Thursday, 19 May 2011

सत्यसाईबाबा

"होय. मीच ईश्वर आहे. आणि तुम्ही देखील ईश्वरच आहात. फरक फक्त ईतकाच आहे की मी हे ओळखलंय, आणि तुम्ही अजुन ओळखलेलं नाहीय!" अशी स्पष्टोक्ती करणार्र्या भगवान सत्यसाईबाबांची प्रकृती सध्या  गंभीर असल्याच्या बातम्या झळकल्या आणि आधूनिक संतपरंपरेतील कदाचीत सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त राहिलेल्या बाबांची कारकिर्द परत एकदा चर्चेत आली. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टपर्थी या छोट्याश्या गावात आज काय नाही? विद्यापिठ, मल्टीसुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेचं मेगा जंक्शन, साठ हजार व्यक्तींच्या राहण्याची सोय, लाखभर जनतेच्या रोजच्या जेवणाचा ईंतजाम, आणि सत्यसाईबाबांचा प्रशांतीनिलयम हा आश्रम! मुळात सत्यसाईबाबा या एका नावाभोवती जमलेलं हे सगळं प्रस्थ आहे. अशी काय जादू आहे या व्यक्तीमत्त्वामध्ये?
भक्तांचं ऐकाल, तर बाबा सर्वज्ञानी, सर्वव्यापी ईश्वरच आहेत. शिर्डीच्या साईबाबांचे ते अवतार आहेत.  स्वत: बाबांनीच सांगितले आहे की शिर्डीच्या साईबाबांनी १९१८ साली सांगूनच ठेवले होते की हे शरीर सोडल्यानंतर आठ वर्षांनी ते पुट्टपर्थी येथे सत्यसाईबाबा म्हणून जन्म घेतील. त्यानुसार २३ नोव्हेंबर १९२६ रोजी पुट्टपर्ती येथे ईश्वराम्मा आणि पेद्दवेंकम्मा राजू रत्नाकरम या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला. वरवर पाहता अतिशय थोतांड वाटत असल्या, तरी जगभरातील २०० देशात वसलेल्या कोट्यावधी साईभक्तांची या कथेवर मनापासून श्रद्धा आहे. त्यांच्या मते सत्यसाईबाबांना जगातल्या अनेक भाषा अवगत आहेत. त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त आहे. त्यांच्या ठायी दिव्यतेज आहे, आणि त्यामुळेच अनेक चमत्कार ते लिलया करतात.
प्रत्यक्षात सत्यसाईबाबांनी आजवर तेलगु शिवाय अन्य कोणत्याही भाषेत प्रवचने दिलेली नाहीत आणि जगभर भक्त असुनही त्यांनी जुन १९६८ मध्ये केलेला नैरोबी दौरा सोडला तर दूसरा कुठलाही विदेश दौरा केलेला नाही. मुळात पुट्टपुर्ती शहराच्या बाहेरही बाबा फारसा प्रवास करत नाहीत. मात्र भक्तांनी आयोजीत केलेला कुठलाही कार्यक्रम असो, बाबांची एक खुर्ची व्यासपिठावर असतेच. भक्तांची अशी श्रद्धा आहे, की बाबा सुक्ष्मरूपाने सगळीकडे संचार करत असतात.
"चमत्कार ही माझी ओळख आहे"  हे वाक्य त्यांच्या एका मुलाखतीत बाबांनी स्वतःच उच्चारले होते. मात्र याच चमत्कारांनी बाबांना वादाच्या भोवर्र्यातदेखील अडकवले आहे. अनेक बुद्धीजीवी लोकांच्या मते बाबांचे चमत्कार ही हातचलाखी आहे, तर अनेकांनी त्यांचे पितळ उघडे पाडण्याचा दावाही केला आहे. मात्र बाबांनी स्वतःहून त्यांच्यावर झालेल्या टिकेला कधी प्रत्युत्तर दिले नाही,  आणि त्यांना आव्हान करणार्र्या कुणालाच त्यांनी प्रतिआव्हानही केलेले नाही.
