Sunday 22 April 2012

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जीवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही. आणि रेताड, ओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत एक संपुर्ण अरण्य फुलवल्यानंतर तो, तुमच्या-आमच्यासारखा सामान्यही रहात नाही. 
होय. आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या जादव पायेंगचं आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. या भागावर राज्य चालतं ते 'ब्रम्हपुत्र' नदिचं. अ-कारान्त पुल्लींगी नाव असणारी कदाचीत ही एकमेव नदी असावी. वेग, विस्तार आणि विध्वंस करण्याची क्षमताही एखाद्या विर पुरूषालाच साजेशी. सागरासमान विशाल अश्या ब्रम्हपुत्रच्या पात्रात अनेक छोटीछोटी बेटे तयार झालीत. तीस वर्षापुर्वी याच ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून सुरू झालेली जादव पायेंगचीही अरण्ययात्रा आज तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार करण्य़ापर्यंत येऊन पोचलीय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघ, तीन गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो. मात्र १९७९ साली सोळा वर्षाच्या एका पोरट्याने या बेटावर पाय ठेवला होता, तेव्हा परिस्थीती अगदीच वेगळी होती.
ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे देखील ठेवली नव्हती. बी रूजायला मातीच नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. त्याच्या कबिल्यात ज्यांची पुजा व्हायची त्या शेकडो साप, अजगर आणि ईतर प्राण्यांचे तडफडून जीव गेलेले पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं. रोपटी मागायला तो वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला. सहाजीक सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलं, असा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. 'मुलई' म्हणायचे त्याला घरचे आणि गावचे लोक. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनी' म्हणजे मुलईचं जंगल. बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे. मुलईच्या अथक परिश्रमाचंच ते फळ.
येथे अथक म्हणजे अगदी शब्दशः अथक! खडकाळ मातीत लाल मुंग्या राहिल्या तर मातीचा दर्जा बदलतो. ती सुपीक होते असा गावक-यांचा अनुभव लक्षात घेऊन मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून  आणुन त्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. गावापासुन बेटावर पोचण्यासाठी आधी तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, नंतर होडीत बसुन तासभर केलेला प्रवास आणि त्याहीनंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवास या मुंग्यांना जवळ घेऊन करत असतांना त्यांनी घेतलेले अगणीत चावे त्याने कसे सहन केले असतील? बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहर, कोरोई, मोज आणि हिमोलू ची रोपटी जमवत फिरणा-या मुलईला सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारल्यावर कुणाच्या भरवश्यावर तो उभा राहिला असेल? लावलेली रोपटी जगावीत, म्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या मुलईला हे सगळं करत राहण्याची प्रेरणा त्या जंगलात कुठुन बरं मिळाली असेल?
विश्वास बसणार नाही ईतकं या जंगलाशी मुलईचं दृढ नातं आहे. ईथले वाघही त्याला ओळखतात आणि एकशिंगी गेंडेही. आजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा. मग हत्तींवर गोळ्या चालवा' असं जाहिर आव्हान हा शिडशिडित प्रकृतीचा बुटकासा माणुसच फक्त देऊ शकतो. एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे सोपवतो.  अध्ये मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आली, की झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच तो अजुनही राहतो. बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. प्रसिद्धी, पैसा किंवा सन्मान यांची त्याला दूरदूरपर्यंत पुसटशीही आशा नाही. पण पैसा आणि सन्मान सोडले, तरी प्रसिद्धी मात्र त्याच्या वाट्याला थोडीफार आली आहे. तेही अगदी अलीकडे २००८ नंतर.
त्याचं झालं असं, की जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. बेटावर मुलईचा शोध घेतल्यावर जुन्या वन
अधिका-यांना त्याची ओळख पटली. जवळपास पंचवीस वर्षापुर्वी वनवीभागाने हाती घेतलेल्या एका योजनेसाठी काम करणारा एक साधा मजुर आपलं आयुष्य खर्ची घालतो, आणि हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करतो, हा त्यांच्यासाठी कुतुहलाच तसाच अभिमानाचा विषय झाला. वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांचं रॅकॅटच या भागात कार्यरत आहे. मुलईच्या मदतीने त्यांना या शिका-यांनाही अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं.
बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला. निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टस' लोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. पण  आपलं जंगल सोडून कुठेही जायला तो तयार नाही. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनी' च्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली, तर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही  अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतो, असा त्याला विश्वास आहे. त्यासाठी या जंगलाला अभयारण्य घोषित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी स्तरावर सरकारी गतीने ते प्रयत्न सुरू आहेत, पण मुलईचं त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही.
जगभर आज वसुंधरा दिवस साजरा होत असतांना  आपल्या अवघ्या आयुष्याचाच वानप्रस्थ करून दररोजच वसुंधरा दिवस साजरा करणा-या या अवलीयाचं अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय!

