Monday 27 June 2011

नितिश भारद्वाज

२४ जुन १९९० या दिवसाचं वैशिष्ट्य काय? असं विचारल्यास आपण सगळेच विचारात पडू. मात्र 'महाभारत' मालिकेचा शेवटचा भाग याच दिवशी दुरदर्शनवरून प्रसारित झाला होता, हे आठवून दिल्यावर  आपल्यापैकी अनेकांचं मन 'रम्य ते दिवस' म्हणत भुतकाळात जाईल. वस्तीत एखाद्याच घरी असलेला क्राउन कंपनिचा शटरवाला टिव्ही, दोन मजली घरावर सत्तर-सत्तर फुट उंचावर लावलेला एन्टीना, मोठ्या भक्तीभावाने घरात जमलेली भाविकांची गर्दी, ओस पडलेले रस्ते, बंद दुकाने, आणि टिव्हीच्या पडद्यावर श्रीकृष्णाच्या रूपातल्या नितिश भारद्वाजला पाहताच टिव्हीसमोरच नतमस्तक होणारी मंडळी -- हा सगळा 'माहोल' ज्या दिवशीपासुन केवळ आठवणीपुरता उरला तो दिवस म्हणजे २४ जुन.
डॉक्टर नितिश भारद्वाज यांनी 'सेलिब्रिटी स्टेटस' पेक्षा कितीतरी पटीने अधीक प्रभावी असं हे 'डेईटी स्टेटस' पुष्कळ दिवसांपर्यंत अनुभवलंय. आजही दिसताक्षणी त्यांचे पाय धरणारे लोक कमी नाहीत. आणि भारद्वाज यांचा अभिनय, श्रीमद्भगद्गीतेवरील त्यांचा व्यासंग, आणि त्यांच्या ठायी असलेला उत्कृष्ठ वक्तृत्त्वाचा गुण पाहू जाता त्यांचे पाय धरण्यातही काहीच गैर नाही. एक जनावरांचा डॉक्टर अभिनयाच्या आवडीपोटी रंगभुमी, आणि टेलिव्हीजनच्या मागे लागतो, 'दूरदर्शन'मध्ये 'डय़ुटी ऑफिसर' म्हणून रूजू होतो, नंतर निवेदक होतो, आणि एक दिवस श्रीकृष्णाच्या भुमिकेत येऊन घराघरात आणि मनामनात आपलं स्थान कायमचं कोरून ठेवतो -- हे सगळं ईश्वरी योजनेशिवाय शक्य आहे का? शिवाय नितिश भारद्वाज माजी खासदार आहेत. मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे ते अध्यक्षदेखील होते. 'गीतारहस्य', 'अपराधी' ईत्यादी मालिकांबरोबरच गोळवलकर गुरूजींच्या जीवनावरील गाजलेल्या 'कर्मयोगी' या डॉक्युमेन्ट्रीचे चे ते निर्माते दिग्दर्शकदेखील आहेत. डॉ नितिश उत्तम छायाचित्रकार आहेत, पर्यटक आहेत, साहित्यीक आहेत, वक्ते आहेत, शिवाय महत्त्वाचं म्हणजे ते 'मराठी माणुस' आहेत! मुंबईकर आहेत!
होय. त्यांची जन्मभुमी आणि कलाक्षेत्रातली कर्मभुमीही मुंबईच. कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या 'चित्रपुर सारस्वत' समाजातील 'उपाध्ये' घराण्यामध्ये १९६२ साली नितिशजींचा जन्म झाला. नावाप्रमाणेच सरस्वतीचे पुत्र असलेल्या या लोकांमध्ये कलाक्षेत्राबद्दलची जाण आणि ओढ ही पिढिजात देणगीच असते. मध्यमवर्गिय मराठी घरात नितिशजींना अभिनयासाठी अभ्यासातून सुट नव्हती. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधून त्यांनी पशुचिकित्साशास्त्र आणि पशुपालनात शिक्षण पुरं केलं. गुरांचा डॉक़्टर म्हणुन करिअर सुरू करतांना एक दिवस 'वृंदावनी गोधने चारणार्या' श्रीकृष्णाची भुमिका आपल्याला करायची आहे हे नितिश भारद्वाजच्या ध्यानिमनीही नसेल.
अभिनयाची ओढ होतीच. राजबिंडं रूप, व्यक्तीमत्त्व, आणि भारदस्त आवाजही जवळ होता. मग प्रयत्न सुरू झाले. मुंबई दुरदर्शनमध्ये निवेदक म्हणुन डॉक्टर नितिश उपाध्ये रूजू झाला. निवेदन करणारा तरूण चेहरा हळुहळु सुपरिचीत होत गेला. दरम्यान बि आर चोप्रा 'महाभारत' बनवणार होते. श्रीकृष्णाच्या प्रमुख भुमिकेसाठी स्क्रीनटेस्ट्स सुरू होत्या. नितिशचं थोडंसं मिष्कील, थोडंसं गुढ, बरंचसं सांगुन जाणारं, आणि खुप काही राखुन ठेवणारं सुचक स्मीतहास्य दिग्दर्शक रवी चोप्राच्या मनाला भावलं. बस! निर्णय झाला! नितिश उपाध्येने छोट्या पडद्यावर नितिश भारद्वाज म्हणुन आगमन केलं, आणि मग ईतीहास बनला! १९८८ ते ९० या दोन वर्षात महाभारत घराघरात पोचलं, आणि श्रीकृष्ण मनामनात पोचले. नितिश भारद्वाजनंतर अनेकांनी श्रीकृष्ण केले. अगदी स्वप्नील जोशीसारख्या गोंडस तरूणापासून ते डॉक्टर सर्वदमन बॅनर्जींसारख्या विद्वानापर्यंत सगळ्यांनीच या भुमिकेत रंग भरून पाहिले. पण आजही श्रीकृष्ण म्हटलं की नितिश भारद्वाज हा एकच चेहरा डोळ्यापुढे येतो.
महाभारतातील कृष्णाच्या भुमिकेने नितिशचं जिवन बदलवून टाकलं. एके काळी केवळ अभिनेता होण्याचं स्वप्न बाळगणारा हा तरूण आता भगवद्गीतेच्या अभ्यासाकडे आकर्षित झाला. एका वेगळ्या दृष्टीकोणातून गीतेचा अभ्यास करणे सुरू झाले. श्रीकृष्ण हा दैवी दृष्टीकोनातून न पाहता तात्त्वीक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला. एक वैचारिक क्रांती घडवणारा क्रांतीकारी, जगावेगळी वाट धरायला न बिचकणारा एक विचारवंत, वीर पुरूष, आणि जगद्गुरू या दृष्टीने कृष्ण अभ्यासणे सुरू झाले.  'गीतारहस्य' या मालिकेची बैठक तयार होउ लागली.