ते हवेतून सोन्याच्या अंगठ्या , नाणी काढतात. दगडाचे चॉकलेटमधे रुपांतर करतात. आजारी लोकांना विभूती देऊन बरे करतात. ही त्यांच्या हातात कुठून येते हे कोणालाही कळत नाही. त्यांनी १९५० साली एका मुलाला ज्याचे शरीर कुजत चालले होते त्याला परत जिवंत केले. १९७१ साली डॉ जॉन हिस्लॉप जो अमेरिकन साई फौंडेशनचे अध्यक्ष होते.  त्यांनी तर असे जाहीर केले की वॉल्टर कोवान ज्याचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला होता, - त्याला बाबांनी परत जिवंत केले. कै सुरी भगवंतम, जे इंडियन इन्स्टीट्यूटचे प्रमुख होते आणि भारत सरकारचे विज्ञान सल्लागार होते त्यांनीपण एक चमत्कार सांगितला आहे की एक दिवस बाबांनी एकदम हवेतून भगवतगीता काढून दाखवली. डॉ भगवंतम यांच्यासारख्या वैज्ञानिकांनीही बाबांच्या चमत्कारांना मान्यता दिल्यामुळे सहाजिकच बाबांच्या चमत्कारी असण्याच्या दाव्याला दुजोरा मिळतो. आणि म्हणुनच बाबांच्या शिष्यांमधे कोण नाही ? भारतातील प्रथम दर्जाचे राजकारणी, मंत्री, न्यायाधीश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, मॉरिशस ह्या देशांचे पंतप्रधान, ग्रीक देशाचे माजी पंतप्रधान, स्पॅनिश राजघराणे, वकील, डॉक्टर्स आणि सामान्य जनता हे सर्व त्यांचे अनुयायी आहेत.
बाबांच्या मते त्यांनी केलेले चमत्कार म्हणजे जगातील नश्वर गोष्टींच्या पगड्यात फसलेल्या सामान्य लोकांना शाश्वत गोष्टींकडे नेण्याचा मार्ग आहेत. एखाद्या चंचल माकडाच्या हातात फळ दिल्यावर ते जसे काहीकाळ एका ठीकाणी शांत बसु शकते, त्याचप्रमाणे चमत्कार दाखवला की सामान्य माणसाचे चंचल मन काही काळ तरी शांत होते, एकाग्र होते, आणि परमतत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. ज्याप्रमाणे कडू औषध हे गोड वेष्टनात देण्यात येते, त्याचप्रमाणे चमत्काराच्या गोड वेष्टणात ईथे परमार्थाचा डोज देण्यात येतो, असं अनेक ठीकाणी साईभक्तांच्या तोंडून ऐकायला मिळतं.
चमत्कार आणि त्यामुळे बाबांभोवती सतत असलेले वादाचे मभळ यातून बाहेर येऊन त्यांच्या ट्रस्टने केलेली सेवाकार्ये पाहिली, तर आपल्यापैकी अनेक, जे चमत्कार मानत नाहीत, ते देखील मानवसेवेचे प्रेरक म्हणुन सत्यसाईबाबांना मानायला लागतील. जगभरातील १६६ देशांत सत्यसाईबाबांचे सेवाकार्य पसरले आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा सामान्यांना देण्यासाठी सत्यसाई विद्यापिठ आणि ट्रस्ट कार्यरत आहेत. विद्यापिठाच्या पुट्टपर्ती, अनंतपूर आणि बंगळूर येथील कॅम्पसने नॅक मुल्यांकनात 'ए प्लस प्लस' हे नामांकन मिळवले आहे (आपल्याकडे बि किंवा बि प्लस मिळवणारी महाविद्यालये बोटावर मोजण्याईतकी आहेत). भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारे श्री सत्यसाई मिरपूरी कॉलेज ऑफ म्युझिक हेच विद्यापिठ चालवते.
१९७७ साली बंगलोर येथे श्री सत्यसाई जनरल हॉस्पीटलची स्थापना करण्यात आली. आजवर या रूग्णालयातून २० लाख रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. १९९१ साली पुट्टपर्तीमध्ये, २००१ साली बंगलोरमध्ये आणि दोन मल्टीसुपरस्पेशालीटी हॉस्पीटल्स उभी झाली. आजवर अडिच लाखाच्या वर अतीशय कठीण शस्त्रक्रीया या माध्यमातून करण्यात आल्यात. ट्रस्टच्या कुठल्याही रूग्णालयात रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना एक पैसाही खर्च येत नाही, रहाणे खाण्याच्या खर्चापासून ते शस्त्रक्रियेच्या खर्चापर्यंत सर्व पैसा ट्रस्टच्या माध्यमातून येतो. याव्यतीरिक्त अनेक साधारण दवाखाने, मोबाईल व्हॅन्स, आणि डोळ्यांचे दवाखाने ट्रस्ट सेवाकार्य म्हणुन चालवते.
