Friday 27 January 2012

महंमद अली

"ज्याने माझी सायकल चोरली आहे त्याला शोधून काढा! साल्याला मरेपर्यंत मारीन! रक्ताच्या थारोळ्यात आडवा पाडीन," बारा वर्षाच्या कॅशियसच्या डोळ्यात अंगार उसळत होता. ज्या पोलीसाकडे तो सायकल चोरल्याची तक्रार नोंदवायला गेला होता त्या मार्टीनने या डोळ्यावरूनच हेरलं, की हा केवळ बालसुलभ संताप नाही; काहीतरी वेगळं रसायन आहे. "एवढी मस्ती आहे तर बॉक्सींगमध्ये का जीरवत नाहीस?! उद्यापासून माझ्या जीम मध्ये ये," मार्टीनने त्याला आमंत्रण दिलं तेव्हा त्याच्या ध्यानिमनीही नसेल की हे चिमुरडं एक दिवस द ग्रेटेस्ट, द चॅम्प, स्पॉर्टसमॅन ऑफ द सेंच्युरी, अशी बिरूदावली मिरवणारा, एक दोन नव्हे तर तीन वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पीअन होणारा, जगातला सदासर्वकाळचा सर्वश्रेष्ठ मुष्टियोद्धा बनेल. महंमद अली बनेल!
आपल्या तीन दशकांच्या देदिप्यमान कारकिर्दीत अनेक महारथींना आधी आपल्या शब्दांनी आणि मग आपल्या ठोश्यांनी नामोहरम करणा-या; खेळाआधीच्या माईंड गेम्सचा आणि खेळानंतरच्या खिलाडूवृत्तीचा बादशहा असणा-या महंमद अलीचा सत्तरावा वाढदिवस (१७ जानेवारी) जगभरातील क्रिडारसिक यंदा साजरा करीत आहेत. आपल्या सबंध कारकिर्दीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मारणारा ठेचणारा, भलेबुरे बोलून आणि आपल्या विध्वंसक खेळानी त्यांना खच्ची करणारा महंमद अली मात्र या वेळी आपल्या सामाजीक संस्थेसाठी देणगी गोळा करण्याच्या कामात मग्न आहे. स्वतः पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या अलीने दुर्लक्षित, दुर्बल आणि दुर्दैवी समाजघटकांना मदत करण्याचा वीडा उचलला आहे. तसेही त्याला  असलेलं सामाजीक आणि राजकिय परिस्थीतीचं भान, दुर्बल लोकांप्रती असलेली करूणा आणि त्यांच्यासाठी घेतलेली परखड भुमीका ही महंमद अलीच्या कारकिर्दीची वैषिष्ट्ये राहिली आहेत.
१९४२ साली अमेरीकेतील केंटाकी मधल्या लुईजविल शहरात ओडेसा क्ले आणि कॅशियस मार्सेलस ह्यांच्या पोटी कॅशियस क्ले चा जन्म झाला. वडील पेंटर होते आणि आई गो-यांकडची मोलकरीण. दोन भावंडांपैकी हा लहान. वडिलांच्या नावावरूनच याचं नावं कॅशियस ठेवलं गेलं. खरं म्हणजे कॅशीअस हे नाव आहे केंटाकीमधीलच गुलामगीरीविरोधी चळवळ करणा-या एका महान नेत्याचं. यावरून क्ले कुटुंबिय वर्णभेद आणि गुलामगीरीविरोधी आंदोलनांशी जोडल्या गेलेले होते हे स्पष्ट होते. लहान असतांना कॅशियसने वर्णभेदाचे चटके सहन केले असणारच. यातुनच त्याच्यामधील आक्रामक बंडखोर घडत गेला.
सायकलचोरीच्या घटनेने त्याच्या या बंडखोरीला सकारात्मक रूप दिलं. मार्टीनच्या जीममध्ये जाऊन कॅशिअसने आधीच धष्टपुष्ट असलेलं आपलं शरीर अधीक बळकट बनवलं. बॉक्सींगमध्ये आवश्यक असलेली रग, राग, आणि माज त्याच्याकडे आधीपासुनच होता. आपण कसे ताकदवान आहोत आणि प्रतिस्पर्ध्याला आपण कसे मारू, फोडू  शकतो याची वर्णने करण्यात त्याचे तासनतास जात असत. सामान्य बॉक्सर्सप्रमाणे हात चेहर्‍यासमोर ठेवून लढणे त्याच्या स्वभावात नव्हते. कमरेपाशी हात ठेऊन तोंडाने समोरच्याला चिथवत, अपमानास्पद बोलत तो लढणार. हौशी बॉक्सिंगमध्ये प्रवेश केल्यावर या 'ऍटिट्युड' च्या भरवश्यावर त्याने १०५ मधील १०० मॅचॅस जिंकल्या. ईतक्या भारी कामगिरीनंतर त्याची निवड ऑलिम्पीकसाठी होणं सहाजीकच होतं.
१९६० च्या रोम ऑलिम्पीक्समध्ये लाईट हेवीवेट गटात अंतीम फेरीत पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्कीला धूळ चारली आणि ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर मायदेशी परतला तेव्हा तो सेलिब्रिटी झालेला होता. त्याच्या व्यावसायिक बॉक्सिंगची सुरूवात या काळात झाली. मग प्रायोजक आणि प्रशिक्षक आलेच! कॅशिअसला लुईजविल स्पॉन्सरशिप ग्रुपने करारबद्ध केलं आणि आर्ची मोर या बॉक्सरला त्याचा प्रशिक्षक म्हणुन नेमलं. पण थोड्याच दिवसात मोरशी खटके उडून त्याने त्याची ऍकॅडमी सोडली. अँजेलो डन्डी यांच्याबरोबर प्रशिक्षण सुरू केले. यानंतर काही दिवसांतच आर्ची मोर यालाच आव्हान देऊन त्याला हरवूनही दाखवलं. क्ले असा विचित्र स्वभावाचा धनी होता.