या दरम्यान श्रीकृष्णाच्या ईपिक ईमेज मधून बाहेर येऊन अभिनय करण्याची धडपड सुरूच होती. १९९१ मध्ये पी पद्मराजन यांचा 'न्यान गंधर्वन' या मल्याळी चित्रपट मिळाला. यात एका लाकडाच्या पुतळ्यातून प्रकट होणार्र्या आणि केवळ नायिकेलाच दिसु शकणार्र्या नायकाची भुमीका केली. हा चित्रपट आजही मल्याळम चित्रसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. हिंदी आणि मराठी चित्रपटांत मात्र नितिशजींना हवं तसं यश मिळालं नाही. त्यांची 'श्रीकृष्ण' ही पॉप्युलर ईमेज या वेळी त्यांचं नुकसान करून गेली. मात्र या ईमेजचा अगदी चपखल वापर त्यांनी एका नव्या क्षेत्रात पाउल ठेवल्यावर त्यांना झाला. ते म्हणजे राजकारण!
श्रीकृष्णाच्या भुमिकेच्या निमित्ताने अनेक विद्वज्जनांशी आणि राजकिय नेतृत्त्वांशी त्यांचा संपर्क आला. यातूनच अभ्यासु वृत्तीबरोबरच राजकारणातही काहीतरी करून दाखवण्याची ईच्छा जागृत झाली. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधील जमशेटपुरमधून निवडणुक लढवली. ईंदरसिंग नामधारी आणि शैलेन्द्र महतो यांसारख्या खंद्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत त्यांनी मोठा विजय प्राप्त केला.
अकराव्या लोकसभेच्या अठरा महिन्याच्या कारकिर्दीत नितिश भारद्वाज यांनी आपण केवळ लेखकाने लिहलेले स्क्रीप्ट वाचणारे कलाकार नसल्याचे सिद्ध केले. टेलीव्हीजन चॅनलवरील वाढती अश्लीलता, असंसदिय भाषा, याचा नवीन पिढीवर होणारा परिणाम, ईत्यादी गंभीर विषय त्यांनी संसदेत प्रभावीपणे मांडले. दुर्दैवाने ही लोकसभा अल्पजीवी ठरली, आणि नितिशजींची खासदार म्हणुन कारकिर्दही थोडक्यातच संपली.
याच दरम्यान रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालीकेला दिलेली ७५ भागांची मुदत संपत आली होती, आणि दूरदर्शनने त्यांना मालिका गुंडाळायचे आदेश दिले होते. खासदार नितिश भारद्वाज यांची 'गितारहस्य' ही मालीका त्या स्लॉटमध्ये लागावी म्हणुन शासनाचा हा डाव आहे, असा सुर टिव्ही क्षेत्रामध्ये निघाला आणि नितिश भारद्वाज वेगळ्याच वादात फसले. राजकारणात मिळालेलं पद हे कलाक्षेत्रात आड येतंय हे लक्षात आल्यावर त्यांनी १९९८ ची निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला.
१९९९ मध्ये 'गितारहस्य' मालीका सुरू झाली, आणि त्यानंतर लगेच मध्यावधी निवडणुका आल्या. या वेळी उमा भारती यांच्या प्रोत्साहनामुळे नितिशजींनी मध्यप्रदेशातील राजगड येथुन दिग्वीजयसिंग यांचे बंधु लक्ष्मणसिंग यांच्या विरोधात निवडणुक लढवली. मालिका टिव्हीवर सुरू असल्यामुळे उमेदवाराचा आयता प्रचार होतो आहे, असा आरोप विरोधकांनी लावल्यामुळे निवडणुक आयोगाने 'गितारहस्य' चे प्रसारण थांबवले. या निवडणुकीत नितिशजीं पराभुत झाले, आणि त्यानंतर ही अप्रतीम मालिकाही आपल्याला बघायला मिळाली नाही. 
दरम्यान, उमा भारती यांच्या भाजपा मधून गच्छंती नंतर नितिशजींचा पक्षातील प्रभावही कमी झाला. राजकिय स्थीत्यंतरे झाली, तशी वैयक्तीक आयुष्यातही वादळे आली. पहिली पत्नी मोनिशापासून घटस्फोट झाला. त्यांची दोन्ही मुलं २००३ पासून आईबरोबर लंडनला असतात. नुकताच आय.ए.एस. अधिकारी असलेल्या स्मिता गाटे या पुण्याच्या मराठी तरुणीशी नितिशजींचा विवाह झालाय. सध्या एका चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात ते व्यस्त आहेत. शिवाय विविध ठीकाणी (साहित्य संमेलनांपासुन ते सामाजीक कार्यक्रमांपर्यंत) त्यांना वक्ता म्हणुन आमंत्रीत केले जाते. भारतीय जनता पक्षाचं कार्य ते करतच आहेत.
त्यांच्या राजकिय मेंटर उमा भारती नुकत्याच भाजपात परत आल्या आहेत, त्यामुळे आता येत्या काही दिवसांत नितिश भारद्वाज यांना एका नव्या आणि मोठ्या भुमिकेत पहाण्याची संधी आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा करू या!
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पूरवणी मध्ये प्रकाशित झालेले याच लेखाचे हे कात्रण.)
(दि. २६ जुन २०११)