खारपाणपट्ट्यातील दुष्क़ाळग्रस्त जनतेला पिण्याचे पाणी पुरवणार्र्या योजना म्हणजे सत्यसाईबाबांच्या सेवाकार्यातील मैलाचा दगड मानाव्या लागतील. अनंतपूर जिल्ह्यातील ७३० दुष्काळग्रस्त गावांना दत्तक घेऊन त्यातील बारा लक्ष लोकांना लोकांना १९९६ पासुन अविरत पिण्याचे पाणी पुरवल्या जाते आहे. २००४ पासून सत्यसाई गंगा कॅनल च्या माध्यमातून अवघ्या चेन्नई शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. याव्यतिरिक्त मेडक जिल्ह्यातील १८० गावातील साडेचार लाख लोक, आणि महबुबनगर जिल्ह्यातील १४० गावातील साडेतीन लाख लोक सत्यसाई सेवा ट्रस्टच्या माध्यमातूनच पिण्याचे पाणी अविरत प्राप्त करत आहेत. २००८ मध्ये ओरीसातील पुरग्रस्त लोकांना मदत म्हणुन संस्थेने तेथे कार्य सुरू केले आणि एक वर्षभरात सोळा गावांचे स्वप्नवत पुनर्वसन केले. याशिवाय जगभर पसरलेल्या सत्यसाई बाल विकास प्रकल्पाच्या शाळा भारतीय संस्कृतीचा प्रचारप्रसार करत आहेत.
हवेतून हळद कुंकू आणि विभुती काढणे हा चमत्कार जरी अंधश्रद्धा आहे असं मानलं, तरी या माध्यमातून झालेलं चाळीस हजार कोटी रूपयांचं सेवासाम्राज्य हे देखील एक सत्य आहे. त्यांच्या चमत्काराला नमस्कार न केल्यास काहीही हरकत नाही, मात्र सेवाकार्यासमोर नक्कीच हात जोडावे असं हे व्यक्तीमत्त्व आहे.
शेवटी बाबा खरोखर देव आहेत की नाही, जर आहेत तर त्यांनी वयानुरूप येणार्र्या थकव्यावर विजय का मिळवला नाही? २००५ पासून बाबा व्हिलचेअर का वापरतात? २००६ मध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तेव्हा ते दवाखान्यात का गेले? तसेच आता श्वसनाच्या तक्रारीनंतर त्यांनी चमत्कारानेच स्वतःला का बरं करून घेतलं नाही? हे सगळे प्रश्न बाबांच्या माध्यमातून होत असलेल्या सेवाकार्याची व्याप्ती पाहता अतीशय गौण वाटतात. मात्र हिंदू संत  आणि हिंदू धर्माधिष्टीत सेवाभावी कार्य करणार्या संस्था यांना वादाच्या भोवर्र्यात ओढणे, आणि त्यांच्या सहिष्णुतेचा फायदा घेत वाटेल ते आरोप त्यांच्यावर बिनधास्त लावणे, हा भारतात प्रसिद्धी प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, आणि सत्यसाईबाबांवर याच मार्गाचा अवलंब आठ दशकांच्या त्यांच्या आयुष्यात होत राहिला असावा.
(दैनिक तरूण भारत मध्ये दिनांक १ मे २०११ रोजी प्रकाशित झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण)

Monday, 16 May 2011

स्वामी रामदेव


कायम प्रकाशझोतात राहण्याचं कसब काही लोकांना प्रयत्नपुर्वक आत्मसात करावं लागतं, तर काहींना त्याची देणगीच असते. योग गुरू स्वामी रामदेव बाबा हे दूसर्र्या प्रकारांत मोडतात. सतत या ना त्या कारणाने वर्तमानपत्रांचे मथळे आणि वृत्तवाहिन्यांचे प्राईम टाईम स्लॉटस गाजवणार्र्या आधूनिक काळातील योगऋषी रामदेवबाबांच्या अफाट लोकप्रियतेचा परिचय नुकताच विदर्भातील जनतेला आला. त्यांच्या भारत स्वाभिमान ट्रस्टच्यावतीने 'ग्राम निर्माण ते राष्ट्रनिर्माण' या संकल्पासाठी रेशीमबाग मैदानावर एक महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्याच्या कानाकोपर्र्यातुन अक्षरश: हजारो लोकांनी या संमेलनाला हजेरी लावली. ईतकेच नव्हे तर भारताच्या कानाकोपर्र्यात होत असलेले रामदेवबाबांचे दौरे आणि संमेलने प्रचंड गर्दि खेचत आहेत. त्यांच्या अनुयायांनी स्वयंस्फुर्तीने उभे केलेले 'योग नेटवर्क' रामदेवबाबांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये महत्त्वाची भुमिका निभावते आहे.