Monday 16 April 2012

आय आय टी रामैय्या

पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस. नागार्जुनसागरच्या आंध्रप्रदेश रेसिडेंशिअल स्कुलमधून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर सरकारी कागदपत्रांमध्ये त्यांचं निवृत्तीवेतन अडकलं.  आयुष्यभर ईमाने ईतबारे शिक्षक म्हणुन नोकरी केलेल्या माणसाजवळ पैसा तो कितीसा असणार? काही महिन्यातच आर्थीक अडचण पुढे दत्त म्हणुन उभी राहिली.
विद्यादानाचं कार्य करत आयुष्य घालवलेल्या या शिक्षकाला आधार वाटला तो माता सरस्वतीचाच! पुढे काय? यावर चिंतन करण्यासाठी 'बसर' मधील ज्ञानसरस्वती मंदिर गाठलं. देशातलं हे एकमेव सरस्वतीचं स्थान. लहान मुलांना या मंदिरात आणुन त्यांच्याकडून 'श्री गणेशा' लिहून घेण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की या मंदिरात शिक्षणाचा श्रीगणेशा करणा-या मुलांना सरस्वती मातेचा आशिर्वाद मिळतो. रामैय्यांनीही मग तसंच करायचं ठरवलं. आपल्या नव्या जीवनाचा श्रीगणेशा या मंदिरातच त्यांनी गीरवला. परत एकदा शिक्षक म्हणुन काम सुरू केलं. आता शाळेचं बंधन नव्हतं. आणि वैयक्तीक शिकवणी वर्ग घ्यायचे असतील तर हैद्राबादला जाण्याशिवाय पर्याय नव्हता.
आंध्रप्रदेशच्या या राजधानीत त्यांच्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी काही तेव्हा ईंडियन ईंन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आय आय टी) च्या प्रवेश परिक्षेची तयारी करत होते. शाळेत रामैय्यांसरांनी शिकविलेल्या गणिताचा प्रभाव त्यांच्या मनावर कायम होता. सरांनी आय आय टी साठी देखील गाणित शिकवावं असा हट्ट या विद्यार्थ्यांनी धरला. आजवर शाळेत गणित शिकवलेल्या रामैय्यांनी हे एक आव्हान म्हणुन स्विकारलं. पहिलं वर्ष आय आय टीचं गणित समजवून घेण्यातच गेलं. मात्र दुसरी दहा जणांची बॅच सुरू झाली आणि यातील सहा विद्यार्थ्यांना आय आय टीत प्रवेश मिळाला. ते वर्ष होतं १९८४. त्यानंतर रामैय्या सरांना मागे वळून पहावं लागलं नाही.
आज भारतातील अग्रगण्य आय आय टी कोचींग सेन्टर्सपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणुन रामैय्या ईन्स्टीट्युट मानले जाते. भारतातल्या सर्वात प्रतिष्टेच्या प्रवेश परिक्षेची तयारी करवून घेण्या-या या शिकवणी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी वेगळी प्रवेश परिक्षा द्यावी लागते. रामैय्या स्टडी सर्कलच्या ठरावीक सव्वाशे जागांसाठी देशभरातील १२ हजार विद्यार्थी दरवर्षी ती परिक्षा देतात. ही परिक्षा 'क्रॅक' करण्यासाठी स्वतंत्र कोचिंग सेन्टर्स आंध्रप्रदेशभर निर्माण झाले आहेत आणि जोमाने सुरू आहेत. आजवर एक हजाराहून अधीक आय आय टी ईंजिनिअर्स दिल्यानंतर ८४ वर्षांचे रामैय्या सर सकाळी चार वाजताचा गणिताचा वर्ग आजही तेवढ्याच तडफेने शिकवतात. गणिताच्या एका शिक्षकाचा हा प्रवास कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही.
मात्र रामैय्यांच्या मते याचं गमक त्यांनी घेतलेल्या पारंपारिक गणिताच्या शिक्षणामध्ये आहे. रामैय्यांचं घर आणि गुडुर हे गाव म्हणजे विद्याभ्यासाचं केन्द्र. मात्र एकिकडे ज्ञानार्जन आणि सरस्वतीसाधनेच्या गोष्टी करायच्या आणि दूसरीकडे अतिशय काटेकोरपणे अस्पृष्य़ता पाळायची हे धोरण काही तरूण रामैय्यांना पटेना. 'कसेल त्याची जमीन' या धोरणाच्या समर्थनार्थ त्यांनी गावात आंदोलन उभारलं. मोठमोठ्या जमिनपट्ट्यांचे मालक आणि सावकार असणा-या त्यांच्याच ब्राम्हण समाजातील धुरिणांना या शाळकरी पोराचं हे धाडस पहावलं नाही. त्यांनी रामैय्यांना जातीबाहेर टाकलं. आठव्या वर्गापर्यंत गावात शिक्षण घेतल्यानंतर कुटुंबाच्या भल्यासाठी त्यांना गावही सोडावं लागलं.