अश्यातच त्याने तेव्हाचा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पीअन सॉनी लिस्टनला आव्हान दिलं. विशेषज्ञांच्या मते क्लेला लढत जिंकण्याची जराशी ही संधी नव्हती. कारण लिस्टन म्हणजे राक्षसी ताकदीचा नमुना होता. पण क्लेची शैलीच मुळात वेगळी होती. 'फ्लोट लाइक अ बटरफ्लाय  ऍण्ड स्टींग लाईक अ बी' असं तो स्वतःबद्दल म्हणायचा. एकिकडे फुलपाखरासारखं अलगद आणि चपळ हालचाली करणं आणि समोरच्याचे ठोसे चुकवणं; आणि दुसरीकडे मधमाशीसारखं संधी मिळताच डंख मारणं ही त्याची खासियत! याच्या भरवश्यावर क्लेने आपली पहिलं वर्ल्ड हेवीवेट टायटल जिंकलं. ह्याच लढतीनंतर क्लेनं इस्लाम स्वीकारल्याचं जाहीर केलं. त्यानी आता नाव धारण केलं ते "महंमद अली"! याबद्दल त्याच्यावर खुप टिकाही झाली. पण टिकेला जुमानेल का तो अली कसला? पुढे त्याने व्हिएतनाम युद्धासाठी अमेरिकन सैन्यात भरती व्हायला साफ नकार दिला आणि आणखी एक वाद स्वतःवर ओढावून घेतला. केवळ नकार देऊन तो थांबला नाही, तर त्याचं कारणही त्याने स्पष्ट केलं.
"आधीच दुर्बल असलेल्या काळ्या लोकांवर बॉम्बगोळे बरसवण्यासाठी मी सैनिक होवून जाणार नाही. त्यांच्यासारखेच दिसणारे कोट्यावधी लोक माझ्या लुईजविल शहरात कुत्र्याचं जीणं जगत आहेत. गो-या लोकांची सत्ता जपण्यासाठी मी माझ्याच लोकांवर का म्हणुन हल्ले करावे?" - अलीच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याचा जगज्जेत्याचा खिताब काढून घेण्यात आला. साडेतीन वर्षं अली व्यावसायिक बॉक्सिंगपासून दूर होता.
१९७१ मध्ये पुनरामन करतांना त्याला "स्मोकिन जो" - जो फ्रेझियर कडून तब्बल ३१ व्यावसायिक लढतींनंतर आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. पण १९७४ मध्ये पुन्हा तयारी करून अलीने या पराभवाचं उट्टं काढलंच.
त्याची दुसरी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पीअनशिपची मॅच झाली ती जगज्जेता जॉर्ज फोरमन याच्या विरूद्ध. 'रंबल ईन द जंगल' या नावाने बॉक्सिंग विश्वात अजरामर झालेली ही झुंझ. ही लढत म्हणजे महंमद अलीच्या झळाळत्या कारकीर्दीवरचा सुवर्णकळस होता. लढतीच्या आधी अलीने फोरमनला घाबरवण्यासाठी एक कवीताही केली होती. दोघांचे माईंडगेम्सही खुप चर्चेत राहिले होते. शेवटी रिंगमध्ये आपल्या परिचीत चपळ हालचालींना बगल देऊन अलीने रोपच्या आसपास राहून प्रतिस्पर्ध्याला थकवण्याची शैली वापरली आणि तब्बल आठ राऊंड चाललेल्या या लढतीत त्याचा विजय झाला. या लढतीवर 'रंबल ईन द जंगल' नावाचा एक लघुपट हॉलीवूडमध्ये बनला आणि त्याला ऑस्करही मिळालं. १९९६ ऑस्कर घेतांना हे दोघे मित्र सोबत रंगमंचावर गेले, तेव्हा पार्किन्सन्स ग्रस्त अलीला फोरमन आधार देत होता. खिलाडू वृत्ती म्हणतात ती हीच ना!
यानंतर १९७८ पर्यंत अली चॅम्पीअन राहिला. १९७८ मध्ये लिऑन स्पिंक्सला टायटल हरल्यानंतर त्याने 'रिमॅच' ची मागणी केली आणि ही मॅच जींकत तीस-यांदा वर्ल्ड हेवीवेट चॅँम्पीअनशिवर आपलं नाव कोरलं. मात्र आता तो थकला होता. अलीने १९७९ मध्ये निवृत्तीची घोषणा केली. १९८० मध्ये त्याने लॅरी होम्स ला  आव्हान देण्यासाठी पुनरागमन केले पण पुर्वीचा अली पुन्हा बघायला नाही मिळाला. शेवटी १९८१ मध्ये त्याने कायम निवृत्ती घेतली.
निवृत्तीनंतर मात्र अलीचं रूप पुर्णतः वेगळं होतं. जगभरातल्या अक्षरशः कोट्यवधी गोरगरीबांसाठी देश, पंथ, वर्ण कसलाही मुलाहिजा न ठेवता त्याने मदत केली आणि प्रचंड निधी जमवला. पार्किनसन्सग्रस्तांसाठी "अली पार्किनसन सेंटरची" स्थापना केली. "ज्याप्रमाणे नदि, तलाव, झरे, आणि समुद्र ही नावं वेगवेगळी असली तरीही ते सगळे पाण्याच्या रूपाने जीवनच देत असतात, त्याचप्रमाणे जगातील धर्मांची नावं वेगळी असली तरी सर्व एक सत्याच्या रूपाने शांतीचाच संदेश देत असतात!" -- एरवी प्रतिस्पर्ध्यांना हीणवणारा, लढतीच्या आधी त्यांची चेष्टा काय करणारा, नको नको ते बोलून हैराण करणारा, एक आक्रामक खेळाडू हे विधान करतो यावरून 'खेळ' म्हणजे काही खेळायचा विषय नाही, तो जगायचा विषय आहे हेच उमगते; नाही का?