Sunday 19 June 2011

डंकन फ्लेचर

सुरेश रैनाच्या नेतृत्त्वात कॅरॅबियन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सुरवातीला 'कच्चा लिंबु' म्हटलं गेलं असलं, तरीदेखील लागोपाठ तीन सामन्यांमध्ये वेस्टईंडिजला धूळ चारून या खेळाडूंनी आपण 'नवा गडी नवं राज्यं' करणार असल्याचं सिद्ध केलंय. या नव्या गड्यांबरोबरच आणखी एक नवा गडी एक नवं राज्य सुरू करू बघतोय. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रूजू झालेले डंकन फ्लेचर यांनी आपली पहिली चाचणी परिक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण केली आहे. आणि प्रशिक्षक या स्वरूपात फ्लेचरचा एंकंदर अनुभव पाहता, येत्या परिक्षांमध्येही ते हाच निकाल कायम ठेवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद हा एक काटेरी मुकुट आहे. क्रिकेट प्रशिक्षण दुनियेमध्ये आजच्या तारखेला हे पद सर्वात जास्त दबावाचे मानले जाते. गुरू गॅरी कर्स्टनच्या मार्गदर्शनात नुकताच विश्वविजेता ठरलेल्या भारतीय संघाच्या पुढच्या वाटचालीची धूरा एखाद्या अनुभवी खांद्यांवर टाकणंच आवश्यक होतं, आणि त्यामुळेच बिसिसिआयने डंकन फ्लेचरची नियुक्ती केली असावी. ४२ वर्षाच्या गॅरी कर्स्टनच्या तुलनेत ६२ वर्षांच्या फ्लेचरचा अनुभव सर्वच दृष्टीने दांडगा आहे.

डंकन ऍंड्र्यु ग्वेन फ्लेचर हे झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक आहेत. झिम्बाब्वेमधील हरारे जवळच्या (त्या वेळी र्र्होडेशिया) सॅलीसबरी मध्ये आपल्या पाच भावंडांबरोबर वेगवेगळे खेळ खेळतच डंकनचं लहानपण गेलं. मुळात र्र्होडेशिअन शेतकरी परिवारांमध्ये मैदानावर जाऊन खेळ खेळणे हा रोजच्या सवयीचाच भाग असतो. ईंग्रजांच्या राजवटीदरम्यान ईंग्रजी खेळांचा प्रभाव फ्लेचर भावंडांवर झाला. डंकनची बहिण ऍन ग्रॅण्ट ही झिम्बाब्वेच्या फिल्ड हॉकी संघाची कर्णधार होती. तीच्या नेतृत्वात १९८० च्या मॉस्कॉ समर ऑलीम्पीक्समध्ये झिम्बाब्वेने फिल्डहॉकीचे सुवर्णपदकही जिंकले होते. शिवाय डंकनचा भाउ ऍलन हा देखील सत्तरच्या दशकात र्र्होडेशिया कडून फर्स्टक्लास क्रिकेट खेळत होता. याच दरम्यान डंकनने झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्त्वच केले. १९८२ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेने आयसिसि ट्रॉफी जिंकली. १९८३ च्या (भारताने जिंकलेल्या) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डंकन फ्लेचरच्या झकास कामगिरीमुळे झिम्बाब्वेला बलाढय़ ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळविता आला होता. फ्लेचर यांनी ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. बहिण राष्ट्रीय हॉकी संघाची कर्णधार, भाउ क्रिकेट संघाचा कर्णधार, आणि दूसरा भाऊ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असा योग जुळून येण्याची कदाचीत ती पहिलीच वेळ असावी.

