Wednesday 28 December 2011

सचिन पिळगावकर

सचिन म्हटलं की मराठी माणसाच्या डोळ्यांपुढे दोन व्यक्तीरेखा उभ्या राहतात. एक म्हणजे खचाखच भरलेल्या मैदानात एका हातात आपली वजनदार बॅट आणि दुस-या हातात हेल्मेट उंचावून आभाळाकडे पहात देवाचे आणि वडिलांचे आशिर्वाद मागणारा सचिन तेंडूलकर; आणि दुसरा म्हणजे पडद्यावर आणि पडद्यामागेही आपल्या स्मीतहास्याने आणि सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणारा सचिन पिळगावकर. मराठी माणसाने या दोन्ही सचिनवर भरभरून प्रेम केलंय आणि हे दोन्ही सचिनही मराठी माणसावर मनापासून प्रेम करतात.
म्हणुनच कारकिर्दीला वीस वर्षे पुर्ण झाली तरीदेखील सचिन तेंडूलकर आबालवृद्धांसाठी 'सचिन' किंवा 'तेंडल्या'च आहे आणि पन्नास वर्षांपासून मनोरंजनविश्व गाजवल्यानंतरही सचिन पिळगावकरदेखील सर्वसामान्यांसाठी 'सचिन'च आहे. खरं म्हणजे पुढच्या वर्षीच्या १७ ऑगस्टला जेव्हा सचिन आपला ५५वा वाढदिवस साजरा करेल, त्या आधीच येत्या फेब्रुवारी महिन्यात त्याने चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीची पन्नाशी पुर्ण केलेली असेल. ईतक्या लहान वयात आजवर कुणीच करू शकले नाही असा हा विक्रम सचिन पिळगावकर नावाच्या अष्टपैलु व्यक्तीमत्त्वाच्या नावावर जमा व्हावा ही आश्चर्याची गोष्ट मुळीच नाही. चित्रपटसृष्टीचे सर्व पैलू - अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संगीत, गायन, नृत्य, संपादन, वितरण, जाहिरात आणिही बरंच काही - सचिनने केवळ जवळून अभ्यासलेच नाहीत, तर या सर्व विभागांत देदिप्यमान यशही मिळवून दाखवलंय.  उतरती कळा लागलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला सावरणा-या, जगवणा-या आणि फुलवणा-या काही मोजक्या निर्माता-दिग्दर्शकांमध्ये सचिनचं नाव अग्रणी आहे. उणेपुरे साडेचार वर्षाचे वय असतांना पडद्यावरच्या पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या या मुलाचा जन्मच मुळात चित्रपटसृष्टीसाठीच झाला आहे, असंच  आता म्हणावं लागेल.
सचिनचं 'पिळगाव' हे जरी गोव्यातलं असलं तरी त्याचा जन्म मात्र मुंबईचा. वडिल शरद पिळगावकर हे तेव्हा एक छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिनच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या शरदरावांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं. 'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही.
त्याचा लोभस चेहरा आणि अभिनयाची असलेली उपजत जाण यांच्या बळावर बालकलाकार म्हणुन त्याला अनेक भुमिका मिळत गेल्या. ज्वेल थिफ, ब्रम्हचारी, मेला -- एकामागोमाग एक ६५ चित्रपट झाले. ज्युनिअर मेहमुद बरोबर सचिनची जी जोडगोळी जमली, ती जवळपास पंधरा चित्रपटांत सोबत होती. बालकलाकारांच्या वाट्याला मोठे झाल्यानंतर येणारी भयंकर उपेक्षा सचिनच्या वाट्याला कधीच आली नाही याचं कारण म्हणजे त्याच्या वडिलांनी मोठ्या कल्पकतेने उचललेली पावले होत.
सचिनच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीचा मिळालेला मुक्त वावर शरदरावांनी सचिनचं व्यक्तीमत्त्व फुलवण्यासाठी वापरला. मोठमोठ्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी ओळख करून त्यांनी सचिनला त्यांच्या सहवासात ठेवला. केवळ अभिनयच नव्हे, तर कॅमेरा हॅण्डलींगपासून ते लाईट लावण्यापर्यंत सगळी कामं त्याने खुप जवळून पाहिली. शरद पिळगावकरांनी मराठी चित्रपटांची निर्मीतीही यादरम्यान सुरू केली होती. ते चित्रपटांची कथाही लिहायचे आणि संवादही. दरम्यानच्या काळात त्यांनी 'गीत गाता चल' नावाची एक गोष्ट लिहली होती. रविन्द्रनाथ टागोरांच्या एका कथेवर आधारित हा चित्रपट मराठीत बनवणे म्हणजे मोठे जिकरीचे काम होते. मधुसूदन कालेलकर यांच्या मदतीने ही कथा राजश्री प्रॉडक्शन्सच्या दरबारात मांडण्यात आली. राजश्रीने ही कथा विकत घेतली आणि सचिन या चित्रपटाचा हिरो बनला. आणि मग सुरू झाला त्याचा सुवर्णकाळ!
