पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक लोकजीवनाचा मंगलकारी प्रवाह. प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा सांस्कृतिक व आध्यात्मिक सोहळा. चंद्रभागेच्या या वाळवंटात भागवत धर्माचा पाया रचणार्र्या ज्ञानेश्वरमाउलींपासून कळस सजवणार्र्या संतश्रेष्ट तुकाराम महाराजांपर्यंत सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी रंगली, नामघोषात मग्न होवून कृतार्थ झाली. आज याच वाळवंटात नाचत, जयघोष करत, हजारो वारकरी फेर धरतात तो हरिभक्तीपरायण श्री बाबामहाराज सातारकरांच्या किर्तनांच्या तालावर. किर्तनकलेचा परिपुर्ण आविष्कार म्हणावे, हजारो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान म्हणावे, भागवत धर्माचा वैश्वीक राजदूत म्हणावे, की आधुनिक काळातील माउली महावैष्णव! -- श्री बाबामहाराज सातारकरांचं कर्तृत्त्व, वक्तृत्त्व, नेतृत्त्व आणि व्यक्तीमत्त्व त्यांना अवघ्या महाराष्ट्राला भावणारा भक्तीस्वर होण्याचा मान प्रदान करतात.
सातारकर यांनी वारकरी कीर्तनाला सैद्धांतिक बैठक प्राप्त करुन दिली. सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती, सहकाराची भावना त्यांच्या कीर्तनातून वृद्धिंगत झाली व महाराष्ट्राची सांस्कृतिक एकात्मता टिकविली गेली. याबरोबरच महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे ईतरही अनेक अनोखे पैलू आहेत. त्यांना घोडसवारी, क्रिकेट, बोटिंग, ट्रेकिंग, शुटिंग, स्विमींग या सर्वातही रस आहे. फोटोग्राफी तर त्यांचा आवडता छंद आहे. कलाकुसरीच्या अनोख्या रचनांबरोबरच दगड, चित्रे, ईत्यादिंचा मोठा संग्रहदेखील त्यांच्याकडे आहे. एक कसलेले शेतकरी, उत्तम फर्निचर व्यावसायिक, पदवीधर वकील, वारकरी फडाचे सर्वोसर्वा, किर्तनाचे प्रशिक्षक, स्तंभलेखक, टिकाकार, साहित्यीक, अभ्यासक या सगळ्या भुमिकाही लिलया ते पार पाडत असतात.
नुकताच पाच फेब्रुवारी रोजी त्यांचा ७५ वा वाढदिवस भक्तमंडळींनी उत्साहात साजरा केला. "जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन करण्याची इच्छा आहे," हेच मागणं त्यांनी या वेळी पांडुरंगाच्या चरणी मागीतलं. तसेही तीन पिढ्यांपासुन तरी किर्तन आणि भागवत धर्माची पताका हेच सातारकर घराण्याचं ब्रिद राहिलेलं आहे. गेल्या दिडशे वर्षापासुन वारकरी परंपरातील प्रमुख फड म्हणुन सातारकर फडाचे नाव घेतले जाते.
मुळात सातारकर घराण्याचे आडणाव गोरे असे आहे. (बाबामहारांचे मुळ नावदेखील निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे.) सातारा परिसराचे आधिपत्य या घराण्याकडे पिढिजात चालत आलेले होते. त्यामुळे सगळी भौतीक सुखे पायाशी लोळण घेत होती. मात्र ऐश्वर्य आणि बुद्धीमत्ता याबरोबर श्रद्धाळू मनाच्या लोकांनी या कुळात जन्म घेतला. भक्तीपरंपरेची वाटचाल सुरू झाली. "जसे दुःख पचवावे लागते, तशी श्रीमंतीही पचवावी लागते." असं बाबामहाराज नेहमी सांगत असतात, याचा परामर्श त्यांच्या पिढीजात कोट्याधीश कुळाने अविरत चालवत आणलेल्या भक्तीपरंपरेत आहे.