मात्र खेळाडू म्हणून फ्लेचरची कादकिर्द हवी तशी बहरली नाही. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाज असलेल्या फ्लेचरने सहा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ४७.७५ च्या सरासरीने १९१ धावा काढल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट आहे ६६.०८. त्यांच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. त्यांची सर्वोत्तम खेळी नाबाद ७१ धावांची आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सहा सामन्यांत २२१ धावांत ७ बळी ही त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधली कामगिरी. प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात त्यांच्या नावावर एकही शतक नाही. १११ प्रथम दर्जाच्या सामन्यात २३.६७ सरासरीने ४०९५ धावा त्यांच्या नावावर आहे. त्यात २० अर्धशतकांचा समावेश आहे. खेळाडू म्हणून जास्त न गाजलेली त्यांची कारकिर्द प्रशिक्षक म्हणुनच खुप गाजली. १९९९ मध्ये फ्लेचर यांनी इंग्लंड क्रिकेट संघाची सूत्रे हाती घेतली तेव्हा क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंड संघाचे ते पहिले विदेशी प्रशिक्षक होते. ईंग्लंडच्या माजी खेळाडुंसह ईतर दिग्गज क्रिकेटविरांनी त्यांच्या निवडिवर टिकास्त्रे सोडली होती. मात्र टिकेला शांततेने सामोरे जाणे आणि प्रसारमाध्यमांशी अतीशय मोजके बोलणे हे फ्लेचर यांचे सुत्र आहे. शिवाय डंकन फ्लेचर या नावाला खेळाडू म्हणुन फारसं वलय नाही. कारण महान क्रिकेटपटू ही प्रशिक्षक म्हणुन मोठी डोकेदुखी ठरते (उदा. ग्रेग चॅपल)कारण तो आपलं महानपण विसरून वावरू शकत नाही. मात्र फ्लेचर मीडियापेक्षा खेळाडूबरोबर जास्त वावरणारे आणि प्रशिक्षणाचं आधुनिक ज्ञान असलेले असे कोच आहेत. स्वतः एकही कसोटी सामना खेळलेला नसला, तरी देखील कसोटी मानांकनामध्ये तळाला गेलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाला एक ताकतवान संघ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा फ्लेचर यांचा सिंहाचा वाटा आहे. आज कसोटी मानांकनांमध्ये इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. २००५ मध्ये ऍशेस मालीकेत ऑस्ट्रॅलीयाला त्यांनी चारलेली धूळ आजही क्रिकेटजगतात आठवली जाते. ऑस्ट्रेलियाचा पतनाचा प्रारंभ नेमका या क्षणापासून झाला, असं म्हणाल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अठरा वर्षानंतर ऍशेसवरती ईंग्लंडचे वर्चस्व निर्माण करण्यात मोलाची भुमिका बजावल्याबद्दल ब्रिटिश शासनातर्फे फ्लेचर यांना ईंग्लंडचं नागरिकत्त्व तर बहाल करण्यात आलंच, शिवाय 'ऑफीसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर' हा सन्मानाचा खिताबही देण्यात आला.

कसोटीमध्ये इंग्लंडचे मानांकन चांगले असले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र डंकन फ्लेचर यांच्या कार्यकाळात इंग्लंडला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला त्यांच्या कारकीर्दीत ७५ विजय तर ८२ पराजय पत्करावे लागले.

कसोटीमध्ये इंग्लंडचे मानांकन चांगले असले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र डंकन फ्लेचर यांच्या कार्यकाळात इंग्लंडला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्या काळात खेळल्या गेलेल्या विश्वचषकांदरम्यान ईंग्लंडला सन्माननिय आव्हानही उभे करता आले नाही. त्यामुळे फ्लेचरच्या कार्यक्षमतेवर ताशेरेही ओढले गेले.

भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणुन निवड झाल्यावरही फ्लेचरवरती विविध क्षेत्रातून टिका झाली. कपिल देवने 'कोण हा डंकन फ्लेचर' असा सरळ सवाल करून खळबळ माजवून दिली. (खरेतर कपिल देवच्या १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील १७५ धावांच्या खेळीचा डंकन फ्लेचर हे साक्षीदार आहेत.) शिवाय सुनिल गावसकरनेही भारतीय प्रशिक्षकाला संधी द्यायला हवी होती, असे म्हणुन फ्लेचर यांच्या निवडिलाच सुरंग लावला होता. "आम्हाला प्रशिक्षक मिळेल, पण कर्स्टन मिळणार नाही" असं म्हणुन हरभजन सिंगने नव्या प्रशिक्षकाचं स्वागत केलं होतं. मात्र या सगळ्यांवर प्रतिक्रीया व्यक्त करण्याचं टाळत फ्लेचरने पहिल्या लढ्यात स्वतःची सरशी केली. यजमान विंडीज संघाला पराभवाची धूळ चारून ३-० च्या आघाडीने भारतीय संघाने मालिकेवर तिरंगा फडकावल्यानंतर मग "येत्या दशकापर्यंत तरी क्रिकेटविश्वावर भारतीय संघाचेच निर्विवाद वर्चस्व कायम राहणार" असे वक्तव्य त्यांनी केले. यावरून 'आधी केले, मग सांगितले' ही त्यांची वृत्ती दिसुन येते.