मात्र महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावीत रामैय्यांना त्याने फारसा फरक पडला नाही. ओस्मानिया विद्यापिठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यचळवळीतही हिरीरीने भाग घेतला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्त्वातल्या रझाकारांच्या विरोधातील चळवळीतही ते आघाडीवर राहिले. त्यामुळे अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला. अश्यात गणितामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. शिक्षक होउन पोटापाण्याचा प्रश्नही सुटेल आणि चळवळीतही काही ना काहीतरी करता येइल या उद्देशाने त्यांनी तेलंगणातील जनगाव मधल्या एका शाळेत नोकरी पत्करली. त्यानंतर सुरू झाला तो दंतकथेचा प्रवास. तो आजवर सुरू आहे. अगदी २००७ मध्ये शिक्षक आमदार म्हणुन आंध्र विधानपरिषदेवर निवडून येईपर्यंत!
चळवळीशी असलेलं रामैय्यांचं नातं अतुट आहे. आय आय टीचं नवं केन्द्र हैद्राबादला न उभारता बसरा या सरस्वतीच्या तिर्थस्थळी उभारावं हा त्यांचा आग्रह होता. त्याचा त्यांनी बराच पाठपुरावा केला, परंतू शेवटी आय आय टी आली, ती हैद्राबादलाच! आजही त्यांना या गोष्टीची खंत वाटते.
आपलं म्हणणं नेहमी गणितीय परखडपणे मांडणा-या आणि आंध्रातील युवकांचं श्रद्धास्थान असणा-या रामैय्यांना विरोध करण्यासाठी काहीही प्रभावी हत्यार जवळ नसल्यामुळे त्यांच्या शिकवणीच्या वेळांवरतीच आंध्रातल्या नेत्यांनी हल्ला चढवला. सकाळी चार ही काही शिकवणीची वेळ नव्हे! तसेच पाठांतर ही काही गुण मिळवण्याची पद्धत नव्हे अशी वक्तव्ये आंध्रातील अनेक नेते वरचेवर देत असतात. "मी सकाळी चार वाजता उठूनच गणिताचा अभ्यास केला आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही हीच वेळ योग्य वाटते. यामुळे त्यांना दिवस मोकळा मिळतो, शिवाय या वेळी केलेलं मनन कायमचं लक्षात राहतं," असं स्पष्टपणे बोलून रामैय्या सर्व विरोधकांची हवा गुल करतात.
त्यांच्यामते आय आय  टी ची परिक्षा म्हणजे ज्ञानापेक्षा कौशल्याची कसोटी आहे. ईतर प्रवेशपरिक्षांमध्ये विद्यार्थी किती वेगाने उत्तरे शोधू शकतो याची कसोटी असते, मात्र आय आय टी मध्ये कमीत कमी पाय-यांमध्ये जास्तीत जास्त कौशल्याचा वापर करून उत्तर शोधण्याला गुण असतात. ही विशेषता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शिकवणी वर्गात फक्त आयआयटी-जेईई करिताच शिकवण्याची मर्यादा घालून घेतली आहे. आजवर कधीही आपली जाहिरात त्यांनी केलेली नाही, की कुठे एक साधा फलकही लावलेला नाही. आता रामैय्य्या ईन्स्टीट्युटमध्ये गणिताबरोबरच भौतिक आणि रसायनशास्त्रही शिकवले जातात. यासाठी या विषयातील तज्ञांची निवड रामैय्यांनी स्वतः केलेली असते.
प्रवेशाची पद्धतही मोठी वैषिष्ट्यपुर्ण आहे.  आवेदन पत्रे मिळण्याचं एकमेव स्थान आहे, ते म्हणजे नल्लाकुंटामधील त्यांचं ईन्स्टीट्युटचं ऑफीस आणि एकमेव दिवस आहे, तो म्हणजे एक एप्रिल. प्रवेश परिक्षेसाठी पात्र असतात दहावीची परिक्षा दिलेले विद्यार्थी. अगदी नुकताच अकरावीत प्रवेश घेतला  असेल, तरीही तुम्ही या प्रवेश परिक्षेसाठी पात्र नाही. तीन पेपर होतात. आणि सर्वाधीक गुण मिळवण्या-या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. या प्रवेशप्रक्रियेवर अनेक वाद आजवर उठलेत. मात्र रामैय्यांच्या यशाचं हेच गमक आहे, की त्यांनी आपला मार्ग कधीच सोडला नाही. सव्वाशेपैकी जवळपास वीस जागा गरिब हुशार विद्यार्थ्यांसाठी असतात. त्यांच्याकडून एक रूपयाही फि म्हणुन घेतला जात नाही.
