Sunday 25 March 2012

द अंडरटेकर!

बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला!
मार्क विल्यम कॉलॉवे. हे नाव फारसं कुणाला माहिती असण्याचं काही कारण नाही. १९९० मध्ये, वयाच्या साडेचोविसाव्या वर्षी डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ रेसलींगच्या रिंगमध्ये 'द अंडरटेकर' या नावाने पाय ठेवल्यापासुन मार्क कॉलॉवेनं जगाला सगळंकाही विसरायला लावलंय, अगदी स्वतःचं खरंखुरं नावही. रेसलींग न बघणा-यांसाठी तो एक 'भयावह पहेलवान' आहे. फॅन्ससाठी तो सर्वात मोठा 'ईंटरटेनर' आहे, आणि व्यावसायिक रेसलींगच्या क्षेत्रात आज 'द अंडरटेकर' हे दैवत आहे. जगभर 'व्यावसायिक रेसलींग' जाणणा-या आणि ना जाणणा-या आबालवृद्धांकरिता या क्षेत्राचा शुभंकर बनलेल्या 'अंडरटेकर' ने कालच (२४ मार्च) आपला छेचाळीसावा वाढदिवस साजरा केला.
खरं म्हणजे अंडरटेकरचा 'बि-लेटेड' हॅपी बर्थडे हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या रवीवारी होणा-या डब्ल्य़ुडब्ल्य़ुईच्या वर्षातल्या सगळ्यात मोठ्या 'रसलमेनिया' नावाच्या स्पर्धेमध्ये दरवर्षी आपोआपच साजरा होत असतो. कारण गेल्या एकोणविस वर्षापासुन या स्पर्धेत अंडरटेकरने पराजय पाहिलेला नाही. या वर्षीच्या रसलमेनियामध्ये जेव्हा स्टेडिअम अंधारात बुडून जाईल, दूरवरच्या स्मशानातलं मोठठं घड्याळ एकामागुन एक बारा ठोके देइल, गुढ निळसर प्रकाशकिरणांनी आसमंत भारला जाईल, आणि पांढ-या धूराच्या लोटांमधून काळे कपडे घातलेला सहा फुट दहा ईंचाचा, एकशे छत्तीस किलोचा 'द अंडरटेकर' धिम्या गतीने एक एक पाऊल टाकत रिंगमध्ये पदार्पण करेल तेव्हा त्याच्या खांद्यावर स्मशानातल्या हाडं गारठवीणा-या थंडीपासुन बचाव करणारा काळा कोटच नव्हे, तर आपल्या विजयामालीकेमध्ये आणखी एका वर्षाची बेरीज करून २०-० असा स्वतःचाच विश्वविक्रम करण्याची महाजबाबदारीही असेल. त्याचा खेळ आणि त्याचा विजय पाहू ईच्छीणा-या जगभरातील कोट्यावधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझंही असेल. आणि त्याच्या खेळावर कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणुक केलेल्या व्यावसायिक रेसलींग जगताच्या आर्थीक उलाढालीचा सगळा खेळही असेल. 'द अंडरटेकर' अर्थात मार्क कॉलोवे गेल्या पंचवीस वर्षांपासुन हा सगळा 'खेळ' समर्थपणे खेळतोय.
मात्र पंचविस वर्षापुर्वी मार्कला हा खेळ मुळीच खेळायचा नव्हता. अमेरिकेल्या प्रत्येक उंचपु-या आणि धिप्पाड मुलाचं जे एकमेव स्वप्न असतं तेच त्याचंही होतं - बास्केटबॉल! ह्युस्टन (टेक्सास) मधल्या कॅथरीन आणि फ्रॅंक कॉलॉवे या उच्च मध्यमवर्गीय दाम्पत्याच्या पाच मुलांपैकी मार्क हे शेंडेफळ. बास्केटबॉलचं जीतकं वेड तीतकंच कौशल्यही भारीच. ल्युफकिनमधील सन्मानाच्या ऍजेलीना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला तोच मुळी बास्केटबॉलच्या शिष्यवृत्तीच्या भरवश्यावर! मात्र नियतिच्या मनात वेगळंच काही होतं. कॉलेजमध्ये एक एक पराक्रम करणा-या मार्कचा मैदानातच भयंकर अपघात झाला. टोंगळा असा काही दुखावला, की मैदानातून बाहेरच जावं लागलं. पुढची अनेक वर्षे या दुखापतीतून सुटका होणार नव्हती. मग दूसरं काहीतरी करायचं ठरलं.
त्या वेळी रॉड्रीक मॅकमॅहॉन यांनी अमेरीकेत सुरू केलेल्या व्यावसायिक रेसलिंगचं चांगलंच पेव फुटलेलं होतं. बॉक्सींग, मिक्स्ड मार्शल आर्ट, आणि बेबंद मारामारी या सगळ्यांचा संगम असलेली ही विचित्र स्पर्धा. त्यातही ग्लॅमर, अभिनय, माईंड गेम ईत्यादी यायला हवं अशी व्यवस्था केलेली. आपल्या नावाने लढता यायचं नाही. कुठलंतरी पात्र रंगवा. त्या पात्राच्या रूपाने लढाई करा. त्याला जींकवा, त्याला हरवा, असा हा खेळ. एकोणीस वर्षाच्या मार्कने या क्षेत्रात पाउल ठेवलं. अनेक नावं आणि अनेक पात्रं रंगवली. काही लढती जिंकल्यादेखील. व्यावसायिक रेसलींगचे सामने घेणा-या अनेक कंपन्या त्याने बदलवल्या.