श्री सदगुरु दादामहाराज सातारकर यांनी सुरू केलेल्या या फडाशी निगडित लाखोचेवर मंडळी आज महाराष्ट्रभर तसेच आंध्र, तामिळनाडू, गुजरात व परदेशा मध्येदेखील पसरली आहेत. असं म्हणतात की श्री दादामहारांना प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनीच दृष्टांत देऊन या परंपरेची धूरा त्यांच्याकडे सोपवली होती. हरिविजय, श्रीभक्तिविजय या ग्रथांवर ते प्रवचने करीत असत. त्यांच्यानंतर त्यांचे व्दितीय चिरंजीव श्री संत अप्पा महाराजांनी अत्यंत निष्ठेने ही परंपरा चालविली. त्यांनी पंचवीस वर्ष श्री एकनाथी भागवताची पारायणे केली व सात वर्ष अमृतानुभव सांगितला. १९६२ साली त्यांनी देह ठेवला आणि त्यांचे पुतणे बाबामहाराज गादीवर आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा आज चढत्यावाढत्या क्रमाने सुऱु आहे.
संस्कृत, संगित आणि कायद्याचे रितसर शिक्षण घेतलेल्या बाबामहाराज यांनी ज्ञानेश्वरीची एक विषेश आवृत्ती 'ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी' या नावाने प्रकाशित केली आहे. शिवाय 'ऐश्वर्याची वचनाक्षरे' हा संत तुकारामांच्या गाथेवरील ग्रंथ, आणि उध्दवगीत अर्थात 'ऐश्वर्यवंत श्री एकनाथी भागवत' ह्या दोन ग्रंथांचं संपादन केलेलं आहे. 'ऐश्वर्य' या शब्दामुळे ते टिकाकारांचे लक्ष्य़ झाले. 'ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी'ची किंमत दोन हजार रूपये होती. कारण त्याच्या मुखपृष्टावर सोन्याची नक्षी काढलेली होती. या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर 'ज्या ज्ञानेश्वरांनी त्यांचे आयुष्य संन्यासी म्हणून घालवले, त्यांच्या विचारांची सातारकरांनी पार वाट लावली' अशी टिकेची झोड त्यांच्यावर उठली. मात्र ग्रंथात दिसणारं हे 'ऐश्वर्य' किंवा श्रीमंती ही पिढीजात चालत आलेली आहे, ते प्रदर्शन करण्यासाठी आणलेलं उसनं अवसान नव्हे, हे सगळे टिकाकार विसरले.
याचप्रमाणे 'दुधिवरे' या आपल्या मुळगावी त्यांनी उभारलेली 'प्रतिपंढरपूर' 'चैतन्यधाम' नगरी आणि 'मंत्रमंदिर' ह्या तिर्थक्षेत्राची निर्मिती देखील वादाच्या भोवर्र्यात अडकली होती. दुधिवरेला विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. यासाठी लोहगडच्या पायथ्याशी, पवना धारणा जवळ निसर्गरम्य परिसरात २२ एकराची जागा त्यांनी कशी मिळवली? या पासून वाद सुरू झाला. लोखंड विरहित बांधकाम, भव्य कमानी, वारकरी भगव्या रंगाशी जवळीक साधणा-या धोलपुरी दगडाच्या राजस्थानी कलाकुसरीने तयार केलेली या देवालयाची पाच मुख्य शिखरे ईत्यादींची भव्यदिव्यता अनेकांच्या डोळ्यात न भरली असती तरच नवल. शिवाय लोणावळ्यापासून अवघ्या आठ किलोमीटरच्या अंतरावर या ठीकाणी निवासासाठी सर्वसोयीयुक्त इमारती आहेत. आगावू बुकिंगने राहण्याची भोजनाची व्यवस्था होते. या माध्यमातून सातारकरांनी नवा व्यवसायच उभारल्याची टिका त्यांच्यावर झाली. मात्र आठशे वर्षापासुन महाराष्ट्रात अस्तीत्त्वात असलेल्या भागवत धर्माला आणि वारीच्या परंपरेला वैश्वीक पातळीवर नेणारं असं एक मुख्यालय या मंदिराच्या रूपाने उभं राहिलेलं आहे, या माध्यमातुन वारी जगभर जाणार आहे, या सत्याचा मात्र टिकाकारांना विसर पडला.