राजश्री प्रॉडक्शनमध्ये संगीतकार रविन्द्र जैन, निर्माते दिग्दर्शक ताराचंद बरजात्या यांच्यासारख्या दिग्गजांच्या हाताखाली सचिन घडत गेला. त्याच्यातील उपजत जिज्ञासु वृत्तीमुळे त्याने स्वतःला अभिनयापुरतंच मर्यादित ठेवलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतून मराठीत येणं ही जशी सचिनच्या बाबतीत घडलेली वैषिष्ट्यपुर्ण घटना आहे, तशीच हिंदी चित्रपटसृष्टीत त्याला मिळालेलं मानाचं स्थान ही देखील आहे. बालकलाकार म्हणुन प्रवेश केल्यामुळे कमी वेळातच सचिनचा चेहरा चित्रपटसृष्टीसाठी परवलीचा झाला. अगदी लहानपणापासून दिग्गजांबरोबर काम करतांना शिकता येईल तेवढं सगळं त्यानं आत्मसात केलं. शिवाय मुळात चित्रपटसृष्टीला समांतर अशी एक अभ्यासकाची  भुमिका सचिन सतत करत आलेला आहे. त्यामुळे सहाजीकच त्याचं अनुभवविश्व समृद्ध झालं. सिप्पींपासुन ते हृषिकेश मुखर्जींपर्यंत सगळ्यांनी या मराठी मुलाचं स्वागतच केल आणि मग हा मुलगा मराठी व हिंदी दोन्ही भाषांच्या माध्यमांत मस्त, स्वच्छंदपणे वावरला!
हिंदीत व्यस्त असतांनादेखील शरद पिळगावकरांनी जेव्हा 'अष्टविनायक' बनवायला घेतला, तेव्हा सचिनने मराठीसाठी वेळ काढला. १९८२ मध्ये आलेल्या 'नदिया के पार' ने तर सगळे विक्रमच तोडले. शिवाय मसाला हिंदी सिनेमांमध्ये सत्ते पे सत्ता आणि शोलेमधल्या भुमिकांनी सचिनसाठी हिंदीत अढळ स्थान निर्माण केलं.
मराठी चित्रपटांत हिरोला चेहरा नसतो. आपल्या मातृभाषेतला रसातळाला चाललेला चित्रपट जगवला पाहिजे, या हेतूने सचिनने मराठीत सिनेमा बनवायचं ठरवलं. १९८२ मध्ये 'आईबाप' या चित्रपटासहं त्यानं रूपेरी पडद्यावर आगमन केलं. त्यानंतर सव्वाशेर, नवरी मिळे नव-याला, आणि गम्मत जम्मत आले. नवरी मिळे नव-याला च्या दरम्यान त्याला खरोखरच सुप्रियाच्या रूपाने एक अनुरूप नवरीदेखील मिळाली.
त्यानंतर आलेल्या शांताराम सन्सची निर्मिती असलेल्या 'अशी ही बनवाबनवी' ने मराठी चित्रपटांचे सगळे रेकॉर्डसच तोडले. लक्षा अशोक आणि सचिनची धम्माल असलेला हा सिनेमा आजही तेवढाच एन्जॉय केला जातो. त्यानंतरच्या कादकिर्दीत सचिनने 'आत्मविश्वास' सारखा गंभिर विषयही तीतक्याच ताकदिने हाताळला आणि आमच्यासारखे आम्हीच मध्ये परत व्यावसायिक यशही मिळवून दाखवलं.
अनेक दर्जेदार, उत्तम व निर्भेळ करमणूक करणारे चित्रपट काढतांनाच नव्याने उदयास येत असलेल्या टिव्ही मालिकांचे माध्यम सचिनच्या जाणकार नजरेतून कसे बरे सुटणार? तू तू मै मै सारखी हास्यस्फोटक मालिका बनवून सचिनने यशाचं आणखी एक शिखर पार केलं! क्षितीज सारख्या गंभीर पण उत्तम हिंदी मालिकाही धाडसाने यशस्वी केल्या आणि हिंदी टेलीविजनच्या यशाने इंडस्ट्रीमध्ये पक्क, आदराचं स्थान निर्माण केलं. जीकडे जावे तीकडे यश मिळवायचं हा फॉर्मुला सचिनने अगदी 'नच बलीये' या रिऍलिटी शो मध्ये विजयी होण्यापर्यंत कायम ठेवला.
या दरम्यान त्याने काढलेल्या नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, आणि आय़डियाची कल्पना या चित्रपटांच्या दर्जावर चर्चाही झाली. आपला अनुभव काय ? गुणवत्ता काय ? कर्तुत्व काय ? हे सगळं विसरून रिऍलीटी शोमध्ये नाचल्याने स्वतःच्या कर्तुत्वाचा, स्थानाचा, स्वतःच्या उत्तमोत्तम कलाकृतींचा आणि रसिकांच्या प्रेमाचा सचिनने अपमानच केलाय, असाही सुर ऐकायला आला. गुरू आणि महागुरू म्हणुन जातांना तो स्वतःचीच बडेजावी करतो, असाही आरोप त्याच्यावर झाला.
मात्र जुने ते न विसरता नवे ते स्विकारावे हा सचिनचा यशाचा फॉर्मुला आहे. आणि तो आजवर सुपरहिट ठरतोय. पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत काय चालतं आणि काय चालत नाही याचा सचिनईतका अंदाज कुणालाच नसावा. येत्या पंचवीस वर्षांत लोक घरीच सिनेमागृह बनवून सिनेमा पाहणार आहेत, त्यामुळे सिनेमा जितका लोकांच्या जवळ गेला तीतकं चांगलं, या हेतूने सचिनने काम सुरू केलं आहे.
सचिनचं वय आणि त्याच्यातलं 'नवतारूण्य' पाहू जाता आणखी पन्नास वर्षतरी तो चित्रपटसृष्टीचा असा पॅरॅलल स्टडी सुरू ठेवेल असं वाटतं. आजपासुन दोन दशकांनंतर कदाचित ईतका दिर्घ काळ चित्रपटसृष्टीची वाटचाल अनुभवणारा, सहा पिढ्यांचा साक्षिदार असा सचिन हा एकमेव कलावंत चित्रसृष्टीत राहिल. अगदी सहा विश्वचषक खेळून गोलंदाजांच्या चार पिढ्या पाहिलेल्या चिरतरूण सचिन तेंडूलकरसारखा.