१९८०-९० चा तो काळ होता. 'डब्ल्युडब्ल्युएफ' या सगळ्यात मोठ्या कंपनीशी पहिला करार झाला. व्हिन्सेन्ट मॅकमॅहॉन त्या वेळला आपल्या वडिलांची कंपनी सांभाळत होता (आजही सांभाळतो आहे.) त्याच्या सुपिक डोक्यातून उंचपु-या मार्कसाठी एका पात्राचा जन्म झाला. आजवर असं पात्र रेसलींगच्या रिंगमध्ये आलंच नव्हतं. जुन्या काळातील ख्रिश्चन स्मशानभुमीमध्ये राहणारा, तीथली कबर खोदण्यापासुन सगळी व्यवस्था पाहणारा म्हणजे अंडरटेकर! मुळात कल्पनाच भयावह. थेट स्मशानातून, ते रहस्य, ते गुढ, आणि त्या कपड्यांसह आलेला, तांत्रीक, अघोरी शक्तींनी परिपुर्ण असा अंडरटेकर! रिंगमध्ये पहिली एन्ट्री घेतल्या दिवसापासुन ते आजतागायत 'द अंडरटेकर' ची हीच ओळख कायम आहे. त्याच्या अनेक दंतकथा बनल्या. तो मरून परत आलाय. त्याला जीवंत गाडलं तरीही तो परतला. त्याला जाळल्यावरही तो जीवंत राहिला. तो अचानक प्रगट होतो. अचानक गायब होतो. आणि ईतरही अनेक! अर्थात हे सगळं लोकांनी रेसलींग पहावं म्हणुन विणलेलं जाळं. अगदी त्याचं मुळही 'ह्युस्टन' नसुन 'डेथ व्हॅली' असल्याचं सांगुन, त्याच्या शेवटच्या वाराला 'लास्ट राईड' आणि 'टॉम्बस्टोन' अशी नावं देऊन,  त्याच्या व्यक्तीमत्त्वाभोवतीचं मृत्युचं मळभ आणखीच दाट करण्यात आलं.
मार्क कॉलॉवे मात्र त्यात चपखल बसला. विस वर्षांच्या वाटचालीत सगळ्याच चॅंम्पियनशिप्सचे बेल्टस त्याने आपल्या कंबरेभोवती गुंडाळले, जवळपास सर्व मोठमोठ्या लढवैय्यांना धूळ चारली. अगदी आपल्या भारतातून तीकडे गेलेल्या महाकाय ग्रेट खलीलाही हरवलं. या सर्व चॅम्पीअनशिप्सपेक्षा 'द अंडरटेकर' हे नाव केव्हाच वरच्या पातळीवर पोचलं. तो त्याच्या खेळाचा राजदूत बनला.
मात्र या भितीदायक पात्राचा कधीकधी कंटाळाही येऊच नये का? तसा तो मार्कलाही आला. खासकरून दोन गोंडस मुलींचा बाप झाल्यावर असले डोळे पांढरे करणे, भुताचे खेळ करणे त्याला नकोसे वाटू लागले. म्हणुन मग त्याने अमेरिकन बॅड ऍस नावाचं एक पात्र जगायला सुरूवात केली. मोटरसायल चालवण्याची त्याला भारी आवड. मोटरसायलचं एक मोठं कलेक्शनच त्याच्याकडे आहे. त्यातूनच एक गाडी काढून थेट गाडीवर बसुनच त्याने रिंगमध्ये जाणं सुरू केलं.
मात्र जुन्या अंडरटेकरची आठवण कुणालाच पुसता आली नाही. २००४ मध्ये आपल्या जुन्या रूपात त्यानं पुनरागमन केलं. त्यानंतर आजपर्यंत 'डेडमॅन' रेसलींग जगतावर राज्य करतो आहे. रेसलींगच्या चाहत्या तरूण वर्गासाठी 'अंडरटेकर' म्हणजे स्फुर्ती, शक्तीचं स्थान आहे. अमेरिकेच्या स्थलसैन्यामधील सैनिकांना प्रोत्साहन म्हणुन त्यांच्याबरोबर थेट छावणीत जाऊन राहणारा; महाविद्यांलयांमध्ये जाऊन बास्केटबॉलचे धडे देणारा, आणि रेसलींगच्या रिंगच्या बाहेर आल्यावर वाचन, सिनेमा, बॉक्सींग, रेसिंग ईत्यादींची आवड बाळगणारा, अतीशय नर्मविनोदी आणि हसतमुख व्यक्तीमत्त्वाचा अमेरिकन मध्यमवयिन माणूस ही मार्क कॉलॉवेची खरी रूपं आहेत. रेसलींगव्यतीरिक्त स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचा त्याचा व्यवसायही आहे. अर्थात भागीदारीमध्ये. कारण सेलीब्रिटी  असल्यामुळे मार्क स्वतः डिल फिक्स करायला जाऊ शकत नाही. मात्र मागे एकदा एंजेलीना जॉली आणि ब्रॅड पिट यांना एक अपार्टमेन्ट विकलं, तेव्हा तो स्वतः कागदपत्रं घेऊन गेल्याचं अमेरिकेल्या नियतकालिकांनी प्रकाशीत केलं होतं.
शरीर साथ देतंय तोवर रेसलींग रिंगची मजा आहे, हे मार्कला ठाऊक आहे. त्यामुळेच त्याचा फिटनेस कमालीचा आहे. आजही दिवसातले सहा तास तो जीममध्ये असतो. ज्या वयात अनेकजण या जीवघेण्या खेळातून निवृत्ती पत्करून समालोचक किंवा मॅनॅजर होतात, त्या वयात तो त्याच्या करिअरच्या सर्वात देदिप्यमान शिखरावर पोचलेला आहे. कदाचित येत्या रवीवारी २०-० चा विश्वविक्रम काबीज करून तो शतकांची शंभरी पुर्ण करणा-या सचिनसारखा 'आभाळाएवढा'ही होउन बसेल.

