Tuesday 21 February 2012

शि द फडणीस

गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं. मग भेटायला येणा-यांनी प्रश्न विचारला की तीच चित्रमालीका त्यांच्यापुढे करायची! आपण काढलेलं एक चित्र हजारो शब्दांचा  आशय सहजपणे सांगतं, याची प्रचिती  शिवराम दत्तात्रेय फडणीसला तेव्हाच आली. आणि कोल्हापूरच्या त्या चित्रनगरीतच 'शि द फडणीस' या अर्कचित्रकलाक्षेत्रातील महान कलावंताची जडणघडण सुरू झाली.
फडणीस म्हणताच आपल्यापैकी थोरामोठ्यांच्या डोक्यात 'हंस', 'मोहिनी' या नियतकालिकांची, पुलंच्या पुस्तकांची रेखीव मुखपृष्टं येतील. मध्यमवयिन लोकांना हसरी गॅलरी, मिष्कील गॅलरी, ही प्रदर्शने बघण्यासाठी केलेली गर्दी आठवेल, आणि तरूणांना आठवेल ते पहिल्या वर्गातलं पहिलंवहिलं गणीताचं पुस्तक! गणित असो किंवा सामान्य विज्ञान, त्या पुस्तकातील सगळी गोंडस चित्रं - गोब-या गालांची, मोठ्या मोठ्या डोळ्यांची छोटीशी मुलगी, चष्मा घातलेले आजोबा, गळ्यात किणकिणती घंटा लटकवलेली म्हैस आणिही बरंच काही -- शि द फडणिसांच्या चित्रांनी तीन पिढ्यांपासुन महाराष्ट्राच्या मनःपटलावर राज्यच केलं नाही, तर महाराष्ट्राची चित्रे म्हणुन ती एक ओळखच जगभर निर्माण केली आहे. व्यंगचित्रं म्हणावी तर प्रत्येक वेळी त्यात व्यंग किंवा विनोदच असतो असं नाही, व्यक्तीचित्रं म्हणावी तर प्रत्येक वेळी त्यात वेगळं व्यक्त्तीमत्त्व असतं असंदेखील नाही, हास्यचित्र म्हणावी तर प्रत्येकच चित्रात हसुही नाही, संदेशचित्र म्हणावी तर प्रत्येक चित्रात 'मॅसॅज' ही नाही. फडणिसांनी जीवनाचे ईतके विविध पैलू आपल्या अद्वीतीय शैलीत हाताळले आहेत की त्यांच्या चित्रांना 'जीवनचित्रे' हीच संज्ञा योग्य म्हणता येइल. या जीवनचित्रांच्या जिवनाची सुरूवात झाली ती बेळगावमधल्या भोज या त्यांच्या मुळगावी.
भोजमधील फडणिसांचं घर म्हणजे प्रखर राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव असलेलं कुटुंब. देशभक्ती, वाचन आणि लेखनाची आवड घरातील संस्कारातूनच लागलेली. चित्रकलेची प्रेरणाही यातुनच मिळाली. घरातील सर्व भावंडांमध्ये शिवराम म्हणजे शेंडेफळ. त्यामुळे जवळच्या मोठ्या शहरात, म्हणजे कोल्हापुरला शिक्षणासाठी गेल्यानंतर त्याची चित्रकलेची आवडही त्याला जपता आली. त्या काळचं कोल्हापुर म्हणजे चित्रकारांचा स्वर्गच. बाबुराव पेंटर, बाबा गजबर, यांच्यासारख्यांची चित्र पहात, शिंदेमास्तरांसारख्या गुरूजींकडून आणि वसंत सरवटेंसारख्या वर्गमित्रांबरोबर चित्रकेलेचे धडे गिरवत त्यांची कलासाधना सुरू झाली. मॅट्रीकची परिक्षा होईतोवर शासनाच्या एलिमेन्ट्री आणि ईंटरमिजेट परिक्षा त्यांनी राज्यस्तरावरची बक्षीसे मिळवत पास केल्या होत्या. मग सर जे जे स्कुल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश मिळणं अशक्य नव्हतंच! घरून येणारी पन्नास रूपयांची मनि ऑर्डर आणि हौस म्हणुन काही नियतकालिकांना पाठवलेली व्यगचित्रे प्रकाशित झाल्यास त्याचं येणारं मानधन यांच्या भरवश्यावर वाटचाल सुरू झाली.
'हंस' मासिकाच्या एका चित्रस्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस मिळालं आणि या निमित्ताने ओळख झाली ती या मासिकाचे संपादक अनंत अंतरकर यांच्याशी. अंतरकरांनी शिदंमधील कलावंत हेरला आणि त्यांच्या मागे लागुन त्यांच्याकडून अनेक चित्र काढून घेतली. 'हंस' तसेच 'मोहिनी' या मासिकाचीही अनेक मुखपृष्ट त्यांनी बनवली. 'एक बस स्टॉप. एक युवती. तिच्या साडिवर मांजरांचे प्रिंटस. बाजुला एक युवक उभा. त्याच्या शर्टवर उंदरांचे प्रिंटस' हे चित्र आज अनेकांना माहिती आहे. १९५२ मध्ये प्रकाशित झालेल्या या चित्राने शिदंबरोबरच मराठी मासिकांच्या विश्वाला एका चाकोरीच्या बाहेर आणलं. याच हंस मासिकामध्ये १९५३ साली वाचकांचे अभिप्राय या सदरात एक लेख प्रकाशित झाला होता. लेखीका होती कुमारी शकुंतला बापट. मुखपृष्टाबद्दल या लेखात लेखिकेने काय अभिप्राय व्यक्त केला होता ते माहिती नाही, मात्र मुखपृष्ठ तयार करणा-या चित्रकाराशीच पुढे तीचं लग्न झालं. लग्नानंतर फडणिसांच्या गाडिने जो वेग घेतला तो त्यांनी केलेल्या कामातून आपल्याला दिसतोच.