पंधरा वर्षांपुर्वी मात्र बाबा रामदेव कोण? असा प्रश्न कुणीही सहज विचारला असता. राष्ट्रीय स्तरावरील जी लोकप्रियता, आणि वैभव प्राप्त करण्यासाठी मोठमोठे नेते आणि अभिनेते अवघी हयात खर्ची घालतात, ती लोकप्रियता पंचेचाळीस वर्षाच्या, शिडशिडित शरिरयष्टीच्या, भगवी वस्त्रे परिधान करणार्र्या या सन्याश्याला अवध्या दिड दशकात प्राप्त व्हावी, हे आधूनिक काळातील आश्चर्यच मानावे लागेल. रामदेवबाबांच्या या स्वप्नवत वाटचालीदरम्यान जसे त्यांना अनुयायी लाभले तसेच हितशत्रुही मिळाले. पुरस्काराबरोबर तिरस्कार आणि व्यापाबरोबर वादही वाढले. खुन, अपहरणे, जमिनिचे गैरव्यवहार, औषधांमध्ये जनावरांच्या हाडांचा वापर, अगदी हवाला पर्यंतचे आरोप त्यांच्यावर राजकारणी, आणि धर्माचार्यांनी केलेत. आता राजकारणाच्या दलदलित स्वतःहूनच प्रवेश केल्यावर त्यांच्यावर चिखलफेक होणे तर ओघाओघाने आलेच. मात्र पंधरा वर्षांच्या या चढत्या वाटचालीचा हा मनोरा उभा करण्यासाठी तीस वर्षाच्या परिश्रमांचा पाया त्यांना रचावा लागलाय, हे विसरून चालणार नाही. 
हरियाणामधल्या महेन्द्रगड जिल्ह्यातील अली सैयदपूर या खेड्यात १९६५ साली रामकिशन रामनिवास यादव चा जन्म झाला तेव्हा या गावात शाळा नव्हती  आणि दवाखानाही नव्हता. हिंदी कुणी बोलत नव्हते. हरियाणवी बोलीभाषेचे चलन होते. रामकिशन शेजारच्या शहजादपूर गावातल्या शाळेत जाऊ लागला. दरम्यान त्याला अर्धांगवायूचा झटका आला. वैद्यकिय सुविधा नसल्यामुळे आयुर्वेद, प्राणायाम आणि योगादी पारंपारिक उपचारपद्धतीचा वापर करून त्याने अर्धांगवायुच्या असाध्य आजारातून सुटका करवून घेतली. त्याचा एक डोळा मात्र पुर्णतः बरा होवू शकला नाही.
ज्या उपचारपद्धतीने आपण बरे झालो त्याचा अभ्यास करण्याचे त्याने नक्की केले. त्यासाठी संस्कृत अभ्यासणे अनिवार्य होते. आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण झाल्यावर रामकिशन खनपुर येथील अर्ष गुरूकुलात जायला लागला. आचार्य प्रद्युभ्न या विद्वानाच्या मार्गदर्शनात संस्कृत व्याकरण आणि योगाचे धडे गिरवणे सुरू झाले. संस्कृतमधील आचार्य पदवी पर्यंतचे शिक्षण झाले. दरम्यान त्यांचे पहिले आध्यात्मीक गुरू आचार्य बलदेवजींशी संपर्क आला आणि सन्यस्त जिवनाची प्रेरणा प्राप्त झाली. रामकिशन यादवने आचार्य रामदेव हे नाव धारण केले आणि उपजिविकेसाठी हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील कलवा गुरूकुलात संस्कृत आणि योग शिकवू लागले. स्वतःचा शोधही सुरू होताच. रामप्रसाद बिस्मील यांनी बंगालीतून हिंदित भाषांतरीत केलेला योगी अरबिंदो यांचा योगीक साधन हा ग्रंथ वाचनात आला आणि हिमालयाच्या पर्वतराजीत भटकंती सुरू झाली.  गंगेच्या किनार्र्यावर वसलेल्या गुरुकुल कांगरी येथे संस्कृतबरोबरच राज्यशास्त्र व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा म्हणुन जाणेयेणे सुरू झाले. या वेळी रामदेवबाबांजवळ एक जुनाट स्कुटर किंवा एक सायकल असायची. गंगा किनार्र्या वर येउन प्राणायाम करणार्र्या, ध्यान लावणार्र्या चार लोकांकडून सहज म्हणुन योगासने करवून घेत असत. ईथे सुरू झालेली शिबिरांची ही शृंखला लक्षावधी लोकांच्या शिबिरांपर्यंत पोचेल ही कल्पना तेव्हा कुणालाच नसावी.