Tuesday 20 March 2012

कमला प्रसाद बिसेस्सर

जानेवारी महिन्यात जयपूरला झालेल्या प्रवासी भारतीय महोत्सवाच्या समारोपिय सोहळ्यादरम्यानची ही गोष्ट. सोहळा रंगात आला होता. अध्यक्ष होत्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती प्रतीभाताई पाटील आणि मुख्य अतीथी होत्या त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर. परदेशी पाहूण्या असल्या तरीही कमलाप्रसाद यांनी त्या दिवशी पारंपारिक राजस्थानी वेषभुषा केलेली होती. रेशमी साडी, आणि सोन्याचे राजेशाही दागीने! राष्ट्रपती प्रतिभाताईंनी त्यांचं स्वागत आणि सत्कार केला, आणि पुढच्याच क्षणी, अगदी सहजपणे कमलाप्रसाद यांनी प्रतीभाताईंना वाकून नमस्कार केला. अगदी पायाला हात लावून. अर्थात प्रतीभाताईंनीही लगेच त्यांचे हात धरून त्यांना  आलींगन दिलं आणि त्रिनिदादच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांची जागा पायाशी नसुन मनात असल्याचं दाखवून दिलं.
खरं म्हणजे मूळच्या भारतीय वंशाच्या असल्यामुळे कमलाप्रसाद यांचे वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने ज्येष्ठ अश्या प्रतिभाताईंना नमस्कार करणे हा त्यांच्या संस्कारांचा भाग होता, परंतू या गोष्टीचे पडसाद त्रिनिदादमध्ये बरेच वेगळे उमटले. विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीने अश्याप्रकारे चरणस्पर्ष करणे हा त्रिनिदादचा अपमान असल्याची बोंब करून बिसेसर यांच्या विरोधात आगडोंब उसळवला. त्यांच्या विरोधात सभा, रॅली आणि संमेलनं झाली. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. मात्र कमलाप्रसाद यांनी या मुद्यावर कसलीच तडजोड केली नाही. 'हे माझे संस्कार आहेत, आणि यात काहीही गैर नाही,' या आपल्या मतावर त्या शेवटपर्यंत ठाम राहिल्या. विरोधाचं वादळ आता शमलंय. प्रवासी भारतीय महोत्सवादरम्यानच्या या 'चरणस्पर्षाने' जींकून घेतलेली अवघ्या जगभरातील भारतीयांची मनं मात्र कायमची कमलाप्रसाद बिसेस्सर यांच्याकडे राहून गेलेली आहेत. १०१ वा जागतीक महिला दिन आपण नुकताच साजरा केला. अश्यावेळी आपली ओळख अशी मनामनांमध्ये कायमची कोरून ठेवणा-या कमलाप्रसाद बिसेस्सर यांची आठवण येणं मग सहाजीकच नाही का?
अर्थात 'ओळख बनवणे' ही गोष्ट अनेकजण करून दाखवतात, मात्र कमलाप्रसाद यांची सुरूवात झाली ती 'ओळख शोधण्यापासुन. होय. ८४५ ते १९१७ या कालावधीत भारतातून वेस्ट इंडिज बेटांवर आणलेल्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार वेठबिगारांमध्ये त्यांचे पूर्वज होते. भारताच्या कुठल्याश्या खेड्यातून एका समुहाबरोबर ईंग्रजांनी त्रीनिदादला आलेल्या कुण्या एका मिश्रा नावाच्या माणसाची आपण वंशावळ आहोत, एवढीच काय त्यांना स्वतःबद्दल माहिती होती. चार पिढ्या त्रीनिदादमध्येच होवून गेलेल्या. तब्बल १२२ वर्ष झाली होती. आपले पुर्वज नेमके कुठले? भारतातल्या नेमक्या कुठल्या गावचे? ही माहिती त्यांच्याकडे नव्हती. मात्र आपली मुळं माहिती करून घेण्याची ओढ कुणाला बरं नसते? लिलराजप्रसाद नावाच्या एका छोट्याश्या तेलकंपनीच्या मालकाच्या मुलीला, कमलालादेखील ही ओढ लहानपणापासूनच होती.
आधी त्रीनिदादमधल्या आपल्या सिपारिया नावाच्या जन्मगावी, आणि नंतर 'युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडिजमध्ये शिक्षण घेत असतांना, त्याहीनंतर इंग्लंडच्या नॉरवूड टेक्निकल कॉलेज आणि हय़ूज वूडिंग लॉ स्कूलमध्ये कायद्याचा अभ्यास करतांना,  मग जमैकामध्ये किंग्स्टनला सेंट अ‍ॅन्ड्रय़ूज हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणुन काम करतांना, जमैका कॉलेज ऑफ इन्शुरन्समध्ये मानद प्राध्यापक म्हणून शिकवतांना आणि अगदी त्रिनिदादच्या पहिल्या महिला अ‍ॅटर्नी जनरल बनल्यावरही त्यांच्या मनात ही ओढ कायम राहिली. पण मार्ग काही मिळाला नाही. दरम्यान ग्रेगरी बिसेस्सर यांच्याशी विवाह झाला आणि कमला प्रसाद ही कमलाप्रसाद बिसेस्सर झाली. 