सातारकरांनी मात्र आज मार्केटिंगचा जमाना आहे आणि त्याला पर्याय नाही हे अचुक ओळखलं. म्हणुनच कार्याच्या प्रसारासाठी सर्व प्रकाराची साधने, आधुनिक विचारसरणीचा त्यांनी अवलंब केला. ईंटरनेटवर त्यांचे व्हिडिओज, स्लाईड शोज आहेत. त्यांचे ग्रंथ नेटजालावर उपलब्ध आहेत. त्यांची वेबसाईटदेखील आहे. महाराज फेसबुकवरही आहेत.
किर्तनाच्या अगणीत सिडिज, डिव्हीडिज निघालेल्या आहेत. कॅसेटच्या विक्रमी विक्री बाबत प्लॅटिनम डिस्क देऊन गौरविलेले एकमेव कीर्तनकार महाराजच आहेत. टिव्हीवर त्यांचे कार्यक्रम होतच असतात. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी संतसाहित्यावर लेखनही केलं आहे. पुणे विद्यापीठाच्या श्री ज्ञानेश्वर अध्यासनावर ते निमंत्रित तज्ञ आहेत. व्यावसायिकता त्यांनी जपली, मात्र त्याला धंदेवाईकतेचा स्पर्ष होउ दिलेला नाही. त्यांच्या जाहीर किर्तनाचे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण हक्क त्यांनी कधीही विकले नाहीत. त्यांच्या प्रवचनांना कधीच प्रवेश शुल्क नसते.
वैयक्तीक आयुष्यातील पुत्र, पती, पिता, मित्र, बंधु या सगळ्या भुमिकाही त्यांनी चपखल पार पाडल्या आहेत. पत्नी रुक्मीणी यांच्या सेवा, सहकार्यांबरोबरच जेष्ट बहिण कौसल्या (माईं) यांचं मार्गदर्शन त्यांना आहे. त्यांची जेष्ठ कन्या भगवती आणि तीचा मुलगा चिन्मय हे महाराजांचे दोन शिष्य़ आहेत. फडाचे ऊत्तराधिकारी म्हणून महाराजांनीं चिन्मयवर आताच जबाबदारी घोषित केली आहे. एक म्हणजे महिला किर्तनकार घडवणे, आणि दूसरे म्हणजे आपल्या परंपरेची धूरा मुलीच्या मुलाकडे सोपवणे हे दोन धाडसी निर्णय घेऊन सातारकरांनी आपलं पुरोगामित्त्वच सिद्ध केलं आहे.
श्रीमंती पचवणार्र्या सातारकरांनी दुःख पचवलंच नाही असं नाहीये. त्यांचा एकुलता एक तरूण मुलगा चैतन्य त्यांना अकस्मात गमावावा लागला. त्याच्याच स्मृतिप्रित्यर्थ देवालयाचे नामकरण श्रीचैतन्यधाम असे करण्यात आले आहे.
‘मग पिकलिया सुखाचा परिमळु। कीं निवालिया अमृताचा कल्लोळु। तैसा कोंवळा आणि रसाळु। बोलु बोलिला॥‘ या माउलींच्या उक्तीप्रमाणे निसर्ग, प्राणी, माणसे, कला, संगीत, भजनकीर्तन, परमेश्वर, आणि एकुणच जीवनावर भरभरुन मनस्वी प्रेम करणारे कलंदर दिलखुलास, तरीही अति परखड, समर्थ, राजस, लोभस असे त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना खिळवून ठेवते, हे मात्र वास्तव सत्य आहे.
तरूण भारत च्या आसमंत पूरवणी मध्ये प्रकाशित झालेले प्रस्तूत लेखाचे हे कात्रण (दि. १० जुलै, २०११) |
No comments:
Post a Comment