Wednesday 2 May 2012

शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती

वेदांचे परमज्ञाता, अद्वैतवादाचे प्रणेते आणि हिंदू धर्माचे पुनरूज्जीवक जगदगुरू श्री आद्यशंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. हे वाक्य वाचून आपल्यापैकी अनेकांच्या नजरा सहज दिनदर्शिकेकडे वळतील कारण जयंती नेमकी कधी होती याची कल्पनाही अनेकांना नसेल. शंकराचार्य म्हणजे हिंदूंचे धर्माचार्य, जगदगुरू!  आद्यशंकराचार्यांनी तयार केलेली काही पिठं आहेत - बहुतेक चार! याशिवाय अनेक स्वयंनिर्मित पिठं आहेत. किती? माहिती नाही! सध्या हयात असलेल्या शंकराचार्यांपैकी कुणाचं नाव आठवेल का? तर कांची पीठाचे श्री जयेन्द्र सरस्वती! कारण? कसल्यातरी वादाच्या भोव-यात अडकले होते, ते हेच शंकराचार्य ना? -- आपल्या धर्मव्यवस्थेबद्दल आणि सर्वोच्च धर्मगुरूंबद्दल ईतका उदासिन असणारा समाज हिंदु धर्माशिवाय अन्य कुठे आढळणे शक्य आहे का?
अश्या परिस्थीतीतही धर्मविहीन राजनीति विधवा आणि राजनीति विहीन धर्म विधुरासमान असतो, असं परखड वक्तव्य करून राष्ट्रकार्य हेच ईश्वरकार्य असल्याचं सांगणारे गोवर्धन मठ पुरी पीठाधीश्वर श्रीमज्जगदगुरु शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती हे शंकराचार्य या संस्थेला जनसामान्यांच्या अगदी समीप आणून ठेवण्याचं कार्य करण्यात अग्रणी ठरतात. आदी शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पिठांपैकी ऋग्वेदाचे अधिष्ठान मानले गेलेल्या पुरी गोवर्धन पिठाचे ते १४५ वे शंकराचार्य आहेत. या पिठाचं वेगळेपण म्हणजे आदीशंकराचार्यांचे पहिले शिष्य श्री पद्मपादाचार्य हे या पिठाचे पहिले शंकराचार्य होते. त्यांच्यानंतर चालत आलेली ही परंपरा आजवर अखंड सुरू आहे.
नदिचं मुळ आणि ऋषिचं कुळ विचारू नये असं म्हणतात. त्यातही संन्यास घेतल्यानंतर ऐहिक जीवनाशी कायमचा काडीमोड घेतला  असल्याने 'पुरी मठाचे शंकराचार्य' ही एकच ओळख स्वामीजींसाठी आज पुरेसी आहे. मात्र सामान्यांसाठी सामान्य अशी त्यांची ओळख करून घेणंही गरजेचंच नाही का? तर १९३९ साली बिहारमधल्या कलुहाई पोस्टमधल्या हरिपुर बक्सी टोल या खेड्यात उच्चविद्याविभुषित आणि वेदशास्त्रपारंगत मैथीली ब्राम्हण घरात जन्मलेल्या स्वामीजींचं मातृछत्र त्यांच्या बालपणीच हरवलं. त्यांच्या  आईचं नाव होतं गीता देवी. आईच्या अचानक सोडून गेल्यानंतर त्यांनी भगवतद्गीतेलाच आई मानलं आणि  आपली वाटचाल सुरू केली.
वेद, मिमांसा, वेदान्त, कर्मकाण्ड ईत्यादींचं शिक्षण हरिद्वार, श्रृंगेरी, वाराणसि, वृंदावन ईत्यादी ठीकाणी घेत असतांनाच, वेदांचं अध्ययन करतांनाच सन्यास घेण्याची प्रेरणा झाली. वाराणसीच्या गुरूदेव स्वामी करपत्री महाराजांकडून सन्यासदिक्षा प्राप्त झाली. पुढे शंकराचार्य स्वामी निरंजनदेवतिर्थ ह्यांचं शिष्यत्त्व पत्करलं आणि आध्यात्मीक क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली. १९९० च्या दरम्यानचा तो काळ होता. रामजन्मभुमीच्या आंदोलनाने अवघं हिंदू जनमानस पेटून उठलेलं. तेव्हाच गुरूजींच्या हाती पुरी पिठाची सुत्र आली आणि त्याबरोबरच आली ती खुप मोठी जबाबदारी.
धर्मपिठाचं पावित्र्य जपत असतांनाच राष्ट्रीय विचारांना स्थानही मिळायला हवं! हा विचार करूनच स्वामीजींनी पुरी पिठाची पुढची दिशा ठरवली. आदिशंकराचार्यांनी हिंदू धर्माचं पुनरूज्जीवन केलं, चार पिठांची स्थापना केली, त्यामागचा उद्देश म्हणजे अखील भरतवर्षाला एकसुत्रतेत बांधायचा होता, हे त्यांनी ओळखलं आणि जाहिर कार्यक्रमांमध्येही आपल्या ओजस्वी वाणीने जनमानसाशी सहज संवाद सुरू केला. आज स्वामीजींची वेबसाईट आहे. ते आज नेमके कुठे आहेत? उद्या कुठे जाणार आहेत? कुठल्या मार्गे जाणार आहेत? कुठे त्यांना भेटता येणं शक्य आहे, याबद्दलची सर्व अद्ययावत माहिती त्यावर मिळते.