गुरुकुल कांगरी हे धार्मिक आणि सामाजीक क्षेत्रातील मोठं प्रस्थ आहे. संस्कृत विद्वान कृपालू देवजी महाराज यांनी १९३२ च्या दरम्यान या आश्रमाची स्थापना केली. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य़ स्वामी श्रद्धानंद यांनी येथे वैदिक गुरूकुल सुरू केले. त्यांचे शिष्य स्वामी शंकरदेव यांच्या हाती या आश्रमाची धुरा आल्यावर १९६८ मध्ये दिव्ययोग मंदिरची स्थापना त्यांनी केली. हेच स्वामी शंकरदेव म्हणजे रामदेव यांचे गुरू. यांच्याकडूनच १९९५ साली रामनवमीच्या दिवशी त्यांनी संन्यासदिक्षा घेतली. आचार्य रामदेव स्वामी रामदेव झाले. शिक्षकांची श्वेत वस्त्रे त्यागुन त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली. गुरू शंकरदेव यांच्याबरोबर दिव्ययोग मंदिराचा व्याप वाढवायला सुरवात केली. ३०० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, आयुर्विज्ञान विद्यापिठ, फुड पार्क, फार्मसी, आणि आयुर्वद रिसर्च सेंन्टर बरोबर दिव्य योग मंदिर ट्रस्ट, पतंजली योगपिठ आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट चा हजारो करोड रुपयांचा वटवृक्ष गेल्या पंधरा-सोळा वर्षापासून आपल्यासमोर बहरलेला दिसत असला तरिदेखील त्याचे बिज १९३२ सालीच रोवले गेले होते, हे येथे महत्त्वाचे.
स्थावर मालमत्ता ही आश्रमाकडे होतीच. रामदेवबाबांच्या प्रयत्नांनी पैशाचा ओघ वाढत गेला आणि आज ईंग्लंडजवळचे एक अख्खे बेटच विकत घेण्याईतपत संपन्नता त्यांना प्राप्त झाली. या डोळ्यात भरणार्र्या प्रगतीने अनेक आरोपांनाही आमंत्रण दिले. गुरू शंकरदेव यांच्याकडून आश्रमाची सुत्रे हस्तगत करण्यासाठी रामदेवबाबांनी त्यांचा खुन करवला, किंवा आझादी बचाव आंदोलनाचे प्रणेते आणि एके काळचे रामदेवबाबांचे निकटचे सहकारी राजीव दिक्षीत यांची हत्या त्यांनीच घडवून आणली असे गंभिर आरोप त्यांच्यावर लावण्यात  आले. आस्था चॅनल ही धार्मिक वाहीनी हस्तगत करण्यासाठी या वाहिनिचे प्रमुख किरिट सि मेहता यांचे अपहरण केल्याचा आरोप तर अनेक धर्माचार्यांनीच त्यांच्यावर लावला. याशिवाय दिव्ययोग फार्मसि च्या माध्यमातून ते औषधांचा व्यापार करतात, योग शिबिराच्या नावाखाली करोडो रूपये वसुलतात, त्यांनी अनेक बड्या प्रस्थांना, मोठमोठ्या पत्रकारांना  आपल्या कह्यात ओढून आपली प्रसिद्धी चालवली आहे, राजकारणी आणि सिने अभिनेत्यांविरूद्ध बेताल वक्तव्ये करून संतपदाला अशोभनिय अशी कृत्ये करतात, ईत्यादी अनेक आरोप त्यांच्यावर सतत होत असतात. अनेकदा रामदेवबाबांनी अनेक आरोपांचे खंडण केले, अनेकदा दुर्लक्षदेखील.
आयुर्वेदिक औषधोपचारांचा पुरस्कार करत असले तरिही रामदेवबाबा ऍलोपॅथीक औषधांचा विरोध करत नाहीत. ग्रहमान, ज्योतिष्य, अंकशास्त्र, कुंडली वास्तुशास्त्र या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक क्षण शुभ, आणि प्रत्येक दिशा परमेश्वराची असल्याचं ते मानतात. धर्म, संस्कृती आणि परंपरांचे प्रखर पुरस्कर्ते असलेले रामदेवबाबा धर्माच्या नावावर चालणार्र्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि पाखंडाचे खंडण करतात. हरिद्वारजवळच्या त्यांच्या पतंजली आश्रमात कोणत्याही देवाचे मंदिर नाही. त्यांच्या योग शिबिरामध्ये 'है प्रित जहॉं की रित सदा' या सारखी देशभक्तीपर गीते भजन म्हणुन वापरली जातात.