Monday 19 December 2011

सुदर्शन पटनायक

वाळू! केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना  अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण! अरबी समुद्राच्या वाळवंटातून घडणारं मुंबईतल्या उंचच उंच ईमारतींचं विलोभनिय दर्शन; आणि कुठल्याश्या जवळच्या नदितून ट्रकमध्ये भरून आणलेल्या वाळूचा ढिग आपल्या रिकाम्या प्लॉटवर येऊन पडल्यावर त्या ढिगा-यात दिसणारं 'स्वतःचं घर!'  -- प्रत्येकाच्या मनाच्या एका कप्प्यात आयुष्यभर जपुन ठेवता येतील एवढं एक वाळवंट ही 'वाळू' तयार करत असते. सुदर्शन पटनायकच्या मनातही असं एक खुप मोठं वाळवंट आहे. मात्र ईतरांपेक्षा ते खुप वेगळं आहे. सुदर्शनच्या मनातल्या वाळवंटात सर्जनशिलता आहे. जीवंतपणा आहे. म्हणजेच कला आहे.
'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असं म्हणतात. वरवर पाहता वाळूच्या कणांतून तेल गळणे ही अतिशयोक्ती वाटत असली तरी सुदर्शन पटनायकची वालुकाशिल्पं पाहिल्यावर हे अशक्यही नाही, असा विश्वास वाटायला लागतो. ललितकलांचं माहेरघर असलेल्या ओडिसाच्या भुमिमध्ये, पुरीच्या समुद्रकिना-यावरच्या सोनेरी वाळूत भगवान जगन्नाथाच्या दरबारात त्यानं मांडलेला खेळ आज जगभरातल्या कलारसिकांच्या दृष्टीने आश्चर्य, आदर्श, आणि अनुकरणाचा विषय झालेला आहे.
सुदर्शन पटनायक हे नाव वर्तमानपत्रं वाचणा-यांसाठी नवं मुळीच नाही. वालुकाशिल्पाचा एखादा ऑफबिट फोटो एखाद्या दिवशी जवळजवळ सर्वच वर्तमानपत्रांमध्ये झळकतो, आणि सोबत झळकतं 'सुदर्शन पटनायक' हे नाव. वालुकाशिल्प बनवणा-या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किना-यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकार का खिताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिना-यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युटदेखील स्थापन केले आहे. मात्र जेव्हा सुदर्शनने वालुकाशिल्प बनवायला घेतली तेव्हा त्याला शिकवणारं कुणीच नव्हतं.
जगन्नाथपुरीला राहणा-या एका मध्यमवर्गीय, धार्मिक घरामध्ये १५ एप्रिल १९७७ मध्ये त्याचा जन्म झाला. कुटुंबातले लोक जगन्नाथाचे भक्त. म्हणुन मुलाचं नाव ठेवलं सुदर्शन. घरात तीन भावंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापेक्षा जास्त फारसं काही शिकता आलं नाही. मात्र घरापासून तीन किलोमिटरवर  असलेला पुरिचा समुद्रकिनारा मात्र नेहमी खुणावत असे. सात वर्षाचा असल्यापासून रेतीवरती चित्रे रेखाटण्याचा छंद सुदर्शनला जडला. बारा वर्षाचा झाला, आणि शाळा सुटली ती कायमचीच.  मग काय? समुद्रकिनाराच शिक्षक बनला. सकाळी चार वाजता उठून समुद्रावर जायचं, आणि तांबडं फुटायच्या आत काहीतरी शिल्प बनवून गायब व्हायचं. मग दुपारच्या वेळी वाळुचं शिल्प पाहून येणारेजाणारे लोक काय बोलतात याचं रिपोर्टींग घेण्यासाठी आपल्या भावंडाबरोबर किना-यावर फिरायचं हा त्याचा दिनक्रम बनला
चार वर्ष अशीच गेली. जेवढी घट्ट धरण्याचा प्रयत्न कराल तेवढीच हातातून सुटून जाणा-या या वाळूवर सुदर्शनच्या हातांची पकड मात्र चपखल बसायला लागली. त्याचा हात लागल्यावर रेतीचा ढिगारा काही तासांतच ताजमहाल बनायचा आणि काही तासांतच भगवान जगन्नाथाचा रथ! बलरामदास या संतकवीने चौदाव्या शतकात असेच वाळूचे रथ बनवले होते, तेव्हा भगवान जगन्नाथ स्वतः आपला रथ सोडून त्यात स्थानापन्न झाले होते अशी आख्यायिका आहे. जगन्नाथाच्या कृपेने या सोनेरी वाळूलादेखील आकार घेण्याचं वरदान आहे. मात्र बलरामदासांनर गेल्या सातशे वर्षापासुन या वरदानाचा लाभ घेणारा कुणी प्रेषित मात्र या किना-याला लाभला नव्हता. सुदर्शनच्या रूपाने ती कमतरता भरून निघाली. मात्र सुदर्शनमधील कमतरतांचं काय?
शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडल्यामुळे निट लिहता वाचता देखील येत नव्हतं, तीथे परदेशातून येणा-या पर्यटकांशी संवाद काय साधणार? प्रसिद्धी मिळू लागली होती, नाव व्हायला सुरूवातही झाली होती, पण बोलायचं काय? ते कळतच नव्हतं. सुदर्शनने मग विचार केला. गुरूशिवाय आपण वालुकाशिल्प बनवण्याची कला आत्मसात करू शकतो, तर भाषा का नाही? मग अभ्यास सुरू झाला. ओरीया या आपल्या मातृभाषेबरोबरच बंगाली, हिंदी आणि ईंग्रजींमध्येही त्याने प्राविण्य प्राप्त केलं. आता बिबिसी पासुन ते एनजीसिपर्यंत सगळ्या चॅनल्सला तो ईंग्रजीत मुलाखत देतो, जगभर प्रवास करतो, आणि सातासमुद्राच्या किना-यांवर आपल्या कलेचा आविष्कार घडवून आणतो. सुदर्शनचं वालुकाशिल्प विद्यालय या कामात त्याला मदत करतं.
१९९५ साली, उणेपुरे अठरा वर्षाचा असतांना आकाशाच्या छपराखाली आणि समुद्रकिना-याच्या गालीचावर बसुन दोन विद्यार्थ्यांसह सुरू केलेलं हे विद्यालय. आजही या विद्यालयाला भिंती, दरवाजे किंवा साधं कुंपणदेखील नाही. गुरूकुल पद्धतीने चालणा-या या विद्यालयात आज विद्यार्थ्यांची संख्या आहे पासष्टच्या वर! जगभरातून विद्यार्थी, पर्यटक येत असतात आणि काहीतरी नवीन कल्पना सुदर्शनला देत असतात. या नव्या कल्पनेला सुदर्शन टच मिळाला की तयार होते ती अप्रतीम कलाकृती. लोक कॅमेरा घेऊन धावतच येतात. कारण खरं पाहता वालुकाशिल्प ही क्षणभंगुर कला आहे. काही तास, काही दिवस, किंवा काही महिन्यांच्या वर वालुकाशिल्प टिकत नाही. पण तसं पाहिलं तर आयुष्याचं शिल्पही कायम टिकणार नसतं. म्हणुन काय आपण जगणं सोडतो का?;
कलेकडे भक्ती आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टीने पहात असतांनाच ऐतीहासिक दृष्टीनेही सुदर्शनने पुष्क़ळ अभ्यास केलेला आहे. कॅनडा, अमेरिका आणि ईतर युरिपियन देशांबरोबरच रशियामध्येदेखील वालुकाशिल्प ही कला आज लोकप्रिय आहे. मात्र सुदर्शनच्या मते याचा उदय आणि विकास भारतात, पुरिच्याच सोनेरी समुद्रकिना-यावर झालेला आहे. जगन्नाथपुरीच्या वाळवंटात रुजलेली आणि वाढलेली ही वालुकाशिल्पाची कला त्याता आता जगभर पोचवायची आहे.
यासाठी जागतीक महत्त्वाचे अनेक विषय तो आपल्या शिल्पांच्या माध्यमातुन हाताळत असतो. ग्लोबल वॉर्मींग, सेव्ह टायगर, सेव्ह गर्लचाईल्ड, एड्स जनजागृती यांसारखे सामाजीक विषय असोत किंवा ओसामा बीन लादेन ची हत्या, मायकल जॅक्सनचा अकस्मात मृत्यु यांसारख्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी असोत, सुदर्शन आपल्या सहका-यांसह वालुकाशिल्पांच्या माध्यमातुन हे विषय कल्पकतेने मांडतो आणि मग आपोआपच जागतीक स्तरावर त्याला प्रसिद्धी मिळते.
पुरस्कारांबद्दल बोलावे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही शेकडो पुरस्कार त्याला मिळाले आहेत. बर्लिनपाठोपाठ रशियाच्या समुद्रकिना-यावर बनवलेल्या त्याच्या कलाकृतीला 'पिपल्स चॉईस' पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं करणा-या या कलाकाराला आपल्या देशाच्या सरकारने मात्र अजुन पद्म पुरस्कारही दिलेला नाहीय. पुरीला 'सॅण्ड पार्क' तयार करण्याचं त्याचं स्वप्न आहे. यासाठी किना-यावरील थोडी जागा तो विकत किंवा लिजवर घ्यायला तयार आहे. मात्र राज्यसरकारने अजुन ते देखील केलेलं नाही. असो.
वयाच्या पस्तीशित आल्यावर आता सुदर्शनला स्पॉण्डेलायटिसने त्रास देणे सुरू केले आहे. मात्र उत्साह ओसरलेला नाही. काम सुरू ठेवायचं आहे. आता तो एकटाही नाही. त्याच्या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी त्याच्याबरोबर आहेत. सॅण्डईंडिया डॉट क़ॉम या वेबसाईटमुळे जगभरातील कलारसिक त्याच्याशी जुळत आहेत. गेल्या सत्तावीस वर्षांपासून अखंड सागरसाधना करत असलेल्या या अवलीयाचं पाऊल वाळूत असं काही उमटलंय की सातासमुद्राच्या लाटांनाही त्याची खुण मिटवावीशी वाटणार नाही.