या सर्वांबरोबरच रामैय्या हे एक उत्तम लेखकही आहेत. त्यांचे तेलगुमधील लघुनिबंध लोकप्रिय आहेत. गणित या विषयाव्यतिरिक्त ईतर विषयांवर त्यांची एकवीस पुस्तकं आजवर आली आहेत. त्यातील १६ लघुनिबंधांचे संग्रह आहेत तर ईतर पुस्तकांमध्ये आपले शिक्षणविषयक विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. पारंपारिक शिक्षणपद्धतीचा त्यांना अभिमान आहे, मात्र बदलत्या काळानुसार अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये काय बदल घडवले पाहिजेत, हे देखील त्यांनी प्रभावीपणे मांडले आहे.
शिक्षक, गणितज्ञ,स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, लेखक यांबरोबरच मुलगा, भाऊ, पती, वडिल, आजोबा आणि आता पणजोबा या भुमीका निभावण्यातही त्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. ज्या वयात लोकांना जगणे असह्य होते त्या वयात रामैय्यासर शेकडो आय आय टी टॉपर्स तयार करण्याच्या मोहिमेत उत्साहाने कार्यरत आहेत ही बसरच्या ज्ञानसरस्वतीची कृपाच नव्हे का? 

Sunday 8 April 2012

सॅम पित्रोडा

फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही. सॅम पित्रोडा म्हटलं तर मात्र ब-याचजणांना आठवण येइल त्यांच्या वैषिष्ट्यपुर्ण केशरचनेमुळे डॉक़्टर ए पी जे अब्दुल कलामांची आठवण करून देणा-या एका भन्नाट व्यक्तीमत्त्वाची. भारतातील संचारक्रांतीचे प्रणेते, दूरसंचार क्षेत्रातील अनेक नव्या आविष्कारांचे जन्मदाते, नव्या कल्पनांचे जनक, आणि सध्या पंतप्रधानांचे तंतज्ञानविषयक सल्लागार असलेल्या सॅम पित्रोडांचं नाव नुकतंच पुन्हा एकदा चर्चेत आलं ते येत्या जुलै महिन्यात होणा-या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या निमित्ताने.
चर्चा आहे की पित्रोडांचं नाव कॉंग्रेसतर्फे पुढं केलं जाण्याची दाट शक्यता आहे. जर तसं झालं, तर या नावाला क़ुणाचाच विरोध असण्याचं काहीच कारण असणार नाही. भारताला डॉक्टर कलामांनंतर  आणखी एक परिणामकारक आणि प्रभावी राष्ट्रपती प्राप्त होईल यात शंकाच नाही. शिवाय पित्रोडांचा स्पष्टवक्ता तसेच मार्मिक स्वभाव, विविध विषयांवरील त्यांचा प्रगल्भ व्यासंग आणि मुख्य म्हणजे संवाद साधण्याची अचंबीत करणारी क्षमता या सगळ्या गोष्टी त्यांना एक 'डायनॅमिक' प्रेसीडेंट बनवायला मदतच करतील. जन्म गुजराती कुटुंबातला असल्यामुळे मातृभाषा गुजराती; कुटुंब ओरिसातल्या तितलागढ येथे स्थायिक झालेले असल्यामुळे ओरीया आणि बंगाली; आधी शिकागो आणि मग दिल्ली ही कर्मभुमी असल्यामुळे ईंग्रजी आणि हिंदी; शिवाय आयुष्याच्या अनुभवाने आलेल्या जर्मन आणि रशियन सह  अन्य अनेक भाषांमध्ये पित्रोडा बिनधास्त संवाद साधू शकतात. मुळात संवाद साधणे हाच या माणसाचा मुळ पिंड आहे. म्हणुनच आपल्या कल्पना आणि संकल्पशक्तीच्या जोरावर अवघ्या भारत देशाला संवाद साधणं सोपं करून देण्यात ते यशस्वी झालेत.
पित्रोडांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे सुतारकाम. त्यांच्या वडिलांना या कामानिमित्त गुजरात सोडून ओरिसात स्थायिक व्हावं लागलं होतं. तेथेच १९४२ साली सत्यनारायणचा जन्म झाला. शिक्षणासाठी मात्र वडिलांनी मोठ्या भावासह त्यांना गुजरातमध्ये पाठवलं. याचं कारण म्हणजे गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव. गुजरात ही गांधीजींची जन्मभुमी असल्यामुळे मुलांना गांधी विचारांचं बाळकडू शिक्षणाबरोबरच मिळेल या उद्देशाने वडिलांनी त्यांची रवानगी वडोद-याला केली.