अ‍ॅटर्नी जनरल असतांनाच त्यांना सक्रीय राजकारणात येण्याची संधी प्राप्त झाली. सुरूवातीपासुनच धाडसी वृत्तीच्या कमलाप्रसाद यांनी १९९५ मध्ये निवडणुक लढवली आणि सिपारिया या आपल्या जन्मगावातूनच त्या निवडूनही आल्या. त्रिनिदादमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या एकुण लोकसंख्येच्या ४४ टक्के आहे, मात्र अजुनही हवं तसं प्रतिनिधित्त्व भारतीय वंशाच्या लोकांना मिळालं नव्हतं. नाही म्हणायला एकदा वासुदेव पांडे नावाचे भारतीय वंशाचे पंतप्रधान या देशाला मिळाले. मात्र त्यांचा कार्यकाळहे वादग्रस्तच होता. कमलाप्रसाद यांच्या युनायटेड नॅशनल काँग्रेसने जवळपास ४३ वर्षे विरोधी पक्षाच्या बाकावर बसुन घालवली होती. पांडे यांच्यानंतरची वजनदार नेता म्हणुन कमलाप्रसाद यांचीच निवड पक्षाने केली, आणि त्यांनी पक्षात नवचैतन्य निर्माण केलं.  काँग्रेस ऑफ द पीपल, ‘नॅशनल जॉइंट अ‍ॅक्शन कमिटी, ‘टोबॅगो ऑर्गनायझेशन ऑफ द पीपल आणि मूव्हमेंट ऑफ द सोशल चेंज या पक्षांबरोबर आघाडी उभी करत २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत झंझावाती प्रचार करून त्यांनी तेव्हाचे पंतप्रधान पॅट्रिक मॅनिंग यांच्या पीपल्स नॅशनल मूव्हमेंटया पक्षाला पराभूत केलं. आघाडीने कॅरेबियन नॅशनल पार्लमेंटमधील ४१ जागांपैकी २९ जागांवर विजय मिळविला. कारण बिसेसर यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्याही एकाच जमातीचे देशावर वर्चस्व प्रस्थापित होणार नाही याची काळजी घेईल अशी आशा जनतेला आहे.  त्रिनिदादच्या ईतीहासातील त्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
पंतप्रधान झाल्यावरही त्यांच्या पुर्वजांप्रती असलेली ओढ मनात कायम होती. वासुदेव पांडे पंतप्रधान असतांना त्यांनी आपल्या भारतीय पुर्वजांचा शोध लावण्यासाठी शम्सुद्दीन नावाचे एक तज्ञ शोधकर्ते बोलावले होते. बिसेस्सर यांनीही त्यांनाच पाचारण केलं. प्रसाद आणि बिसेस्सर यांच्या घरी असलेली काही कागदपत्रे, सिपारिया गावी असलेल्या सरकारी नोंदींतून मिळालेले काही पुरावे आणि ईतर बरंच साहित्य जमवून शम्सुद्दीन यांचा शोध सुरू झाला.
पण हे काम मोठं जिकरिचं होतं. पुरावा म्हणुन शम्सुद्दीन यांच्याजवळ व्होल्गा नावाच्या प्रवासी जहाजाचं एक तिकिट आणि नाही म्हणायला ऑक्टोबर २१, १८८९ ही एक तारिख होती. यावरून या जहाजावरून आलेल्या ५५५ वेठबिगारांपैकीच कुणीतरी पंतप्रधानांचा पुर्वज असला पाहिजे हे कळलं. त्यांचं आडणाव मिश्रा होतं, ही ओळख वापरून जहावरच्या सर्व प्रवाशांची यादी मिळवली असता, जवळपास पन्नास मिश्रा नावाचे लोक जहाजावर सापडले. व्होल्गा हे जहाज कलकत्यावरून निघालं असल्याचं कळल्यावर तीकडे चौकशी झाली. बिहारच्या बक्सरमधल्या लोकांना रिपब्लीकन बेटावर घेऊन जाण्याची जबाबदारी या जहाजावर होती असं कळल्यावर बस्तरमध्ये शोध सुरू झाला. कलकत्ता, बस्तर, त्रिनिदाद, अशी आणखी काही कागदपत्रं मिळत गेली, आणि बिहारमधल्या भेलपूर गावातले रामलखन मिश्रा हेच पंतप्रधानांचे पणजोबा ही ओळख पटली.
मिश्रा १८८९ मध्ये त्रिनिदादला आले आणि त्रिनिदादमध्ये ईथल्याच मुलनिवासी मुलीशी विवाहबद्ध झाले. त्यांना चिरोंजीप्रसाद नावाचा मुलगा झाला. त्यांनी मुळच्या भारतीय वंशाच्या सुमित्रादेवींशी विवाह केला आणि कमलाप्रसाद यांच्या वडिलांचा, लिलराजप्रसाद यांचा जन्म झाला. पिढी दरपिढी परिस्थीती सुधारत गेली आणि लिलराज यांनी स्वतःची तेल कंपनी काढली. कमला या आपल्या मुलीलाही त्यांनी सुरूवातीपासूनच उत्तम शिक्षण दिलं. अगदी विदेशातही पाठवलं. ही वंशावळ माहिती झाल्यावर कमला प्रसाद बिसेस्सर भारत दौ-याची वाट पाहू लागल्या.
प्रवासी भारतीय महोत्सवादरम्यान त्यांना ही संधी मिळाली. बक्सरमधल्या भेलपुर गावातल्या लोकांनी त्यांचं स्वागत अगदी माहेरवाशीण मुलीसारखं केलं. त्यांना साडी, दागिने अहेर म्हणुन देण्यात आले, आणि सुवासिनिंनी त्यांची ओटीही भरली. या भेटीदरम्यान त्यांना आपल्या आसवांना आवर घालणं मोठं कठीण होउन बसलं होतं. आज आपण जी काही हिम्मत मिळवली आहे, ती सगळी याच मातीतुन आलेली असल्याचं त्यांनी साश्रृ नयनांनी मान्य केलं. त्यांच्या पणजोबांच्या ईतर नातेवाईकांचे वंशजही भेलपुरमध्ये त्यांना भेटले. एकुणच काय तर हा सोहळा त्यांच्या मनात कायम घर करून केला. हा आनंद मिळवून देणा-या भारताच्या भुमीच्या सर्वोच्च स्थानावर विराजमान असलेल्या प्रतिभाताईंच्या पायाला हात लावून नमस्कार करावासा वाटणं हे मग खुपच सहाजीक होउन बसतं. नाही का?