कितीतरी पुस्तकांची मुखपृष्ठं, ईल्युस्ट्रेशन्स, यांबरोबरच एक अक्षरही न लिहता व्यक्त होणारी व्यंगचित्रे -- शिंदंच्या चित्रांनी एक काळ गाजवला. अप्लाईड आर्टस हा त्यांचा विषय असल्याने त्यांनी कलात्मकतेबरोबरच व्यावसायिकता जपली आणि एक वेगळा आदर्श नव्या पिढीपुढे घालून दिला.  अनेक नव्या उपक्रमांची, नव्या प्रकारांची, परंपरांची मुहुर्तमेढ या काळात रोवली गेली. मारिओ मिरांडापासुन ते बाळासाहेब ठाकरे पर्यंत सगळ्या अर्कचित्रजगताने फडणिसांच्या नावाचा 'लोहा' मानला. हसरी गॅलरी हे त्यांनी काढलेल्या चित्रांचं भव्य प्रदर्शन अनेक ठीकाणी हाउसफुल्ल गेलं, ते आजतागायत हाउसफुल्लच जातय. यानंतर मिष्कील ग़ॅलरी, आणि काही काळानंतर 'चित्रहास' नावाचं एक अभिनव प्रदर्शनही त्यांनी सुरू केलं. चित्रहासमध्ये फडणीस स्वतः रसिकांशी संवाद साधतात. मराठी आणि ईंग्रजीबरोबरच क्वचित हिंदीतही ते बोलतात. हा उपक्रम एक जगावेगळा अनुभव देऊन जातो आणि म्हणुनच जगभर त्याचे प्रयोग झालेत.
आकडेवारीच्याच निकषातुन पाहिल्यास सुमारे २०० पुस्तकांची मुखपृष्टे, ३० पुस्तकांना मुखपृष्टासह आतील पानांचीही सजावट, आणि २५० च्या वर चित्रहासचे कार्यक्रम याशिवाय गणित, शास्त्र, बॅकिंग, आरोग्य, व्यवस्थापन, नाटक, चित्रपट, उद्योग, यांच्यासाठी केलेले प्रचारसाहित्य, हास्यचित्रे आणि चित्रमाला यांच्यासाठी केलेल्या रेखाचित्रांची संख्या कित्येक हजार होईल. पाच पुस्तके, लहान मुलांसाठी निवडक चित्रांची एक सिडी, आणि नुकतंच आलेलं त्यांचं रेषाटन नावाचं आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा. केवळ चित्रांची पुस्तकंही खपाचा विक्रम मोडू शकतात ही गोष्ट फडणिसांच्याच पुस्तकांनी मराठी ग्रंथविश्वास पटवून दिली. कमर्शिअल आर्टीस्ट गिल्डच्या पुरस्काराबरोबरच ईंडियन ईन्स्टीट्युट ऑफ कार्टुनिस्टसने केलेला सन्मान शिवाय मार्मीकचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांमध्ये महत्त्वाचा.
परंतू या सगळ्या सन्मानांच्या वरचढ म्हणजे फडणिसांच्या चित्रांना मिळालेलं रसिकप्रेम. जगभरातल्या रसिकांनी त्यांच्या हास्यचित्रांना मनमोकळी दाद दिली. अप्लाईड आर्टस या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शि द फडणीस म्हणजे एक विद्यापिठच झाले. त्यांची चित्र बदलत्या काळाचं द्योतक बनली. एका पिढीने त्यांच्याच प्रतिमांच्या माध्यमातून जग पाहिलं आणि आधीच्या पिढीसाठी नाविन्यपुर्ण असलेली त्यांची चित्रं नव्या पिढीसाठी क्लासिक बनली. शि द फडणीस हे चित्रकलेतलं एक युग बनलं.
आजही वयाच्या सत्यांशीव्या वर्षी दोन मुलीं, जावई आणि नातवंडांच्या सहवासात फडणीस चित्रकलेबद्दल उत्साही आहेत. मुलींनी सुरू केलेली त्यांची वेबसाईट, ईमेल्स या माध्यमातून ते रसिकांशी संपर्कात असतात. शिवाय कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि नवीन तंत्रज्ञानानाचंही ते स्वागत करतात. कॉम्प्युटरने कलात्मकता नष्ट केली हा अनेक चित्रकारांचा आरोप त्यांना अजीबात मान्य नाही. कंप्युटर जीथे थांबतो, तेथे सृजनाचं काम सुरू होतं, असं त्यांचं स्पष्ट मत आहे.
आयुष्याचा या टप्प्यावर आपण अगदी शांत, मुक्त व तृप्त आहोत. परमेश्वराकडे काहिही मागणं नाही. कश्याच्याही मागे धावायचं नाही. पूर्वीप्रमाणेच आता आणि पुढेही चिरतरूण आस्वादक दृष्टीने सर्व गोष्टींचं स्वागत करायचं आहे --  असं केवळ एक अभिजात कलावंतच लीहू शकतो ना?

