Monday, 4 July 2011

निरूपमा राव

२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यानंतर थांबलेली भारत-पाकिस्तान द्विपक्षीय वार्ता भारताच्या पुढाकाराने नुकतीच पुन्हा सुरू झाली. पाकिस्तानकडून सलमान बशिर तर भारताकडून निरूपमा राव या उभय देशाच्या परराष्ट्र सचिवांनी काश्मीरसह अनेक विषयांवर चर्चा केली. आपल्या करारी बाण्याबरोबरच चेहर्र्यावर सतत प्रसन्न स्मीतहास्य जपणार्र्या; अत्यंत नेटकी नेसलेली प्रिंटेड जॉर्जेट साडी, व्यवस्थित सेट केलेले केस, हलका मेकअप आणि सुस्पष्ट संभाषणकौशल्य या सगळ्यांमुळे एका प्रभावी व्यक्तीमत्त्वाच्या धनी झालेल्या निरूपमा राव यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर एव्हाना आपला जबरदस्त ठसा उमटविला आहे. मुदत संपल्यामुळे त्यांना येत्या ३१ जुलैला परराष्ट्र सचिव पदावरून निवृत्त व्हावे लागणार आहे. असे जरी असले तरी त्यांची लगेच अमेरिकेत राजदूत म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊन भारत सरकारने त्यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. मात्र आपल्यासमोर आलेल्या आव्हानांचा सस्मीत सामना करायचा, आणि यशस्वीपणे ती पेलून दाखवायची, हा निरूपमा राव यांचा स्वभावच आहे. अगदी सुरवातीपासून.
जागतिक व्यवहारात भारताचा एक सुसंस्कृत, अभ्यासू व समंजस चेहरा म्हणुन नावारूपास आलेल्या निरूपमा राव उत्तम कवयित्री आहेत. पत्रकार मंडळींनी शब्दांची फिरवाफिरव करून मांडलेल्या प्रश्नांना ठामपणे उत्तरे देणार्र्या निरूपमा राव कर्नाटक व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायक आहेत, तसेच पाश्चात्य संगिताच्याही अभ्यासक आहेत. परराष्ट्रधोरणाचा मसुदा ठरवतांना संगणकावर सामर्थ्याने फिरणारी त्यांची बोटं तितक्याच अधीकाराने गिटार आणि पियानो यांवरती देखील फिरतात. आणि म्हणुनच केवळ एक वरिष्ट प्रशासकिय अधीकारी म्हणुन नव्हे, तर एक आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणुनही त्या आपल्यावर छाप सोडून जातात. या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण सुरू झाली ती निसर्गरम्य केरळमधील मालापूरमच्या एका छोट्याशा सरकारी निवासस्थानापासून. 
कर्नल व्ही पी एन मेनन यांच्या तीन मुलींपैकी निरूपमा ही थोरली. चौकस अभ्यासु वृती, चाणाक्षपणा, आणि धाडस हे उपजत मल्याळी गुण अंगी होतेच. वडिलांचं योग्य मार्गदर्शनही होतं. त्यांची ज्या ज्या ठीकाणी पोस्टींग होत गेली, त्या त्या ठीकाणच्या शाळेत तीचं शिक्षण होत गेलं. बंगलोर, पुणे, लखनऊ, आणि मसुरीच नव्हे तर औरंगाबादमध्येही शिक्षण झालं. मराठवाडा विद्यापिठातून ईंग्रजी साहित्यात एम ए केलं. तेथे असतानाच भारतीय प्रशासकिय सेवेच्या (युपिएससी) परीक्षा द्यायचा निर्णय झाला. वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आय ए एस च्या परिक्षेत भारतातून पहिला क्रमांक प्राप्त केला. वडिलांच्या सल्ल्यानुसार थेट परराष्ट्र मंत्रालय गाठलं आणि आय एफ एस ऑफिसर म्हणुन प्रोबेशनवर रूजू झाल्या.
साल होतं. १९७३. स्थळ - निसर्गश्रीमंत मसुरी. आपल्या बॅचमॅटसबरोबर गिटार वाजवून 'दोज वेअर द डेज माय फ्रेन्ड, वि थॉट दे वुड नेव्हर एन्ड!' या ओळी एखाद्या सराईत गायिकेच्या थाटात गाणार्र्या २३ वर्षाच्या निरूपमाचे सुर सुधाकर राव नावाच्या देखण्या आणि हुशार वर्गमित्राबरोबर जुळले. १९७५ मध्ये निरूपमा मेननची ती निरूपमा राव झाली, आणि वैयक्तीक जिवनाबरोबरच व्यावसायिक जिवनातील नव्या वाटचालीला देखील सुरूवात झाली.
भारतातील प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांच्यावर पहिली जबाबदारी आली ती व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) मधील भारतीय दूतावासाची. यानंतर श्रीलंकेतील भारतीय उच्चालयातील पहिल्या सचिव म्हणुन त्यांनी काही दिवस काम पाहिलं. या दरम्यान भारत आणि चिन यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांबाबत त्यांनी विषेश अभ्यास केला. विदेश मंत्रालयाच्या पुर्व आशिया विभागाच्या सहसचिव या पदावर कार्यरत असतांना १९८८ साली त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर ऐतीहासिक चिन भेटीदरम्यान दोन्ही देशांतील तणावाचे संबंध संपुष्टात आणण्यात पुढाकार घेतला. वॉशिग्टन, मॉस्कॉ, ईत्यादी आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या केन्द्रांवर भारताचे प्रतिनिधित्त्व करतांनाच त्यांनी हॉवर्ड विद्यापिठात १९९२-९३ दरम्यान फेलोशिपही केली. १९९५-९८ दरम्यान त्यांनी पेरूमधील भारताच्या राजदूत म्हणुन काम पाहिलं. गेली ३७ वर्षे परराष्ट्र खात्यात विविध पदांवर काम करीत असल्या तरी त्यांची कारकीर्द खरी बहरली ती त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणुन कार्यभार स्विकारला तेव्हापासून.