Sunday 11 March 2012

उषा उत्थुप

मनं जिंकण्याची कला काही लोकांना थेट देवाकडूनच मिळालेली असते. जेथे जातील तेथे त्यांचे चाहते तयार होतात आणि जे काही करतील त्याचं उत्साहाने स्वागतच होतं. "रोको ना, रोको ना, मुझको प्यार करने दो!" असं म्हणत ज्येष्ट गायिका उषा उत्थुप यांनी यंदाचं सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचं फिल्मफेअर अवार्ड स्विकारलं आणि ईंडिपॉपच्या अध्वर्यु; भारतीय संस्कृतीच्या वैश्वीक राजदूत असलेल्या उषाजींच्या अगणीत चाहत्यांनी जगभर याचा आनंद साजरा केला. खरं म्हणजे १९७८ साली जेव्हा 'वन टू चा चा चा' या गाण्यासाठी त्यांचं नामांकन झालं होतं तेव्हाच हे फिल्मफेअर उषाजींना मिळायचं होतं. त्यानंतरही 'हरी ओम हरी' आणि 'रंबा हो!' या गाण्यांसाठी त्यांचं नामांकन झालं होतं, पण फिल्मफेअरने हुलकावणी दिली ती तब्बल चाळीस वर्षे. अर्थात पंचवीस भाषा, पन्नास वर्ष, शेकडो गाणी, हजारो कार्यक्रम, लाखोंमध्ये अल्बम्सची विक्री, कोट्यावधी चाहते आणि अब्जावधी शुभेच्छांनी खच्चुन भरलेल्या त्यांच्या वाटचालीला अवॉर्डची गरजच ती काय म्हणा?
मात्र आनंद, मग तो कितीही छोटासा का असेना, पुरेपूर अनुभवायचा, साजरा करायचा आणि सगळ्यांना वाटायचा हे सुत्र कायम जपलेल्या उषाजींनी फिल्मफेअरचा आनंदही आपल्या 'ईश्टाईल' मध्ये सगळ्यांबरोबर साजरा केला. सगळ्यांना, अगदी सगळ्यांनाच आपल्याबरोबर गायला, थिरकायला लावणं ही त्यांची खासियतच  आहे. ते सहाजीकही आहे. कारण चेन्नईचं मुळ, मुंबईचा जन्म, दिल्लीला करिअरची सुरूवात आणि कलकत्त्याला (आता कोलकाता) लग्न -- असं भारताच्या चारही महानगरांशी त्यांचं अतुट नातं आहे.  हल्ली त्यांच्या मुंबई-कोलकाता वा-या सुरू असतात. कोलकात्यात लोकांना दोनच दिदी ठाऊक आहेत. एक म्हणजे ममता बॅनर्जी आणि दूस-या उषा उत्थुप. त्यांच्या ठसठशीत डिझाईनर बिंदी, भरपूर दागीने, आणि थोडा भडक मेक-अप यांमुळे बंगाली लोकांना त्या बंगालच्या संस्कृतीचं प्रतिक वाटतात, तर कांजीवरम साडी, केसात माळलेले भरमसाठ गजरे यामुळे मद्रासी लोकांना त्यांच्या ऍंबेसेडर वाटतात. मुंबईत येऊन जेव्हा छानसं मराठी बोलतात तेव्हा त्या बॉर्न मुंबईकर वाटतात आणि दिल्लीत गेल्यावर जेव्हा ओबेरॉय इंटरकाँटिनेंटल हॉटेलात गात असतानांच्या आपल्या उमेदवारीच्या दिवसांच्या आठवणी सांगतात तेव्हा दिल्लीकरांना त्यां  आपल्या वाटतात. उषाजी मात्र अवघ्या भारताच्या आहेत, असं त्या नेहमी सांगतात. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्यांच्या कपाळावरची बिंदी राष्ट्रध्वजातील तीन रंग धारण करते, त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमांचा शेवट 'वंदे मातरम' ने होतो आणि चॅरिटीसाठी घेण्यात येणा-या गाण्याच्या कार्यक्रमांना त्या आवर्जुन  उपस्थीत असतात. अर्थात आयोजकही त्यांना निमंत्रण देतातच, कारण भारतात सध्या असलेल्या काही आघाडीच्या 'क्राउड पुलर्स' मध्ये त्यांचं नाव अग्रणी आहे.
गर्दी खेचण्याची ही क्षमता त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्त्वामुळे, गाणं म्हणण्याच्या आणि सादरिकरणाच्या त्यांच्या वैषिष्ट्यपुर्ण शैलीमुळे, त्यांच्या सुपरडुपरहिट गाण्यांमुळे तर  आलेली आहेच, शिवाय  उषाजींबद्दल भारतीय प्रेक्षकांच्या मनात असलेला आदर आणि सन्मानाची भावना ही त्यांना लाभलेली खुप आगळी देणगी आहे. हा आदर मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आधी उषा सामी अईयर आणि नंतर उषा जानी चाको उत्थुप यांना तारेवरची कसरत करावी लागली आहे, हे विसरून चालायचं नाही.
त्यांचा जन्म मुंबईचा आणि वडिल पोलीस अधिकारी. बालपण गेलं ते भायखळ्यातल्या पोलीस क्वार्टरमध्ये. पारंपारिक तामिळ ब्राम्हण घरात शास्त्रीय संगीत शिकण्याची पद्धतच असते. मात्र मुळात उषाचा आवाजच वेगळ्या पठडितला. त्यामुळे संगीत शिकताच येणार नाही, असं शिक्षकांनीच घोषित करून टाकलं होतं. उषाच्या मोठ्या बहिणी आणि भाऊ मात्र संगीताचा रियाझ करायचे. त्यांचं पाहून थोडंफार संगीत शिकता आलं, तेवढंच काय ते शास्त्रीय प्रशिक्षण.  रॉक, पॉप, जॅझ या पद्धतीची गाणि सिलोन रेडिओवर ऐकत असतांना आपल्या आवाजाला साजेसं संगीत हेच असावं, अशी अनुभुती झाली. शिकवणारं तर कुणी नव्हतंच. मग स्वतःच ऐकून ऐकून शिकणं सुरू झालं. शास्त्रीय संगीत शिकणा-या उषाच्या मोठ्या बहिणी कधीमधी रेडिओवर गात असत. त्यांच्याबरोबरच रेडिओस्टेशन वर आलेल्या नऊ वर्षाच्या उषाचा आवाज अमिन सयांनींनी ऐकला आणि तीला एक गाणं गाण्याची संधी दिली. 'मॉकींगबर्ड हिल' हे रेडिओवर गाजणारं गाणं सादर झालं. आणि त्यानंतर बरेचदा रेडिओवर पॉप संगीत म्हणण्याची संधी मिळाली. रंगमंचावर गाणं सादर करण्यासाठी मात्र आपल्या मुळगावी, चेन्नईला जावं लागलं. तेव्हा उषाचं वय असेल उणंपुरं विस वर्षे.