Wednesday 18 January 2012

गणेश आचार्य

जगणे म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत आहे. आपल्याला मिळालेल्या उडी मारण्याच्या क्षमतेनुसार प्रत्येकजण येणारे अडथळे पार करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. कुणाच्या नशिबात किती अडथळे ठेवायचे आणि किती उंच उडी मारण्याची क्षमता द्यायची, हे तर परमेश्वरानेच ठरवले असते. मात्र आपल्याला मिळालेल्या उडी मारण्याच्या क्षमतेचा उपयोग किती आणि कुठे करायचा हे मात्र ज्याचे त्याने ठरवायचे असते. मग अडथळ्यांनी त्रस्त होउन एखादा समुद्रात उडी मारतो आणि सगळंच संपवतो, तर कुणीतरी समुद्र उल्लंघून जाण्याच्या ध्येयाने उड्डाण करतो आणि शंकाकुशंकांची लंका दहन करून सोन्याची विजयादशमी साजरी करतो. आपल्या ध्येयाने प्रेरित होउन एकदा का उड्डाण केलं, की मग अडथळेच मैलाचे दगड बनतात आणि वैगुण्याचीही वैषिष्ट्य़े होतात. 'नृत्य' या एकाच ध्येयाने झपाटलेल्या गणेश आचार्यच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय.
सिनेमाच्या पार्टीजमध्ये कधीमधी दिसणारा, एक ऐसपैस शरिरयष्टीचा, रंगीबेरंगी डिझाईनर कपडे घालणारा आणि सतत हसत राहणारा गणेश आचार्य अनेकांनी पाहिला असेल; आणि त्याच्या वेगळेपणामुळे तो आपोआप लक्षातही राहिला असेल. गेल्या वर्षभरात जवळपास विस किलो कमी केल्यानंतरही गणेशचं वजन आज एकशे विस किलोच्या वर आहे. नृत्यदिग्दर्शकाकडे असावी अशी शास्त्रीय नृत्याची साधना त्याच्याकडे नाही. फारसा सुंदर चेहराही नाही, आणि खुप अमोघ अशी भाषाही नाही. तरीदेखील गणेशने नाचवला नाही असा एकही प्रतिथयश कलाकार आज हिंदी चित्रपटसृष्टीत सापडणार नाही. काल परवा आलेल्या रणवीर सिंग-अनुष्का शर्मा पासुन ते थेट अमिताभ-हेमामालिनी पर्यंत सगळे दिग्गज गणेशच्या तालावर नाचले आहेत, आणि नाचत आहेत.
गणेश आचार्यने बसवलेल्या सुपरहिट नृत्यांची केवळ वानगीदाखल म्हणुन काही उदाहरणं द्यायची झाल्यास गोवींदा-डेविड धवन जोडीच्या भारोभार चित्रपटांबरोबर 'चायनागेट'च्या 'छम्मा छम्मा' पासुन ते ओमकाराच्या 'बिडी जलैले' पर्यंत लांबच लांब यादी तयार होइल. आता तर त्यात 'चिकनी चमेली' आणि 'बॉडीगार्ड' चे शिर्षकगीतही सामील झालेले आहेत. १९९२ मध्ये 'गणेश' या नावाने चित्रपटक्षेत्रातील नृत्यदिग्दर्शनाचा श्रीगणेश केलेल्या या आचार्याचा नावावर आजवर सव्वाशे चित्रपट जमा झालेत आणि ही यादी उत्तरोत्तर वाढतेच आहे. खुप तांत्रीक बाबींमध्ये न फसता गाण्याचा आणि चित्रपटाचा विषय अभ्यासुन आणि त्यातली भावना समजुन घेऊन सेटवर तेव्हाच्या तेव्हाच स्फुरलेल्या स्टेप्स देत गाणं बसवायचं, हे त्याचं सोपं सुत्र! गणेशाच्या आयुष्याचा नाच मात्र असा सोपा नक्कीच नव्हता.
मुंबईच्या चाळीमध्ये राहून गणपती उत्सवातल्या स्पर्धांमध्ये नृत्यसाधना करणारा दक्षीण भारतीय वडील आणि महाराष्ट्रीयन आई, एक मोठी बहीण आणि लहान भाऊ असलेला हा मुलगा. वडिल गोपीकृष्ण हे देखील डान्सरच होते. मुंबईत ओळख बनवण्यात, आपल्या मुलांना काहीही कमी पडू नये यासाठी खस्ता खाण्यातच त्यांचं जीवन गेलं. गणेश आठ वर्षाचा असेल तेव्हाच पितृछत्र हरवलं. मात्र वडीलांनी दिलेला नृत्याचा वसा बरोबर होता. मोठ्या बहिणीकडून घरच्या घरी नृत्याचे धडे घेतले. वयाच्या १३व्या वर्षी चार मित्रांना घेऊन एक डान्सगृप तयार केला आणि व्यायसायिक नृत्यक्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. वडिलांची ओळख आणि स्वतःची उत्सुकता यांच्या बळावर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक कमाल यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली.
कमाल हे नाव १९८० च्या दशकात जवळपास प्रत्येकच व्यावसायिक चित्रपटाच्या श्रेयनामावलीत  असायचंच. मसाला चित्रपटाचे हे दिवस होते. सामान्यातला सामान्य दर्शक काय पसंत करतो याची जाण गणेशला याच दरम्यान  आली. शास्त्रीय नृत्याच्या जुजबी शिक्षणाबरोबरच पाश्चात्य नृत्याचंही प्रशिक्षण त्यानं याच दरम्यान मिळवलं. मात्र या सगळ्यांची भेळ करून बनवलेली एक खास बॉलीवुड डान्सची शैली असते, आणि तीच आपले लोक पसंत करतात हेदेखील त्याला उमगलं.