क्रिकेट जगताकडून टिकास्त्रे झेलत असतांनाच २००७ मध्ये फ्लेचरने 'रग्बी' खेळाचे सल्लागार म्हणुन काम करणार असल्याचं जाहिर केलं. रग्बीचा थरार हा क्रिकेटपेक्षाही काकणभर जास्तच असल्याचं ते मानतात. त्या खेळातही सल्लागार प्रशिक्षक होण्याईतपत कौशल्य त्यांच्या ठायी आहे. याव्यतीरीक्त आणखी एक कौशल्य फ्लेचरकडे आहे. ते म्हणजे त्यांचा साहित्य आणि संस्कृती या विषयांवरचा व्यासंग. वाचन हा त्यांचा आवडता पासटाईम असला, तरी, ते एक उत्तम लेखकही आहेत. याचा परिचय त्यांचे 'बिहाईंड द शेडस' हे त्यांचं हे आत्मचरित्र वाचतांना आपल्याला येईल. वाडवडिल ईंग्रजांच्या राजवटिचे सेवक असुनदेखील ब्रिटिश नागरिकत्त्व मिळवण्यासाठी त्यांना किती कष्ट झेलावे लागले, हे फ्लेचरच्या शैलीत वाचतांना वेगळीच मजा येते. भारतातील त्यांच्या दोन वर्षाच्या वास्तव्यादरम्यान विविधतेने नटलेल्या या भुमिबद्दल त्यांच्या लेखणीतून काहीतरी वेगळं वाचायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पूरवणी मध्ये प्रकाशित झालेले याच लेखाचे हे कात्रण. दि. १९ जुन २०११)