Friday 17 February 2012

डॉ. एस. एल. भैरप्पा

चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान सहा दर्जेदार परिसंवादातून, उद्घाटन आणि समारोपिय भाषणांतुन अनेक नव्या कल्पना पुढे आल्या. संमेलनाला ख-या अर्थाने 'अखिल भारतीय' बनवायचे असेल तर ईतर भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत आणले पाहिजे; ललित किंवा कादंब-यांच्या लेखकांनी अभ्यास करून लेखन केलं पाहिजे; भाषासौंदर्याच्या पलिकडे जाऊन साहित्य त्यातील 'कंटेन्ट' च्या भरवश्यावर ईतर भाषिकांना आकर्षित करेल असे असायला हवे, असे सुर संमेलनादरम्यान निघाले. म्हणुनच या सर्व गुणांनी परिपुर्ण असलेलं डॉक्टर एस एल भैरप्पा यांचं साहित्यही संमेलनाच विषेश आकर्षणाचा विषय बनलं होतं.
मुळ कन्नडमधून लिहलेल्या डॉक़्टर भैरप्पांच्या कादंब-यांचे मराठी अनुवाद गेल्या अनेक वर्षांपासून बेस्टसेलर होत आहेत. भारतीय साहित्याला, कादंबरीलेखनाला एक वेगळा आयाम देणारे डॉक्टर संतेश्वरा लिंगन्नैय्या भैरप्पा येत्या ऑगस्ट महिन्यात आपले सहस्त्रचंद्रदर्शन साजरे करतील. अभ्यासपुर्ण, वैज्ञानिक दृष्टीकोनातून,समाजशास्त्र, तत्त्वज्ञान ईत्यांदिंनी मजबुत केलेल्या पायावर उभं असलेलं त्यांचं लेखन एकुण भारतीय साहित्यातील मैलाचा दगड ठरलंय. २०१० मध्ये त्यांना  के. के. बिर्ला फाऊंडेशनचासरस्वती सन्मान प्राप्त झाला तेव्हा या पुरस्कारालाच पुरस्कार मिळाल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलं होतं, यातच सर्वकाय ते आलं.
बंगलोरपासून २०० किलोमिटर दुर हसन जिल्ह्यात असलेल्या  कोण्या एका चन्नरायपट्टण नावाच्या खेड्यात भैरप्पांचा जन्म झाला तो १९३१ मध्ये. घरात वेदाध्ययन, महाकाव्यग्रंथांचे अध्ययन, मंत्रपठणाची परंपरा होती. त्यामुळे लहान असतांनाच संस्कृतशी जवळचा परिचय झाला. घरातील वातावरणामुळे संस्कृतशी, आणि आईमुळे संस्कृतीशी! पण नेमकी तेव्हा जीवघेणी प्लेगची साथ आली, आणि त्यात आईसह भावंडंही दुरावली. काका आणि काकुंच्या सहवासात सावत्र जीणं नशिबी आलं. घर सोडून पळून जावं असं सतत मनात यायला लागलं. भटकंतीचं आणि'नक्की खरं काय आहे?' हे शोधण्याचं मुळ या छळवादातूनच उगवलं असावं.
शालेय शिक्षण सुरू झालं, तो काळ स्वातंत्र्यचळवळीचा होता. गोरूर रामस्वामी अय्यंगार हे त्यांच्याच भागातील साहित्यक्षेत्रातील मोठं नाव. त्यांच्या प्रभावाखाली येऊन स्वातंत्र्यचळवळीतही भाग घेतला. ईंग्रजांच्या राजकिय प्रभावातून तर आपण मुक्त होउ, पण त्यांच्या बौद्धीक, वैचारिक प्रभावाचे काय? हा प्रश्न त्याना सतत पडायचा. यातूनच शाळा सोडून भटकंती करण्याची उर्मी आली.
वर्षभर भटकत ते मुंबईला पोचले. हाताला मिळेल ते काम करत पुढं जात राहिले. एका साधुंच्या समुहाशीही यादरम्यान गाठ पडली, आणि त्यांच्याबरोबरही काही काळ भटकंती झाली. मात्र शहर असो किंवा गाव, लोक कुठलाच विचार न करता, शोध न घेता केवळ कुणीतरी सांगीतलेल्या मार्गावर आंधळेपणाने चालत  आहेत, हाच अनुभव त्यांना आला. पावलं परत फिरली आणि मैसुरला राहिलेलं शिक्षण पुर्ण करायचं ठरलं. मिळेल ते काम करत, आपल्या शिक्षणासाठी पैसा आणि आयुष्यासाठी अनुभव जमवत सुरू झालं उच्च शिक्षण.
स्वभावगुणानुसारच तत्त्वज्ञान हा विषय निवडला, आणि त्यात सुवर्णपदकही मिळवलं. भैरप्पांचा लेखन-प्रवास त्यांच्या वयाच्या सुमारे सतरा-अठरा वर्षांपासून सुरू झाला. सुरुवातही कादंबरी लेखनानं झाली. कारण त्यांना जे सुचतं तेच मुळी भव्य स्वरूपात. भीमकाय नावाची कादंबरी लिहली तेव्हा प्रकाशक मिळण्याची वानवा होती. दरम्यानच्या काळात हुबळीच्या कलासिद्देश्वर कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणुन नोकरी सुरू केली. शोध सुरूच होता.भीमकाय प्रकाशित होण्यासाठी १९६० साल उगवावं लागलं.
