"होय. मीच ईश्वर आहे. आणि तुम्ही देखील ईश्वरच आहात. फरक फक्त ईतकाच आहे की मी हे ओळखलंय, आणि तुम्ही अजुन ओळखलेलं नाहीय!" अशी स्पष्टोक्ती करणार्र्या भगवान सत्यसाईबाबांची प्रकृती सध्या गंभीर असल्याच्या बातम्या झळकल्या आणि आधूनिक संतपरंपरेतील कदाचीत सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त राहिलेल्या बाबांची कारकिर्द परत एकदा चर्चेत आली. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टपर्थी या छोट्याश्या गावात आज काय नाही? विद्यापिठ, मल्टीसुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वेचं मेगा जंक्शन, साठ हजार व्यक्तींच्या राहण्याची सोय, लाखभर जनतेच्या रोजच्या जेवणाचा ईंतजाम, आणि सत्यसाईबाबांचा प्रशांतीनिलयम हा आश्रम! मुळात सत्यसाईबाबा या एका नावाभोवती जमलेलं हे सगळं प्रस्थ आहे. अशी काय जादू आहे या व्यक्तीमत्त्वामध्ये?
भक्तांचं ऐकाल, तर बाबा सर्वज्ञानी, सर्वव्यापी ईश्वरच आहेत. शिर्डीच्या साईबाबांचे ते अवतार आहेत. स्वत: बाबांनीच सांगितले आहे की शिर्डीच्या साईबाबांनी १९१८ साली सांगूनच ठेवले होते की हे शरीर सोडल्यानंतर आठ वर्षांनी ते पुट्टपर्थी येथे सत्यसाईबाबा म्हणून जन्म घेतील. त्यानुसार २३ नोव्हेंबर १९२६ रोजी पुट्टपर्ती येथे ईश्वराम्मा आणि पेद्दवेंकम्मा राजू रत्नाकरम या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला. वरवर पाहता अतिशय थोतांड वाटत असल्या, तरी जगभरातील २०० देशात वसलेल्या कोट्यावधी साईभक्तांची या कथेवर मनापासून श्रद्धा आहे. त्यांच्या मते सत्यसाईबाबांना जगातल्या अनेक भाषा अवगत आहेत. त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त आहे. त्यांच्या ठायी दिव्यतेज आहे, आणि त्यामुळेच अनेक चमत्कार ते लिलया करतात.
प्रत्यक्षात सत्यसाईबाबांनी आजवर तेलगु शिवाय अन्य कोणत्याही भाषेत प्रवचने दिलेली नाहीत आणि जगभर भक्त असुनही त्यांनी जुन १९६८ मध्ये केलेला नैरोबी दौरा सोडला तर दूसरा कुठलाही विदेश दौरा केलेला नाही. मुळात पुट्टपुर्ती शहराच्या बाहेरही बाबा फारसा प्रवास करत नाहीत. मात्र भक्तांनी आयोजीत केलेला कुठलाही कार्यक्रम असो, बाबांची एक खुर्ची व्यासपिठावर असतेच. भक्तांची अशी श्रद्धा आहे, की बाबा सुक्ष्मरूपाने सगळीकडे संचार करत असतात.
"चमत्कार ही माझी ओळख आहे" हे वाक्य त्यांच्या एका मुलाखतीत बाबांनी स्वतःच उच्चारले होते. मात्र याच चमत्कारांनी बाबांना वादाच्या भोवर्र्यातदेखील अडकवले आहे. अनेक बुद्धीजीवी लोकांच्या मते बाबांचे चमत्कार ही हातचलाखी आहे, तर अनेकांनी त्यांचे पितळ उघडे पाडण्याचा दावाही केला आहे. मात्र बाबांनी स्वतःहून त्यांच्यावर झालेल्या टिकेला कधी प्रत्युत्तर दिले नाही, आणि त्यांना आव्हान करणार्र्या कुणालाच त्यांनी प्रतिआव्हानही केलेले नाही.