योगासने आणि प्राणायाम हा जात धर्म पाहून केला जात नाही आणि या स्वास्थ्ययात्रेमध्ये सगळ्यांचेच स्वागत आहे, असे आवाहन त्यांच्या शिबिरांद्वारे वारंवार होते. जमैतुल उलेमा ए हिंद च्या मौलाना महमूद मदनी यांनी दिलेल्या आमंत्रणावरून बाबा देवबंद येथील मुस्लीम संमेलनात नुकतेच जाउन आले. आपल्या भाषणाची सुरवात त्यांनी कुराण शरिफ मधील आयत गाउन केली. दरम्यान देवबंद येथूनच मुस्लीमांनी 'वंदे मातरम' गाऊ नये, असा फतवा जारी करण्यात आला होता. तेव्हा "कुराणातील आयत गायल्याने जर माझा धर्म भ्रष्ट होउन मी मुसलमान झालो नाही, तर वंदे मातरम म्हटल्याने तुमचा धर्म कसाकाय भ्रष्ट होणार?" असा प्रश्न त्यांनी शेकडो उलेमांसमोर उपस्थीत लाखो मुस्लीम बांधवांना विचारला.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन असो, स्विस बॅंकेतील काळ्या पैशासाठी त्यांचे प्रस्तावित उपोषण असो, किंवा समलैंगीक संबंधांना कायदेशिर ठरवणार्र्या निर्णयाचा सामाजीक आणि सांस्कृतीक जाणिवेतून केलेला विरोध असो; रामदेवबाबांनी आपले म्हणणे नेहमी स्पष्टपणे मांडले, आणि त्यानंतर  झालेल्या प्रत्येक परिणामाला ते सामोरे गेले.
आता त्यांची राजकिय खेळी सुरू झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ५४० जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. जनमानसांत असलेल्या लोकप्रिय प्रतिमेमुळे राजकारणातही यश प्राप्त होईल की, लाखोची गर्दि खेचणार्र्या चिरंजिवीच्या प्रजाराज्यम प्रमाणे रामदेवबाबांचा पक्षही अल्पजीवी ठरतो ते  आता पहायचे.
 
तरूण भारत च्या  आसमंत पुरवणीमध्ये १४ मे २०११ रोजी प्रकाशित झालेल्या या लेखाचे हे कात्रण

Saturday, 14 May 2011

कलाईगनर

तामीळनाडू, केरळ, पश्चीम बंगाल आणि आसाम मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येत्या १३ मे रोजी जाहीर होतील. सर्वच राज्यांत अभुतपुर्व असे सरासरी सत्तर टक्क्याहून अधीक मतदान झाल्यामुळे या निवडणुका एकुणच देशाच्या राजकारणात बदलाचा संदेश घेऊन येणार्र्या असतील, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. निवडणूका झालेल्या राज्यांपैकी राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे. मात्र 'कलाईगनर' अर्थात 'कलेचा स्वामी' हे सन्मानाचं बिरूद केवळ राजकारण करून प्राप्त होत नाही. आठ दशकांच्या सक्रिय राजकिय कारकिर्दीबरोबरच करूणानिधींनी आपली कला आणि साहित्य क्षेत्रातली कारकिर्दही जागती आणि वाढती ठेवलेली आहे.
एका दृष्टीक्षेपात बघायचं झाल्यास करूणानिधींनी आजवर शंभराहून अधीक पुस्तकं लिहिली आहेत. यात ललित, कवीता, कथा, कादंबर्र्यांबरोबरच भाषाशास्त्रावरील पुस्तकांचादेखील समावेश आहे. त्यांनी लिहलेल्या नाटकांची संख्या नऊहून अधीक आहे, आणि आजही तामिळनाडूमध्ये या नाटकांचे प्रयोग तुफान गर्दी खेचतात. करूणानिधींनी आजवर ७५ सुपरहिट तामिळ चित्रपटांच्या पटकथा लिहलेल्या आहेत. पटकथालेखनासाठी त्यांना आजवर शेकडो पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. एकाच वेळी राजकारण आणि सिनेमात यशस्वी होणे हे करूणानिधी यांचे वैषिष्ट्य आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र तामिळ राजकारणात तशी परंपराच आहे. करूणानिधिंचे राजकिय गुरू अन्नादूराई, ज्यांनी द्रमुक पक्षाची स्थापना केली, ते सुद्धा एक उत्तम पटकथालेखक होते. अन्नादूराईंच्या जिवनकालात करूणानिधिंचे सहकारी असणारे आणि त्यांच्या मृत्युनंतर नेतृत्त्वसंघर्षातून अन्नाद्रमुक (ए आय ए डि एम के) ची स्थापना करणारे एम जी रामस्वामी (एमजिआर) हे तामिळ चित्रपटांचे सुपरस्टार होते. सध्या अन्नाद्रमुक च्या  अध्यक्षा असलेल्या जे जयललीता यांनी देखील रूपेरी पडद्यावर एक काळ गाजवला आहे.