चेन्नईमध्ये च्या माऊंट रोडवरच्या नाईन जेम्स नाईटक्लबमध्ये सहज म्हणुन नातेवाईकांबरोबर गेलेल्या उषाने त्यांच्या आग्रहास्तव क्लबच्या बॅंण्डबरोबर गाणं सादर केलं. मॅनॅजरला ते ईतकं आवडलं, की तीने आठवडाभर क्लबमध्ये रोज गाणं म्हणावं अशी गळ त्याने घातली. सात दिवसांच्या गाण्याचं मानधन म्हणुन कांजीवरमची साडी मिळाली. तेव्हापासुनच मग हीच साडी उषाजींचा ट्रेडमार्क बनली.
मुळात पॉप, जॅझ या पाश्चात्य गाण्याला, त्यातही नाईटक्लबमध्ये गाणी म्हणण्याला त्या काळी अजीबातच प्रतिष्ठा नव्हती. उषाजींच्या 'सादगी' मुळे या क्षेत्राता भारतात मानाचं स्थान मिळवता आलं. साडी, गजरा, दागीने ही त्यांची वेषभुषा त्यांचं भारतीयत्त्व जपत गेली, आणि पाश्चात्य संगीत सादर करणारी ही तरूणी देखील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणा-या कोणत्याही घराण्याच्या गायिकेपेक्षा वेगळी नाही, हे लोकांना लक्षात येऊ लागलं. कलकत्त्याच्या त्रींकास नाईट क्लब मध्ये गात असतांनाच त्यांची गाठ जानी चाको उत्थुप यांच्याशी पडली. मुळच्या केरळमधील कोट्टायमच्या असलेल्या या युवकाशी विवाह करूनच त्या उषा उत्थुप झाल्या. कलकत्ता, मुंबई, दिल्लीत नाईट क्लब्समध्ये गाण्याचे कार्यक्रम होतच होते. दरम्यान काही अल्बम्सही रिलिज झाले. नाव मात्र व्हायचं राहिलं.
१९७० च्या सुमारास दिल्लीतल्या ओबेरॉय इंटरकाँटिनेंटल हॉटेलात गात असताना त्याच हॉटेलात देवआनंद आणि त्यांच्या नवकेतनमधील काही सहका-यांचा मुक्काम होता. त्यात संगीतकार राहुलदेव बर्मनही होते. हरे राम हरे कृष्णमध्ये हिप्पींच्या दम मारो दमगाण्याची जुळवाजुळव सुरू होती. नेहमीपेक्षा वेगळ्या आणि हिप्पी संस्कृतीशी जुळेल अशा आवाजाच्या शोधात आरडी होते. उषाचा आवाज त्यांच्या मनाला एकदम भिडला आणि मग ही मंडळी उषाला भेटली. हरे राम हरे कृष्णमधल्या आवाजाने चांगलीच धूम मचवली आणि उषाचं नाव देशभर झालं. सत्तर आणि ऐशींच्या दशकात आरडी आणि बप्पी लेहरी सारख्या संगीतकारांकडे उषाजींनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली. खुप गायला मिळालं नाही, पण जेवढं मिळालं ते खुप गाजलं. म्हणुन मग स्टेज शो करण्यावर भर दिला.
स्टेज शो च्या निमित्ताने  भारतभर फिरायला मिळालं. अनेक स्थानिक भाषा यामुळे आत्मसात करता आल्या. तामिळ, तुळू, तेलुगु, मराठी, कोकणी, बंगाली, पंजाबी, कन्नड, मल्याळम, गुजराती, ओरीया, आसामींसह सतरा भारतीय भाषा आणि ईंग्लीश, डच, फ्रेंच, जर्मन, ईटालियन, सिंहली, स्वाहिली, रशीयन, स्पॅनिश, नेपाळी, झुलुसह अनेक विदेशी भाषांमधून त्यांनी गाणी गायली. यापैकी अनेक भाषा त्यांना बोलताही येतात.
उषाजींना अभिनयाचंही अंग आहे. बॉम्बे टू गोवामध्ये एका गाण्यात त्यांनी दर्शन दिलं होतं. नंतर काही दाक्षिणात्य चित्रपटांतूनही छोटी छोटी कामं केली. मल्याळी चित्रपटही केले. सात खून माँफमध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाजने मोठी भूमिका देऊन त्यांच्या अभिनयक्षमतेचा चांगला वापर करून घेतला.
पुर्वापारापासुन चालत आलेल्या साम्राज्यावर आपल्या कर्तृत्त्वाने अधिकार प्राप्त करणं हे नक्कीच मोठं यश आहे. मात्र आपलं स्वतःच ईंद्रप्रस्थ तयार करून त्याला पुर्वापारच्या साम्राज्याच्या तोडीस नेऊन ठेवण्याचा पराक्रम प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा असणारे वीरच करू शकतात. इंडिपॉपच्या साम्राज्याची मुहुर्तमेढ भारतात रोवून त्याचं ईंद्रप्रस्थ करणा-या उषाजींवर असलेली ईश्वरी क़ृपा आणि देवाने त्यांना दिलेलं मनं जिंकण्याचं वरदान येती अनेक वर्ष आपलं संगीतभावविश्व समृद्ध करत राहिल, हे नक्की.

Thursday 1 March 2012

'शीळसम्राट' के. शिवप्रसाद!

शीळ.