आपल्या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अवघा भरतखंड पिंजुन काढणा-या  आदिंशंकराचार्यांची पुजा बांधत स्वामी निश्चलानंद सरस्वतीही मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात. या वयातही त्यांचा अखंड प्रवास सुरू आहे. चार्टर्ड विमान वगैरेच्या भानगडीत न पडता रेल्वे, आणि साध्या कारमधूनही ते प्रवास करत असतात. जातील त्या ठीकाणी जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ज्याप्रमाणे आपल्या तर्क आणि शास्त्रार्थांच्या बळावर आदिशंकराचार्यांनी विभिन्न पेच आणि चुकीच्या मान्यतांमध्ये उचित सुधार घडवून आणून धर्माची सांगड मुख्य धारेशी घातली, त्याचप्रमाणे बदलत्या काळाबरोबर आपण कसं बदलायला हवं याबद्दल ते सुचवत असतात.
सन्यास घेतला आणि नि:संग झालो, तरीही जननी आणि जन्मभुमीशी असलेलं नातं तुटत नाही, हा आदिशंकराचार्यांचा विचार त्यांनी  अंगीकारला आहे. आदिंशंकराचार्यांनीही सन्यस्थ जीवन जगत असतांनाही आपल्या आईला दिलेलं तिच्या अंतीम घडीला घरी पोचण्याचं वचन पाळलं होतं. स्वामीजींनीही आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या मुळगावी उभारल्या गेलेल्या स्मृतीमंदिराच्या शिलान्यासाला उपस्थीत राहून आपल्या लहानपणच्या अठवणी जाग्या केल्या. सन्यास म्हणजे त्याग.  तुसडेपणा नव्हे. हे त्यांच्या 'जिंदादील' व्यक्तीमत्त्वातून दिसुन येते. 
गोवर्धन मठाच्या माध्यमातून  सुशीलता, ओजस्विता व शूरता या तीनही गुणांनी सपन्न अशी नवी पिढी तयार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे. मठाच्या पिठ परिषदेच्या माध्यमातून आदित्य वाहीनी आणि आनंदवाहीनी या युवक आणि युवतींच्या संघठनाची बांधणी त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेली आहे. भारतातली सगळ्यात मोठी रथयात्रा भरवणारं जगन्नाथपुरी हे एकमेव ठीकाण असावं. आदित्यवाहिनीच्या कार्यकर्त्यांच्या या आयोजनातला सहभाग सर्वमान्य आहे. अगदी गरजुंना वैद्यकिय सुवीधा पुरवण्यापासुन ते कचरा उचलण्यापर्यंत सगळी कामं हे युवक करत असतात. पुरीमध्ये शंकराचार्यांचं वेदाध्ययन केन्द्र आहे. योगपिठ आहे. गोशाळा आहे. या गोशाळेचं उद्दिष्टदेखील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनवणे हे नसुन मुळ भारतीय गाईंच्या दर्जेदार वंशावळीची पैदास करणे आणि उच्च प्रतिच्या गाईंची देशभर निर्यात करून भारतीय गोवंश टिकवणे असं आहे. मुळात वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून स्वामीजींनी नवे बदल घडवून आणले आहेत. आणत आहेत.
शंकराचार्य ही मुळात एक व्यक्ती नसुन संस्था आहे. दक्षीणेत शृंगेरी, पुर्वेत जगन्नाथपुरी, पश्चीमेत शारदामठ द्वारीका, उत्तरेत बद्रिकाश्रम या चार पिठांची स्थापना प्रत्यक्ष आदिशंकराचार्यांच्या हातची. त्यामुळे या चार पिठांच्या पिठाधिशपदी येणा-यांमधे सहाजीकच दैवी शक्ती, सामर्थ्य असल्याचे मानले जाते. त्यांना 'चल-शंकर' म्हणजे शंकराचार्यांचा  अवतारच संबोधले जाते. मात्र पिठाधिशपदी येण्यासाठी लागणारे ज्ञानसामर्थ्य, योगसामर्थ्य, आणि गुरूभक्ती यांशीवाय हे सामर्थ्य येत नाही. स्वामी निश्चलानंद सरस्वती मात्र याहूनही पुढे जाऊन राष्ट्रभक्ती, आणि निःस्वार्थ जनसेवेच्या व्रताला अधीक पवित्र मानतात. धर्मसंस्थेच्या माध्यमातून राष्ट्रोत्कर्षासाठी झटणा-या स्वामी निश्चलानंद सरस्वतींच्या तालमीत तयार झालेली नवी पिढी हिंदू धर्मसंस्थेला एकूणच नवा आयाम देइल, आणि ज्ञान, विज्ञान  आणि तत्त्वज्ञान यांच्या पायावर उभे असलेले तर्कसंगत धर्मविचार आपल्याला मिळतील अशी खात्री पुज्यश्रींकडे पाहिल्यावर वाटल्याशिवाय राहत नाही.
गेले वर्षभर सुरू असलेल्या या स्तंभाचा समारोप स्वामीजींच्या 'अक्षरचित्राला' गीरवून व्हावा हे केवढं सौभाग्य.