‘देल्ही बेली’ चित्रपटातील मुक्त शिविगाळीची चर्चा सध्या सर्वत्र जोरात सुरू आहे. या चित्रपटातील 'डी के बोस' या गाण्याला विरोध होत आहे. मात्र आधुनिकतेचे दाखले देऊन या गाण्याचे समर्थनही सुरू आहे. अशीच खळबळ विस वर्षांपुर्वी सुभाष घईने जेव्हा ‘खलनायक’साठी ‘चोली के पीछे क्या है...’ असे आनंद बक्षींकडून लिहून घेतले तेव्हा माजली होती. त्या वेळी या गाण्याची गायिका ईला अरूणला देखील नकारात्मक प्रसिद्धीला सामोरं जावं लागलं होतं. आपल्याकडे एकदा ईमेज बनली, की त्यातून बाहेर निघणे कठीण जाते, याचा प्रत्यय ईला अरूणला अनेक वर्षांपर्यंत येत राहीला.
एक आंतरराष्ट्रीय दर्जाची रंगकर्मी, शास्त्रीय संगीताचे रितसर शिक्षण घेतलेली पहाडी आवाजाची गायिका, भारतातल्या अनेक राज्यांतील लोकसंगीताची अभ्यासक, राजस्थानी लोकसंगीताची तर अनभिशिक्त सम्राज्ञीच, एक उत्तम दिग्दर्शक, लेखक, नाटककार, नृत्यांगना आणि गीतकार असलेली ईला अरूण केवळ 'उथळ चालीची लोकगितावर आधारीत गाणी' म्हणणारी गायिका म्हणुन अनेक वर्ष परिचीत होती. मात्र रंगदेवतेवरील निस्सिम भक्ती आणि कलेप्रती असणारा अभ्यासपुर्ण दृष्टीकोण या सर्वांनी ईला अरूणला एक जेष्ट अष्टपैलू कलावंत म्हणुन ओळख मिळवून दिली. राजस्थान या आपल्या जन्मभुमीवर तीचे मनापासून प्रेम आहे आणि म्हणुनच ती खर्र्या अर्थाने या राज्याची सांस्कृतीक राजदूत आहे.
महाराजा आणि महाराणीच्या या राज्याच्या राजधानीत म्हणजे जयपूरला ईला अरूणचा जन्म झाला तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात. दोन भाऊ, बहिणींमध्ये ती थोरली. शिक्षणाचे आणि कलेचे वातावरण घरात होतेच. महाराजा स्कुल मध्ये शालेय शिक्षण घेत असतांनाच अभिनयाची गोडी लागली. संगीतातदेखील रूची होती. हौशी कलावंत म्हणुन नवनाटक, पथनाट्य, आणि लोकनाट्य करत करतच ईला अरूण ने संगीत विषय घेऊन बि ए केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना लोकसंगीता बद्दल आदर असला, तरीही राजस्थानच्या या परंपरेची गोडी तीला नंतरच्या काळात लागली जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनकरीता तीने थेट दिल्ली गाठली.
सत्तरच्या दशकात दर शनिवार-रवीवारी दिल्ली ते जयपूर बसने प्रवास करतांना ईलाने लोककलांमध्ये रमलेला राजस्थान पाहीला. बंजारा तांड्यांपुढे त्यांची गाणी ऐकत ती तासनतास उभी रहात असे. राजस्थानी लोकसंगीतावरील तीचा सगळा रिसर्च याच काळात तीने पुर्ण केला. या दरम्यान लोकसंगीताची प्रगल्भता, शास्त्रीय बैठक, मिष्कीलपणा, ईत्यादी गुण तीने हेरले आणि अंगीकारले. आज छोटेछोटे चमचमणारे आरसे असणारी राजस्थानी पॅटर्नची रंगीत साडी, त्यावर विणलेले जयपूरी नक्षी, जरासा भडक मेक-अप, मुळातच मोठ्या डोळ्यांना अधीक ठळकपणे व्यक्त करणारे काजळ, आणि कपाळावरची नवरंगी बिंदी, ही ईलाजींची ओळख झाली आहे.