ते हवेतून सोन्याच्या अंगठ्या , नाणी काढतात. दगडाचे चॉकलेटमधे रुपांतर करतात. आजारी लोकांना विभूती देऊन बरे करतात. ही त्यांच्या हातात कुठून येते हे कोणालाही कळत नाही. त्यांनी १९५० साली एका मुलाला ज्याचे शरीर कुजत चालले होते त्याला परत जिवंत केले. १९७१ साली डॉ जॉन हिस्लॉप जो अमेरिकन साई फौंडेशनचे अध्यक्ष होते. त्यांनी तर असे जाहीर केले की वॉल्टर कोवान – ज्याचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला होता, - त्याला बाबांनी परत जिवंत केले. कै सुरी भगवंतम, जे इंडियन इन्स्टीट्यूटचे प्रमुख होते आणि भारत सरकारचे विज्ञान सल्लागार होते त्यांनीपण एक चमत्कार सांगितला आहे की एक दिवस बाबांनी एकदम हवेतून भगवतगीता काढून दाखवली. डॉ भगवंतम यांच्यासारख्या वैज्ञानिकांनीही बाबांच्या चमत्कारांना मान्यता दिल्यामुळे सहाजिकच बाबांच्या चमत्कारी असण्याच्या दाव्याला दुजोरा मिळतो. आणि म्हणुनच बाबांच्या शिष्यांमधे कोण नाही ? भारतातील प्रथम दर्जाचे राजकारणी, मंत्री, न्यायाधीश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, मॉरिशस ह्या देशांचे पंतप्रधान, ग्रीक देशाचे माजी पंतप्रधान, स्पॅनिश राजघराणे, वकील, डॉक्टर्स आणि सामान्य जनता हे सर्व त्यांचे अनुयायी आहेत.
बाबांच्या मते त्यांनी केलेले चमत्कार म्हणजे जगातील नश्वर गोष्टींच्या पगड्यात फसलेल्या सामान्य लोकांना शाश्वत गोष्टींकडे नेण्याचा मार्ग आहेत. एखाद्या चंचल माकडाच्या हातात फळ दिल्यावर ते जसे काहीकाळ एका ठीकाणी शांत बसु शकते, त्याचप्रमाणे चमत्कार दाखवला की सामान्य माणसाचे चंचल मन काही काळ तरी शांत होते, एकाग्र होते, आणि परमतत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. ज्याप्रमाणे कडू औषध हे गोड वेष्टनात देण्यात येते, त्याचप्रमाणे चमत्काराच्या गोड वेष्टणात ईथे परमार्थाचा डोज देण्यात येतो, असं अनेक ठीकाणी साईभक्तांच्या तोंडून ऐकायला मिळतं.
चमत्कार आणि त्यामुळे बाबांभोवती सतत असलेले वादाचे मभळ यातून बाहेर येऊन त्यांच्या ट्रस्टने केलेली सेवाकार्ये पाहिली, तर आपल्यापैकी अनेक, जे चमत्कार मानत नाहीत, ते देखील मानवसेवेचे प्रेरक म्हणुन सत्यसाईबाबांना मानायला लागतील. जगभरातील १६६ देशांत सत्यसाईबाबांचे सेवाकार्य पसरले आहे. शिक्षण आणि आरोग्य सेवा सामान्यांना देण्यासाठी सत्यसाई विद्यापिठ आणि ट्रस्ट कार्यरत आहेत. विद्यापिठाच्या पुट्टपर्ती, अनंतपूर आणि बंगळूर येथील कॅम्पसने नॅक मुल्यांकनात 'ए प्लस प्लस' हे नामांकन मिळवले आहे (आपल्याकडे बि किंवा बि प्लस मिळवणारी महाविद्यालये बोटावर मोजण्याईतकी आहेत). भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणारे श्री सत्यसाई मिरपूरी कॉलेज ऑफ म्युझिक हेच विद्यापिठ चालवते.
१९७७ साली बंगलोर येथे श्री सत्यसाई जनरल हॉस्पीटलची स्थापना करण्यात आली. आजवर या रूग्णालयातून २० लाख रूग्णाची यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. १९९१ साली पुट्टपर्तीमध्ये, २००१ साली बंगलोरमध्ये आणि दोन मल्टीसुपरस्पेशालीटी हॉस्पीटल्स उभी झाली. आजवर अडिच लाखाच्या वर अतीशय कठीण शस्त्रक्रीया या माध्यमातून करण्यात आल्यात. ट्रस्टच्या कुठल्याही रूग्णालयात रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना एक पैसाही खर्च येत नाही, रहाणे खाण्याच्या खर्चापासून ते शस्त्रक्रियेच्या खर्चापर्यंत सर्व पैसा ट्रस्टच्या माध्यमातून येतो. याव्यतीरिक्त अनेक साधारण दवाखाने, मोबाईल व्हॅन्स, आणि डोळ्यांचे दवाखाने ट्रस्ट सेवाकार्य म्हणुन चालवते.