या काळात कमाल यांच्या सहायकांपैकी सर्वात जास्त लक्षवेधी जर कुणी असेल तर तो म्हणजे गणेशच! कारण त्याचं अवाढव्य शरीर आणि तरीही त्याच्याकडे असलेला कमालीचा लवचिकपणा! गोवींदाने नेमकं हेच हेरलं. त्याने स्वतः गणेशला बोलावून घेतलं. ओळख निघाली. मग मैत्री झाली. नव्या संधीनी दारे उघडली. कोरिओग्राफर म्हणुन त्याचा पहिला चित्रपट आला तो १९९२ मध्ये - आयेशा झुल्काचा 'अनाम'. पण तो फारसा चालला नाही. मग कमालजींच्या देहावसानापर्यंत मात्र गणेशने स्वतःच्या नावाने काम घेतलं नाही. गुरूजींच्या मृत्युनंतर साईन केलेला गोविंदाचा 'कुली नंबर वन' म्हणजे गणेशच्या धडाकेबाज कारकिर्दीचा श्रीगणेश म्हणता येइल.
आजवर एकमेकांकडे पाहून नाचणा-या हिरो-हिरोईन्सला गणेशने कॅमॅ-याकडे पाहून नाचायला लावलं. हा नवा प्रयोग होता. गोवींदा आणि करिश्मा कपुर या जोडीच्या मदतीने हा सुपरहिट ठरला. मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही. अगदी मेजरसाब मध्ये भिष्म पितामह अमिताभ बच्चन यांना 'सोणा सोणा' शिकवण्यापासून ते 'बादशहा' मध्ये शाहरूखकडून 'बादशाह ओ बादशाह' नाचवून घेण्यापर्यंत त्याने प्रत्येक हिरो आणि हिरोईनला नाच शिकवला.
गणेशचं हसतमुख व्यक्तीमत्त्व, त्याची मुंबईया भाषा आणि हलकीफुलकी शैली यांमुळे तो लवकरच सगळ्यांमध्ये लोकप्रिय झाला. ठाकरे कंपनीचा 'अग्नीसाक्षी' चित्रपट येऊ घातला होता, तेव्हा गणेशने स्वतः जाऊन बिंदु ठाकरेंकडे काम मागीतलं होतं. 'ईकरार करना मुष्कील है' हे मनिषा कोईरालाचं गाणं तेव्हा खुप गाजलं. या गाण्याची कोरिओग्राफी पाहून राजकुमार संतोषींनी गणेशला बोलावून घेतलं ते 'घातक' चित्रपटातल्या 'मारा रे' या गाण्यासाठी. यात गणेशने स्वतः आपल्या नृत्यकौशल्याची झलकही दाखवली. आता त्याचा चेहरा आणि मुख्य म्हणजे 'मोहरा' लोकांच्या परिचयाचा झाला. संतोषिंबरोबर त्याची जोडी जमली ती 'चायना गेट', 'लिजंड ऑफ भगतसिंग' ते थेट 'लज्जा' पर्यंत. लज्जा मधल्या 'बडी मुष्कील' या गाण्यात त्याने माधुरी दिक्षीतला नृत्य शिकवलं. या गाण्यासाठी पहिल्यांदा फिल्मफेअरसाठी त्याचं नामांकन झालं. मात्र पुरस्काराने सारखी हुलकावणीच दिली. तो मिळाला थेट २००६ मध्ये 'ओमकारा' मधल्या 'बिडी जलैले' या गाण्यासाठी.
नृत्यदिग्दर्शक म्हणुन आपला जम बसवल्यावर गणेशने चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकलं. त्याला पहिला चित्रपट आला तो 'स्वामी'. आपल्या वडिलांच्या संघर्षमय आयुष्यावर त्याने काढलेला हा सिनेमा फारसा चालला नाही. 'ए फिल्म कोरिओग्राफड बाय गणेश आचार्य' असे पंचलाईनमध्ये लिहून त्याने आपली नृत्यदिग्दर्शक हीच ओळख आपल्याला जपायची आहे हे दाखवून दिलं.
आपल्या आवडत्या सहका-याबरोबर - गोवींदाबरोबर त्याने 'मनी है तो हनी है' हा तद्दन मसाला चित्रपटही काढून पाहिला, पण यात काही शय आले नाही. चित्रपट बनवणं मात्र गणेशला आवडलेलं दिसतंय. कारण नृत्यदिग्दर्शक म्हणुन हिंदी, तामिळ, तेलगु, बंगाली चित्रपटसृष्टीत भरपुर काम करत असतांनाच, आणि मुंबई, ईंदोर आणि कलकत्त्याला आपल्या नावाचे डान्स स्कुल्स चालवत असतांनाच गणेश 'ऍन्जल' नावाचा एक खुप गंभिर चित्रपट घेऊन येतो आहे.
एकीकडे अगदी नाचणं जीवावर येत असलेल्या सन्नी देओल, आणि अजय देवगणसारखे हिरो गणेशकडून धडे घेणं पसंत करतात; तर दुसरीकडे हृतिक रोषनसारखे नृत्यनैपुण्य असलेले लोकही त्याला पसंती देतात. माधूरीपासून ते कैत्रीनापर्यंत सगळ्यांसाठी तो नृत्य बसवतो. आपल्या सव्वाशेकिलोच्या शरिराचा कसलाच अडथळा न होउ देता नृत्य, अगदी एकेक स्टेप करून दाखवतो आणि आपल्या मुंबईय्या भाषेत समजावूनही सांगतो! "आम्हाला नृत्यातील छोट्याछोट्या हालचालीही आणि लकबीदेखील स्पष्ट लक्षात याव्या म्हणुन गणेशने स्वतःचे शरीर एवढे मोठे वाढवून ठेवले आहे," ही गोवींदाची प्रतिक्रीया बरंच काही बोलून जाते.