त्यानंतर मात्र मागे वळून पहावंच लागलं नाही. कन्नडमध्ये त्यांच्या बाविस कादंब-या प्रकाशित झाल्या. अनेकांच्या दहा दहा आवृत्त्या निघाल्यात. सहा कादंब-यांबर चित्रपट निघालेत,काहिंवर दुरदर्शन मालिका निघाल्यात. त्यांच्या ग्रंथसंपदेवर आधारीत पंचवीसहून अधिक ईतर लेखकांची पुस्तकं प्रकाशीत झालीत. त्यांच्या बहुतांश कादंबऱ्या भारतातील सर्व भाषांमध्ये अनुवादित झाल्या असून त्यापैकी बऱ्याच अनुवादकांना साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार मिळवून देण्यास कारणीभूत झाल्या आहेत. शेकडो अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर डॉक्टरेट मिळवली आहे. भैरप्पांना मात्र त्यांच्या'ट्रुथ ऍण्ड ब्युटी' या ईंग्रजीतील शोधनिबंधासाठी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीने डि लिट दिली आहे. यानंतर तब्बल सहा विद्यापिठांच्या मानद डॉक्टरेट मिळाल्या! वाचकांच्या दृष्टीने एक जिवंत ज्ञानपिठ असलेल्या भैरप्पांना मात्र अजुनही ज्ञानपिठ पुरस्कारानं हुलकावणीच दिली आहे.
दरम्यानच्या काळात भैरप्पांनी गुजरातच्या सरदार पटेल विद्यापिठात, दिल्लीच्या एनसिईआरटीमध्ये आणि मैसुरच्या रिजनल कॉलेजमध्येही अध्यापन केलं. गुजरात आणि उत्तर भारतात केलेल्या वास्तव्यामुळे त्यांचे विषय आणि हाताळणी संपूर्ण भारताला भिडणारी झाली. ईंग्रजीवरती कमालीचं प्रभुत्त्व असुनदेखील त्यांनी कन्नडमध्येच लेखनाला प्राधान्य दिलं याचं कारण म्हणजे कर्नाटकावर आणि कन्नड भाषेवर त्यांचं प्रेम!
'अभ्यास' हे त्यांच्या लेखनाचं वैषिष्ट्य. शास्त्रीय संगीतावरील मंद्र नावाच्या कादंबरीसाठी त्यांना सरस्वती सन्मान मिळाला. ह्या कादंबरीचा विषय कला आणि कलाकार किंवा कलाजीवन आणि सामान्य जीवन असा ठेवला आहे. यासाठी भैरप्पांनी स्वतः शास्त्रीय संगीताचा क्लास लावला!'पर्व' या महाभारतावरील त्यांच्या प्रचंड गाजलेल्या कादंबरीच्या वेळी त्यांनी तत्त्वज्ञान या आपल्या विषयाबरोबरच समाजशास्त्र, मानव्यवंशशास्त्र,भुगोल ईत्यादी विषयांचा ईतका अभ्यास केला, की या साठी त्यांना वेगळी डॉक्टरेट मिळावी! म्हणुनच लोकमान्यता आणि विद्वत्मान्यता लाभलेल्या काही मोजक्याच लेखकांपैकी डॉक्टर भैरप्पा एक आहेत. सखोल अभ्यासानंतर स्वत:ला वाटेल ते निर्भिडपणे मांडणारा हा शिपाई आहे.
प्राचिन भारताच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक महानतेबद्दल डॉक्टर भैरप्पा भरभरून बोलतात. साहित्य वाचवायचे असेल, तर आपल्या शिक्षणप्रणालित बदल घडवून आणायला  हवेत. पुराणातल्या भाकडकथा म्हणुन अभ्यासक्रमातून बाद केलेला आपला देदिप्यमान ईतीहासच आपल्या विद्यार्थ्यांना निर्मितीक्षम विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो असंही ते मानतात. नव्या विचारांचं ते समर्थन करतातआणि वैज्ञानिक दृष्टीकोणाचा आग्रह धरतात. हिंदू धर्म, त्यापेक्षाही पुढे जाऊन भारतीय दर्शन हे तर्कसंमत आणि पुरोगामी असल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे. यामुळे एकुणच त्यांनी स्वतःवर अनेक वादविवादही ओढवून घेतले.
एन आर नारायण मुर्ती यांचं कावेरी मुद्यावर समर्थन करणं असो, किंवा टिपु सुल्तानच्या धार्मिक धोरणांवर गिरिश कर्नाड यांच्याशी झालेला वादविवाद असो, त्यांनी आपली बाजु 'सबुतो के साथ' मांडली आहे. 'आवरण' ही त्यांची टिपु सुल्तानवरिल कादंबरी जेव्हा १४ भाषांमध्ये भाषांतरित झाली आणि हिंदीमध्ये तीच्या तीन आवृत्त्या लगोलग खपल्या, त्यावेळी हा विवादही आपोआपच शमला.
त्यांच्या वंशवृक्ष, पर्व,धर्मश्री’, ‘तंतु’, ‘काठ’, ‘सार्थ या कादंब-या भारतीय तत्त्वज्ञानातील विविध दर्शनावर, आपल्या महाकाव्यांवर,ऐतिहासिक संदर्भांवर आधारीत आहेत. या ग्रथांकडे, आपल्या कथांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणा-या या कादंब-या  आहेत. 'पर्व' ही आठशे पानांची महाकादंबरी लिहण्यापुर्वी पाच वर्षे भैरप्पांनी महाभारतकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यात घालवली यावरून त्यांची शोधक वृत्ती दिसून येते. म्हणुनच टिका करायच्या आधी एकदा मी उल्लेख केलेल्या संदर्भांवरून नजर फिरवा, आणि मग वादविवादाला उभे रहा, असं आव्हान त्यांनी दिल्यावर कुणाचीच विवाद करण्याची टाप राहिली नाही.