ते वर्ष होते २००१-०२. भारत-पाकिस्तान आग्रा शिखर वार्तेदरम्यान निरूपमा राव हा चेहरा सर्वपरिचित झाला. वृत्तांत देताना मीडियाला काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही याचं अचूक भान त्यांनी सांभाळलं होतं. त्यांच्या करारीपणाला कंटाळून पाकिस्तानच्या काही काही उर्दू पत्रकारांचा संयम सुटला आणि त्यांनी राव यांच्याविषयी असभ्य उद्गार काढले. तेव्हा खुद्द मुशर्रफ यांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती.
यानंतर २००४-०६ पर्यंत श्रीलंकेत आणि २००६-०९ पर्यंत चिन मध्ये त्या भारताच्या राजदूत होत्या. या काळात दोन्ही देशांतील संबंध कमालीचे सौहार्दाचे झाले, जे अजूनही आहेत. बिजींग आणि मॉस्कोशी त्यांचे ऋणानुबंध ईतके जुळले, की त्यांच्या पहिल्या कवीतासंग्रहाचा  -- रेन राईजिंग चा रशियन आणि चायनिस अनुवाद लगोलगच प्रकाशित झाला.
राजदूत आणि त्यानंतर परराष्ट्र सचिव म्हणुन अतीशय तणावाच्या जबाबदार्र्या सांभाळतांनाच वयाच्या १२ व्या वर्षापासुन जपलेला कवीतांचा छंद राव यांनी  आजही कायम ठेवला आहे. शास्त्रीय संगिताबरोबरच पाश्चात्य संगिताचं शिक्षण त्यांनी घेतलंय. जॅझ, व्हायोलीन आणि १८व्या शतकातील पाश्चात्य संगीत हे त्यांचे  आवडते पासटाईम आहेत. मे २००३ मध्ये दिल्लीला झालेल्या 'समरटाईम' म्युझिक फेस्टीवल मध्ये त्यांनी पियानोवर पाश्चात्य संगिताचा एक धडाकेबाज पर्फोमन्सही दिला होता. मात्र हा पहिला आणि शेवटचाच जाहिर कार्यक्रम. हल्ली निरूपमा राव गातात ते फक्त काही मोजक्या जवळच्या मित्रांच्या कंपुमध्ये, किंवा आपल्या छोट्याश्या परिवाराबरोबर असतांना. आय ए एस ऑफीसर म्हणुन सेवानिवृत्त झालेले त्यांचे पती सुधाकर राव, आणि दोन मुले निखिलेश आणि कार्तिकेय यांच्याबरोबर राहाण्याची संधी त्यांना क्वचितच प्राप्त होते.
"आय एफ एस तर मी नंतर झाले, कवीता आधीपासूनच करायचे," असं सांगतांनाच कवीता, संगीत, वाचन हे सगळे छंद जोपासले असले, तरीदेखील आपलं काम हेच आपलं पहिलं प्रेम असल्याचंही त्या नेहमी सांगत असतात. त्यामुळेच परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी स्विकारल्यावर पाकिस्तानबरोबरचा तणाव वाढू न देता, त्याला दहशतवादाच्या प्रश्नावर कोंडीत पकडायचे, त्यासाठी अमेरिकेचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा; हे करत असतांना चीनच्या आघाडीवर कोणताही नवा तणाव निर्माण होऊ न देता त्याच्याशी व्यापारी व आर्थिक संबंध वाढवायचे; शिवाय अमेरिकेलाही भारताशी अधिक खुलेपणाने व्यवहार करण्यास भाग पाडायचे -- अशी अनेकविध कामगिरी निरुपमा राव यांच्यासारखा कुशल मुत्सद्दीच करू जाणे.
दोन वर्षाची मुदत संपल्यामुळे त्यांना येत्या ३१ जुलैला परराष्ट्र सचिव पदावरून त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे. त्यांचे ज्युनिअर १९७४ च्या आय एफ एस बॅच चे रंजन मथाई यांची नियुक्ती नवे परराष्ट्र सचिव म्हणुन करतांनाच सरकारने राव यांची लगेच अमेरिकेत राजदूत म्हणून रवानगी करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिवाखालोखाल सध्या ती महत्त्वाची जागा आहे. येत्या काळात भारत आणि अमेरिका संबंधात मोठे बदल होणार आहेत, त्या बदलांना योग्य तो आकार देण्याची कामगिरी निरुपमा राव आता पार पाडतील.
शिवाय संगित, साहित्य यांच्या सहवासाबरोबरच बर्र्याच कालावधीनंतर आता त्यांना आपल्या परिवाराबरोबर रहायला मिळेल. याच दरम्यान त्यांचा दुसरा काव्यसंग्रहदेखील प्रकाशित व्हावा, अशी अपेक्षा करू या!
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पुरवणीत प्रकाशित झालेल्या याच लेखाचे हे कात्रण. दिनांक ३ जुलै २०११)

No comments:

Post a Comment