खरोबरच - आपल्या ध्येयाने प्रेरित होउन एकदा का उड्डाण केलं, की मग अडथळेच मैलाचे दगड बनतात आणि वैगुण्याचीही वैषिष्ट्य़े होतात.

Monday 9 January 2012

मेट्रो मॅन ई श्रीधरन

वय वर्षे ७९ या वयोगटातील सामान्य लोक एकतर म्हातारपणातील अनेक व्याधींशी लढत असलेले, भजन किर्तनात रमलेले किंवा फारफार तर एखाद्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या कार्यक्रमात बसलेले आपल्याला दिसतील. काही लोक कला आणि वाड्मयक्षेत्रामध्ये, किंवा शिक्षणक्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्यात तर काही मोजके राजकारणातील लोक या वयात मोठमोठी पदे उपभोगतांना दिसतील. मात्र हे सरकारी सेवेतून निवृत्त होण्याचं वय नक्कीच नाही. रेल्वे स्थापत्यशास्त्रातील आपली कारकिर्द पन्नास वर्षाहून अधीक काळ गाजवून डॉक्टर ईलत्तुवलपीळ श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून नुकतीच २ जानेवारी रोजी निवृत्ती पत्करली तेव्हा त्यांचं वय होतं अवघं ७९ वर्ष ६ महिने आणि २० दिवस. 'मेट्रो मॅन' म्हणुन प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन यांच्या निवृत्तीची दखल जगभरातल्या प्रसारमाध्यमांना घ्यावी लागली ईतकं या आधुनिक विश्वकर्म्याचं कर्तृत्त्व मोठं आहे.
भारतात मेट्रोरेल्वेची मुहुर्तमेढ रोवणारी कलकत्त्याची मेट्रो ट्रेन, दुर्गम परंतू निसर्गरम्य कोकणाला नवा श्वास देणारी कोकण रेल्वे, शंभर वर्षांच्या दिल्ली राजधानीला ख-या अर्थाने ग्लोबल लुक देणारी विराट मेट्रो रेल्वे आणि केरळातील पलक्कड जिल्ह्यातील करुकपुथूर खेडे -- या चार धामांना आपल्या कर्तृत्त्वाच्या धाग्याने एकत्र जोडणारा एक जगन्नाथ म्हणजे डॉक्टर ई श्रीधरन! निवृत्तीनंतर आपल्या करुकपुथूर या गावी जाऊन आपल्या पिढीजात घरात स्थायिक व्हायचा त्यांचा निर्णय म्हणजे  आपल्या कुळाशी आणि मुळाशी ईमान राखणा-या दक्षीण भारतीय मानसिकतेला अगदी साजेसा आहे. शेवटी या गावाशी असलेला त्यांचा ऋणानुबंध पिढ्यानपिढ्यापासुनचा!
लहानपणी गावातल्या बसेल-ईव्हांजेलिकल-मिशन-उच्च-माध्यमिक शाळेतून शिकतांना टी एन शेषन या आपल्या वर्गमित्राशी स्पर्धा करत आणि नेहमी अव्वल येत घालवलेल्या दिवसांच्या आठवणी, त्यानंतर पलक्कडच्या व्हिक्टोरिया कॉलेजातून घेतलेलं महाविद्यालयीन शिक्षण आणि मग काकीनाडा येथील गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी स्नातक ही पदवी घेतांना सतत जपलेला 'अव्वल दर्जा' या गोष्टी श्रीधरन यांनी आजवरच्या कारकिर्दीतही कायम ठेवल्या आहेत. घरातील धार्मिक संस्कार, परंपरा आणि श्रद्धास्थानांचा सन्मान करत त्यांनी तंत्रज्ञानाची कास धरली आणि देशाला दिशा देणा-या मोठमोठ्या प्रकल्पांचे ते अध्वर्यु झाले. आज देशभरातल्या ईंजिनियर्स आणि प्रॉजेक्ट मॅनॅजर्सची शाळा घेणा-या श्रीधरन यांचं सुरवातीच्या काळातील स्वप्न होतं उत्तम प्राध्यापक होण्याचं. त्यादृष्टीने त्यांनी कोझिकोडे येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये नागरी-अभियांत्रिकीतील व्याख्याता म्हणून कामही सुरू केलं. पण नियतीच्या मनात त्यांच्यासाठी वेगळे 'प्रोजेक्ट' होते.
अभियांत्रीकी शिक्षणाचा भाग म्हणुन मुंबईच्या पोर्ट ट्रस्टमध्ये उमेदवारी करत असतांनाच १९५४ च्या डिसेंबरमध्ये ते दक्षिण रेल्वेमध्ये सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून रुजू झाले. आधी दक्षिण आणि मग दक्षिणपूर्व रेल्वेत नवे मार्ग निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. दिलेल्या वेळेत किंवा त्या आधी काम पुर्ण करून देण्याची सवय त्यांना याच अनुभवातून लागली.
श्रीधरन यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट मात्र १९६३ मध्ये आला. भारताच्या रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा तामिळनाडूतील पंबनम्‌ पूल वादळाने वाहून गेला होता. पूलाचे वाहून गेलेले १२५ टप्पे, पुन्हा उभे करण्याच्या कामगिरीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. नियोजनाप्रमाणे या कार्याला सहा महिने लागणार होते, मात्र श्रीधरन यांच्या वरिष्ट अधिका-याने तीन महिन्यात काम पुर्ण करतो, अशी ग्वाही परस्पर देऊन ठेवली. हे आव्हान स्विकारत श्रीधरन यांनी पुलाचं काम केवळ ४६ दिवसात पुर्ण करून दाखवलं. याबद्दल रेल्वे मंत्रालयाने त्यांना पारितोषिकही दिलं होतं. त्यानंतर पारितोषिकांची मालिकाच सुरू झाली ती आजतागायत आय आय टि दिल्लीच्या डॉक्टरेट पासुन ते पद्मविभुषणपर्यंत सुरूच आहे.