Tuesday 13 December 2011

डॉ वर्गीस कुरियन

ताज्या घडामोडींवर आधारीत आपल्या वैषिष्ट्यपुर्ण जाहिरातीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'अमुल' डेअरी प्रोडक्टसतर्फे २६ नोव्हेंबर या दिवशी एक खुप वेगळी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये झळकली. 'अमुल' ची शुभंकर असलेली मुलगी एका ज्येष्ट व्यक्तीला गुलाबाचे फुल देत आहे. फिकट गुलाबी रंगाचा साधा शर्ट आणि पॅण्ट घातलेल्या या व्यक्तीने गायीच्या एका बछड्याला उचलून छातीशी कवटाळले आहे, आणि मागे आहे 'अमुल' ची भलीमोठी फॅक्ट्री. पंचलाईन आहे - 'वी प्रेझेंट नांईन्टी कॅण्डल्स टू द मिल्कमॅन ऑफ ईंडिया'! आणि ही व्यक्ती म्हणजे 'अमुल' सह एकुणच भारत देशातील दुध उत्पादकांचे भिष्म पितामह - पद्मविभुषण डॉ वर्गीस कुरियन!
'अमूल', 'धारा', 'आणंद', 'ऑपरेशन फ्लड' ही नावं ही नावं न ऐकलेली व्यक्ती विरळाच. या नावांना प्रत्येक भारतीयाच्या घरात आणि जगभरात मानाचं आणि आपुलकीचं स्थान मिळवून दिलं ते वर्गीस कुरियन यांनी. भारतीय धवलक्रांतीचे ते जनक! भारताला दुग्धोत्पादन आणि खाद्यतेलाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं संपूर्ण श्रेय डॉ. कुरियन यांचे आहे. जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश म्हणून भारताला घडवण्यात त्यांनी उभारलेल्या संस्थांचा फार मोठा वाटा आहे.
चौकस, ज्ञानी, कल्पक, मेहनती आणि देशाभिमानी पुत्रांनी केलेल्या मोलाच्या कर्तृत्त्वानेच देशाची मान जगात गर्वाने उंच होत असते. डॉ कुरिअन शिक्षणाने मॅकॅनिकल ईंजिनिअर, आणि व्यवसायाने डेअरीचे व्यवस्थापक. मनाने मात्र जनमानसाची व्यथा ओळखणारे आणि मोठी स्वप्न पाहतानाच त्याच्या परिपुर्तीसाठी झटणारे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व. अष्टपैलू यासाठी की ते यशस्वी उद्योजकही आहेत, सहकारक्षेत्रातील अध्वर्युही आहेत, समाजशास्त्राचे जाणकार आहेत, पर्यावरणवादी असण्याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचेही पुरस्कर्ते आहेत, परिवर्तनवादीही आहेत, राजकारणाचे अभ्यासक आहेत, उत्तम लेखक आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम शिक्षक आहेत.
केरळमधील कोझिकोडे येथील एका सामान्य मध्यमवर्गीय केरलाईट ख्रिश्चन कुटुंबामध्ये जन्मलेल्या-वाढलेल्या मुलाने गुजरातमधल्या कुठल्यातरी छोट्याश्या 'आणंद' गावी जाऊन आपल्या कामाची चुणुक दाखवावी. नव्हे  आपल्या कर्तृत्त्वाने देशाच्या दुग्धोत्पादन क्षेत्राचा चेहरामोहराच बदलवून टाकावा ही गोष्ट चमत्कारसदृष्य़च वाटते ना? पण तो काळच तसा होता असं म्हणावं लागेल. देश आणि देशवासियांप्रती त्या काळात असलेली तळमळ तेव्हा असे चमत्कार घडवतच असे. नवेनवेच स्वातंत्र्य मिळाले होते ना तेव्हा!
म्हणुनच चेन्नईला ईंजिनियर बनुन आणि मिशिगन विद्यापिठात उच्च शिक्षण घेऊन ऐन उमेदिच्या काळात वर्गीस कुरिअन भारतात परत आले. जमशेदपुरला टाटांच्या विद्यापिठात ईंजिनिअरिंगची सामाजीक बाजु अभ्यासतांनाच देशात नव्यानेच स्थापन होउ बघत असलेल्या डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी ते बंगलोरला गेले. पुढचा मार्ग खुपच अनवट होता. वाट बघावी लागणार होती. सरकारी नोकरी मिळाली ती डेअरी डिपार्टमेन्टमध्ये आणि पहिली पोस्टींग मिळाली ती गुजरातमधील आणंद येथे.
एका छोटेखानी सरकारी फॅक्ट्री मध्ये दुधापासून भुकटी बनवण्याचं काम चालायचं. 'म्हशीच्या दुधाची भुकटी होऊच शकत नाही' असं जगभरातील शास्त्रज्ञांनी ठासून सांगितलं असूनसुद्धा डॉ. कुरियन यांनी हा प्रकल्प आणंदला यशस्वीरित्या राबवला. सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांच्यातील ही चुणुक हेरली. आणंदला सरदार पटेल यांनी स्थापना केलेल्या कैरा डिस्ट्रीक्ट को ऑपरेटीव्ह मिल्क प्रोड्युसर्स संघाची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. जबरदस्त इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी आणंदला जगाच्या नकाशावर पोहोचवलं. विदेशी आक्रमणाला थोपवत जगातला सर्वांत मोठा खाद्यान्न व्यवसाय उभा करून 'अमूल'सारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या ब्रँडची निर्मिती केली. पुढे काय झालं तो ईतीहास आहे!
१९६५ मध्ये लालबहादुर शास्त्रींनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्डाची स्थापना केली, तेव्हा या महामंडळाचे अध्यक्ष म्हणुन केवळ एकच नाव त्यांच्या डोळ्यांपुढे होतं ते म्हणजे डॉ वर्गिस कुरियन यांचं. सहकारी स्तरावर दुध उत्पादनचा अमुल पॅटर्न मग देशभर राबवला गेला. सावकारी पाश, अनिष्ट रुढी आणि वर्ण-जातिभेदाच्या ओझ्यांतून ग्रामीण जनतेची मुक्तता या माध्यमातून करता आली. शेतकर्‍यांचे आर्थिक हितसंबंध जपणार्‍या आणि ग्रामीण जनतेच्या गरजा भागवणार्‍या ग्रामपातळीवरच्या संशोधन तसंच प्रशिक्षण संस्थांची उभारणी झाली आणि आणि देशात धवलक्रांती आली!
१९७७ साली एच. एम. पटेल यांनी भारताच्या अर्थमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गुजरातचे असल्यामुळे डॉक्टर कुरियन यांचे ते जवळचे स्नेही होते. पटेल यांनी खाद्यतेलांच्या वाढत्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होत असल्याबद्दलची आपली चिंता डॉक्टर कुरियन यांच्याजवळ व्यक्त केली. सहकार तत्त्वाचा पाया असणारा 'आणंद पॅटर्न' खाद्यतेलाच्या क्षेत्रातही वापरता येईल का, जेणेकरून या बाबतीतही देश स्वयंपूर्ण ठरेल, अशी विचारणा केली. आणि 'धारा' च्या ईतीहासाची पायाभरणी झाली. तेलबिया उत्पादक आणि तेलाचे ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून हे 'तेलिया राजे' काम करीत होते. यांची मध्यस्ती मिटवून तेल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही योग्य न्याय मिळावा या उद्देशाने 'धारा' ची निर्मिती झाली. त्यात 'अमुल' ईतकं जरी नाही, तरी ब-यापैकी यश त्यांना मिळालं.
देशात तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे बदल घडवून  आणणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर कुरियन यांची असलेली मैत्री अनेकदा राजकिय चर्चेचा विषय झाली. कॉन्ग्रेसकडे असलेला त्यांचा कल आणि उजव्या पक्षांप्रती असलेली अनास्था यावर देखील राजकिय चर्चा ब-याच झाल्या. मात्र अनेकांना हे माहिती नाही की संघाचे दुसरे सरसंघचालक प.पू गोळवलकर गुरूंजींबरोबर कुरियन यांचा स्नेह खुप जवळचा होता.
संघाने गोहत्येविरोधात उभारलेल्या चळवळीच्या फलस्वरूप १९६७ साली केंद्र सरकारनं गायींच्या संरक्षणाकरता एक उच्चाधिकार समिती नेमली होती. 'एनडीडीबी'चा अध्यक्ष या नात्यानं डॉक्टर कुरियन त्याचे सभासद होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सरकार यांची समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. सभासदांमध्ये होते पुरीचे शंकराचार्य, म्हैसूरच्या 'सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट'चे संचालक एच ए बी पारपिया आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरूजी! या समितीच्या बैठका तब्बल १२ वर्षापर्यंत नियमीत होत राहिल्या. यात  हरिणाजिन वापरणा-या शंकराचार्यांचा गोहत्येबाबतचा धार्मिक दृष्टीकोन कुरियन यांच्यामधील व्यावसायिक डेअरी डेव्हलपरला पटला नाही. प पु गुरूजींचा राष्ट्रवादी दृष्टीकोन मात्र त्यांच्यातील देशभक्त भारतीयाला पटला.
आपल्या आत्मचरित्रात ते लिहतात -- गुरूजी म्हणाले, "गोहत्याबंदीचा अर्ज संघाने दाखल केला, तो सरकारला अडचणीत आणण्यासाठी मात्र जनतेने याला पाठींबा दिला तो उपजीविकेचं साधन असलेली आपली गाय वाचवण्यासाठी! गायीमध्ये देशाला एकत्र आणायची ताकद आहे. भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक आहे. तुम्ही गोहत्याबंदीसाठी या समितीत माझ्याशी सहमती दर्शवा आणि मी तुम्हांला वचन देतो, त्या तारखेपासून ५ वर्षांत मी देशाला एकत्र आणलेलं असेल. आपल्यातलं भारतीयत्व जागृत करण्यासाठी मला गायीचा उपयोग करून घ्यायचा आहे," -- गुरूजींच्या व्यक्तीमत्त्वाचा चा प्रभाव त्यांच्यावर एवढा होता की समितीमध्ये त्यांनी गोहत्याबंदीचे समर्थन केले. भ्रष्टाचार, दहशतवाद बळावलेला असुनही आपला हा देश कोलमडून पडत नाही, कारण जातिधर्माच्या पलीकडे समष्टीच्या कल्याणाच्या ध्येयानं प्रेरित अशी डॉ कुरियन यांच्यासारखी माणसं जी कामं उभी करतात, त्यांतून मोठी प्रेरणा मिळत राहते.
याच सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि देशावरील आत्यंतिक प्रेम या गुणांच्या जोरावर डॉ कुरियन यांनी गुजरातेतल्या आणि नंतर देशभरातल्या दुग्धोत्पादक शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण बनवले.'विलक्षण द्रष्टेपण, बांधिलकी, निष्ठा आणि राष्ट्रीयत्वाची ज्वलंत भावना असणारे एक हजार कुरियन मिळाले असते, तर आपला देश आज कुठल्या कुठे असता,' -- कुरियन यांच्याबद्द्ल रतन टाटा यांचं हे विधान बरंच काही सांगून जातं.