एनएसडीमधील वर्गमित्रांनी दिल्ली सोडून मुंबई गाठल्यावरही ईलाने मात्र दिल्लीतील रंगमंचावरच बरेच दिवस काम केलं. उद्देश एवढाच, की राजस्थानपासून दूर जावे लागू नये. १९८२ मध्ये चुलत भाऊ संगीतकार समिर सेन यांच्या आग्रहावरून ती मुंबईला आली. कधीकाळी रेडिओवर गाणं गायल्याचे पाच रूपये मिळाले होते, तेवढाच काय तो संगीत क्षेत्रातला व्यावसायिक अनुभव. या काळात लतादिदि आणि आशाताईंसारखं गाता यावं असाच प्रयत्न प्रत्येक नवोदित गायीकेचा असायचा. ईलासाठी ते शक्यच नव्हतं. त्यामुळे तीने मुंबईला प्रायोगीक रंगभुमीवर काम शोधायचं ठरवलं.
एनएसडीची विद्यार्थी असल्यामुळे श्याम बेनेगल यांच्याशी भेट झाली. बेनेगल तेव्हा 'मंडी' चित्रपट बनवत होते. अंबरिश पुरी, ओम पुरी, शबाना आझमी, स्मीता पाटील या समांतर सिनेमातील महान कलावंतांबरोबरच निना गुप्ता, अनिता कंवर आणि रत्ना पाठक ईत्यादी वर्गमैत्रीणींच्याही भुमिका या चित्रपटात होत्या. समांतर सिनेमातील ही तीची सुरूवात ठरली. कलाक्षेत्रातील दिग्गजांच्या सहवास ईलामधील अष्टपैलू कलावंताला घडवत गेला. आज संगित, नृत्य, अभिनय आणि लेखन या सर्व कलांमध्ये तीला गुरू मानले जाते.
दरम्यानच्या काळात मर्चंट नेव्हीमध्ये ऑफीसर असलेल्या अरूण वाजपेयी यांच्याशी विवाह झाला, आणि ईला पांडेची ईला अरूण झाली. स्वतः एक उत्तम व्हिडिओग्राफर असलेल्या अरूणजींना कलाक्षेत्राची उत्तम जाण आहे. त्यांची मुलगी ईशीता नुकत्याच एनडिटीव्हीवर गाजलेल्या 'दिल जीतेगी देसी गर्ल' या रिऍलिटी शो मध्ये बरिच लोकप्रिय झाली.
गायिका म्हणुन राजस्थानी लोकसंगीताला रणरणत्या वाळवंटाच्या बाहेर काढून पॉप आणि रॉकच्या सुत्रात बांधून जगभर प्रसिद्ध करण्याचे श्रेय ईलाजींनाच जाते. चित्रपटात त्यांना संधी मिळाली ती यश चोप्रांच्या लम्हे चित्रपटातील 'मोरनी बागा मे बोले' या गाण्याच्या माध्यमातून. कुठल्याश्या आकाशवाणी केन्द्रावर ऐकलेला हा आवाज संगितकारजोडी शिव-हरी यांनी अचुक हेरून ठेवला होता. यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी खलनायक चित्रपटातील 'चोली के पिछे' या गाण्यासाठी बोलावल. आणि मग ईला अरूण ने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
राजस्थानी लोकसंगितावर आधारीत त्यांचे अनेक अल्बम्स येत गेले. 'घागरो जो घुम्यो' किंवा 'निगोडी कैसी जवानी है' सारखी गाणी वादग्रस्तही ठरली आणि गाजली देखील. द्वयर्थी गाण्याचा आरोप हसत हसत स्विकारणार्र्या ईलाजींच्या मते काही गाणी द्वयर्थी असली, तरीही त्यांच्या माध्यमातून राजस्थानी संगीताचा श्रीमंत वारसा लोकांपुढे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या म्हणतात की 'अल्बमध्ये नऊ गाणी असतात. ती सर्वच ऐकली की एखाद्या द्वयर्थी गाण्याकडे आपोआपच दुर्लक्ष होईल ईतकी ती चांगली असतात.'