Wednesday 15 June 2011

कर्मापा लामा

बुद्ध पौर्णीमेचा चंद्र एव्हाना कलेकलेने लहान होताना दिसत असला तरीही बौद्ध धर्माचा व्याप मात्र प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढताच राहिला आहे. आज बौद्ध धर्माचे पस्तीस कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे. आशिया खंडात बौद्ध धर्माचे अनुयायी अधीक असले तरीही,  आता जगभर बौद्ध तत्त्वज्ञान आणि धर्माचा प्रचारप्रसार झालेला आहे.
बुद्ध पौर्णीमेचे निमित्त साधून सतरावे कर्मापा लामा नुकतेच नागपूरात येऊन गेले. ओग्येन ट्रिनले दोर्जे कर्मापा अवघ्या २६ वर्षाचे आहेत. दलाई लामा आणि पांचेन लामा यांच्यानंतर ते तिसरे सर्वोच्च गुरू मानले जातात. "शांती, नैतिकता आणि सामर्थ्य' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. तिबेटी भाषेत झालेल्या या व्याख्यानातुन त्यांनी बुद्ध तत्त्वज्ञानाची संकल्पना विशद केली. मात्र हल्ली कर्मापांचे नाव गाजतेय ते मात्र वेगळ्याच कारणाने. हिमाचल प्रदेशातील कर्मापा वास्तव्यास असलेल्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी जवळपास सात कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. या संपत्तीबाबत अद्याप समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने व तपास समितीला कर्मापा सतत चीनच्या प्रशासकांच्या संपर्कात असल्याचे आढळल्याने ते चीनचे गुप्तहेर असण्याचा संशय बळावला आहे.
धर्माची धर्मसंस्था झाली, की त्यात अनेक पंथ, उपपंथ, शाखा, जाती, समुह, त्यांचे त्यांचे वेगळे धर्मगुरू, आणि त्यांच्यातील मानापमानांनाही सुरूवात होते. एक सहज दृष्टीक्षेप टाकल्यास सतराव्या कर्मापा लामांच्या भोवती या वादाच्या भोवर्र्याने फेर धरल्याचे कारण आपल्या लक्षात येइल.
बौद्ध धर्माच्या महायान शाखेचे अनुयायी पुर्व आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. यांपैकी तिबेटीयन उपशाखेमधील धर्मगुरूंना 'लामा' (ज्ञानाचा सागर) असे संबोधन आहे. लामा हे तिबेटचे धर्मगुरू तर आहेतच, शिवाय परंपरेने तिबेटची राजकिय सत्ताही त्यांच्याच हाती आहे. मात्र सध्या तिबेटवर चिनचे राज्य असल्यामुळे तीबेटचे हे शासक आणि धर्मगुरू हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे आश्रय घेऊन राहतात.
दलाई लामा आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. तिबेटियन बुद्धांचे ते सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. असे जरी असले, तरी तिबेटियन बुद्ध धर्मामध्ये चार पिठे आहेत ज्यांना 'मॉनेस्टीज' म्हटले जाते.  'न्यिगमा', 'काग्यु', 'साक्य' आणि 'जिलग' या चार मॉनेस्टीजपैकी 'जिलग' मॉनेस्टीचे गुरू म्हणजे दलाई लामा होत, तर 'काग्यु' मॉनेस्टीचे गुरू कर्मापा लामा नावाने ओळखले जातात. महत्त्वाचे म्हणजे काग्यु मॉनेस्टी ही दलाई लामांच्या 'जिलग' मॉनेस्टीपेक्षा जवळपास दोनशे वर्षे आधीपासून अस्तित्त्वात असल्याने तीचे महत्त्व आणि अनुयायी जास्त आहेत. मात्र सध्या दलाई लामा हे या चारही मॉनेस्टीज मधील लामांपेक्षा वयाने जेष्ट असल्यामुळे त्यांना सर्वोच्च मानले जाते. त्यामुळे जेष्टता प्राप्त झाल्यास कर्मापांकडे दलाई लामांचा वारस म्हणून पाहिले जाईल. मात्र थेट निवडिपासूनच कर्मापा वादाच्या भोवर्र्यात अडकले आहेत.