Saturday 10 December 2011

सायरस मिस्त्री

रतन टाटांच्या निवृत्तीनंतर टाटा उद्योगसमुहाची जबाबदारी कुणावर य़ेणार या गोष्टीची उत्सुकता टाटांचं मीठ खाणा-या, टाटांचा फोन वापरणा-या, टाटांच्या बसमध्ये प्रवास करणा-या, टाटांच्या हॉटेलमध्ये रहाणा-या, टाटांच्या आयटी, कम्युनिकेशन, इंजिनिअरिंग, स्टील आणि इतर कंपन्यांमध्ये कॅम्पसमधुनच सिलेक्ट होण्याची ईच्छा असणा-या, -- म्हणजेच एकुणच सर्वच क्षेत्रातील भारतीयांना बरेच दिवसापासुन लागलेली होती. टाटांच्या घड्याळात वेळ बघत आपल्यापैकी अनेकजण ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण मागच्या बुधवारी संध्याकाळी सहा वाजता आला.  'सायरस पालनजी मिस्त्री विल वर्क विथ रतन टाटा ओव्हर द नेक्स्ट इयर अँड टेक ओव्हर फ्रॉम हिम व्हेन मि टाटा रिटायर्स इन डिसेंबर 2012' अश्या आशयाचे ईमेल अलर्टस अनेकांना आले, आणि ४३ वर्षाचा हा खांदानी उद्योजक टाटांच्या चारलाख कोटींच्या साम्राज्याचा वारस होणार हे नक्की झालं.
मुळात उद्योगविश्वात ब-यापैकी परिचीत नाव असलं तरी सायरस मिस्त्री हा अत्यंत लो प्रोफाईल जपणारा मितभाषी आणि हुशार माणुस आहे. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांपैकी अनिल जनमानसांत जास्त परिचीत आहे, मात्र मुकेश उद्योगजगतात जास्त प्रभावी आहे, त्याचप्रमाणे सायरस आपल्या क्षेत्रात ब-यापैकी प्रभावी व्यक्तीमत्त्व आहे. टाटासन्स या टाटांच्या सगळ्यात प्रभावी होल्डींग कंपनिमधील शापुरजी पालनजी मिस्त्री उद्योगसमुहाचे ते प्रतिनिधित्त्व करतात. या समुहाचे भागभांडवल कंपनित सगळ्यात जास्त आहे. शिवाय टाटासन्स हीच कंपनी टाटांच्या ईतर सर्व उद्योगांचे संचलन करते. त्यामुळे सायरस मिस्त्रींची टाटांचे उत्तराधीकारी म्हणुन झालेली निवड आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. मात्र टाटांच्या कार्यपद्धतीप्रमाणे सर्वसंमतीने ती निवड होणे आवश्यक होते. म्हणुनच केवळ कंपनिमध्ये सगळ्यात जास्त भांडवल असणा-या समुहाचा प्रतिनिधी आहे म्हणुनच नव्हे, तर -- धोरणात्मक व्यूहरचना करणारा, कंपनीला नफ्यात आणणारा, मितभाषी, विनोदबुद्धी असलेला, भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा अनुभव असणारा, प्रसिद्धीपासून दूर राहणारा आणि खांदानी वारसा चालवणारा, टाटा समूहाशी परिचित आणि मुख्य म्हणजे पारसी असणारा ह्या सगळ्या निकषांवरही खरा उतरल्यामुळे सायरस मिस्त्रीची निवड पक्की करण्यात आली.
मिस्त्री परिवार आणि टाटा परिवारांचे स्नेहबंधदेखील जुने आहेत. पालनजी मिस्त्री हे सायरस यांचे आजोबा. ईंग्रजांच्या काळात मुंबईतील बांधकामाची कंत्राटे घेऊन ती वेळेत पुर्ण करून देणे हे त्यांचे काम. म्हणुनच त्यांचे आडणावही मिस्त्री झाले असावे. त्यांचे जेष्ट पुत्र शापूरजी यांनीच पुढे शापुरजी पालनजी बांधकाम कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईत काम करतांनाच त्यांच्यापेक्षा काही काळ आधी स्थापन झालेल्या टाटा समुहाशी आधी स्पर्धा आणि नंतर पारशी कनेक्शनमधुन मैत्री करण्याच्या निमित्ताने कंपनिचा संबंध आला. स्पर्धेच्या दरम्यान जेआरडी टाटांचे धाकटे बंधू दोराबजी टाटा यांच्याकडील टाटासन्सचे सर्व शेअर्स पालनजी मिस्त्री यांनी खरेदी केले तर मैत्रीच्या दरम्यान संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने आणखी काही शेअर्स शापुरजी यांनी विकत घेतले. थोडक्यात यामुळे टाटासन्समधील सर्वात जास्त भागभांडवल असणारी कंपनी म्हणुन शापुरजी पालनजीचा उदय झाला.
पुढे शापुरजींनी पेत्सी दुबाष या आयरीश महिलेशी विवाह केला. यायरचा जन्मही आयर्लंडचाच. मात्र शिक्षण वडिलांच्या कर्मभुमित, मुंबईत, झालं.  मुंबईतल्या कॅथ्रेडल अँड जॉन कॉनन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर घराण्याच्या व्यवसायाला साजेसं असं सिव्हील ईंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडन गाठलं. इम्पेरियल महाविद्यालयातून १९९०मध्ये अभियांत्रिकीचे आणि त्यानंतर  लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबिए अशा शिक्षणाच्या पाश्र्वभूमीवर सायरस यांनी शापूरजी पालनजी उद्योगसमूहातच आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. १९९१ मध्ये ते संचालक झाले आणि १९९४ मध्ये व्यवस्थापकिय संचालक. यादरम्यान त्यांचे वडिल शापुरजी यांनी टाटासन्समध्ये आपला जम चांगलाच बसवला होता. टाटासन्सचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये त्यांना 'घोस्ट ऑफ बॉम्बे हाउस' म्हणुन ओळखत असत ईतका त्यांचा 'वट' होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायरसची वाटचाल सुरू झाली.
अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही मिडल-ईस्ट मधील खुप नावाजलेली बांधकाम कंपनी त्यांनी टेक-ओव्हर केली आणि त्यांच्यामधील दुरदृष्टीचा परिचय दिला. पुढे याच कंपनीने दिल्लीच्या मेट्रोरेलसह अनेक मोठमोठी कामे पुर्ण केली. रिलायन्सची जामनगरमधील रिफायनरी, जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आणि ईतरही अनेक मोठमोठी कामे शापुरजी पालनजी या कंपनीनेच केली.
या दरम्यान २००५ मध्ये पंचाहत्तरीत असलेल्या शापुरजी मिस्त्री यांनी टाटासन्समध्ये व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यत्त्वावरून निवृत्ती पत्करली आणि आपला मुलगा सायरसला हे पद मिळावे अशी शिफारस केली. आधी पालनजी यांचा प्रभाव, आणि रतन टाटांशी असलेला शापुरजींचा स्नेह या घटकांमुळे सायरस यांची पुढील वर्षीच टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. आज कोणीही सायरस यांच्याविषयी बापाच्या जिवावर शिलेदारअसा किंवा तशा आशयाचा उल्लेख करत नाही. मितभाषी, हुशार, निर्भीड सायरस यांनी नंतर टाटा सन्सच्या इतर संचालकांवर आणि विशेषत: रतन टाटांवर प्रभाव पाडला. टाटांप्रमाणेच तेही पारशी असल्याचा फायदा झालाच.
टाटांनी आपला उत्तराधिकारी नेमण्यासाठी तयार केलेल्या समितीचे सायरसदेखील एक सदस्य होते. युनिलिव्हरचे माजी अध्यक्ष केकी दादीसेठ ते पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नूयी यांच्या नावांपर्यंतचा विचार टाटांच्या उत्तराधिकारीपदासाठी झाला. तब्बल १४ उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या. मात्र जेव्हा आपल्यामधीलच एक सायरस मिस्त्री या नावाची चर्चा सुरू झाली, तेव्हा मिस्त्रींनी स्वतःहूनच समितीच्या बैठकीला उपस्थीत राहणे बंद केले. यावरून त्यांच्यामधील टाटा या ब्रॅण्डनेमला साजेसं 'जंटलमॅन स्पीरिट' दिस्रुन येतं.
वैयक्तीक आयुष्यातही रतन टाटांप्रमाणेच त्यांची रहाणी साधी आहे. रतन टाटा नागपूरला आले, तेव्हा केवळ तीन गाड्यांचा त्यांचा ताफा होता, आणि साधा कॉटनचा शर्ट आणि फॉर्मल ट्राउझरवर त्यांनी पत्रकारांशी हिंदीतुन संवाद साधला होता. सायरस मिस्त्रींचंही ब-यापैकी तसंच काम आहे. त्यांचे सुटीचे दिवस पत्नी रोहिका (प्रसिद्ध विधिज्ञ मोहम्मदअली करीम छागला यांची नात ) आणि दोन मुले यांच्याबरोबर घालवायला आणि रूचकर जेवण जेवायला त्यांना आवडते. गोल्फ खेळणे आणि जुनि गाणी एकणे हे त्यांचे छंद आहेत. एकुणच टाटांचा वारस म्हणुन अंगी असायला हवेत ते सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत.
शिवाय एक महत्त्वाचा मुद्दा आहे. टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या नावाची चर्चा त्यांचे वारस म्हणुन होणे सहाजीकच होते. टाटा परिवारातील असलेल्या नोएल यांना डावलून परिवाराबाहेरील कुणाची नियुक्ती ही पारिवारिक कलहाला कारण ठरू शकत होती, मात्र सायरस मिस्त्रींच्या बाबतीत ते होणे नाही. याचं कारण म्हणजे सायरस यांची मोठी बहिण आलु ही नोएल टाटांची पत्नी आहे. त्यामुळे 'सारी दुनिया एक तरफ-जोरू का भाई एक तरफ' या नितिप्रमाणे नोएल टाटा हे देखील सायरस यांच्या नियुक्तीमुळे खुष असणार आहेत.
वयाच्या कमीत कमी ६५ व्या वर्षापर्यंत म्हणजे येती जवळपास दोन दशके सायरस मिस्त्री टाटा साम्राज्याच्या उत्तराधिकारीपदावर राहणारे पहिलेवहिलेच 'अ-टाटा' असणार आहेत. (या यापूर्वीचे अध्यक्ष नौरोजी सकलतवाला १९३२ ते ३८ या काळात अध्यक्ष होते.) भारताची जागतीक ओळख असलेल्या टाटा समुहाला नवी दिशा देण्याची त्याच्यावर आलेली जबाबदारी ते अशी पार पाडतात यावर टाटा या ब्रॅण्डकडे आशेने पाहणा-या हजारो भारतीय युवकांपासुन ते टाटांचं मिठ खाणा-या कोट्यावधी भारतीय नागरिकांचे डोळे लागलेले असतील यात शंकाच नाही.