खारपाणपट्ट्यातील दुष्क़ाळग्रस्त जनतेला पिण्याचे पाणी पुरवणार्र्या योजना म्हणजे सत्यसाईबाबांच्या सेवाकार्यातील मैलाचा दगड मानाव्या लागतील. अनंतपूर जिल्ह्यातील ७३० दुष्काळग्रस्त गावांना दत्तक घेऊन त्यातील बारा लक्ष लोकांना लोकांना १९९६ पासुन अविरत पिण्याचे पाणी पुरवल्या जाते आहे. २००४ पासून सत्यसाई गंगा कॅनल च्या माध्यमातून अवघ्या चेन्नई शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. याव्यतिरिक्त मेडक जिल्ह्यातील १८० गावातील साडेचार लाख लोक, आणि महबुबनगर जिल्ह्यातील १४० गावातील साडेतीन लाख लोक सत्यसाई सेवा ट्रस्टच्या माध्यमातूनच पिण्याचे पाणी अविरत प्राप्त करत आहेत. २००८ मध्ये ओरीसातील पुरग्रस्त लोकांना मदत म्हणुन संस्थेने तेथे कार्य सुरू केले आणि एक वर्षभरात सोळा गावांचे स्वप्नवत पुनर्वसन केले. याशिवाय जगभर पसरलेल्या सत्यसाई बाल विकास प्रकल्पाच्या शाळा भारतीय संस्कृतीचा प्रचारप्रसार करत आहेत.
हवेतून हळद कुंकू आणि विभुती काढणे हा चमत्कार जरी अंधश्रद्धा आहे असं मानलं, तरी या माध्यमातून झालेलं चाळीस हजार कोटी रूपयांचं सेवासाम्राज्य हे देखील एक सत्य आहे. त्यांच्या चमत्काराला नमस्कार न केल्यास काहीही हरकत नाही, मात्र सेवाकार्यासमोर नक्कीच हात जोडावे असं हे व्यक्तीमत्त्व आहे.
शेवटी बाबा खरोखर देव आहेत की नाही, जर आहेत तर त्यांनी वयानुरूप येणार्र्या थकव्यावर विजय का मिळवला नाही? २००५ पासून बाबा व्हिलचेअर का वापरतात? २००६ मध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, तेव्हा ते दवाखान्यात का गेले? तसेच आता श्वसनाच्या तक्रारीनंतर त्यांनी चमत्कारानेच स्वतःला का बरं करून घेतलं नाही? हे सगळे प्रश्न बाबांच्या माध्यमातून होत असलेल्या सेवाकार्याची व्याप्ती पाहता अतीशय गौण वाटतात. मात्र हिंदू संत आणि हिंदू धर्माधिष्टीत सेवाभावी कार्य करणार्या संस्था यांना वादाच्या भोवर्र्यात ओढणे, आणि त्यांच्या सहिष्णुतेचा फायदा घेत वाटेल ते आरोप त्यांच्यावर बिनधास्त लावणे, हा भारतात प्रसिद्धी प्राप्त करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे, आणि सत्यसाईबाबांवर याच मार्गाचा अवलंब आठ दशकांच्या त्यांच्या आयुष्यात होत राहिला असावा.
(दैनिक तरूण भारत मध्ये दिनांक १ मे २०११ रोजी प्रकाशित झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण) |
"हवेतून हळद कुंकू आणि विभुती काढणे हा चमत्कार जरी अंधश्रद्धा आहे असं मानलं, तरी या माध्यमातून झालेलं चाळीस हजार कोटी रूपयांचं सेवासाम्राज्य हे देखील एक सत्य आहे. त्यांच्या चमत्काराला नमस्कार न केल्यास काहीही हरकत नाही, मात्र सेवाकार्यासमोर नक्कीच हात जोडावे असं हे व्यक्तीमत्त्व आहे."
ReplyDeleteहे १०० टक्के मान्य.....सत्यसाई बाबांनी केलेलं ल्कम खरच स्तुत्य आहे त्यापुढे चमत्कार फार गौण ठरतात. पण बाबांच्या ह्या व्यक्तित्वाची ओळख जरा उशिरा झाली.....