Monday 25 July 2011

डॉ. जयंत नारळीकर

विज्ञान साहित्याच्या बाबतीत मराठी भाषा बंगाली, हिंदी, आणि तामीळहूनदेखील समृद्ध असल्याचे भाषाशास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात निष्पन्न झाले आहे. मराठी भाषेला हा बहूमान मिळवून देणार्र्यांपैकी एका महत्त्वाच्या व्यक्तीने नुकताच १९ जुलैला आपला वाढदिवस साजरा केला. डॉक्टर जयंत विष्णु नारळीकर ७३ वर्षांचे झाले.
गणित आणि विज्ञान हे मुळातच किचकट वाटणारे विषय अगदी सामान्य माणसांपर्यंत रंजकपणे पोचवणारं एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठाहे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक म्हणुन डॉ नारळीकरांचं नाव आज घेतलं जातं. 'मराठी शास्त्रज्ञ' म्हटलं की नारळीकरांशिवाय ईतर कुणाचाही चेहराच डोळ्यापुढे येत नाही, ईतकी जवळीक त्यांनी सामान्य मराठी माणसाशी साधली आहे. हे कसं शक्य झालं?
संशोधन, अध्यापन यांबरोबरच विज्ञानाचा प्रसार, समाजाचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे या गोष्टीही नारळीकरांनी महत्त्वाच्या मानल्या. अनेक लेख,कथा-कादंबर्‍या लिहून; व्याख्याने, चर्चासत्रे, दूरदर्शन मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञान लोकप्रिय केले. विज्ञानातील सिद्धांत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. म्हणुनच डॉक्टर नारळीकर खर्र्या अर्थाने 'महाराष्ट्र भुषण' ठरतात.
चेहर्र्यावर कायम स्मीतहास्य, मुळात बोलका आणि समोरच्यालाही बोलतं करणारा स्वभाव; अत्यंत साधी रहाणी, नम्रता, आणि सौजन्यशीलता या सर्वांमुळे सुपरीचीत असलेल्या डॉक्टर नारळीकरांना एक वैज्ञानिक म्हणुन किती उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेली आहे हे हे आपण जाणतोच. खरं म्हणजे डॉ. नारळीकर हे स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी असे तारांकित व्यक्तिमत्त्व आहे.
डॉक्टरांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे वडिल म्हणजे रँग्लर विष्णू नारळीकर! केंब्रिज विद्यापीठात गणित विषयात विशेष यश प्राप्त केल्यानंतर रँग्लर ही पदवी मिळते. रँग्लर विष्णू नारळीकर गणिताचे चालतेबोलते विद्यापिठच होते. बनारस हिंदू विद्यापिठातील गणित विभागाचे ते प्रमुख होते. त्यामुळे डॉक्टरांचे शिक्षणही बनारस येथेच झाले. त्यांच्या मातोश्री सुमतीताई या संस्कृतसाहित्याच्या अभ्यासक होत्या. आईवडिलांचे गुण त्यांनी घेतले. वडिलांप्रमाणे गणितामध्ये नेत्रदीपक प्राविण्य मिळवलं; तर आईप्रमाणं संस्कृत भाषेमध्ये व्यासंग! बनारस विद्यापिठातून विज्ञानात स्नातक करून त्यानंतर वडिलांप्रमाणेच केम्ब्रिज विद्यापीठीतून रँग्लर झाले.
केंब्रिजच्या पदवी परीक्षेत सन्मानाचं 'टायसन पदक' त्यांनी मिळवलं तर नंतर उच्च अभ्यास करताना 'स्मिथ प्राईज'. दहावीला असतानांच मोठी आकृती, प्रमेय, उपप्रमेय अशा स्वरूपातील दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अर्ध्या पानात मांडून दाखविणार्र्या या 'ब्राईट स्टुंडट' ला प्रा फ्रेड हॉईल यांच्या पारखी नजरेने हेरले, आणि गुरूशिष्याच्या एका नव्या परंपरेची सुरूवात झाली.