ईथल्या सयाजीराव विद्यापिठातुन भौतिकशास्त्रात पदवी घेऊन सत्यनारायणने थेट शिकागो गाठलं. सांगायचं कारण होतं उच्च शिक्षणासाठी! मात्र मुळात २२ वर्षाच्या या तरूणाला ओढ लागली होती ती अमेरिकेच्या चांद्रमोहिमेची. अमेरिका मानवाला चंद्रावर पाठवणार या कल्पनेनंच तो भारावून गेला होता. या मोहिमेत आपणही काहीतरी करून सहभागी व्हावं याच उद्देशाने त्याने शिकागोच्या ईलिय़ॉनिस ईन्स्टीट्युटमधून ईलेक्ट्रॉनिक ईंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. अमेरिकेचं नागरिकत्त्वही मिळालं. सत्यनारायण पांचाल चा सॅम पित्रोडा झाला.
शेवटी चंद्रावर मात्र निल आर्मस्ट्रॉंग गेला.  सॅमने घेतलेलं शिक्षण डिजिटल टेलिकॉम स्विचिंगचं मशिन बनवण्याच्या कामी आलं. काही दिवस वेगवेगळ्या ईलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी काम करता करताच १९७०च्या सुरूवातीला काही मित्रांसमवेत त्यांनी स्वतःची वेसकॉम नावाची कंपनी स्थापन केली. एकामागोमाग एक अशी पन्नासहून अधीक टेलीकॉम उपकरणे त्यांनी तयार केली. त्या सर्वांचं पेटंटही घेतलं. दहा वर्षांनंतर ही कंपनी रॉकवेल ईंटरनॅशनल्स मध्ये विलीन करतांच सॅम पित्रोडा करोडपती झाले. त्यानंतर सहज म्हणुन भारत भेटीवर आले असता तो प्रसंग घडला, ज्याने पित्रोडांचं जीवन आणि आपलं संचारविश्व बदलवून टाकलं.
ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पित्रोडा थांबले होते, तीथून त्यांच्या पत्नीला काही केल्या फोन लागेच ना. शेवटी त्यांना घरी जाऊनच बायकोला भेटावं लागलं. तेव्हाच त्यांनी निश्चय केला, की  आता बास झालं पैशाच्या मागे धावणं. आता मातृभुमीसाठी काम करण्याची वेळ आली. भारतातली संचारसेवा अद्ययावत करण्याची एक प्रभावी योजना त्यांनी तयार केली, आणि ती  ऐकवण्यासाठी सरळ पंतप्रधानांचीच म्हणजे ईंदिरा गांधींची भेट मागीतली. त्यांची भेट १० मिनिटांच्या वर मिळे ना, आणि पित्रोडांना हवा होता एक तास! मग मंत्रालयाच्या वा-यांवर वा-या सुरू झाल्या. अनेकदा वाट पाहून परत जावं लागलं, तर अनेकदा ईंदिराजींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ठरलेली मिटिंग रद्द झाली. दरम्यानच्या काळात नुकतेच राजकारणात आलेले, देशोदेशी फिरलेले आणि तंत्रज्ञान ब-यापैकी कळणारे राजीव गांधी पित्रोडांच्या संपर्कात आले, आणि दोघांची मैत्री झाली. राजीवजींच्या मध्यस्तीने त्यांनी ईंदिराजींची भेट मिळवली आणि आपलं पहिलंवहिलं प्रेझेंटेशन केलं. यानंतर ईंदिराजींनी त्यांना आपल्या नवरत्नांमध्ये स्थान दिलं, ते नेहमी करीताच. "मॅडम, तिकडे शिकागोला माझ्याकडे लोकांना भेटायला वेळ नाही. सहा सहा महिने लागतात माझी अपॉईन्टमेन्ट मिळवायला. आणि ईकडी मी तुमची वेळ घेण्यासाठी सहा महिन्यांपासुन अक्षरश: फे-या मारल्यात," अशी शालजोडीतून सुरवात करून सुरू केलेलं पित्रोडांच पहिलंच प्रेझेंटेशन गांधीं मातापुत्रांचं मन जींकून गेलं. यानंतर घडला तो ईतीहास.
राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अमेरिकन नागरिकत्व सोडून ते पंतप्रधानांचे मुख्य तंत्रज्ञान सल्लागार बनले. हे काम त्यांनी तब्बल दहा वर्षे दरसाल अवघा एक रुपया नाममात्र वेतन घेऊन केले. वीस वर्षांपूर्वी भारतात सुरू झालेल्या 'पीसीओ ' क्रांतीचे पित्रोडा शिल्पकार ठरले.
