कायम प्रकाशझोतात राहण्याचं कसब काही लोकांना प्रयत्नपुर्वक आत्मसात करावं लागतं, तर काहींना त्याची देणगीच असते. योग गुरू स्वामी रामदेव बाबा हे दूसर्र्या प्रकारांत मोडतात. सतत या ना त्या कारणाने वर्तमानपत्रांचे मथळे आणि वृत्तवाहिन्यांचे प्राईम टाईम स्लॉटस गाजवणार्र्या आधूनिक काळातील योगऋषी रामदेवबाबांच्या अफाट लोकप्रियतेचा परिचय नुकताच विदर्भातील जनतेला आला. त्यांच्या भारत स्वाभिमान ट्रस्टच्यावतीने 'ग्राम निर्माण ते राष्ट्रनिर्माण' या संकल्पासाठी रेशीमबाग मैदानावर एक महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्याच्या कानाकोपर्र्यातुन अक्षरश: हजारो लोकांनी या संमेलनाला हजेरी लावली. ईतकेच नव्हे तर भारताच्या कानाकोपर्र्यात होत असलेले रामदेवबाबांचे दौरे आणि संमेलने प्रचंड गर्दि खेचत आहेत. त्यांच्या अनुयायांनी स्वयंस्फुर्तीने उभे केलेले 'योग नेटवर्क' रामदेवबाबांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये महत्त्वाची भुमिका निभावते आहे.
पंधरा वर्षांपुर्वी मात्र बाबा रामदेव कोण? असा प्रश्न कुणीही सहज विचारला असता. राष्ट्रीय स्तरावरील जी लोकप्रियता, आणि वैभव प्राप्त करण्यासाठी मोठमोठे नेते आणि अभिनेते अवघी हयात खर्ची घालतात, ती लोकप्रियता पंचेचाळीस वर्षाच्या, शिडशिडित शरिरयष्टीच्या, भगवी वस्त्रे परिधान करणार्र्या या सन्याश्याला अवध्या दिड दशकात प्राप्त व्हावी, हे आधूनिक काळातील आश्चर्यच मानावे लागेल. रामदेवबाबांच्या या स्वप्नवत वाटचालीदरम्यान जसे त्यांना अनुयायी लाभले तसेच हितशत्रुही मिळाले. पुरस्काराबरोबर तिरस्कार आणि व्यापाबरोबर वादही वाढले. खुन, अपहरणे, जमिनिचे गैरव्यवहार, औषधांमध्ये जनावरांच्या हाडांचा वापर, अगदी हवाला पर्यंतचे आरोप त्यांच्यावर राजकारणी, आणि धर्माचार्यांनी केलेत. आता राजकारणाच्या दलदलित स्वतःहूनच प्रवेश केल्यावर त्यांच्यावर चिखलफेक होणे तर ओघाओघाने आलेच. मात्र पंधरा वर्षांच्या या चढत्या वाटचालीचा हा मनोरा उभा करण्यासाठी तीस वर्षाच्या परिश्रमांचा पाया त्यांना रचावा लागलाय, हे विसरून चालणार नाही.
हरियाणामधल्या महेन्द्रगड जिल्ह्यातील अली सैयदपूर या खेड्यात १९६५ साली रामकिशन रामनिवास यादव चा जन्म झाला तेव्हा या गावात शाळा नव्हती आणि दवाखानाही नव्हता. हिंदी कुणी बोलत नव्हते. हरियाणवी बोलीभाषेचे चलन होते. रामकिशन शेजारच्या शहजादपूर गावातल्या शाळेत जाऊ लागला. दरम्यान त्याला अर्धांगवायूचा झटका आला. वैद्यकिय सुविधा नसल्यामुळे आयुर्वेद, प्राणायाम आणि योगादी पारंपारिक उपचारपद्धतीचा वापर करून त्याने अर्धांगवायुच्या असाध्य आजारातून सुटका करवून घेतली. त्याचा एक डोळा मात्र पुर्णतः बरा होवू शकला नाही.