आज वयाच्या एंशिव्या वर्षिही डॉक़्टर भैरप्पांचा शोध सुरूच आहे. मैसुरमधल्या आपल्या घरी आपल्या दोन मुलांसह एकत्र कुटुंबात राहतांना शास्त्रीय संगीत ऐकणे, वाचन करणे आणि संस्कृत भाषेच्या उत्थानासाठी कार्य करणे यात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे. 'भित्ती'नावाचं त्यांचं आत्मचरित्रही खुप लोकप्रिय झालंय आणि सध्या 'कवलू' ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद गाजतोय.
साहित्यामध्ये अभावानेच आढळणारा संशोधन आणि लालित्याचा संगम डॉक्टर भैरप्पांच्या आठ दशकाच्या साहित्यतपश्चर्येला भारतातील सर्वोत्कृष्ट कादंबरिकारांच्या रांगेत नेऊन ठेवतो.

Tuesday 14 February 2012

"मै रवी चतुर्वेदी!"

सकाळी चार वाजता उठून भारत आणि ऑस्ट्रेलीयाची कसोटी पाहणा-या क्रिकेट चाहत्यांचा या वेळी चांगलाच हेटा झाला. वाईटातल्या वाईट पद्धतीने कसं हरावं याचा नमुनाच भारताच्या संघाने यंदा सादर केला. मात्र ऑस्ट्रेलीयामधील पहाटे उठून पाहिलेले सामने असोत किंवा वेस्ट ईंडिजमधले रात्री जागुन पाहिलेले क्रिकेट असो, ती मजा, ते थ्रील काहीतरी वेगळंच असतं. पुर्वी भारताबाहेरील सामन्यांसाठी रेडिओवर अवलंबुन रहावं लागायचं.  "धूप खिली हुई और दर्शकोंमें उत्साह" या वाक्यापाठोपाठ येणारा हजारो प्रेक्षकांचा आवाज असो, किंवा "... अगली गेंद...ऑफइस्टंप के काफी बाहर.. और बहोsssतही उम्मदा तरीकेसे ये खेल दिया है कव्हर्स क्षेत्रमेंसेचार्रर्रर्रर्रर्रन..." या वाक्याबरोबर चेह-यावर आपोआप येणारं स्मीत असो; रेडिओ कॉमेन्ट्रीच्या माध्यमातुन मैदानावरचा अवघा खेळ आपल्या डोळ्यांसमोर मांडण्याचं सामर्थ्य या समालोचकांकडे असायचं. हिंदीतील क्रिकेट समालोचनाचा श्रीगणेशा करणा-या रवी चतुर्वेदी यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित करून भारत सरकारने जनतेच्या क्रिकेटप्रेमाची पावतीच दिली आहे. 
चाळीस वर्षांपुर्वीच्या अश्याच फ्रेब्रुवारी महिन्यातील थंडिमध्ये दिल्ली-मुंबई रणजी सामन्यात "नमश्कार - दिल्लीके फिरोजशाह कोटला मैदान से मैं रवि चतुर्वेदी .... " अशी सुरूवात करून क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडकन वाढवणारे रवीजी आता ७४ वर्षांचे झाले आहेत. क्रिकेटवर २० पुस्तकं, त्यापैकी १५ ईंग्रजीमध्ये लिहून झालीत. सुनिल गावस्करपासुन ते सचिन तेंडूलकरपर्यंत सगळ्यांचे लाडके 'पंडितजी' म्हणजे 'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हे उससे मिलाने की कोशिश में लग जाती है' या सुप्रसिद्ध वाक्याचं 'जीता जागता उदाहरण' आहेत.
लखनऊ शहराच्या गल्ली बोळांमध्ये खेळत-बागडत बालपण गेलं. क्रिकेटचा मागमुसही तेव्हा लागला नव्हता. मात्र पाच वर्षाचा असतांना वडिलांची बदली दिल्लीला झाली आणि मॉल रोड वरील नव्या घरात गृहप्रवेश केला. नवं शहर आणि नव्या घराबरोबरच लहानग्या रवीला क्रिकेट हा नवा खेळही माहिती झाला. क्रिकेटचं वेड मग ईतकं वाढलं की आयुष्यात क्रिकेटविरच व्हायचं हा निर्णय शाळेत जाताच बोलून दाखवला. शाळेच्या क्रिकेट टिममध्ये, त्यानंतर कॉलेज आणि मग दिल्ली विद्यापिठाच्या टिममध्ये देखील तो खेळला. रणजी खेळाडू व्हायचं त्याचं स्वप्न मात्र अपुरं राहिलं.
याचं कारण म्हणजे पालकांची ईच्छा त्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावं, अशी होती. आतासारखं ग्लॅमर आणि पैसा त्या काळी क्रिकेटमध्ये नव्हता. त्यामुळे क्रिकेटर  हे करिअरही असु शकते, असा विचार कोणता मध्यमवर्गीय, नोकरीपेशा आणि रिटायर्डमेन्टला आलेला बाप करेल? घरच्या लोकांनी बजावून ठेवल्याप्रमाणे मग जीवशास्त्राचा अभ्यास सुरू झाला. रवीने जीवशास्त्राच्या परिक्षेतही भरघोस यश मिळवलं. दिल्लीलाच डॉक्टर झाकिर हुसैन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणुन नोकरी मिळावी ईतकं भरघोस! मात्र कॉलेजमध्ये जीवशास्त्र शिकवणा-या या प्राध्यापकाचा जीव मात्र क्रिकेट्मध्येच अडकलेला.