आज गावोगावी , गल्लोगल्ली दिसणाऱ्या ' पब्लिक टेलिफोन बूथ ' च्या मागे दूरभाष सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यासाठीची पित्रोडा यांची कल्पकता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राबलेल्या तंत्रज्ञांच्या पलटणींचे परिश्रम आहेत. राजीव गांधींच्या घातपाती मृत्यूनंतर , जवळची सर्व बचत संपत आल्यानंतर पित्रोडा १९९३ साली अर्थार्जनासाठी अमेरिकेला परतले व तेथे स्थायिक झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने मागास देशांत टेलिकॉम सेवेचा प्रसार करण्यासाठी स्थापलेल्या ' वर्ल्डटेल ' या संस्थेचे ते अध्यक्ष झाले.  या संस्थेच्या अनेक उत्पादनां ची पेटंट्स त्यांचीच आहेत. शिकागोत स्वत:च्या मालकीच्या काही छोट्या तंत्रज्ञान कंपन्या पित्रोडा आपल्या कुटुंबाच्या (पत्नी व दोन मुलांच्या) चरितार्थासाठी चालवित होते. भारतातील घडामोडींवरही त्यांची नजर होतीच. शिवाय त्यांच्यावर नजर होती भारतातील नेतेमंडळींची. म्हणुनच डॉक्टर मनमोहनसिंग पंतप्रधान झाल्यावर पित्रोडांना परत एकदा भारतात येण्याचं निमंत्रण मिळालं. विज्ञान महामंडळाचे ते अध्यक्ष झाले. पंतप्रधानांचे तत्रज्ञान क्षेत्रातील सल्लागार बनले. आता वेळ होती मोबाईल आणि ब्रॉडबॅण्ड क्रांतीची!
ही क्रांती आपण अनुभवतो आहोतच. अगदी वानगीदाखल सांगायचं झालंच तर आज लक्षावधी लोक मोबाईलवरून आर्थीक व्यवहार (फंड ट्रान्सफर, ऑनलाईन बॅन्कींग, बिल पेमेन्ट ई.) करण्यासाठी वापरतात ते 'वन वॉलेट' तंत्रज्ञान पित्रोडांचंच पेटंट आहे.
'पॉलीसी मेकींग़' अर्थात योजना बांधणीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. म्हणुनच भारत सरकारच्या रेल्वे नविनिकरणापासुन ते ऑनलाईन लायब्ररीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. सध्या त्यांचा एक पाय भारतात, एक अमेरिकेत असतो. शिवाय लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतही शिक्षणविषयक योजनांकडे ते लक्ष देतात. भारतातही शाळांचे संगणकीकरण, ग्रामपंचायतींना ब्रॉडबॅण्डने जोडणे, भारतीय पारंपारीक वैद्यकशास्त्राचे पुनरुज्जीवन ईत्यादी सामाजीक महत्त्वाचा तांत्रीक कामामध्ये हल्ली त्यांनी लक्ष घातले आहे. तंत्रज्ञानातून सर्वांगीण प्रगतीचा हेतू साध्य करणारे पद्मभुषण सॅम पित्रोडा पुढे येऊ पाहणा-या मोठ्या जबाबदारीलाही याच आत्मविश्वास आणि स्मीतहास्यासह सामोरे जातील, यात शंका नाही.             

Wednesday 4 April 2012

स्वप्नातली कार बनवणारा सुधाकर!

आजच्या कॉर्पोरेट जगतामध्ये करिअरच्या सुरवातीलाच 'नयी कार' आणि काही वर्षात 'नया घर' मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक 'सुनिलबाबु' बघत असतो. आपलं घर ईतरांपेक्षा वेगळं असावं, आणि त्याच्या अंगणात उभी असलेली कारही ईतरांपेक्षा जरा वेगळी असावी, असंही प्रत्येकाला वाटतं. अगदी लहानपणी 'झुकझुक झुकझुक अगीनगाडी' पासुन सुरू झालेलं गाड्यांचं आकर्षण 'पोलीसच्या जीप' पासुन ते 'चांदण्यांची गाडी, अन त्याला हरणाची जोडी' पर्यंत आपल्याबरोबर असतं. असंच जुन्या हैद्राबाद शहरातील बहादूरपू-यात रहाणा-या के सुधाकर यादव नावाच्या पोराला शाळेत असतांनाच 'वेगळ्या' गाड्यांच्या भुतानं झपाटलं. नेहमीच्या चाकोरीबद्ध आकारापेक्षा वेगळं काहीतरी आपल्या वाहनामध्ये करता आलं पाहिजे, या वेडानं कामाला लागलेल्या सुधाकरने आज तीनशेच्या आसपास चित्रविचित्र आकाराच्या कार्स बनवल्या आहेत,
अगदी चौदा ईंचाच्या मोटारसायकलपासुन ते बेचाळीस फुटाच्या महाकाय तीनचाकी सायकलपर्यंत कित्येक वाहनं त्याच्या 'सुधा-कार्स' संग्रहालयाची शान वाढवत आहेत. भारताचा सगळ्यात मोठा ऑटॉमोबाईल मॉडिफायरम्हणुन त्याचं नाव घेतलं जातंय, आणि लिम्काबुक पासुन ते गिनिजबुक पर्यंत सगळीकडेच त्याने बनवलेल्या वाहनांचा डंका पिटल्या जातोय. शहराच्या ईतर आकर्षणांबरोबरच सुधाकरचं कार संग्रहालयही 'हैद्राबाद दर्शन' फेरीचा भाग बनलंय. आज विविध कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या प्रसिद्धीसाठी व्हॅन डिझाईन करून देणा-या, अनेक सामाजीक उपक्रमांसाठी, क्रिडा स्पर्धांसाठी नाविन्यपुर्ण वाहने तयार करणा-या सुधाकरची सुरूवात झाली ती याच वेडापासुन.