श्रीधरन उपमुख्य अभियंता असतांना देशातील पहिली मेट्रो रेल्वे १९७० ते १९७५ या काळात कोलकाता येथे उभारण्यात आली. त्या कामाचे तेच प्रभारी होते. त्यांनीच ह्या कामाचा तपास, नियोजन आणि अभिकल्पन केले होते. रेल्वेच्या प्रशासकिय सेवेत असतांना त्यांनी पुर्ण केलेला हा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होय. कारण १९९० मध्ये ते निवृत्त झाले. मात्र औपचारिक सेवानिवृत्तीनंरच श्रीधरन यांच्या ख-या करिअरची सुरूवात झाली! 
प्रतिष्ठेच्या समजल्या गेलेल्या कोकण रेल्वेवर अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. कोकण रेल्वेचा प्रकल्प पाच वर्षात पुर्ण करायचा असं त्यांनी ठरवलं. ७६० किलोमीटर लांबीचा, १५० पूल असणारा आणि तब्बल ९३ बोगदे असणारा कोकण रेल्वे प्रकल्प पुर्ण करणे खुप जिकरीचे काम होते. त्यातल्या त्यात ज्या वेळी या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होते त्याच वेळी नेमका हर्षद मेहताचा कोट्यवधी रुपयांचा रोखे घोटाळा उजेडात आला आणि बाजारात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटून आर्थिक पुरवठादारांनी हात आखडते घेतले. हा प्रकल्प बांधा-वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर घेण्यात आलेला पहिलाच प्रकल्प होता. पैशाचा ओघ थंडावल्यामुळे पाच वर्षाऐवजी सात वर्षात ही योजना पूर्ण झाली. आज कोकण रेल्वेने या भागातील सार्वजनिक वाहतूकीचे चित्रच बदलवून टाकले आहे.
कोकण रेल्वेच्या भिमपराक्रमानंतर देशभरातल्या मोठमोठ्या रेल्वे प्रकल्पांसाठी श्रीधरन यांच्या नावाचा विचार होवू लागला. यात बाजी मारली ती दिल्ली सरकारने. ५ नोव्हेंबर १९९७ पासून ते दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले गेले. दिल्ली मेट्रोचे पुढील सर्व टप्पे मी वेळेत पूर्ण करून दाखवीनच, असा निर्धार करून श्रीधरन यांनी कामाला हात घातला आणि मेट्रोरेलचा कायापालट व्हायला सुरूवात झाली. सहा लाईन्स, एकशे नव्वद किलोमिटर्सचा मार्ग, एकशे बेचाळीस स्टेशन्स - त्यातील ३५ अंडरग्राऊंड स्टेशन्स, आणि दररोज अडिच हजार फे-यांद्वारा प्रवास करणारे लक्षावधी नागरीक! दिल्ली मेट्रोचं हे स्वप्न पुर्ण व्हायला काम हाती घेतल्यानंतर अवघ्या चौथ्या वर्षी सुरूवात करून श्रीधरन यांनी त्यांचा 'क्लास' दाखवून दिला. २००२ मध्ये पहिली 'रेड लाईन' खुली झाल्यानंतर ठरावीक अंतरांनी २०११ पर्यंत सहा लाईन्स खुल्या करण्यात आल्या आहेत. तीसरा आणि अंतीम टप्पा आता पुर्णत्त्वाकडे जाईल.
यादरम्यान संकटे आलीच नाहीत असं नाही. मात्र 'चलता है' ही सरकारी बाबुगीरी सोडून त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे श्रीधरन यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. सरकारचे सुद्धा. मध्यंतरी दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला तेव्हा डॉ. श्रीधरन यांची आम्हाला गरज आहेअसं सांगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी तो तात्काळ नामंजूरकेला होता.
राजकारण व भ्रष्टाचार यामध्ये रुतलेल्या भारतासारख्या देशात एक व्यक्ती भव्य व अद्ययावत प्रकल्प वेळेत आणि जादा खर्च होऊ न देता कसे काय पूर्ण करते हा प्रश्न जगाला पडला. श्रीधरन यांची दखल मग जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी घेतली नसती तरच नवल.
देशाच्या सगळ्याच भागात अनेक वर्ष काम केल्याने श्रीधरन यांची विषिष्ट कार्यशैली तयार झाली आहे. थंडगार एसी केबिनमध्ये न बसता साईटवर प्रत्यक्ष जाऊन काम करण्याची यांची खासीयत आहे. वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील दर शनिवारी कोणत्याही साईटवर भेट देऊन ते प्रत्यक्ष कामाची पहाणी करत असत. एंशिच्या घरात असणारा हा माणुस तरूणांबरोबर तरूण म्हणुन काम करतांना निर्मितीशील वातावरण निर्माण करतो. म्हणून दुप्पट-तिप्पट पगाराच्या ऑफर्स नाकारून तरुण अभियंते या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी श्रीधरनभोवती गर्दी करतात. रेल्वे प्रकल्प बांधणे हे त्यांचे कर्तृत्त्व आभाळाएवढे असले तरी नव्या कार्यक्षम ईंजिनिअर्सची एक पिढी घडवणे हे त्यांचे कार्य त्यांना या आभाळातला सुर्य बनवते.
काम करण्याच्या आनंदात म्हातारं व्हायला वेळच मिळाला नाही असं ते म्हणतात. भारतातील अभियांत्रीकी क्षेत्राचे सदगुरू मोक्षगुंडम विश्वेवरैय्या यांची आठवण करून देणारंच हे व्यक्तीमत्त्व नाही का?