आजवर काग्यु मॉनेस्टीमध्ये झालेल्या सोळा कर्मापांपैकी सात जणांनी स्वतःच अतिशय कमी वयात आपण कर्मापा असल्याचे घोषित केले होते व आपल्या आधिच्या कर्मापांच्या वस्तू ओळखून, आणि ईतर संदर्भ सांगुन ते सिद्धही केले होते. ईतर कर्मापांच्या वेळला कुणीच स्वतःहून घोषणा न केल्यामुळे मॉनेस्टीच्या सदस्यांना दिवंगत कर्मापांचे लिखीत स्वरूपातील संकेत ओळखून योग्य कर्मापांची ओळख पटवावी लागली होती. तसाच काहीसा गुंता सतराव्या कर्मापांच्या निवडिच्या वेळी झाला. मॉनेस्टीच्या काही सदस्यांनी तिबेटमधील तशुरफू मठाचे प्रमुख ओग्येन ट्रीनले दोर्जे यांची कर्मापा म्हणुन निवड केली. दलाई लामांसह ईतर मॉनेस्टीजच्या गुरूंनीदेखील त्याला मान्यता दिली, तसेच चिनच्या शासनानेही ट्रीनले दोर्जे यांची निवड पक्की केली.
मात्र दरम्यान काही सदस्यांनी त्रिन्ले थाये दोर्जे यांची कर्मापा म्हणुन निवड केली. थाये दोर्जे हे तिबेटमधील ल्हासा या ठीकाणी १९८३ मध्ये जन्मलेले असुन परंपरेप्रमाणे ते लहानपणापासूनच आपण कर्मापा असल्याचा दावा करत असल्याचे निवडकर्त्यांचे म्हणणे आहे. खरा कर्मापा कोण हा विवाद आजही सुरूच आहे.
मार्च १९९४ साली त्रिन्ले थाये दोर्जे यांनी तिबेटमधून भारतात निर्वासितांसह आगमन केलं. नवी दिल्ली येथे निर्वासितांचे स्वागत करत असतांना त्त्यांची ओळख देण्यात आली, आणि हिमाचल प्रदेशातील तवांग येथील आश्रमात त्यांच्या वास्तव्यास सुरवात झाली. आजही अनेक भारतिय तिबेटी निर्वासितांचे श्रद्धास्थान हेच कर्मापा आहेत.
याउलट उग्येल ट्रिनले यांनी तिबेटमधून पलायन केलं आणि भारतात येण्याच्या त्यांच्या पद्धतिपासूनच त्यांच्याभोवती संशय दाटायला सुरुवात झाली. सन २००० मध्ये चौदा वर्षे वयाचे कर्मापा चिनी सुरक्षा रक्षकांना चकवून तिबेटमधून भारतात पळून आले. तिबेटी सीमेवर आजवरचा इतिहास, भारतीय हद्दीत शिरकाव करणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचाच होता. पण कर्मापा सीमा ओलांडून सुखरूप भारतात आले. भारत सरकारने त्यांना आश्रय दिला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे त्यांना मठ स्थापन करण्याची परवानगी दिली.
मात्र भारतात आश्रयाला आल्यानंतरही कर्मापांची पाठ वादविवादांनी सोडली नाही. वैद्यकीय तपासणीत त्यांचे वय खुप जास्त असल्याचे आढळले. याचा अर्थ त्यांचा जन्म १९८१ पुर्वी (१६ व्या कर्मापांच्या निर्वाणाचा आधी) झालेला आहे असे म्हणता येइल, त्त्यामुळे त्यांच्या खरे कर्मापा नसल्याच्या ईतरांच्या दाव्याला बळच मिळाले.
फेब्रुवारी २०११ मध्ये हिमाचल पोलीसांनी त्यांच्या सिद्धबानी मठात छापा मारला. यांच्याकडून एक कोटी रुपयांची कार, भारतीय चलनातील चार लाख रुपये रोख रक्कम, सहा लाख अमेरिकन डॉलर, अकरा लाख युआन तसेच जपानी आणि ऑस्ट्रेलियन चलन अशी सात कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. त्यात चीन, नेपाळ, अमेरिका आणि अन्य देशांतील चलनी नोटांचाही समावेश होता.
कर्मापा यांच्या मठाचे कोषाध्यक्ष शक्ती लामा यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले तर कर्मापांवर आश्रमाच्या पंधरा किलोमिटरच्या बाहेर प्रवास न करण्याचे निर्बंध लादण्यात आले. मात्र मार्च २०११ मध्ये केन्द्र सरकारने कर्मापांची संपत्ती ही त्यांना देश विदेशातून भक्तजनांनी दिलेले दान आहे, असे शिक्कामोर्तब करून त्यांच्यावरील प्रवासाचे निर्बंध हटवले.