खरं पाहिलं तर जुन्या हैदराबादेत असलेल्या काही पिढीजात मुद्रणालयांपैकी एक म्हणजे के रामस्वामी कुटुंबियांचे मुद्रणालय. घर म्हणावं तर ब-यापैकी सुखवस्तू. एकत्र कुटुंबात राहतांना मुलांनीही हाच व्यवसाय पुढे न्यावा ही सहज अपेक्षा. पण शाळेत जायला लागल्यापासुनच सुधाकरच्या डोक्यात घर केलं ते वेगळ्याच उद्योगाने! घराच्या मागच्या अंगणात अनेक वर्षांपासुन धूळ खात पडलेली एक जुनी हेराल्ड कार त्याला खुणावत होती. या कारचा जीर्णोद्धार करता येइल का? या विचाराने त्याच्या मनात काहूर माजवलं. ईटरच्या वर्गात असतांना कॉलेजला बुट्टी मारून मित्रांबरोबर सिनेमा पहायला जाण्याऐवजी सुधाकरचा तो वेळ घराजवळच्याच बाबु खान गॅरॅजमध्ये जायला लागला. कच-यातुन कला हा मंत्र त्याने याच ठीकाणी आत्मसात केला. त्याला दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नसानसाशी परिचित करून देणारे बाबु खानच मग त्याचे गुरू बनले. मागच्या अंगणातल्या हेराल्डवरची धूळही मग झटकली गेली आणि तीचं बाह्यस्वरूप बदलून तीला एका बग्गीसारखं बनवण्यात आलं. पहिलाच प्रयोग होता. आणि खर्च आला दहा हजार रूपये. हौस म्हणुन वडिलांनी देऊ केलेले हे पैसे सुधाकरचं आयुष्यच बदलवून टाकतील असं तेव्हा कुणालाच वाटलं नसेल. कॉलेजमध्ये बि कॉम चं शिक्षण घेत असतांनाच त्याच्या मनात 'कार संग्रहालयाची' कल्पना आली. भंगारमध्ये काढलेल्या गाड्यांमध्ये जीव फुंकायचा आणि त्यांचं बाह्यस्वरूप बदलवून त्यांना नव्याने लोकांसमोर आणायचं, हा त्याचा छंद बनला. जुन्या हैद्राबादेतल्या भंगारच्या मोठमोठ्या दुकानांमध्ये फेरफटका मारणे आणि निकामी झालेले गाड्य़ांचे स्पेअरपार्टस, ईंजीनचे पुर्जे, आणि जे वाटेल ते खरेदी करून घरी आणुन ठेवणे हा दिनक्रमच झाला. मागच्या अंगणातलं गॅरॅज ही त्याची प्रयोगशाळा बनली आणि याच प्रयोगशाळेतून हळूहळू निर्माण व्ह्यायला लागला चित्रविचित्र वाहनांचा ताफा. चौदा ईंचाची एक मोटरसायल बनली. सहा ईंचाची सायकल बनली. सहासात जण एकत्र चालवू शकतील अशी सायकल ट्रेन बनली. आणि हे सगळं केवळ शो साठी नाही! अगदी कुणीही चालवू शकेल ईतपत कार्यक्षम अश्या या सगळ्या गाड्या बनल्या.
१९९०-९१ दरम्यानच्या काळात सुधाकरला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. त्याच्या शोधक डोळ्यांनी हेरली ती 'वॅकी कार्स' ची संकल्पना. जुन्या कारच्या चेसिसवर नवं आवरण चढवायचं  आणि वेगळी दिसणारी गाडी बनवायची अशी ही एकंदर भन्नाट कल्पना. सुधाकरच्या सुपिक डोक्यात मग अश्या अनेक कार्स तयार झाल्या आणि भारतात परतल्यावर त्याने त्या प्रत्यक्षातही उतरवल्या. सहा सात हजार रूपयांचा भंगारातला ऑटो घरी आणायचा. आधी त्याला सुरू करायचं, आणि नंतर त्याच्यावर आपल्या मनात येइल त्याप्रमाणे साज चढवायचे असा हा उपक्रम. यातूनच मग 'बुटाची कार', सोफा कार, बास्केटबॉल कार, लिपस्टीक कार आणि अश्या शंभरेक मॉडेल्सचा जन्म झाला. फुटबॉलच्या विश्वचषकाच्या वेळी 'फुटबॉल कार' जन्मली, तर क्रिकेटच्या २००३ च्या विश्वचषकाच्या वेळी 'क्रिकेट बॉल कार' हैद्राबादच्या रस्त्यांवरून धावली. २००७ च्या विश्वचषकामध्ये क्रिकेटची बॅट रस्त्यावरून ४० च्या स्पिडने धावतांना पाहून लोकांनी तोंडात बोटं घातली, तर नुकत्याच झालेल्या विश्वचषकादरम्यान प्रत्यक्ष विश्वचषकाची टॉफीच रस्त्यावरून धावत होती. अधूनमधून हैदराबादच्या रस्त्यावर एखादा महाकाय कॅमॅरा, कंप्युटर, किंवा एखादं हेल्मेट धावतांना दिसलं तर ट्राफिक पोलीसांना आश्चर्य वाटत नाही. गाडीला एखाद्या भल्यामोठ्या बर्गरने, किंवा सुटकेसने ओव्हरटेक केलं तर 'तौबा ये क्या बला है?' असे हैदराबादी उद्गारही हल्ली निघत नाहीत. सुधाकर आणि त्याच्या विचित्र गाड्या या शहराच्या संस्कृतीचा एक भाग होउन गेल्या आहेत.