गुरू शिष्याच्या जोडीने गुरुत्वाकर्षण, सापेक्षता व विश्वरचना यांच्या संदर्भात नवा सिद्धांत मांडला आणि वैज्ञानिक जगतात खळखळ उडवून दिली. हॉईल-नारळीकर सिद्धांत म्हणून त्यांचं संशोधन प्रसिद्ध आहे. पुढे हॉईल गुरुजींसमवेत संशोधन करून नारळीकर यांनी विश्वरचनेचा, स्थिर-स्थिती सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतानं जयंत नारळीकर हे नाव जगभर प्रसिद्ध झालं. वैज्ञानिक म्हणुन त्यांचं कर्तृत्त्व सर्वपरिचितच आहे. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी पद्मभुषण व त्यानंतर पद्मविभुषण देऊन या कार्यासाठी सरकारने त्यांना गौरविलेदेखील आहे. मात्र नारळीकरांचं खरं यश आहे अवकाशातले तारे मराठी घरांमध्ये पोचवण्यात.
ही प्रेरणा त्यांना गुरू फ्रेड हॉइल यांच्याकडून मिळाली असावी. कारण हॉईल यांनी सर्वसामान्य जनतेसाठी खगोलशास्त्रावर अनेक सुंदर पुस्तके व विज्ञानकथा लिहिल्या आहेत. लोकप्रिय विज्ञानासाठी दिले जाणारे 'कलिंग पारितोषिक' हॉइल यांना याचमुळे मिळाले होते. त्यांच्या कार्याने प्रेरीत होउन 'विज्ञान म्हणजे आपला प्रांत नाही; ते भलतेच काही तरी आहे', हा सामान्य माणसाच्या मनातला गैरसमज दूर करण्याचे मोठेच काम नारळीकर यांनी केले. पोस्टाच्या साध्या कार्डावर त्यांना प्रश्न लिहून विचारावा आणि त्यांच्या स्वाक्षरीसह त्याचे उत्तर मिळवावे, या उपक्रमामुळे तर लहान लहान गावात राहणाऱ्या पण कुतूहलभरल्या नजरेनं जगाकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची फारच सोय झाली. 'विज्ञान' हा बाऊ करण्यासारखा नाही, तर आनंद घेण्यासारखा प्रांत आहे; आणि या बौद्धिक आनंदाची तुलना इतर कोणत्याही आनंदाशी करता येणार नाही,' याची जाणीव करून देण्याचं मोठंच काम नारळीकरांनी अशा अनेक उपक्रमांमधून केलं. त्यामुळंच १९७०च्या दशकामध्ये विज्ञानाभोवती असलेलं एक 'भीती'चं म्हणा किंवा 'धास्ती'चं म्हणा असलेलं वलय विरळ होण्यास खूपच मदत झाली. .
प्रयोगशाळेच्या भिंतींआड चालतं ते विज्ञान; त्याच्याशी आपला संबंध नाही, हा गैरसमज पुरता मोडून काढून लोकांना 'विज्ञानसाक्षर' बनविण्यासाठी नारळीकर यांनी लेखणी उचलली आणि मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते ठरले. सहा विज्ञानकादंबर्र्या, शेकडो विज्ञानकथा, आणि त्यांचे अनेक भाषांमध्ये झालेले अनुवाद या सर्वांनी नारळीकरांची साहित्यीक म्हणुन ओळख बनवली.