मुळात तामिळ सिनेमा आणि तामीळ राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ईथे प्रत्येक नेता अभिनेता बनु शकतो आणि, आणि अभिनेता नेता बनु शकतो. करूणानिधींचं कलाक्षेत्रातलं कर्तृत्त्व केवळ सिनेमाच्या पटकथा लिहण्या पुरतं मर्यादित असतं, तर त्यांना 'कलाईगनर' हे नामाभिधान खचितच प्राप्त झालं असतं. तामिळ भाषा, संस्कृती, आणि तामिळ अस्मीता या विषयावरील करूणानिधींचा व्यासंग त्यांना ईतर नेत्या-अभिनेत्यांपासून वेगळ्या, उच्चासनावर नेऊन ठेवतो.
करूणानिधींचा जन्म झाला तो एसाईवेल्लार या समाजामध्ये. 'एसाई' म्हणजे संगित आणि 'वेल्लार' म्हणजे संवर्धक. कला आणि संगिताचे संवर्धक असलेल्या या लोकांनी कोणे एके काळी 'भरतनाट्यम'चा शोध लावला होता, असं म्हणतात. करूणानिधिंकडे कलेचा वारसा असा शेकडो पिढ्यांपासून चालत आलेला आहे. जात-धर्म किंवा देव या गोष्टी आता मात्र करूणानिधी मानत नाहित. त्यांच्या नावातील एम. म्हणजे मुथुवेल हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. आपल्या परिवाराचे 'मारन' हे पारंपारिक आडणावही ते लावत नाहीत. विद्रोही द्रविड विचारांचा हा परिणाम आहे. या विचारांची कास त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी जेष्ट तामिळ नेते अलगिरस्वामी यांचे प्रभावी भाषण  ऐकल्यावर धरली.
'द्रविड संस्कृती ही पुरातन काळापासून अस्त्तीत्त्वात होती. आर्यांनी आक्रमण करून द्रविडिय सभ्यतेची कुचंबणा केली. हिंदू धर्मातील कर्मकांड, ब्राम्हणांचा वाढता प्रभाव, आणि धार्मिक विधिंतील फोलपणा यामुळे पुरोगामी अशी द्रविड सभ्यता मागे पडत गेली. त्यामुळे आता अस्त्तीत्त्व टिकवायचे असेल तर ब्राम्हणांचे, आर्यांचे, पर्यायाने उत्तर भारतीयांचे वर्चस्व झुगारून द्यावे लागेल, असा सुरवातीच्या काळातील द्रविड विचार तरूण करूणानिधींवर प्रभाव पाडून गेला. हिंदीविरोधी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांची राजकिय कारकिर्दही सुरू झाली. तरूणांची एक संघटना निर्माण करून त्यांनी द्रविड विचाराचा प्रसार करण्याचे कार्य आरंभले. त्यांच्यातील सर्जनशिल लेखक मात्र शांत बसला नाही. एक हस्तलिखित वृत्तपत्र त्यांनी याच काळात सुरू केले. या वृत्तपत्रात त्यांनी 'द्राविडनाडू' (द्रविड राष्ट्र) नावाचा एक अग्रलेख लिहला होता. द्रमुकचे नेते अन्नादूराई यांच्या वाचनात हा लेख आला आणि त्यांनी या तरूण संपादकाला भेटायला बोलावले. करूणानिधींनी पहिल्या भेटितच अन्नादूराईंवर अशी काही छाप सोडली, की पुढे हेच हस्तलिखित वृत्तपत्र 'मुरासोली' हे त्यांच्या पक्षाचे विचारपत्र म्हणुन नावारूपाला आले.
अन्नादूराईंच्या माध्यमातून त्यांना चित्रपटासाठी पटकथा लिहण्याची संधी प्राप्त झाली. राजकुमारी या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा लेखणी हाती घेतली, आणि या निमित्ताने त्यांची भेट एम जी रामास्वामी या सुपरस्टारशी झाली. पुढे अन्नादूराई-करूणानिधी-रामास्वामी हे त्रीकूटच तामिळनाडूचे भाग्यविधाते बनले. आज करूणानिधिंचा डिएमके आणि रामास्वामिंनी स्थापन केलेला जयललीतांचा एआयएडिएमके या दोनच पक्षांभोवती तामिळनाडूमध्ये सत्ताकेन्द्र फिरते आहे.