Wednesday 30 November 2011

नृत्यदिग्दर्शनातील 'सुबल' सरकार

कलकत्त्यावरून एक मुलगा सुमारे साठ वर्षापुर्वी मुंबईत आला. नृत्याची त्याला आवड होती, कलाकार बनण्याची ईच्छाही! मुंबई नगरीने त्याची परिक्षा घेणं सुरू केलं.  फेरीवाला, फळविक्रेता बनुन त्याने रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. मात्र हार मानली नाही. कारण त्याच्या नावातच 'बल' होतं.
हाल-अपेष्टा सोसुन आलेलं मनोबल, कलेची तपस्या करून आलेलं तपोबल, आणि ईश्वरावरील अतुट श्रद्धेमुळे आलेलं आत्मबल या सगळ्यांनी त्याचं 'सुबल' हे नाव सार्थक केलं. एक दिवस सुबल हा मुलगा सरकार बनला! मराठी चित्रपटातील आजवरचा सगळ्यांत मोठा नृत्यदिग्दर्शक! सुबल सरकार!  त्यांच्या जाण्याने पदन्यासाचे पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
सुबलदांचं आयुष्य म्हणजे एक चित्रपटच. अनेक अतर्क्‍य गोष्टी त्यात आहेत. त्याला असंख्य वळणं आहेत. बांग्लादेशातल्या कोणत्या खेड्यात नेमका कुठल्या दिवशी त्यांचा जन्म झाला हे त्यांच्याही लक्षात नव्हतंच कधी. बहुधा १९३५ साली जन्म झाला असावा. देशाची फाळणी झाली आणि पुर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मधून त्यांना निर्वासित म्हणुन भारतात यावं लागलं. घरची परिस्थीती फारच बेताची होती, त्यातही आता बेघर व्हायची वेळ आली. कलकत्यातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये दिवस कंठतांना आपल्या खेड्यातील घरात केलेला नृत्याचा सराव नऊ दहा वर्षाच्या सुबलला खुप आठवत असे. नृत्याची आवड कशी लागली हे माहिती नाही, मात्र नृत्याशिवाय आणखी कश्याचीही आवड लागलीच नाही, हे देखील तेवढंच खरं.
जवळपास दहा वर्षं वेगवेगळ्या "कॅंप'मध्ये राहून काढली. हे जिणं शेवटी असह्य झालं आणि एके दिवशी आई-वडिलांच्या पाया पडून "थोडंसं फिरून येतो" असं सांगुन थेट रेल्वे स्टेशन गाठलं. मुंबईची गाडी पकडली.
त्या काळात मुंबईत पळून येणाऱ्या बंगाली मुलांना हेरून त्यांना कामाला लावण्यासाठी एक "टीम'च कार्यरत होती. दुसऱ्याच दिवसापासून त्यांना फेरीवाल्याचं काम मिळालं. एखाद्या स्टुडिओसमोर उभे राहून फळं विकायची! जातायेता कुणी दिसतंय का?, ते पहायला. कलाकारांना आपल्याच तो-यात जाता-येतांना पाहून सोळा सतरा वर्षाचं ते शिडशिडित पोर हरखुन जायचं. त्याला वाटायचं की आपणच या सगळ्यांना पाहतोय. मात्र त्याच्याकडेही कुणीतरी पहात होतं.
एक दिवस व्हीटी स्टेशनबाहेर एके दिवशी चिकू विकत बसला असतांना एक गाडी समोर येऊन थांबली. त्यातून एक उंच, हॅट घातलेला माणूस बाहेर पडला. "चिकू कैसे दिया?' हा त्याचा प्रश्‍न. "छह आना डझन।" "घर से भागके आया क्‍या ?' त्या व्यक्तीचा दुसरा प्रश्‍न. मुलाने होकारार्थी मान डोलावली. तेव्हा या व्यक्तीनं त्याला चिकूच्या टोपली सकट गाडीत बसायला लावलं आणि आपल्या घरी आणलं. हे सर्व घडेपर्यंत आपण ज्या व्यक्तीशी बोलतो आहोत, ती व्यक्ती म्हणजे सचिन शंकर आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती. या काळातील कलासृष्टी गाजवणारा नृत्यदिग्दर्शक! सचिन शंकर म्हणजे कलाक्षेत्रात येण्याचा महामार्गच! नशिब फळफळलं आणि हा महामार्ग सुबलला मिळाला.
सचिनदांच्या किचनमध्ये सुबलची राहण्याची व्यवस्था झाली. त्यांच्या सहवासात कलाक्षेत्राचा परिचय जवळून होत गेला. खरं तर ते काही सिनेमातले हीरो नव्हते; पण ते रस्त्यावर उतरले की सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे वळून पाहायचे. तेव्हा नृत्यदिग्दर्शक बनण्यामागचं ग्लॅमर सुबलच्या लक्षात आलं. त्यांच्या अनेक गोष्टींची नक्कल करायला मग त्यानं सुरवात केली. पांढरे कपडे हा देखील त्यातलाच एक भाग. पुढे ही सुबलदांची ओळख बनली. पांढरा पायजमा, पांढरा कुर्ता !
सचिनदांच्या हाताखाली नृत्याचे धडे गिरवतांना त्यांच्यासारखाच दिसणारा, तसेच कपडे घालणारा मुलगा कधी  'एस.एस.नं. २' बनला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. 'बॅले' ही तेव्हा सचिन शंकर यांची खासियत होती. त्यांच्या बॅले ट्रुपमध्ये डान्सरचं, आणि नंतर सहायक नृत्यदिग्दर्शकाचं काम सुबलदांना मिळालं. देशभर दौरे झाले. विदेशात जाण्याचीही संधी मिळाली. देशात फिरत असतांना सामान्य माणसाचे लोकनृत्यावर जास्त प्रेम असते ही जाणीव त्यांना झाली. मनात आपोआपच लोकनृत्यप्रकारांप्रती आकर्षण निर्माण झालं.
हेलसिंकीच्या दौऱ्यावर असतांना एक दिवस कोळी नृत्य करायचं होतं. त्यासाठी एक जण त्यांच्याकडे लुंगी मागायला आला. लुंगी दिल्यावर त्यानं टोपी मागितली. मग बनियन मागितलं. त्याच्या मागण्या काही संपत नव्हत्या. आता आणखी मी काय देणं बाकी आहे, असे भाव चेहऱ्यावर आणुन सुबलदांनी एक रागीट लुक त्या व्यक्तीला दिला आणि तो माणुस पसार झाला. कार्यक्रम सुरू झाला. सुबलदांनी दिलेल्या कपड्यातल्या त्या माणसाने "होशियार' असा नारा दिला आणि नंतर अख्खं स्टेडियम जागच्या जागी उभं राहिलं. सात-आठ मिनिटं हा माणूस गायला आणि अवघा आसमंत त्यानं भारून टाकला. हा माणूस दुसरातिसरा कोणी नसून होते ते शाहीर अमर शेख!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुबलदांना महान व्यक्तिमत्त्वं भेटत गेली, त्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अमर शेख. त्यांच्या माध्यमातून सुबलदांना सामान्य जनतेचं जीणं जाणण्याची संधी मिळणार होती. त्यांच्याकरीता पुर्णतः  अपरिचीत अश्या महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी त्यांचा परिचय होणार होता. बंगाली-हिंदीत बोलणारे सुबल सरकार  आता अस्खलीत मराठीत बोलणारे 'दद्दू' होणार होते. यासाठी सचिन शंकर यांची साथ मात्र सोडावी लागणार होती.
"आप का पैर मेरे हक का पैर है । जब मैं चाहूँ तब नतमस्तक हो जाऊँगा ।" या शब्दात त्यांनी आपल्या पित्यासमान असलेल्या गुरूचा निरोप घेतला आणि शाहीरांकडे काम सुरू केलं. सचिनदांकडे त्यांना मिळायचे चाळीस रूपये! तर शाहिरांच्या फडात मिळायचे चार रूपये! मात्र हा 'घाट्याचा सौदा' त्यांनी सहर्ष स्विकारला.
शाहिरांमुळे सुबलदा अख्खा महाराष्ट्र पालथा घालू शकले. कॉ. डांगे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे अशा मोठमोठ्या माणसांचा सहवास त्यांना मिळाला. गावोगावी दौरा केल्यामुळेच त्यांना मराठी माणसाची नस ओळखता आली. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा होता. सुबलदां केवळ याच लढ्यात नव्हे, तर गिरणी कामगारांच्या लढ्यात धरणे, मोर्चा, उपोषण अशा विविध अंगाने ते सहभागी झाले होते. महाराष्ट्रावर त्यांनी भरभरून प्रेम केलं. आणि महाराष्ट्रानेही त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं.
एके ठिकाणी स्थिर राहणं हा सुबलदांचा स्वभाव नव्हता. म्हणूनच अमर शेख यांच्याबरोबर काम करून झाल्यानंतर स्वतःची "सुबल सरकार डान्स युनिट' ही संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे "माझं गाव' हा बॅले सादर केला जायचा; पण मनानं कलावंत असणाऱ्या सुबलदांना आर्थिक गणितं सोडवता आली नाहीत आणि ही कंपनी त्यांना बंद करावी लागली. मग अर्थार्जनासाठी पुढे त्यांनी "ग्रुप डान्सर' म्हणून नवीन भूमिका स्वीकारली.
अश्यातच एक दिवस निर्माते अशोक ताटे यांनी त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातील चार गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी दिली. नृत्यदिग्दर्शक म्हणुन त्यांच्या प्रवासाला प्रारंभ झाला. मग काय झालं तो ईतीहासच आहे!
अगदी भालजी पेंढारकर, राजा ठाकूर, हृषीकेश मुखर्जी यांच्यापासून दादा कोंडकेंपर्यंतच्या सर्व दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. 'राजश्री प्रॉडक्‍शन' चे तब्बल १७ चित्रपट केले. दाक्षिणात्य भाषा सोडल्या तर इतर सर्व प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं. शेकडो कलाकारांना नाचविलं. एक काळ असा होता की सुबल सरकार यांच्याशिवाय एकही मराठी सिनेमा होत नसे. १९६०-७० च्या दशकापासून अगदी २०१० पर्यंत प्रत्येक मराठी दिग्दर्शक, निर्मात्याबरोबर सुबलदांनी काम केलं. त्याचं फळही मिळालं. तब्बल सहा राज्य चित्रपट पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. दादासाहेब फाळके अकादमीने त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मान केला तर, राज्य सरकारने त्यांना सांस्कृतिक पुरस्काराने गौरवले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार त्यांना २००७ साली देण्यात आला. यावर्षी (२०११) महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवले. रसिकांचं प्रेम मिळालं. आज त्यांचा मुलगा आणि मुलगी या क्षेत्रात खूप चांगलं काम करताहेत.
सुबलदांचा पुनर्जन्मावर विश्वास असल्यामुळे ते म्हणायचे की, मला पुढचा जन्म याच महाराष्ट्रात मिळो. त्यांची ही ईच्छा पुर्ण व्हावी हीच त्यांना श्रद्धांजली.