तो जमाना रेडिओचा होता. ईंग्रजी समालोचन ऐकत क्रिकेटचा आनंद घेत असतांना सहज म्हणुन आपणही समालोचकच का होवू शकत नाही? असा विचार डॉ रवींच्या मनात आला. समालोचन शिकवणारी अशी काही विद्यापिठं तेव्हा नव्हती. आतासारखं कुठल्याही सामन्याचं समालोचन युट्युबवर क्षणार्धात मिळेल अशी सोयही नव्हती. मग ईंग्रजी वर्तमानपत्रांतील क्रिकेटविषयक लेख  आणि बातम्यांचं वाचन सुरू झालं. त्या काळात क्रिकेटवर लिहणारे अनेक राजे लोक होते. टाईम्स ऑफ ईंडियाचे आर श्रीमन आणि ज्येष्ट्य क्रिडा समिक्षक के गोपालकृष्णन हे त्यांपैकीच. रवीजींनी त्यांच्याशी ओळख वाढवली. आजही या दोघांनाच ते आपला गुरू मानतात.
आताच्या काळातली निवृत्त खेळाडूंनी क्रिडा समिक्षण आणि समालोचन करण्याची पद्धत तेव्हा नवी होती. क्रिडा पत्रकार, समिक्षक, जाणकार यांच्या सान्नीध्यात राहून, पुस्तकं वाचून रवीजींनी आपला अभ्यास आपणच सुरू केला. दरम्यानच्या काळात दिल्ली दूरदर्शनवर ईंग्रजी समालोचकाची ऑडिशनही दिली. ऑडिशन छान झाली असली, तरीही नशिबाने त्यांच्यासाठी वेगळंच पॅकॅज तयार करून ठेवलं होतं.
१९६० मध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हिंदीत समालोचन करण्याचे धोरण राबवले. नुकतेच ऑडिशन देऊन गेलेले रवी चतुर्वेदी यांचं हिंदीवरील प्रभुत्त्वही दूरदर्शनचे निर्माते मधू मालती आणि आकाशवाणीचे संचालक आर एन दास यांनी पाहिलं होतं. 'या क्षेत्रात नवीन काहीतरी करून अधीक काळपर्यंत ईनिंग खेळायची असेल, तर हिंदी समालोचनाची जबाबदारी स्विकारा. आम्ही हवी ती सगळी मद्त करतो,' असा सल्ला या दोघांकडून मिळाला आणि रवी चतुर्वेदिंनी हिंदी समालोचनाचा श्रीगणेशा केला.
क्रिकेट खेळलेले असल्यामुळे त्यातील लहानसहान गोष्टी, संज्ञा, नियमावली, आणि ब-याच खेळाडुंचे रेकॉर्डस त्यांना तोंडपाठ होते.  आपल्या या ज्ञानाचा पुरेपुर लाभ उचलत त्यांनी हिंदी समालोचनाच्या क्षेत्रात वाटचाल सुरू केली. अनेक शब्दांना हिंदी प्रतिशब्द शोधले, नव्या संज्ञा. एक नवा अध्यायच सुरू झाला. 'दर्शकोमे काफी उत्साह', 'और ये लगा सिक्सर' ईत्यादींसारख्या त्यांच्या वाक्यांचे पुढे वाक्प्रचार झाले.
हिंदी साहित्य आणि कवीतांचा केलेला अभ्यास, वाचन आता त्यांना व्यक्त होण्यासाठी महत्त्वाचा ठरू लागला. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे क्रिकेटचं वेड! त्यांच्या उत्साहातून अनेकदा हिंदी भाषेलाच नवे असे शब्द आणि उदगार मिळाले. सिद्धूनी सिक्सर मारल्यावर "... ये छे रन और दर्शक आंदोलित" असं पुर्णतः नवीन 'एक्स्प्रेशन' देणारे चतुर्वेदी पहिलेच आणि एकमेवच!
सामान्य क्रिकेट रसिकांना समजेल आणि उमजेल अश्या भाषेमध्ये क्रिकेट येऊ लागल्यामुळे आता रेडिओच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाली. भारतातल्या सामन्यांचे प्रक्षेपण टिव्हीवरून होत असे, मात्र विदेशातील सामन्यांसाठी रेडिओ हे एकच माध्यम होते. एकंदर या क्षेत्रात एक नवं युग सुरू करण्याचं श्रेय चतुर्वेदिंना जातं. दरम्यानच्या काळात क्रिकेटला खुप जवळून पाहण्याची, अनेक खेळाडुंशी मैत्री करण्याची संधी त्यांना मिळाली. डॉन ब्रॅडमन, गॅरी सोबर्स, क्लाईव्ह लॉईड त्यांचे मित्र बनले. सुनिल गावस्कर त्यांना पंडितजी म्हणायचे, तर बिशनसिंग बेदींचे ते 'मान्यवर' होते.
आताच्या काळात सहज हाताशी उपलब्ध असलेल्या रेकॉर्डस, केवळ एका क्लीकवर प्राप्त होणारी खो-याने माहिती आणि ईतीहास या सगळ्यां सुवीधा तेव्हा नव्हत्या. अनेकदा समालोचकाला आपल्या उपजत क्षमता आणि अभ्यास यांच्या भरवश्यावर वेळ मारून न्यावी लागायची. रवीजींचं ईंग्रजीवरही तेवढंच प्रभुत्त्व असल्यामुळे त्यांनी अनेक ईंग्रजी समालोचकांशी संवाद साधून आपल्या समालोचनाला 'चार चांद' लावले. पुढे त्यांना डॉ. नरोत्तम पुरी, आकाश लाल ईत्यांदीसारखे सहकारी लाभले, आणि हिंदी समालोचनाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
विदेशातील सामन्यांच्या निमित्ताने त्यांचं ईंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅरेबिअन बेटांसह अनेक देशविदेशांत फिरणं झालं. क्रिकेटची काशी असलेल्या लॉर्डसवर समालोचन करण्याची संधीही त्यांना लाभली. १९७६ च्या पोर्ट ऑफ स्पेन कसोटीमध्ये भारताने ४०० धावांचं अशक्य वाटणारं लक्ष्य पार करत विजय मिळवला, तेव्हाच्या सामन्यातील चतुर्वेदींच्या समालोचनाचं कौतुक पंतप्रधान ईंदिरा गांधींनी स्वतः केलं होतं. कॅरॅबिअनच्या वेगवेगळ्या बेटांना भेटी देत असतांना आलेल्या अनुभवांची प्रवासवर्णनं त्यांनी लिहली, आणि ती भारतापेक्षा वेस्ट ईंडिजमध्येच खुप लोकप्रिय झाली!