ज्या उपचारपद्धतीने आपण बरे झालो त्याचा अभ्यास करण्याचे त्याने नक्की केले. त्यासाठी संस्कृत अभ्यासणे अनिवार्य होते. आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण झाल्यावर रामकिशन खनपुर येथील अर्ष गुरूकुलात जायला लागला. आचार्य प्रद्युभ्न या विद्वानाच्या मार्गदर्शनात संस्कृत व्याकरण आणि योगाचे धडे गिरवणे सुरू झाले. संस्कृतमधील आचार्य पदवी पर्यंतचे शिक्षण झाले. दरम्यान त्यांचे पहिले आध्यात्मीक गुरू आचार्य बलदेवजींशी संपर्क आला आणि सन्यस्त जिवनाची प्रेरणा प्राप्त झाली. रामकिशन यादवने आचार्य रामदेव हे नाव धारण केले आणि उपजिविकेसाठी हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील कलवा गुरूकुलात संस्कृत आणि योग शिकवू लागले. स्वतःचा शोधही सुरू होताच. रामप्रसाद बिस्मील यांनी बंगालीतून हिंदित भाषांतरीत केलेला योगी अरबिंदो यांचा ‘योगीक साधन’ हा ग्रंथ वाचनात आला आणि हिमालयाच्या पर्वतराजीत भटकंती सुरू झाली. गंगेच्या किनार्र्यावर वसलेल्या गुरुकुल कांगरी येथे संस्कृतबरोबरच राज्यशास्त्र व तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता यावा म्हणुन जाणेयेणे सुरू झाले. या वेळी रामदेवबाबांजवळ एक जुनाट स्कुटर किंवा एक सायकल असायची. गंगा किनार्र्या वर येउन प्राणायाम करणार्र्या, ध्यान लावणार्र्या चार लोकांकडून सहज म्हणुन योगासने करवून घेत असत. ईथे सुरू झालेली शिबिरांची ही शृंखला लक्षावधी लोकांच्या शिबिरांपर्यंत पोचेल ही कल्पना तेव्हा कुणालाच नसावी.
गुरुकुल कांगरी हे धार्मिक आणि सामाजीक क्षेत्रातील मोठं प्रस्थ आहे. संस्कृत विद्वान कृपालू देवजी महाराज यांनी १९३२ च्या दरम्यान या आश्रमाची स्थापना केली. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य़ स्वामी श्रद्धानंद यांनी येथे वैदिक गुरूकुल सुरू केले. त्यांचे शिष्य स्वामी शंकरदेव यांच्या हाती या आश्रमाची धुरा आल्यावर १९६८ मध्ये दिव्ययोग मंदिरची स्थापना त्यांनी केली. हेच स्वामी शंकरदेव म्हणजे रामदेव यांचे गुरू. यांच्याकडूनच १९९५ साली रामनवमीच्या दिवशी त्यांनी संन्यासदिक्षा घेतली. आचार्य रामदेव स्वामी रामदेव झाले. शिक्षकांची श्वेत वस्त्रे त्यागुन त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली. गुरू शंकरदेव यांच्याबरोबर दिव्ययोग मंदिराचा व्याप वाढवायला सुरवात केली. ३०० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, आयुर्विज्ञान विद्यापिठ, फुड पार्क, फार्मसी, आणि आयुर्वद रिसर्च सेंन्टर बरोबर दिव्य योग मंदिर ट्रस्ट, पतंजली योगपिठ आणि भारत स्वाभिमान ट्रस्ट चा हजारो करोड रुपयांचा वटवृक्ष गेल्या पंधरा-सोळा वर्षापासून आपल्यासमोर बहरलेला दिसत असला तरिदेखील त्याचे बिज १९३२ सालीच रोवले गेले होते, हे येथे महत्त्वाचे.