कदाचित सगळ्यात सहज, नकळत, आपोआप उमगणारी एक गोष्ट! म्हणुनच बरीच दुर्लक्षीतही. बोलायला, चालायला, गायला, नाचायला शिकवावं लागतं, पण शिळ अगदी सहज येते, न शिकवता. कधितरी मोकळ्या हवेत फिरतांना, कधी सिनेमातला फाडू डायलॉग ऐकल्यावर, कधी हिरोईनच्या एन्ट्रीवर, कधी गल्लीतल्या क्रिकेट मॅचमध्ये, कधी 'ईशारा' म्हणुन, कधी कौतुक म्हणुन, कधी मस्ती म्हणुन आणि कधी सुस्ती म्हणुन! शीळ प्रत्येकजण वाजवतो. अगदी 'रानारानात' जाऊन 'राया' चा 'काळवेळ' आणि 'ताळमेळ' बिघडेपर्यंत!
कोमोरावलु शिवप्रसादही शीळ वाजवायचा. तासनतास! 'होट घुमा सिटी बजा' हा मंत्र अगदी कालपरवा आलेला, पण शिवप्रसादने तो पन्नास वर्षांपुर्वीच आत्मसात केला होता.  आंध्रप्रदेशातल्या गुंटुर जिल्ह्यातल्या बापट्टल नावाच्या छोट्याश्या समुद्रकिना-यावरील गावात वसलेल्या आपल्या घरी दिवसभर गाण्यांच्या एल पिज लावून त्याबरोबर शिळ वाजवत राहणे हाच शिवप्रसादचा दिनक्रम होता. शीळ त्याच्या तन-मनात ईतकी भरली की तो भारताचा, नव्हे जगाचा पहिलाच व्हिसल विझार्ड बनला! ह्युमन फ्ल्युट, प्रकृतीमुरली, आंध्रा नाईटिंगेल, कलासरस्वती के शिव प्रसाद यांनी केवळ शीळ वाजवण्याचे १० हजारच्या वर कार्यक्रम जगभर सादर केलेत. शास्त्रीय संगीताच्या बंदिशीपासुन ते कोलावेरी डी पर्यंत सगळंकाही केवळ शीळ वाजवून व्यक्त करू शकणा-या या जगावेगळ्या कलाकाराची खासियत आहे ती कर्नाटक आणि हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर असलेलं सारखंच प्रभुत्त्व, संगीतांच्या विविध अंगांचा, वाद्यवृंदाचा बारकाईने केलेला अभ्यास आणि जगातल्या कुठल्याही भाषेचं बंधन नसलेली वेड लावणारी शीळ!
मात्र वेड लावण्याचं हे कसब आत्मसात करण्यासाठी आधी अनेक वर्ष शिवप्रसादला 'वेडा' हे बिरूद मिरवावं लागलं. घरी शास्त्रीय संगीताची नव्हे तर शास्त्र आणि विज्ञानाच्या अभ्यासाची, उच्चशिक्षणाची परंपरा होती. संगीताला विरोध तसा नव्हता, पण संगीतातल्या बंदिशी, आरोह-अवरोह, आणि आलाप ताना गायचे सोडून मुलगा शीळच का म्हणुन मारत राहतो, हा प्रश्न त्यांच्या आठ मोठ्या भावां-बहिंणींसह आई आणि वडिलांनाही पडायचा. त्यातल्या त्यात लहानग्या शिवाला दम्याचा विकार जडला आणि तो त्याच्या पत्त्थ्यावरच पडला! डॉक़्टरानीच सांगीतलं की याला शीटी वाजवू द्या! त्यामुळे श्वसनाचा व्यायाम होतो. दमा लवकर बरा होइल! मग काय पहायचं? शीळवेड्या शिवप्रसादची लॉटरीच लागली. जागा असला की त्याची शिटी सुरूच असायची. शीळीने दमा कुठच्या कुठे पळवला आणि शिवप्रसादला कुटुंबात आणि मित्रमंडळीत बरंच लोकप्रियही केलं. मात्र ही कला त्याला जनमानसांतही मानाचं स्थान मिळवून देइल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती.
शेवटी तो प्रसंग आलाच. दिवस होता हनुमान जयंतीचा आणि पहाटे उठून आजुबाजुचे सगळे लोक जमले होते ते हनुमान जन्माचं किर्तन ऐकण्यासाठी. मात्र ऐनवेळी किर्तनकार बुवाच येवू शकले नाहीत. पर्यायी व्यवस्था होइपर्यंत जमलेल्या भक्तगणांना खिळवून ठेवण्याची जबाबदारी आयोजकांनी बारा वर्षाच्या शिवप्रसादवर सोपवली. टाळ मृदंग, आणि वीणा हा वाद्यवृंद तयारच होता. शिवप्रसादने श्रोत्यांना नमस्कार केला आणि संगीत सुरू झालं. पहाटेची वेळ. अहिर भैरव रागातील बासरीचे स्वर कानी पडू लागले... अरेच्या! बासरी नव्हे, ही तर शीळ! सर्वजण थक्क !!  गाजलेल्या तेलगु रामभजनाचे 'पिबरे रामरसम..' चे स्वर कानावर पडू लागले. शब्द सगळ्यांना ठाऊक होतेच. पण ईतक्या सुरेल शीळीच्या रूपात रामरसम ऐकण्याचा अनुभव शब्दांच्या पलिकडला ठरला. कितीतरी वेळ त्या शेकडो लोकांच्या लाखो टाळ्या! शिवप्रसादच्या कानात अजुनही या टाळ्यांच्या आवाज ताजा आहे.
