Saturday, 11 June 2011

योगाचार्य बी. के.एस. अय्यंगार

योग आणि प्राणायाम या क्षेत्रांसाठी जून महिना मोठ्या प्रमाणावर घडामोडिंनी भरलेला रहाणार आहे, असं दिसतंय. योग गुरू रामदेव बाबांच्या 'हटयोगा' ने सरकारला फेफरं आणलेलं असतांनाच रामदेवबाबांपेक्षा कित्येक पिढ्या आधीपासून देशात योगाचा प्रचार करणारे योगाचे भिष्मपितामह ९३ वर्षाचे योगाचार्य बी. के.एस. अय्यंगार हे 'ईंडो-चायना योग समिट' या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थीत राहण्यासाठी म्हणुन चिनमधील ग्वान्झु साठी एव्हाना रवाना झाले असतील. ही परिषद येत्या आठवड्यामध्ये चिनमध्ये होउ घातलेली आहे. या देशात शारिरिक, मानसिक आणि आत्मीक समाधान प्राप्त करण्यासाठी मार्शल आर्ट हा प्रकार सर्वमान्य आणि लोकप्रिय आहे. मार्शल आर्ट चे हयात असलेले सर्वोच्च शिक्षक मास्टर लु जिझिअन हे सध्या ११७ वर्षांचे आहेत. योगाचार्य अय्यंगार आणि मास्टर लु यांची या परिषदेच्या निमित्ताने भेट होईल आणि योग आणि मार्शल आर्ट या दोन शास्त्रांवरती सांगोपांग चर्चा होईल. वयाच्या या पाडावावर असतांना देखील दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे, यावरून या दोन्ही शास्त्रांचे महत्त्वच लक्षात येते. या निमित्ताने भारतातील योगशास्त्राचे पहिलेवहीले ग्लोबल ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर असलेले पद्मभुषण योगाचार्य अय्यंगार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. 

बेल्लूर कृष्णमचार सुंदरराज अय्यंगार यांचा जन्म जरी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर गावचा असला, तरी त्यांची कर्मभुमी पुणे हीच आहे. गेल्या पाउणशे वर्षांपासून योगशास्त्राचा अभ्यास, प्रसार, प्रचार आणि अध्यापन करणारे योगाचार्य या विषयावरील अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. अनेक वृत्तपत्रांसाठी (यात मराठी वृत्तपत्रांचाही समावेश आहे) त्यांनी स्तंभलेखन केलं आहे. महर्षी पतंजलीच्या योगाचे गुरूजींनी सांगितलेले स्वरूप हे त्यांच्या अनुयायांमध्ये 'अय्यंगार योगा' म्हणुन प्रसिद्ध असले, तरीही गुरूजी मात्र हा ठेवा महर्षी पतंजलीचाच असल्याचं नम्रतेने वारंवार सांगतांना दिसतात.  अय्यंगार हे मुळात तामिळनाडूमधील उच्चकुलीन ब्राम्हण कुलनाम आहे. रामानुजाचार्यांनी सांगितलेल्या विषिष्टाद्वैतवादाच्या सिद्धांतावर विश्वास असणार्र्या भाविक वैष्णवांचा हा समाज आता तामिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातही आढळतो. गुरूंजींचे वडिल एक साधारण शिक्षक होते. १३ भावडांपैकी त्यांचा क्रमांक ११ वा. घरची परिस्थीती अतीशय हलाखीची होती. यामुळेच मलेरिया, टिबी, टायफॉईड आणि उपासमार या सर्वांचा सामना करत आयुष्याची नउ रोगट वर्षे कशीतरी काढली. नवव्या वर्षी वडिलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे सर्व भावंडांची जबाबदारी आई आणि मोठ्या भावांबहिणींवर येऊन पडली. गुरूजींचे बहिणजावई मैसुरचे तिरूमलाई कृष्णम्माचार्य हे योगशास्त्रातील त्या काळात गाजलेलं नाव. (कृष्णम्माचार्य देखील योगसामर्थ्याच्या भरवशावर शंभर वर्षांचं निरोगी आयुष्य जगले.) त्यांनी लहानग्या सुंदरची जबाबदारी स्विकारली. मैसुरला गुरूगृही त्यांचं योगशिक्षण सुरू झालं. 
 
यथाशक्ती निरंतर योगाभ्यासाने किमया केली, आणि गुरूजींनी अवघ्या काही दिवसांतच अशक्तपणा आणि रोगटपणावर मात केली. योगाभ्यासामध्ये त्यांची ऋची आणि गती लक्षात आल्यावर कृष्णम्माचार्यांचेदेखील ते आवडते शिष्य झाले. त्यांनी पुण्याच्या योगशाळेत शिक्षक म्हणुन तरूण सुंदरची नियुक्ती केली. साल होतं  १९३७. सुंदरचा बि के एस अय्यंगार गुरूजी होण्याची हीच सुरूवात. पुण्य़ात डॉ गोखल्यांनी ज्या वेळी प्रथम त्यांना ' योगा ' शिकवायला जिमखान्यावर आणलं. त्या काळी पूना गेस्ट हाऊसच्या निमित्तानं सिनेमावाले खूप ओळखीचे झाले. ललिता पवार आणि भालजी पेंढारकरांनीही गुरुजींकडून योगाचे धडे घेतले. त्या काळात माणूस आणि शेजारी हे दोन चित्रपट खूप वेळा बघितल्याचं ते सांगतात. पुण्यात गुरूजींनी लावलेल्या ईवल्याश्या रोपट्याचा वेलु हळूहळू जगभर पसरू लागला.
 