Sunday 1 January 2012

शिवमणी

आयुष्याला जर 'जीवनगाणं' म्हटलं, तर त्यात आपले शब्द, ईतरांचे सुर आणि नशिबाचा ताल यांची गुंफण अगदी चपखल व्हायला पाहिजे. यापैकी शब्द आपले आपण ठरवतो, सुर कुणाशी जुळवायचे ते देखील आपण ठरवू शकतो, मात्र 'ताल' हा विषय सर्वस्वी नियतीच्या हाती असतो. म्हणुनच नशिब लिहण्याची आणि ते बदलवण्याची सर्वोच्च शक्ती जवळ असणा-या महादेवाने स्वतःजवळ डमरू हे तालवाद्य ठेवलं असावं. आनंदम शिवमणीच्या नशिबाची गाठ याच महादेवाने याच तालवाद्याशी कायमची बांधून ठेवली आहे.
मुळात तालवाद्यापेक्षा शिवमणीची गाठ 'ताल' या संकल्पनेशीच बांधली  आहे असं म्हणावं लागेल. कारण शिवमणीला वाजवण्यासाठी अमुक एक वाद्यच लागते असं काही नाही. ड्रम,डमरू, तबला, ढोल आणि ढोलकीच नव्हे, तर पावभाजीचा तवा, कढई, पाण्याची बादली, काचेची बाटली, ताट, वाटी, चमचा, आणि जे वाटेल ते -- शिवमणी दगडातही ताल शोधू शकतो आणि विटेतूनही बिटस काढू शकतो. गेल्या ३५ वर्षांच्या त्याच्या तालयात्रेने या अवलीया कलावंताला भारतातील प्रथम क्रमांकाचा आणि जगातील पहिल्या पाच ड्रमर्सपैकी एक ड्रमर बनवले आहे. १९५९ साली जन्मलेल्या आणि  वयाच्या १४ व्या वर्षापासुन तालवाद्यांची संगत करत आलेल्या शिवमणीचे वादक म्हणुन करिअर जरी ३५ वर्षांच्या आसपास असले तरीही त्याला लाभलेली तालपरंपरा मात्र शंभर वर्षांहून जुनी आहे.
शिवमणीचे वडिल एस एम आनंदन हे दक्षीण भारतातील गाजलेले ड्रमर. तामीळ चित्रसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. घराण्यातच मुळात संगीताची परंपरा. संगीताबरोबरच वैदीक शास्त्री घर असल्यामुळे वेदमंत्र आणि संस्कृत श्लोकांचे संस्कारही शिवमणीवर लहानपणापासूनच झाले. अगदी लहान असतांनाच तो शंख वाजवायला शिकला. वडिलांना ड्रम वाजवतांना पाहून त्याने अनेकदा ड्रम वाजवण्याचा हट्ट धरला. मात्र तेव्हा त्याला तुटकी स्टीक आणि फुटका कोंगो याव्यतीरिक्त काहीही मिळालं नाही. अनेक महिने लाक़डाच्या एका स्टुलवर ठकठक करत घालवल्यावर त्याला पारंपारिक कर्नाटक संगीताचे धडे देण्यास सुरूवात झाली. वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा ड्रमवर ताल धरला आणि अकराव्या वर्षी पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली.
यानंतर ड्रमच्या स्टीक्स सोडल्या पेन, पेन्सील पुस्तक किंवा ईतर नादरहित गोष्टी काही त्याने फारश्या हाताळल्या नाहीत. शालेय शिक्षणात त्याला अगदीच पासिंगपुरता रस होता. शिवमणीचे दहावी बोर्डाचे पेपर सुरू असतांना त्याचे वडिल सिंगापुरच्या एका कार्यक्रमात ड्रम वाजवणार होते. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर सोबत करण्यासाठी म्हणुन त्यांनी वेळेवर शिवमणीला बोलावणं धाडलं. तो तडक सिंगापुरकडे निघाला. परिक्षा राहिली ती कायमचीच.
व्यावसायिक क्षेत्रात ड्रमर म्हणुन शिवमणीला पहिली संधी मिळाली ती के व्ही महादेवन यांच्याकडे. महादेवन म्हणजेच मामा हे त्या काळातील तामिळ आणि तेलगु संगीत क्षेत्रातील खुप मोठं नाव होतं. त्यांच्याकडे रेकॉर्डींग करत असतांनाच शिवमणीवर एस पी बालसुब्रमन्य़म यांची कृपादृष्टी झाली. बालसुब्रमण्यम तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवत होते. त्यांनी वेळोवेळी शिवमणीला  मार्गदर्शन केलं. आजही करत आहेतच. या वेळी भारतात ड्रमर्सचे एवढे चलन नव्हते. म्हणुन मग वडिलांकडून कलेचे धडे घेणा-या शिवमणीला आपले आदर्श देशाबाहेर शोधावे लागले.
विल्यम कॉबहॅम हे या क्षेत्रातलं त्या काळातलं जॅझ आणि रॉक क्षेत्रातील गाजत असलेलं नाव! शिवमणी त्याचा भक्त झाला. डोक्याला पटका बांधण्याची, भडक रंगीत कपडे घालून चेह-यावर मोकळेपणाने हसत ड्रम वाजवण्याची त्याची स्टाईल बिली कॉबहॅमच्या प्रभावातूनच आलेली आहे. त्याला ऐकता यावं आणि नव्या संधी मिळाव्या म्हणुन शिवमणीने जीवाची मुंबई करायचं ठरवलं. मुंबईत आल्यावर त्याच्यामधील उपजत कलावंताला नवं आकाशच मिळालं. उस्ताद झाकिर हुसैन पासुन ते लुई बॅन्क्सपर्यंत सगळ्यांबरोबरच काम करण्याची आणि नवं काही शिकण्याची संधी त्याला मिळाली. त्याचे आदर्श विल्यम कॉबहॅम यांच्याबरोबरही त्याने १९९० मध्ये पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली. शिवमणी हे नाव आता चांगलंच गाजायला लागलं.