Wednesday 16 November 2011

रविन्द्र जैन

त्यांचं संगीत लोकसंगीताप्रमाणे स्वयंभु वाटावं, शब्द मंत्रोच्चाराप्रमाणे सुत्रबद्ध वाटावे, आणि स्वर आकाशवाणीप्रमाणे अढळ वाटावा,  अशी सामर्थ्याची त्रीसुत्री परमेश्वराने रविन्द्र जैन नावाच्या व्यक्तीला अर्पण करून आता सात दशकं होत आलीत. रामायण आणि भगवतगीता टिव्हीच्या माध्यमातून त्यांच्याच शब्दांतून ऐकलेल्या-समजलेल्या युवा पिढीसाठी रविन्द्र जैन कथा-व्यास आहेत, अभिजात संगीताच्या चाहत्यावर्गासाठी रविन्द्र जैन आदर्श संगीतकार आहेत, गीतलेखनाला साहित्यलेखन मानणा-यांसाठी रविन्द्र जैन जेष्ठश्रेष्ट कवी आहेत तर संगीतक्षेत्रात नव्याने येऊ ईच्छीणा-यांसाठी रविन्द्र जैन हे सरस्वतीचं देऊळ आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यांच्यावर प्रेम करणा-यांचे लाडके 'दादू' होवून राहणंच अधीक आवडतं.
चाहत्यांशी संवाद साधता साधताच दादू क्षणार्धात स्वरबद्ध कवीता रचतात आणि आपल्या सुरेल आवाजात सादर करतात. हिंदी बरोबरच ईंग्रजी, संस्कृत आणि मराठी बंगाली भाषेचंही त्यांना ज्ञान आहे. हिंदू बरोबरच जैन, बुद्ध, ख्रिस्त्री आणि ईस्लाम धर्माचा अभ्यास आहे. ही विलक्षण अध्ययन क्षमता मात्र त्यांच्यासाठी नवीन नाही. कारण दादूंचे वडिल आयुर्वैदाचार्य पंडित ईंद्रमणी जैन हे संस्कृतचेदेखील पंडित होते. त्यांचे जेष्ट बंधू महेन्द्रकुमार जैन हे देखील भारतातील आघाडिचे आयुर्वेदाचार्य आहेत. 'मंजले भैया' जेष्ट कायदेतज्ञ आणि सर्वैच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉक्टर डि के जैन हे टाईम्स समुहाचे संचालक आहेत. संगीताचा वारसा दादूंना त्यांच्या आई किरणदेवींकडून मिळाला.
मुळचे अलीगढचे असलेले जैन राजस्थानमधील लोहारिया या खेड्यात वास्तव्याला असतांना १९४४ मध्ये रविन्द्रचा जन्म झाला. सात भावंडांमध्ये रविन्द्र तीसरा. देवाने त्याला अलौकीक दृष्टी द्यायची असं आधीच ठरवलं असावं, त्यामुळे भौतीक दृष्टी देण्याच्या भानगडीत तो पडला नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मात्र जन्मांध मुलाचे भविष्य घडवणे ही मोठीच जबाबदारी होती. छोट्या रविन्द्रचे शिक्षण सुरू झाले ते गुरूमुखी विद्या ग्रहण करतच. आजुबाजुच्या जैन मंदिरांमध्ये होणा-या भजन समारंभात रविन्द्र अगदी लहान असतांनापासुनच भजन गायला लागला. तेव्हा वडिलांनी ठरवलं, की मुलाला संगीताचंच शिक्षण द्यायचं. पंडित जनार्दन शर्मा, जि एल जैन आणि पंडित नथुराम यांसारखे गुरू लाभले. लोहारिया, जयपूर,  अलीगढ, दिल्लीसह कलकत्त्यापर्यंत संगीतशिक्षणासाठी भ्रमंती झाली. संगीताबरोबरच संस्कृत आणि धार्मिक ग्रंथाचा अभ्यास झाला.
दरम्यानच्या काळात १९५७ मध्ये दादूंचं वास्तव्य काही काळ मोठ्या भावाकडे नागपूरलाही होतं. १९७० च्या दरम्यान मात्र वडिलांच्या ईच्छेनुसार चित्रपटाला संगीत द्यायचं हे मनाशी ठरवून त्यांनी मुंबई गाठली. पुढील मार्ग सोपा नक्कीच नव्हता. मात्र दादूंच्या मनमिळावू व्यक्तीमत्त्वामुळे आणि बोलक्या स्वभावामुळे, त्यांच्या चौकस वृत्तीमुळे आणि ज्ञानामुळे चित्रपटक्षेत्रातील दर्दी लोकांमध्ये ते काही काळातच लोकप्रिय झाले. गुणवत्ता तर त्यांच्या ठायी होतीच. तरीदेखील संधी मिळण्यासाठी दोन वर्षाहून अधीक काळपर्यंत वाट पहावी लागली. १९७२ च्या दरम्यान 'सौदागर चित्रपटाचं काम मिळालं. पहिलं रेकॉर्डिंग होतं फ़िल्म सेण्टर स्टूडियो मध्ये आणि गायक होते महंमद रफी. दिवस होता मकसंक्रांतीचा. १४ जानेवारी १९७२.
रविन्द्रजींच्या कार्यशैलीने प्रभावीत झालेल्या रफीसाहेबांनी दादूंना गज़ल म्हणुन दाखवण्याची विनंती केली. 'गम भी हैं न मुक्कमल, खुशियाँ भी हैं अधूरी, आंसू भी आ रहे हैं, हंसना भी है जरूरी' -- दादूंच्या घनगंभीर आवाजातील ह्या ओळींनी रफीसाहेबांना ईतकं प्रभावीत केलं की यानंतर प्रत्येक रेकॉर्डिंगनंतर ही गज़ल त्यांची खास फर्माईश बनली.
यानंतर आलेल्या 'चोर मचाये शोर' च्या दरम्यान त्यांनी किशोरदांबरोबर आपलं पहिलं गाणं 'घुंगरू की त-हा बजता ही रहा हू मै' रेकॉर्ड केलं. भल्याभल्या संगीत दिग्दर्शकांच्या नाकी नऊ आणणारे किशोरदा रविन्द्रजींना मात्र संगीत संयोजनासाठी हवा तेवढा वेळ घेऊ द्यायचे. यानंतर मुळातच श्रद्धाळू आणि धार्मिक असलेल्या बडजात्यांच्या राजश्री प्रॉडक्शनबरोबर त्यांची जोडी जी जमली ती आजतागायत 'विवाह' च्या सुपरहिट गाण्यांपर्यंत कायम आहे.