चौकातल्या सार्वजनिक नळाचं पाणी पिऊन, ' रीगल ' च्या सिंगल चहाची चव जिभेवर रेंगाळती ठेवत 'योग' शिकणे, शिकवणे सुरू झाले. 'योगा' इतकाच नृत्य आणि गाणं ऐकण्यात
रस असल्याने आणि शास्त्रीय संगीतात विशेष रुची असल्याने सूर आणि सुरेल माणसं हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच पंडित भिमसेन जोशी आणि जागतीक किर्तीचे व्हायोलीन वादक येहूदी मेन्युहीन यांच्याशी संपर्क आला. १९५२ साली मेन्युहीन यांच्या सहकार्याने लंडन, स्वित्ज्झर्लॅड आदी ठीकाणी योग शिबिरे घेतली. भारताबाहेर योगशिबीर होण्याची ही बहूधा पहिली वेळ असावी. त्यानंतर मात्र योगाला ग्लोबल करण्याचं सत्रच सुरू झालं. आज युरोप-अमेरिकेत अय्यंगार योगवर्गाच्या तीनशे शाखा आहेत.
 
१९६१ साली त्यांचे गुरुजी कृष्णमाचार्य पुण्यात आले होते. अय्यंग़ार सरांची कन्या गीता आणि मुलगा प्रशांत यांना योगाभ्यासाचे धडे देणे सुरू होते. कृष्णमाचार्यांनी एक आसन जवळपास अर्ध्या तासापर्यंत शिकवूनही या लहानग्यांना ते समजे ना. योगायोगाने तीथे अय्यंगार गुरूजी आले, आणि सजहपणे एका वाक्यात 'अमुक बिंदूपासून तमुक या बिंदूपर्यंत शरीर स्ट्रेच करा' असं सांगीतलं. मुलांच्या हे लगेच लक्षात आलं. एवढा एक प्रसंग कृष्णमाचार्यांसाठी पुरेसा होता. त्यांनी गुरूजींना योग शिक्षक चक्रवर्ती हे स्वर्णपत्र प्रदाब केलं. त्यांच्यामधील शिक्षकाला मिळालेली ही सर्वोच्च पावती. गुरूजींचं पहिलं पुस्तक 'लाईट ऑन योगा' हे १९६६ साली प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे योगाभ्यासावरील बायबल म्हणुन गणलं जातं. जगातील १७ हून  अधीक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली. ईंग्रजी, कन्नड, मराठी आणि ईतर अनेक भारतीय भाषांमध्ये संवाद साधू शकणार्र्या गुरूजींनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलंय, आणि करत आहेत. त्यांची योगशास्त्रावरची सोळा पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. ' अष्टदल योगमाला ' चे बारा खंड लिहून पूर्ण करण्याचं काम सुरू आहे.
 
येत्या चौदा डिसेंबरला वयाची ९४ वर्षे पूर्ण होणार , तरी धाप नाही. दम नाही. चपळतेनं बंगलोरी हिरव्या काठाची लुंगी सावरत, आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्य़ात उभारलेल्या 'राममणी अय्यंगार मेमोरिअल योगा ईन्स्टीट्युट' मध्ये फेरफटका मारणारे गुरूजी  अनेकांना लक्षात असतील. या वयातदेखील कामाच्या झपाट्यात फरक नाही. पूर्वी पहाटे साडेतीनला उठायचे. आता साडेपाच होतात. दोन तास प्राणायाम. नंतरच चार तास योगवर्ग. दुपारी ग्रंथालयात वाचन किंवा नोट्स काढणं. सध्या ईंडो-चायना योग समिट संदर्भातली गुरुजींची तयारी सुरू असेल.
नव्वदीच्या घरात चपळतेने वावरणारे पद्मभूषण आणि पुण्यभूषण अय्यंगारगुरुजी हे पौराणिक चित्रपटातल्या नायकासारखेच दिसतात. कपाळावरून उलटे फिरवलेले आणि खांदे-मानेवर रेंगाळणारे दाट केस. भव्य कपाळावर रेखलेली लाल कुंकवाची उभी रेघ. पौराणिक पुरुषासारख्या दाट वळलेल्या भुवया , दणकट बाहू. आणि सचिन तेंडुलकरला सहज उचलतील अशी उंची!
 
होय! सचिन हा गुरूजींचा आवडता शिष्य! मध्यंतरी तो रोज गुरुजींकडे योगाचे धडे घ्यायला येत होता. क्रिकेट तर त्यांचा जीव की प्राण. मॅच मन:पूर्वक पाहतात. मध्यंतरी बंगलोरला सर्व खेळाडूंना कोचिंग द्यायला गुरुजी गेले होते. नुसतं पाहून ' सेहवाग ला त्यांनी सांगितलं की , पायाचा प्रॉब्लेम असेल. खूप पाय दुखतो ना! त्यामुळे मन स्थिर न राहल्याने कन्सिस्टन्सी नाही. सौरभला विचारलं , ' कंबर दुखते का ?.' नुसतं उभं राहण्याच्या पोश्चरवरून ओळखलं आणि आसनं टिकवून सगळ्यांना फिट्ट केलं. योगा फॉर क्रिकेटर्स हे त्यांचं पुस्तकही त्यानंतर आलं.
 
योगप्रचाराच्या निमित्ताने सध्या जगभर प्रवास करावा लागत असुनही गुरूजींच्या चेहर्र्यावरील सहज आणि सात्त्वीक स्मीत कायम असतं. आता चिनमध्ये मास्टर लु जिझिअन यांच्यासमवेत योग आणि मार्शल आर्ट यांचा काय सुवर्णमध्य ते शोधून काढतात ते पहायचे.
 
 

No comments:

Post a Comment