विज्ञानकथा लिहण्याचा नारळीकरांचा प्रवास कसा सुरू झाला तो किस्साही खुप रोचक आहे. १९७४ साली नवव्या मराठी विज्ञान साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित विज्ञानरंजन स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला. तो घेताना त्यांनी 'जविना' (जयंत विष्णु नारळीकर) या आपल्या आद्याक्षरांची उलथापालथ करून 'नाविज' म्हणजेच नारायण विनायक जगताप हे नाव धारण केलं आणि 'कृष्ण विवर' ही आपली कथा स्पर्धेसाठी पाठवली. या कथेला पहिलं बक्षीस मिळालं, आणि मग मराठी विज्ञानकथेनं मागे वळून पाहिलं नाही. एक काळ असा होता की विज्ञान काल्पनिका हा 'उपेक्षित' वाङ्मयप्रकार होता. या वाङ्मयाला समीक्षकांच्या दृष्टीनं फारशी किंमत नव्हती. पण नारळीकर विज्ञानकथा लिहू लागले आणि या कथाप्रकाराची उपेक्षा संपून गेली. विज्ञानकथेचा स्वतंत्र असा वाचकवर्ग तयार झाला. विज्ञानातील विविध संकल्पना, घडामोडी, साध्या, सोप्या मराठीतून लोकांपर्यंत जाऊ लागल्या. मराठी साहित्यसृष्टी श्रीमंत झाली आणि विज्ञानविषयक लेखनाने तरुण पिढी घडविली गेली. नारळीकरांच्या यक्षाची देणगी, प्रेषित, वामन परत न आला, अभयारण्य अशा कथा-कादंबऱ्या गाजल्याच; पण 'आकाशाशी जडले नाते'सारखा ग्रंथराजही गाजला. ईंग्रजीमध्येही 'द रिटर्न ऑफ वामन' आणि 'ऍडव्हेन्चर' या दोन कादंबर्र्या त्यांनी लिहल्या.
आपला देश, आपली भाषा आणि आपली संस्कृती याबद्दल डॉक्टरांना कमालीचा आदर आहे. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कधीही चांगले, मात्र त्याचे अंधश्रद्धेत रूपांतर होउ देता कामा नये, असे ते सांगतात. केंब्रिज विद्यापिठात राहण्याची आणि काम करण्याची संधी असूनसुद्धा नारळीकरांनी भारतामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला त्यावरूनच त्यांचे वेगळेपण सिद्ध होते. १९७२ च्या काळात देशातले बुद्धिमान, धडाडीचे, अभ्यासू, स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण धडाधड परदेशी जात होते आणि स्थिरावत होते. अशा वेळी नारळीकरांनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला,हे धाडसच म्हणावं लागेल. मात्र 'ज्या मार्गानं बरेचसे जातात, त्या मार्गानं आपण न जाता वेगळा मार्ग निवडायचा,' हा संस्कार त्यांचे गुरू डॉ हॉईल यांनीच त्यांच्यावर केलेला आहे. आपल्या गुरूचा हा संस्कार त्यांनी सदैव ताजा ठेवला. अनवट वाटेनं जाऊन त्यांनी विज्ञानाच्या जगात स्वत:चं स्थान निर्माण केलं.
१९८८ मध्ये त्यांनी खगोल-भौतिकी संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची आयुका’ (इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी ऍण्ड ऍस्ट्रोफिजिक्स) ही संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केली. त्यामध्ये मुलांसाठी विज्ञान वाटिकेची निर्मिती केली. आयुकाच्या माध्यमातून संशोधन व विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. या संस्थेच्या कृपेने अनेक महान शास्त्रज्ञांचे पाय पुण्यनगरीला लागले. आजही डॉक्टर नारळीकर मुलांशी संवाद साधण्यात, शंकांचं समाधान करण्यात आणि विज्ञानकथा लिहण्यात व्यस्त आहेत.
मुलांविषयी विलक्षण जिव्हाळा व कौतुक असल्याने त्यांच्या प्रश्नांना स्वहस्ते उत्तरे पाठविण्यासाठी ते वेळ राखून ठेवतात. युवकांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी सतत कार्यरत असणार्र्या या मराठी अब्दुल कलाम ला मानाचा मुजरा!
दिनांक २४ जुलै रोजी तरूण भारत मध्ये प्रकाशित याच लेखाचे हे कात्रण

No comments:

Post a Comment