गाण्याची धुन बनवतांनाच त्याचे शब्द लिहण्याचं कसबही दादूंना देवाने बहाल केलेलं आहे. त्यांच्या अप्रतीम गीतरचना आणि भजनांनी प्रभावीत झालेल्या कवयित्री दिव्या जैन यांनी सौदागर च्या प्रसिद्दी दौ-यादरम्यान त्यांना दिल्ली येथे पाहिलं आणि 'लग्न करायचं तर यांच्याशीच' अस मनोमन निश्चयच केला. यथावकाश दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर जणु दादूंच्या करिअरचे सुवर्णयुगच सुरू झाले. 'ब्रिजभुमी', 'नदिया के पार' 'अखीयो के झरोको से' -- आणि यादी वाढतच जाईल.
हिंदीच नव्हे तर अनेक मल्याळम, हरियाणवी, भोजपुरी, पंजाबी आणि तेलगु चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं. धार्मिक चित्रपटांचे संगीत देण्यात त्यांचा हातखंडा! गोपालकृष्ण, राजा हरिश्चंद्र यां हिंदी चित्रपटांबरोबरच ब्रम्हर्षि विश्वामित्र या तेलगु चित्रपटालाही संगीत दिलं. याचदरम्यान दक्षिण भारतीय संगीतक्षेत्रातील तेव्हा गाजत असलेलं नाव होतं - डॉक्टर के जे येसुदास ! दादूंनी येसुदासचा तलम रेशमी आवाज हिंदीमध्ये आणला. या जोडगोळीने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. खरं म्हणजे येसुदासच नव्हे, तर यांबरोबरच दादूंना श्रेय जातं ते अनेक नवे आणि दर्जेदार पार्श्वगायक हिंदी चित्रपटसृष्टीला देण्याचं. सुरेश वाडकर, आरती मुख़र्जी, जसपाल सिंग, हेमलता यांसह अनेक नव्या आवाजांना त्यांनी संधी दिली. नाव दिलं.
१९८२ च्या लगीनसराईमध्ये एक स्वप्नवत घटना घडली. चित्रपटक्षेत्रातीलच कुणाचातरी (कदाचित बरजात्या परिवारातीलच) विवाहसोहळा सुरू होता. मेहफिल जमलेली होती. दादूंना गाणं म्हणण्याचा आग्रह करण्यात आला. आणि त्यांनी सहज तान धरली - 'एक राधा, एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अन्तर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी...' मेहफिलीमध्ये बसलेल्यांपैकी एक होते राज कपुर! गाण्याच्या ओळी ऐकून ते मंत्रमुग्ध झाले! "ये गीत किसी को दिया तो नही?" त्यांनी विचारलं. दादू म्हणाले - "दे दिया!" "किसे?" राजजींनी  आश्चर्याने विचारलं. आणि दादूंनी हसुन सांगीतलं - "राजकपूर जी को!". पुढच्याच क्षणी राजजींनी खिशातले होते नव्हते तेवढे सगळे पैसे त्यांनी दादूंच्या हातात दिले. 'राम तेरी गंगा मैली' च्या अप्रतीम संगीताची मुहुर्तमेढ रोवली गेली. यानंतर आर के प्रॉडक्शन्सबरोबर त्यांनी 'हिना' चित्रपटही केला. मात्र याच दरम्यान राजजींच निधन झालं, आणि पुढचे अनेक मैलाचे दगड त्यांच्या आणि आपल्याही संगीत प्रवासात यायचे राहून गेले.
बरजात्या परिवार आणि राज कपूर यांच्यासह सागर परिवारांशी असलेला दादूंचा ऋणानुबंधही आजतागायत टिकून आहे. रामानंद सागर अर्थात पापाजींच्या 'आखे' चित्रपटाला संगीत देणा-या रविंन्द्रजींनी जेव्हा 'रामायण' मालीकेसाठी गीत आणि संगीताची जबाबदारी घेतली, तेव्हा दादूंची गीतं तुलसिरामायणाप्रमाणेच पुजनिय झाली. यानंतर श्रीकृष्ण मालीकेतून त्यांनी भगवद्गीता सांगीतली. नुकतीच सागर परिवाराच्या तीस-या पिढीबरोबर काम करत त्यांनी रामायणाची २०११ मधली आवृत्ती आपल्यापुढे आणली.
सध्याच्या बदलेल्या संगीत क्षेत्रामध्ये देखील स्वतःची शैली आणि अभिजात संगीताची साथ त्यांनी सोडली नाहीय. सध्या हिंदी साहित्य संमेलनात, कवी संमेलनात, तसेच गीत-गज़ल च्या मैफलींमध्ये ते व्यस्त असतात. फेसबुकवरही दादूंचं अकाउंट आहे, आणि दररोज चार अप्रतीम ओळी ते त्यावर लिहतात. चित्रपटाला संगीत देण्याचं कामही सुरू आहे. आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे २०१२ मध्ये येऊ घातलेल्या सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' कादंबरीवर आधारीत चित्रपटाचं संगीत दादूंनीच दिलेलं आहे.
'खुला खुला गगन ये हरे भरी धरती, जीतना भी देखो तबीयत नही भरती' सारखे शब्द लौकीकार्थाने कधी सृष्टीसौंदर्य पाहिलेलंच नसलेल्या माणसाने लिहावे ही गोष्ट मातापित्यांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट, संगीत तपस्येसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, यांबरोबरच ईश्वरी अस्तीत्त्वाचा पुरावा देण्यासही पुरेशी नाही का?