करूणानिधिंनी आपल्या विद्रोही विचारांना आपल्या लेखणिच्या माध्यतातून व्यासपिठ मिळवून दिलं. त्यांनी लिहलेला 'परासक्ती' हा सिनेमा १९५२ साली प्रदर्शित झाला. ब्राम्हणवादावर सोडलेलं हे टिकास्त्र सनातनवाद्यांच्या पचनी पडणारं नव्हतं. मात्र करूणानिधिंनी माघार घेतली नाही. शेवटी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामुळे तामिळनाडूमध्ये क्रांती झाली. पुढे अस्पृश्यता, बालविवाह या विषयावरील 'पानम' आणि जमिनदारी आणि महिलांवरिल अत्याचार या विषयांवरील 'थंगरत्नम' हे चित्रपट आले, आणि करूणानिधींची 'समाजसुधारक सिनेमावाला' अशी प्रतिमा तयार झाली. त्यांची नाटकं चित्रपटांच्या पटकथेपेक्षाही अधीक जहाल विचारांनी ओतप्रोत असायची. त्यामुळे अनेकदा ते वादाच्या भोवर्र्यातही  अडकले.
मात्र आदर्शवादाविना केलेली कलोपासना म्हणजे छपराविना बांधलेलं घर आहे, असं स्पष्ट मत असलेल्या करूणानिधंनी आजवर आपली कलानिर्मिती द्रविड आदर्शांची जपणुक करतच सुरू ठेवली आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच तामिळनाडुचं सांस्कृतीक खातं, आणि तामिळ भाषेच्या विकासासाठी बनवलेलं खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं आहे.  पहिल्या जागतिक अभिजात तामिळ संमेलनाचा 'मेगा शो' कोइम्बतूर येथे नुकताच धडाक्यात पार पडला तो करूणानिधिंच्या पुढाकारानेच. देशविदेशातील विद्वज्जन व सामान्यांच्या अलोट गर्दीत हे पाच दिवसीय संमेलन पडले. शहाऐंशी वर्षाचे करुणानिधीं या संमेलनाला सलग पाच दिवस हजर होते. चर्चासत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग आणि तामिळ भाषा साहित्यातील उत्कृष्ट संशोधकासाठी स्वत:च्या वैयक्तिक निधीतून त्यांनी निर्माण केलेला रोख दहा लाख रुपयांचा पुरस्कार ही त्यांच्यामधील सृजनशिल सहित्यिक आजही तरूण असल्याची पावतीच म्हणावी लागेल.
या बरोबरच कलाईगनर यांची कथा-पटकथा असलेला ७५ वा चित्रपट 'ईल्यानग्यान' हा सुद्धा याच दरम्यान प्रदर्शित झाला. नागपूरमध्ये या चित्रपटाची चमु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आली होती. "आजवर करूणानिधिंचा एकही चित्रपट प्लॉप गेला नाही. त्यांच्या लेखणित जादू आहे!" असं त्यांचे दिग्दर्शक क्रिष्णा यांनी अभिमानानं सांगितलं. विषेश म्हणजे १९५७ साली आपली पहिली विधानसभा निवडणुक जिंकणार्र्या करूणानिधीना आजवर निवडणुकीत कधीच पराजय पहावा लागलेला नाही. यावरून राजकारण आणि कलाक्षेत्रात ते अपराजित आहेत, हेच सिद्ध होते.
वैयक्तिक जीवनाच्या स्क्रीन प्लेमधे मात्र त्यांनी तीन विवाहांचा क्लायमॅक्स घडवला. तामिळनाडूतील राजकारणालाही घराणेशाहीचा शाप आहे. त्यातल्या त्यात करूणानिधिंच्या तीन परिवारांची अपत्ये, आणि त्यांचे पुतणे हे सर्व सत्तेतील आपल्या वाट्यासाठी भांडतांना दिसतात. स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे त्यांच्या पक्षातील गृहकलह चव्हाट्यावर आले. "पक्ष हाच आपला परिवार आहे', असं म्हणणार्र्या करुणानिधींसाठी हे गृहकलह काही नवीन नाहीत. भारतामध्ये राजकारण नावाच्या चिखलात हात घालणार्र्या प्रत्येकाचेच हात खराब होतात. या हातांकडे बघत आपल्या आयुष्यातली रसिकता गमावून बसणारे अनेक नेतेमंडळी आहेत. मात्र त्यातच गुरफटून न राहता साहित्य आणि कलाक्षेत्रातली आपली वाटचाल गांभिर्याने सुरू ठेवत आपल्या आयुष्याचा हा प्राणवायूचा स्त्रोत सतत जागता ठेवल्यामुळेच करूणानिधी वयाच्या सत्यांशिव्या वर्षीही सस्मीत सक्रिय राहू शकतात. करूणानिधींच्या काळ्या चष्म्याच्या समोर राजकारण आणि भ्रष्टाचाराचं तांडव सुरू असलं तरीही या चष्म्याआड तामिळी स्वप्नांची एक दुनिया वसते आणि ही दुनिया खुपच मनोहारी आहे.

दैनिक तरूण भारत आसमंत पुरवणी मधील या लेखाचे कात्रण (दि. ८ मे २०११)