                सुधाकरने हैद्राबादची लाडकी टेनिसस्टार सानिया मिर्झाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणुन एक टेनिसबॉल कारही बनवली होती. सानियानेच त्या कारचं उद्घाटन करावं अशी त्याने तीला विनंती केली. मात्र सानियाच्या एजंटने या साठी पैशाची मागणी केली. कपिलदेव पासुन ते चिरंजीवीपर्यंत सगळ्यांनी सुधाकरने बनवलेल्या कार्सचं अनावरण मोठ्या कौतुकाने केलं आहे. तेव्हा त्याच्याच शहरातल्या सानियाकडून अशी वागणुक मिळाल्यामुळे तो बराच व्यथीतही झाला होता. सुधाकरने ती कार आजही कायमची पडद्यांमागे ठेवली आहे.
                मात्र  आपल्या हैदराबादवर त्याचं मनापासुन प्रेम आहे. मित्रांच्या आग्रहास्तव हैद्राबादचं नाव गिनिजबुक मध्ये न्यायचं ठरवल्यावर त्याने एक भलीमोठी तीनचाकी सायकल बनवायला घेतली. एक्केचाळीस फुट सात ईंचं उंचीची, सतरा फुट व्यासाची चाकं असणारी, तीन टनाची ही महाकाय तीचाकी सायकल एक व्यक्ती आरामात चालवू शकतो ईतकी सहज आहे.
                सामाजीक बांधीलकी म्हणुन सुधाकरने कित्येक अपंग व्यक्तींना त्यांच्या सोयीच्या होतील अश्या सायकली, गाड्या आणि कार डिझाईन करून दिल्या आहेत. एडसबद्दल जनजागृती करण्यासाठी त्याने 'कॉण्डॉम बाईक' बनवली होती, ती बरिच लोकप्रिय झाली होती. आजही 'कच-यातून कला' हे सुत्र त्याने जपलं आहे. गाड्या बनवणं हा त्याचा व्यवसाय नाही, छंद आहे, हे तो आवर्जुन सांगतो. बनवलेल्या कार तो विकत नाही. मात्र त्याचं एक कायमस्वरूपी प्रदर्शन त्याने आपल्या घरीच तयार केलं आहे. या प्रदर्शनाला दररोज शेकडो लोक भेट देतात. वयाच्या पन्नाशीला आलेल्या सुधाकरने आता 'ऍनिमल पार्क' च्या एका भन्नाट कल्पनेवर काम सुरू केलं आहे.
                खरं म्हणजे घरापासुन जवळच असलेल्या हैद्राबादच्या प्राणिसंग्रहालयामध्ये वारंवार जाणा-या सुधाकरच्या नऊ वर्षाच्या मुलीच्या, स्पष्टाक्षराच्या डोक्यात आलेली ही आयडीया! 'झु मध्ये जसे प्राणी फिरतात, तसेच आपल्या पार्कमध्येही ईलेक्ट्रॉनिक प्राणी फिरू शकत नाहीत का?' या एका वाक्यासरशी सुधाकरच्या डोक्यात वादळ  आकार घेऊ लागलं. मोटरवर चालणा-या हत्तीवर बसुन मुलांना पार्कचा फेरफटका मारता येइल. पार्कमध्ये फिरणारे ईतर प्राणीही अगदी खरेखुरे वाटतील, तसेच चालतील, आणि तसेच आवाजही काढतील असे हे प्राणी संग्रहालय तयार करण्याच्या कामात सुधाकर हल्ली मग्न आहे.
                आजवर मनात येइल आणि स्वप्नात दिसेल ते ते करून दाखवलेल्या सृजनशिल सुधाकरच्या 'रिअलटाईम झु' ची सफरही आपण लवकरच करू शकू!