आपला काळ गाजवून झाल्यानंतर  आता डॉ चतुर्वेदी क्रिकेट पाहण्यात, वाचण्यात आणि लिखाणात मग्न आहेत. समालोचकांच्या नव्या पिढीमध्ये क्रिकेटच्या ज्ञानाचा अभाव असल्याची खंत बाळगण्यापेक्षा मुळात भाषेचा आणि  अभिव्यक्तीचा अभाव असल्याची खंत त्यांना अधिक जाणवते. टिव्हीमुळे मुळात समालोचनाचंच महत्त्व कमी झाल्याच्या या काळात  आता हिंदी समालोचनाला तर उतरती कळाच लागली आहे. मात्र अश्यातही या साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवणारे चतुर्वेदी अजुनही आशावादी आहेत. शेवटी राज्य असो किंवा नसो. राजा हा नेहमी राजाच असतो. नाही का?

Wednesday 8 February 2012

सुमन कल्याणपूर

सध्या फास्टफुड, फास्ट फॉरवर्ड आणि फास्ट फॉरगेट चा जमाना आहे. एखादी गोष्ट जनमानसावर ठसवायची असेल तर त्याचं सतत हॅमरींग करत रहावं लागतं. पुर्वी एखादी गोष्ट जुनी व्हायला वर्ष, महिने किंवा काही दिवस लागायचे; आता ही वेळ काही मिनिटांवर आली आहे. अश्या परिस्थीतीत एखाद्या कलावंताला स्वतःची ओळख निर्माण करून ती टिकवायची असेल तर सतत रसिकांसमोर काहीतरी नवं घेऊन जात रहावं लगतं.
'मेरी आवाज ही पहचान है'  अशी स्वतःची ओळख निर्माण करणं हे स्वप्न पुर्ण करण्यात अनेकांची हयात निघून जाते पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत नाही. याउलट काही गायकांची ओळख ही मनावर कायम कोरल्या गेलेली असते. अगदी कालपरवाच (२८ जानेवारी) आपला ७५ वा वाढदिवस साजरा केलेल्या सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायन सोडल्याला अनेक वर्षं उलटली तरी त्यांचे नाव व गाणं रसिकांच्या मनात तसंच ताजं आहे.
प्रत्यक्ष सरस्वतीच्या - लता मंगेशकरांच्या आवाजाशी अगदीच मिळताजुळता आवाज असल्याचा त्यांना किती फायदा आणि किती तोटा झाला या विषयाची चर्चा सुमनताईंपेक्षा ईतरांनीच अधीक केली. त्यांनी मात्र या सगळ्या वादांपासुन दूर, आपली कारकिर्द आपल्या निकशांवर सुरू ठेवली. संगीत त्यांच्यासाठी जीवनाचा भाग आहे, आणि पार्श्वगायन हा त्या संगीत साधनेतील एक छोटासा भाग. या संगीत साधनेची सुरवात थेट भवानीपूर या ढाक्याजवळील (तत्कालीन बंगाल प्रांत) छोट्याश्या गावात सापडते. वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले.
१९४३ मध्ये हेमाडी कुटुंबीय मुंबईला स्थायिक झाले आणि सहा वर्षाच्या सुमनच्या रितसर संगीत शिक्षणाला प्रारंभ झाला. या वेळी त्यांचे शेजारी होते केशवराव आणि ज्योत्स्नाताई भोळे तर शाळेतले संगीत शिक्षक होते यशवंत देव! शाळेत या दोघांनी बसवलेलं गाणं ऐकून भोळे दांम्पत्यांनी त्या गाण्याला शुक्राची चांदणी नावाच्या मराठी सिनेमामध्ये रेकॉर्ड करण्याची शिफारस केली. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, पण हे गाणं आणि हा सिनेमाही कधी आलाच नाही. यामुळेच सुमनताईंची कारकिर्द मराठीतून सुरू होता होताच हिन्दी चित्रपटसृष्टीतून सुरू झाली.
दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही त्यांना मिळत गेली. अश्याच एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असतांना तलत मेहमुद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. 'ईस लडकी के आवाज मे जादू है' अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एच एम व्ही कडे स्वतःहून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली. एव्हाना १९५४ साल उजाडलं होतं. सुमन हेमाडी यांनी आपलं पहिलं गाणं रेकोर्ड केलं ते 'मंगु' चित्रपटासाठी. संगीतकार मोहम्मद शफी आणि ओ पी नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी या चित्रपटात पाच गाणी गायली. 'कोई पुकारे धीरे से तुझे' हे त्यांचं पहिलंच गाणं तुफान लोकप्रिय झालं.