शिवमणीला ड्रम वाजवण्याचं बाळकडू घरातूनच मिळालं असलं, आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एस पी बालसुब्रण्यमसारख्यांच्या पाठींब्याने त्याचं मुंबईतील स्थानही बरंच प्रबळ झालं असलं, तरीही केवळ या कारणांमुळे त्याची वाटचाल सहज झाली असं म्हणणं म्हणजे पर्क्युश्यन या क्षेत्रात शिवमणी होण्यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केल्यासारखंच होईल. कर्नाटक संगीताचे घरातून मिळालेले प्राथमीक शिक्षण एवढेच काय ते संचित घेऊन शिवमणीने आपली तालतपस्या सुरू केली होती. घटम वादक विक्कु विनायकराम, मृदंगवादक टि के मुर्ती, कंजीरावादक नागराजन, टि व्ही गोपालकृष्णन, कुन्नाकुडी वैज्यनाथन यांसारख्या शास्त्रीय संगीताला आयुष्य वाहून घेतलेल्या गुरूंचे शिष्यत्त्व मिळवण्यासाठीच त्याला खुप धडपड करावी लागली.
मुंबईत दक्षिण भारतीय संगीतक्षेत्रातील लोकांचा एक वेगळा दबदबा आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, सराव आणि कर्नाटक आणि हिंदुस्थानी या शैलींचा संगम ही या कलावंतांची वैषिष्ट्ये म्हणावी लागतील. शिवमणीलाही आपले सुरवातीच्या दिवसांतील सोबती याच कलावंतांमध्ये मिळाले. 'श्रद्धा' या बॅण्डचा तो भाग बनला. एकवार या बॅण्डच्या ईतर सहका-यांच्या नावांकडे वळून पाहूया म्हणजे 'श्रद्धा' ची शक्ती आपल्या लक्षात येइल. ग़िटारवर लॉय मेंडोसा (शंकर-एहशान-लॉय मधील), मॅंडोलीनवर यु श्रीनिवास (पद्मश्रीसह अनेक पुरस्कार शिवाय मायकल जॅक्सनसह अल्बम्स) आणि गायक म्हणुन हरिहरन आणि शंकर महादेवन (बस नाम ही काफी है).
                जवळपास तीन दशके तालवाद्यांची तपस्या करून झाल्यानंतर शिवमणीचे आराध्य भगवान शिव त्याला प्रसन्न झाले जेव्हा मणिरत्नम यांनी तामिळमध्ये रोजा चित्रपट बनवायला घेतला. ए आर रहमानने या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसंगीतात पदार्पण केलं. आपली खास 'चमु' जमवतांना रहमानच्या लिस्टमध्ये ड्रमर म्हणुन शिवमणीशिवाय ईतर क़ुणाचं नाव असतं तरच नवल. रहमानबरोबर शिवमणीची जोडी ही रोजा पासून जी जमली ती बॉम्बे, लगान, दिल से, गुरू, ताल ये थेट स्लमडॉग पर्यंत कायम आहे. रहमानच्या वर्ल्ड टुरचा शिवमणी हा अविभाज्य घटक असतो. केवळ त्याचा 'सोलो परफॉर्मन्स' ऐकायला येणारे रसिकही काही कमी नाहीत. जगभर रॉक़, जॅझ, पॉप, आणि संगीताच्या सगळ्याच प्रकारांचे चाहते शिवमणीचेही फॅन्स आहेत. शिवमणीला मात्र आपली भारतीय, तामिळ ओळख जपण्यातच खरा अभिमान वाटतो.
आपल्या सादरिकरणादरम्यान तो मंत्रपठण करतो, नोटेशन्स म्हणुन दाखवतो, शंख वाजवतो, ॐकार गाऊन दाखवतो. 'मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव' हा त्याचा मंत्र येतील तेवढ्या भाषांमध्ये समजावून सांगतो, आणि भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेगळेवपण पटवून देतो. शिवमणीला दक्षिण भारतीय भाषांबरोबरच चांगलं मराठी आणि तुटक हिंदी बोलता येतं. संगीत तो लहानपणी शिकलाय, त्यामुळे गाणारा गळा त्याच्याकडे आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच हिंदी सिनेमाची गाणीही तो गुणगुणत असतो.
२००९ मध्ये त्याने स्वतःचा पहिला नादवाद्यांचा अल्बम काढला. 'महालिला' असं त्याचं नाव. याशिवाय एशिया ईथनिक आणि सिल्क अन श्रद्धा या त्याच्या दोन बॅण्डसह कार्यक्रम देण्यात तो व्यस्त आहे. या दोन्ही बॅण्डचे वैषिष्ट्य म्हणजे शिवाचे अधिष्टान! एशिया ईथनिकच्या तर लोगोमध्येच शिवाचा त्रिशुळ आहे. शिवमणीला भक्ती, संगीत आणि जीवन या गोष्टी एकमेकांच्या सोबती वाटतात. त्याला परंपरांबद्दल नितांत आदर आहे. पारंपारिक वेषभुषा, तामिळ भाषा यांबरोबरच भारतीय संस्कृतीमधिल गुरूकुल शिक्षणपद्धतीचा तो समर्थक आहे. लवकरच तो स्वतःचे गुरूकुलही काढणार आहे.
शिवाच्या आशिर्वादाने सुरू झालेली शिवमणीची ही वाटचाल त्याला जगभर गाजत असलेल्या एका वाद्याचा गुरू तर बनवतेच शिवाय भारतीय संस्कृतीचा वैश्वीक राजदूतही बनवते.