रतन टाटांच्या निवृत्तीनंतर टाटा उद्योगसमुहाची जबाबदारी कुणावर य़ेणार या गोष्टीची उत्सुकता टाटांचं मीठ खाणा-या, टाटांचा फोन वापरणा-या, टाटांच्या बसमध्ये प्रवास करणा-या, टाटांच्या हॉटेलमध्ये रहाणा-या, टाटांच्या आयटी, कम्युनिकेशन, इंजिनिअरिंग, स्टील आणि इतर कंपन्यांमध्ये कॅम्पसमधुनच सिलेक्ट होण्याची ईच्छा असणा-या, -- म्हणजेच एकुणच सर्वच क्षेत्रातील भारतीयांना बरेच दिवसापासुन लागलेली होती. टाटांच्या घड्याळात वेळ बघत आपल्यापैकी अनेकजण ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण मागच्या बुधवारी संध्याकाळी सहा वाजता आला. 'सायरस पालनजी मिस्त्री विल वर्क विथ रतन टाटा ओव्हर द नेक्स्ट इयर अँड टेक ओव्हर फ्रॉम हिम व्हेन मि टाटा रिटायर्स इन डिसेंबर 2012' अश्या आशयाचे ईमेल अलर्टस अनेकांना आले, आणि ४३ वर्षाचा हा खांदानी उद्योजक टाटांच्या चारलाख कोटींच्या साम्राज्याचा वारस होणार हे नक्की झालं.
मुळात उद्योगविश्वात ब-यापैकी परिचीत नाव असलं तरी सायरस मिस्त्री हा अत्यंत लो प्रोफाईल जपणारा मितभाषी आणि हुशार माणुस आहे. अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांपैकी अनिल जनमानसांत जास्त परिचीत आहे, मात्र मुकेश उद्योगजगतात जास्त प्रभावी आहे, त्याचप्रमाणे सायरस आपल्या क्षेत्रात ब-यापैकी प्रभावी व्यक्तीमत्त्व आहे. टाटासन्स या टाटांच्या सगळ्यात प्रभावी होल्डींग कंपनिमधील शापुरजी पालनजी मिस्त्री उद्योगसमुहाचे ते प्रतिनिधित्त्व करतात. या समुहाचे भागभांडवल कंपनित सगळ्यात जास्त आहे. शिवाय टाटासन्स हीच कंपनी टाटांच्या ईतर सर्व उद्योगांचे संचलन करते. त्यामुळे सायरस मिस्त्रींची टाटांचे उत्तराधीकारी म्हणुन झालेली निवड आश्चर्यकारक नक्कीच नव्हती. मात्र टाटांच्या कार्यपद्धतीप्रमाणे सर्वसंमतीने ती निवड होणे आवश्यक होते. म्हणुनच केवळ कंपनिमध्ये सगळ्यात जास्त भांडवल असणा-या समुहाचा प्रतिनिधी आहे म्हणुनच नव्हे, तर -- धोरणात्मक व्यूहरचना करणारा, कंपनीला नफ्यात आणणारा, मितभाषी, विनोदबुद्धी असलेला, भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा अनुभव असणारा, प्रसिद्धीपासून दूर राहणारा आणि खांदानी वारसा चालवणारा, टाटा समूहाशी परिचित आणि मुख्य म्हणजे पारसी असणारा ह्या सगळ्या निकषांवरही खरा उतरल्यामुळे सायरस मिस्त्रीची निवड पक्की करण्यात आली.
मिस्त्री परिवार आणि टाटा परिवारांचे स्नेहबंधदेखील जुने आहेत. पालनजी मिस्त्री हे सायरस यांचे आजोबा. ईंग्रजांच्या काळात मुंबईतील बांधकामाची कंत्राटे घेऊन ती वेळेत पुर्ण करून देणे हे त्यांचे काम. म्हणुनच त्यांचे आडणावही मिस्त्री झाले असावे. त्यांचे जेष्ट पुत्र शापूरजी यांनीच पुढे शापुरजी पालनजी बांधकाम कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईत काम करतांनाच त्यांच्यापेक्षा काही काळ आधी स्थापन झालेल्या टाटा समुहाशी आधी स्पर्धा आणि नंतर पारशी कनेक्शनमधुन मैत्री करण्याच्या निमित्ताने कंपनिचा संबंध आला. स्पर्धेच्या दरम्यान जेआरडी टाटांचे धाकटे बंधू दोराबजी टाटा यांच्याकडील टाटासन्सचे सर्व शेअर्स पालनजी मिस्त्री यांनी खरेदी केले तर मैत्रीच्या दरम्यान संबंध अधिक सुदृढ करण्याच्या दृष्टीने आणखी काही शेअर्स शापुरजी यांनी विकत घेतले. थोडक्यात यामुळे टाटासन्समधील सर्वात जास्त भागभांडवल असणारी कंपनी म्हणुन शापुरजी पालनजीचा उदय झाला.
पुढे शापुरजींनी पेत्सी दुबाष या आयरीश महिलेशी विवाह केला. यायरचा जन्मही आयर्लंडचाच. मात्र शिक्षण वडिलांच्या कर्मभुमित, मुंबईत, झालं. मुंबईतल्या कॅथ्रेडल अँड जॉन कॉनन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर घराण्याच्या व्यवसायाला साजेसं असं सिव्हील ईंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लंडन गाठलं. इम्पेरियल महाविद्यालयातून १९९०मध्ये अभियांत्रिकीचे आणि त्यानंतर लंडन बिझनेस स्कूलमध्ये एमबिए अशा शिक्षणाच्या पाश्र्वभूमीवर सायरस यांनी शापूरजी पालनजी उद्योगसमूहातच आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. १९९१ मध्ये ते संचालक झाले आणि १९९४ मध्ये व्यवस्थापकिय संचालक. यादरम्यान त्यांचे वडिल शापुरजी यांनी टाटासन्समध्ये आपला जम चांगलाच बसवला होता. टाटासन्सचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये त्यांना 'घोस्ट ऑफ बॉम्बे हाउस' म्हणुन ओळखत असत ईतका त्यांचा 'वट' होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायरसची वाटचाल सुरू झाली.
अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही मिडल-ईस्ट मधील खुप नावाजलेली बांधकाम कंपनी त्यांनी टेक-ओव्हर केली आणि त्यांच्यामधील दुरदृष्टीचा परिचय दिला. पुढे याच कंपनीने दिल्लीच्या मेट्रोरेलसह अनेक मोठमोठी कामे पुर्ण केली. रिलायन्सची जामनगरमधील रिफायनरी, जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आणि ईतरही अनेक मोठमोठी कामे शापुरजी पालनजी या कंपनीनेच केली.
या दरम्यान २००५ मध्ये पंचाहत्तरीत असलेल्या शापुरजी मिस्त्री यांनी टाटासन्समध्ये व्यवस्थापक मंडळाच्या सदस्यत्त्वावरून निवृत्ती पत्करली आणि आपला मुलगा सायरसला हे पद मिळावे अशी शिफारस केली. आधी पालनजी यांचा प्रभाव, आणि रतन टाटांशी असलेला शापुरजींचा स्नेह या घटकांमुळे सायरस यांची पुढील वर्षीच टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. आज कोणीही सायरस यांच्याविषयी ‘बापाच्या जिवावर शिलेदार’ असा किंवा तशा आशयाचा उल्लेख करत नाही. मितभाषी, हुशार, निर्भीड सायरस यांनी नंतर टाटा सन्सच्या इतर संचालकांवर आणि विशेषत: रतन टाटांवर प्रभाव पाडला. टाटांप्रमाणेच तेही पारशी असल्याचा फायदा झालाच.
टाटांनी आपला उत्तराधिकारी नेमण्यासाठी तयार केलेल्या समितीचे सायरसदेखील एक सदस्य होते. युनिलिव्हरचे माजी अध्यक्ष केकी दादीसेठ ते पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नूयी यांच्या नावांपर्यंतचा विचार टाटांच्या उत्तराधिकारीपदासाठी झाला. तब्बल १४ उमेदवारांनी मुलाखतीही दिल्या. मात्र जेव्हा आपल्यामधीलच एक सायरस मिस्त्री या नावाची चर्चा सुरू झाली, तेव्हा मिस्त्रींनी स्वतःहूनच समितीच्या बैठकीला उपस्थीत राहणे बंद केले. यावरून त्यांच्यामधील टाटा या ब्रॅण्डनेमला साजेसं 'जंटलमॅन स्पीरिट' दिस्रुन येतं.
वैयक्तीक आयुष्यातही रतन टाटांप्रमाणेच त्यांची रहाणी साधी आहे. रतन टाटा नागपूरला आले, तेव्हा केवळ तीन गाड्यांचा त्यांचा ताफा होता, आणि साधा कॉटनचा शर्ट आणि फॉर्मल ट्राउझरवर त्यांनी पत्रकारांशी हिंदीतुन संवाद साधला होता. सायरस मिस्त्रींचंही ब-यापैकी तसंच काम आहे. त्यांचे सुटीचे दिवस पत्नी रोहिका (प्रसिद्ध विधिज्ञ मोहम्मदअली करीम छागला यांची नात ) आणि दोन मुले यांच्याबरोबर घालवायला आणि रूचकर जेवण जेवायला त्यांना आवडते. गोल्फ खेळणे आणि जुनि गाणी एकणे हे त्यांचे छंद आहेत. एकुणच टाटांचा वारस म्हणुन अंगी असायला हवेत ते सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत.
शिवाय एक महत्त्वाचा मुद्दा आहे. टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्या नावाची चर्चा त्यांचे वारस म्हणुन होणे सहाजीकच होते. टाटा परिवारातील असलेल्या नोएल यांना डावलून परिवाराबाहेरील कुणाची नियुक्ती ही पारिवारिक कलहाला कारण ठरू शकत होती, मात्र सायरस मिस्त्रींच्या बाबतीत ते होणे नाही. याचं कारण म्हणजे सायरस यांची मोठी बहिण आलु ही नोएल टाटांची पत्नी आहे. त्यामुळे 'सारी दुनिया एक तरफ-जोरू का भाई एक तरफ' या नितिप्रमाणे नोएल टाटा हे देखील सायरस यांच्या नियुक्तीमुळे खुष असणार आहेत.
वयाच्या कमीत कमी ६५ व्या वर्षापर्यंत म्हणजे येती जवळपास दोन दशके सायरस मिस्त्री टाटा साम्राज्याच्या उत्तराधिकारीपदावर राहणारे पहिलेवहिलेच 'अ-टाटा' असणार आहेत. (या यापूर्वीचे अध्यक्ष नौरोजी सकलतवाला १९३२ ते ३८ या काळात अध्यक्ष होते.) भारताची जागतीक ओळख असलेल्या टाटा समुहाला नवी दिशा देण्याची त्याच्यावर आलेली जबाबदारी ते अशी पार पाडतात यावर टाटा या ब्रॅण्डकडे आशेने पाहणा-या हजारो भारतीय युवकांपासुन ते टाटांचं मिठ खाणा-या कोट्यावधी भारतीय नागरिकांचे डोळे लागलेले असतील यात शंकाच नाही.
No comments:
Post a Comment