का नसावा? यानंतरच शब्दांच्या पलिकडलं 'शीळ' हेच आपलं कलाक्षेत्रं, असं त्यानं ठरवून टाकलं. संगीताची साधना आणखी जोमाने सुरू झाली. शिटी म्हणजे काहीतरी असंस्कृतपणाचं लक्षण, रोडरोमिओंचा थिल्लरपणा, ही ओळख पुसून टाकायची; शीटीला एक कला, कौशल्य म्हणुन नावारूपाला आणायचं असा निश्चयच त्याने केला आणि स्वतः निवडलेल्या खडतर वाटेवरून वाटचाल सुरू झाली. शीळ वाजवण्याची कला याभोवती एक वेगळं वलय असल्याने काही काळातच शिवप्रसाद ब-यापैकी प्रसिद्ध झाले. कोना प्रभाकर राव हे त्या वेळचे एक जेष्ट नेते. महाराष्ट्राचे ते राज्यपालही राहिले होते. त्यांना शिवप्रसादची कला फारच भावली. हैद्राबादला येऊन मोठ्या कलाकारांशी परिचय करून देण्याचं त्यांनी आश्वसन दिलं. मोठ्या उत्साहाने राजधानीत आलेल्या शिवप्रसादच्या पदरी मात्र मोठ्या संगीततज्ञांकडून निराशाच आली. "शास्त्रीय संगीतात कुणी शीळ वाजवत नाही. यापेक्षा बासरी का नाही शिकत?" "शीटी म्हणजे आपल्या परंपरेच्या विरूद्ध, विचीत्र आणि अवैध!" अश्या प्रतिक्रीया कानी पडल्या. मात्र 'शास्त्रीय शिटी' असते कशी, याची उत्सुकता प्रत्येकालाच असायची. प्रत्येकजण 'एकदा वाजवून दाखवा' अशी फर्माईश जरूर करायचा.
असंच एकदा कर्नाटक संगीताचे त्या वेळचे 'महागुरू' डॉक्टर एम बालमुरलीकृष्ण यांच्यापुढे शिवप्रसादची शीळ वाजली. बालमुरलीकृष्ण स्वतः उठून उभे राहिले आणि त्यांनी शिवप्रसादला संगीत शिकवणार असल्याचं सगळ्यांसमोर जाहिर केलं. आठवड्याभरात शिवप्रसादजींचं बस्तान हैद्राबादवरून गुरूगृही चैन्नईला गेलं. गुरूकृपा झाली, आणि ईमारत फळा आली! भारतीय शास्त्रीय संगीतातल्या मोठमोठ्या कलाकारांपुढे मग मुशाफिरी करता आली. मुलगा वेगळं काहीतरी करतोय त्याचं कौतुक व्हायचं, मात्र कुणीच संगीत सभांकरीता आमंत्रण द्यायचं नाही. सोडून द्यावं का हे वेड? गाणं सुरू करावं का? अशी द्वीधा मनस्थीती झाली. पण शीळ काही स्वस्थ बसु देइ ना.
एकदा भारतरत्न बिस्मील्ला खांसाहेबांना भेटण्याची संधी लाभली. "क्या बजा रहे हो? सिटी?" त्यांनी विचारलं. शिवप्रसादजींनी उत्तरादाखल सादर केला राग मालकंस! आणि खांसाहेबही चकित झाले. "ये मत छोडना," त्यांनी स्वानुभवावरून सांगीतलं. शहनाई हाती घेतल्यावर "मय्यत का साज बजाने वाला" म्हणुन त्यांची झालेली अवहेलना त्यांनी कशी सहन केली, हे त्यांनी शिवप्रसादजींना जवळ बसवून सांगीतलं. त्याक्षणी मनातला कितु कुठच्या कुठे पळाला. ठरलं. आता शीळच वाजवायची!
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आधी दहा मिनिटाचा वेळ देणा-या आणि मग 'प्लिज कंटिन्यु' अशी विनंती करत तब्बल दिड तास शिवप्रसादजींच्या स्वरांचा आनंद घेणा-या तत्कालीन पंतप्रधान ईंदिरा गांधी असोत; शिवप्रसादजींचे आराध्य भगवान सत्यसाईबाबा असोत; कर्नाटक संगीतातले त्यांचे गुरूजन असोत, आंध्रप्रदेशच्या सांस्कृतीक संचालनालयात ते कार्यक्रम अधिकारी होते, त्या वेळी राज्यात येणारे  आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलागुरू असोत; किंवा हल्ली त्यांच्याकडे शीळ शीकायला येणारे युवा शिष्यगण असोत; प्रत्येकाला या जगावेगळ्या अनुभवात चिंब भिजवायचा त्यांचा उपक्रम गेल्या चाळीस वर्षांपासुन निरंतर सुरू आहे.
आता सत्तरी जवळ असतांना योगासने आणि प्राणायाम करून  आपला 'दम' त्यांनी कायम ठेवला आहे. जगभर कार्यक्रम झालेत, होत आहेत. शिष्यपरिवारही बनतो आहे. शिष्यांना ते शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यायचा आग्रह करतात. शीळ शिकायला येणा-यामध्ये मुलींची संख्या खुप असल्याचाही त्यांना अभिमान आहे.
मात्र अजुनही शीळ या कलाप्रकाराला मान्यता मिळाली नाहीये.  कौतुक होतं खरं, पण शास्त्रीय संगीत सभेची औपचारिक निमंत्रणं येत नाहीत याची खंतही त्यांना आहे. 'बिकट वाट' निवडल्यावर हे कष्ट करावेच लागणार हेदेखील शिवप्रसादजी जाणतात. भारतीय शास्त्रीय संगीताने अनेक नवी वाद्ये, नवे कलाप्रकार स्विकारलेत, आणि शीळ हा कलाप्रकारही लवकरच सर्वमान्य होईल असा आत्मविश्वासही त्यांना आहे. केवळ शिवप्रसादजींची शिटी असलेले अब्लम्स, कॅसॅटस बेस्टसेलर झाल्यात. त्यांच्या एल पी ने तर त्यांचं नाव थेट लिम्का बुकमध्ये नेऊन ठेवलंय. तेलगु भजने, व कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीतावर आधारीत त्यांचे शेकडो अल्बम्स दक्षीण भारतात विक्रचे उच्चांक मोडत आहेत.
एवढं झालंय, आता राहिलेलं सुद्धा होइलच, या खात्रीसह के शिवप्रसादजी निश्चींत होउन शीळ वाजवत आहेत.