स्थावर मालमत्ता ही आश्रमाकडे होतीच. रामदेवबाबांच्या प्रयत्नांनी पैशाचा ओघ वाढत गेला आणि आज ईंग्लंडजवळचे एक अख्खे बेटच विकत घेण्याईतपत संपन्नता त्यांना प्राप्त झाली. या डोळ्यात भरणार्र्या प्रगतीने अनेक आरोपांनाही आमंत्रण दिले. गुरू शंकरदेव यांच्याकडून आश्रमाची सुत्रे हस्तगत करण्यासाठी रामदेवबाबांनी त्यांचा खुन करवला, किंवा आझादी बचाव आंदोलनाचे प्रणेते आणि एके काळचे रामदेवबाबांचे निकटचे सहकारी राजीव दिक्षीत यांची हत्या त्यांनीच घडवून आणली असे गंभिर आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. आस्था चॅनल ही धार्मिक वाहीनी हस्तगत करण्यासाठी या वाहिनिचे प्रमुख किरिट सि मेहता यांचे अपहरण केल्याचा आरोप तर अनेक धर्माचार्यांनीच त्यांच्यावर लावला. याशिवाय दिव्ययोग फार्मसि च्या माध्यमातून ते औषधांचा व्यापार करतात, योग शिबिराच्या नावाखाली करोडो रूपये वसुलतात, त्यांनी अनेक बड्या प्रस्थांना, मोठमोठ्या पत्रकारांना आपल्या कह्यात ओढून आपली प्रसिद्धी चालवली आहे, राजकारणी आणि सिने अभिनेत्यांविरूद्ध बेताल वक्तव्ये करून संतपदाला अशोभनिय अशी कृत्ये करतात, ईत्यादी अनेक आरोप त्यांच्यावर सतत होत असतात. अनेकदा रामदेवबाबांनी अनेक आरोपांचे खंडण केले, अनेकदा दुर्लक्षदेखील.
आयुर्वेदिक औषधोपचारांचा पुरस्कार करत असले तरिही रामदेवबाबा ऍलोपॅथीक औषधांचा विरोध करत नाहीत. ग्रहमान, ज्योतिष्य, अंकशास्त्र, कुंडली वास्तुशास्त्र या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक क्षण शुभ, आणि प्रत्येक दिशा परमेश्वराची असल्याचं ते मानतात. धर्म, संस्कृती आणि परंपरांचे प्रखर पुरस्कर्ते असलेले रामदेवबाबा धर्माच्या नावावर चालणार्र्या अंधश्रद्धा, अज्ञान आणि पाखंडाचे खंडण करतात. हरिद्वारजवळच्या त्यांच्या पतंजली आश्रमात कोणत्याही देवाचे मंदिर नाही. त्यांच्या योग शिबिरामध्ये 'है प्रित जहॉं की रित सदा' या सारखी देशभक्तीपर गीते भजन म्हणुन वापरली जातात.
योगासने आणि प्राणायाम हा जात धर्म पाहून केला जात नाही आणि या स्वास्थ्ययात्रेमध्ये सगळ्यांचेच स्वागत आहे, असे आवाहन त्यांच्या शिबिरांद्वारे वारंवार होते. जमैतुल उलेमा ए हिंद च्या मौलाना महमूद मदनी यांनी दिलेल्या आमंत्रणावरून बाबा देवबंद येथील मुस्लीम संमेलनात नुकतेच जाउन आले. आपल्या भाषणाची सुरवात त्यांनी कुराण शरिफ मधील आयत गाउन केली. दरम्यान देवबंद येथूनच मुस्लीमांनी 'वंदे मातरम' गाऊ नये, असा फतवा जारी करण्यात आला होता. तेव्हा "कुराणातील आयत गायल्याने जर माझा धर्म भ्रष्ट होउन मी मुसलमान झालो नाही, तर वंदे मातरम म्हटल्याने तुमचा धर्म कसाकाय भ्रष्ट होणार?" असा प्रश्न त्यांनी शेकडो उलेमांसमोर उपस्थीत लाखो मुस्लीम बांधवांना विचारला.
भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन असो, स्विस बॅंकेतील काळ्या पैशासाठी त्यांचे प्रस्तावित उपोषण असो, किंवा समलैंगीक संबंधांना कायदेशिर ठरवणार्र्या निर्णयाचा सामाजीक आणि सांस्कृतीक जाणिवेतून केलेला विरोध असो; रामदेवबाबांनी आपले म्हणणे नेहमी स्पष्टपणे मांडले, आणि त्यानंतर झालेल्या प्रत्येक परिणामाला ते सामोरे गेले.
आता त्यांची राजकिय खेळी सुरू झालेली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ५४० जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. जनमानसांत असलेल्या लोकप्रिय प्रतिमेमुळे राजकारणातही यश प्राप्त होईल की, लाखोची गर्दि खेचणार्र्या चिरंजिवीच्या प्रजाराज्यम प्रमाणे रामदेवबाबांचा पक्षही अल्पजीवी ठरतो ते आता पहायचे.
तरूण भारत च्या आसमंत पुरवणीमध्ये १४ मे २०११ रोजी प्रकाशित झालेल्या या लेखाचे हे कात्रण |
No comments:
Post a Comment