रंगभुमी असो, गायन असो, अल्बम्स असो, सिनेमा असो, किंवा टिव्ही सिरिअल्स असो -- ईला अरूण यांनी नेहमी आपल्यातील कलेचा आणि कलावंताचा सन्मान केला आहे. टिव्हिवर श्याम बेनेगल यांच्या 'यात्रा', 'डिस्कवरी ऑफ ईंडिया', गोविंद निहलानींच्या 'तमस', विजया मेहतांच्या 'लाईफलाईन' या मालिका त्यांनी निवडल्या आणि सास बहू मालीकांचा जमाना आल्यावर हळूवारपणे काढता पाय घेतला.
‘खलनायक’ नंतर आलेली तत्सम गाण्याची शेकडो ऑफर्स त्यांनी नम्रपणे धुडकावून लावली. मधल्या काळात लोकसंगिताच्या नावाखाली ढासळलेल्या दर्जाची गाणी लोकांपुढे आणल्यामुळे या संगीताची, आणि पर्यायाने राजस्थानची बदनामी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी अल्बम बनवणेच बंद केले. पायरसी, आणि उथळपणा यांच्या विरोधात त्यांनी अनेक वर्ष कामही केलं नाही. मात्र ईलाजींमधील उत्कृष्ट गायिकेची ओळख असणार्र्या ए आर रहमान सारख्या संगीतकाराने 'छैय्या छैय्या' पासून ते 'रिंगा रिंगा' पर्यंत अनेक हिंदी आणि तामीळ गाणी त्यांच्याकडून आवर्जुन गावून घेतली. जगभरातील अनेक भाषांमधून गायलेल्या आणि उत्तम मराठीची जाण असलेल्या ईलाजींनी निर्माते सतीश कुलकर्णी यांच्या 'जमलं हो जमलं'मध्ये मराठीतही गाणं म्हटलं.
चित्रपटांतूनही त्यांनी त्यांनी भुमिका केल्या, त्याही 'ऑफबिट' च्!. 'चायनागेट', 'घातक' किंवा ‘जोधा अकबर’ मधील त्यांची भुमिका आठवा, किंवा 'वेलकम टु सज्जनपूर', 'वेल डन अब्बा,' आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'वेस्ट ईज वेस्ट' हे चित्रपट पहा! ईलाजींची एक कलावंत म्हणुन असलेली निष्टा सिद्ध होते. सिनेमासाठी त्यांनी गीतेही लिहली आहेत.
रंगभुमीवर कार्य करणारी त्यांची 'तमाशा' ही संस्था आहे. अनेक उदयोन्मुख कलावंतांना या माध्यमातून संधी प्राप्त होते आहे. ईंग्रजी रंगभुमिवरील 'ईन द हाउस ऑफ बिल्कीस बिबी' हे त्यांचं नाटक खुप गाजतंय. शिवाय 'हौले हौले' या एका धमाकेदार अल्बमसह ईलाजी आपल्या जुन्या रंगात परत येत आहेत. मायावती, आणि ममता बॅनर्जी यांच्या भुमिका करण्याची ईच्छा असल्याचं ईलाजींनी नुकतंच बोलून दाखवलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपल्याला निळ्या काठाची सुती साडी आणि स्लीपर घालून झपझप चालणार्र्या ममतादिदि मोठ्या पडद्यावर दिसतील अशी आशा करू या.
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित झालेले प्रस्तूत लेखाचे हे कात्रण. दि. १७ जुलै, २०११) |
वा ! एक सुंदर लेख.
ReplyDelete