मात्र लतादिदिंच्या आवाजाशी असलेलं प्रचंड साधर्म्य या वेळी त्यांच्या मार्गातील अडथळा बनलं. गानसरस्वतीच्या आवाजासारखा आवाज मिळणं हे खरं पाहिलं तर किती मोठं सौभाग्य! पण सुखाचा अतीरेकही कधीकधी महागात पडतो. सुमन हेमाडी ही लता मंगेशकरांची नक्कल करते, असं वाटून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून  अंतर ठेवलं. खरं तर सुमनताईंचा यांचा आवाज लतादीदीच्या जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. या दोन्ही आवाजांमधला फरक तसेच गायनाच्या पद्धतीतला फरक ज्यांचे कान तयार आहेत; अशा फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. त्यातल्या त्यात तेव्हा लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिंदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती. त्यामुळे लतादिदिंशी ज्यांचं पटत नव्हतं अश्या काही संगीत दिग्दर्शकांनीच सुमनताईंकडून गाणी गावून घेतली. यामुळे विनाकारणच वाद वाढतोय हे पाहून त्यांनी राजमार्गाचा नाद तेव्हाच सोडून दिला. मोजकं आणि मनाला भावेल ईतकंच काम करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवलं .
१९५८ मध्ये उद्योजक श्री रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची कारकिर्द ख-या अर्थाने बहरली. आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांनी मोजकी परंतू आवडणारी गाणी निवडली. कॅबेरे, मुजरा आणि कुटुंबात ऐकता येणार नाहीत अशी गाणी गायची नाहीत हा नियम त्यांनी मुद्दामहून लावून घेतला आणि पाळलाच. ठरावीकच गायचं परंतू ते 'खास आपलं' असलं पाहिजे हा नियम त्यांनी जपला. त्यामुळे लतादिदिंचा ऑप्शन हा टॅग मिटवून एक वेगळी ओळख त्या निर्माण करू शकल्या. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरीही त्यांपैकी सुपरहिट झालेल्या गाण्यांचं प्रमाण पाहू जाता कमी गाणी गायला मिळाली म्हणून अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा जास्ती जास्त चांगली गाणी गायला मिळाल्यामुळे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात खरा न्याय सुमन कल्याणपूर यांनाच मिळाला, असं वाटतं. म्हणुनच मागच्या वर्षी त्यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित झाला, तेव्हाचा त्यांनी तो मोठ्या आदरपुर्वक स्विकार केला.
नंतरच्या काळात मग अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते सुमनताईंकडूनच ते गाणे गाऊन घेत. 'आजकल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर' हे 'ब्रह्माचारी' चित्रपटातलं गाणं अनेकांना लतादिदिंनीच गायलंय असं वाटतं. पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे. मध्यंतरीच्या काळात लता मंगेशकर आणि महंमद रफी याच्यात काहीतरी अनबन झाली, तेव्हा युगुलगीतं गाण्यासाठी संगीतकारांनी सुमनताईंचा आवाज वापरला. ही युगलगीतं ईतकी लोकप्रिय झाली, की नंतर रफी  आणि सुमन कल्याणपूर ही जोडीच जमली.
मराठीत तर अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर हा आपला ब्रँडच बनवला होता. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. त्याखेरीज, सुधीर फडके, स्नेहल भटकर या जाणत्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली असंख्य गाणीही लोकप्रिय झाली. त्यांनी मराठी, हिंदीखेरीज १३ भाषांमध्ये पार्श्वगायन केलंय.
१९८० च्या दशकांत कुटुंबाच्या जबाबदा-या सांभाळत त्यांनी आपली करिअरची वाटचालही सुरू ठेवली. या काळात चित्रसृष्टीत झपाट्याने होत जाणारे बदल, त्यांच्या पतींची प्रकृती, ईत्यादींमुळे त्यांनी खुप मोजकी गाणी गायली.  मराठीमध्ये संगीतकारांनी केलेल्या नॉन फिल्मी अल्बम्ससाठीही त्यांनी गायन केलं. मात्र नव्वदच्या दशकात त्यांनी व्यावसायिक संगीतक्षेत्रातून काम करणं बंद केलं. सुमनताईंच्या मते १९९० मध्ये संगीताचा दर्जा खुप ढासळला होता, मात्र आता तो पुन्हा खुप उंचावला आहे. मराठी संगीतात होणाऱ्या नव्या बदलांमुळे या संगीताला खूप चांगले दिवस निश्चितच येतील, असंही त्या मानतात. आता बदलत्या काळात त्यांनी पुन्हा माईक हाती घ्यावा असा आग्रह अनेक संगीतकारांनी केला आहे. सुमनताई मात्र बागकाम, पुष्परचना, आणि एम्ब्रोय़डरी ईत्यादी आपले छंद जोपासत छान गाणी ऐकण्यात व्यस्त आहेत. मधल्या काळात त्यां सार्वजनिक कार्यक्रमातूनही खुप कमी दिसायच्या. २०१० आणि २०११ मध्ये मात्र महंमद रफी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि झी गौरव पुरस्काराच्या माध्यमातून त्यां रसिकांपुढे आल्या. यापैकी एक दोन कार्यक्रमांत त्यांनी काही गाणीदेखील गायली. आजही त्यांच्या आवाजात तीच जादू आहे, याची खात्री परत एकदा सगळ्यांना पटली.
पंचाहात्तराव्या वाढदिवसाच्या शुभमुहुर्तावर त्यांनी संगीतकारांच्या आग्रहाचा स्विकार करून परत एकदा गाणं रेकॉर्ड करावं, हीच प्रार्थना त्यांचे असंख्य चाहते नटेश्वराच्या चरणी करत असतील.