दलाई लामांनी नुकतेच आपण निवृत्ती पत्करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आगामी तिबेटी धर्मगुरूचे पद प्राप्त करण्याच्या चढाओढीमध्ये दोनपैकी कोणते कर्मापा आघाडिवर राहतात ते आता पहायचे. मात्र तथाकथीत चिनी प्रभावाखाली असलेले ओग्येन ट्रीनले दोर्जे हे दलाईंचे वारस झाल्यास चिनला आनंदच होईल हे नक्की.


Saturday 11 June 2011

योगाचार्य बी. के.एस. अय्यंगार

योग आणि प्राणायाम या क्षेत्रांसाठी जून महिना मोठ्या प्रमाणावर घडामोडिंनी भरलेला रहाणार आहे, असं दिसतंय. योग गुरू रामदेव बाबांच्या 'हटयोगा' ने सरकारला फेफरं आणलेलं असतांनाच रामदेवबाबांपेक्षा कित्येक पिढ्या आधीपासून देशात योगाचा प्रचार करणारे योगाचे भिष्मपितामह ९३ वर्षाचे योगाचार्य बी. के.एस. अय्यंगार हे 'ईंडो-चायना योग समिट' या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थीत राहण्यासाठी म्हणुन चिनमधील ग्वान्झु साठी एव्हाना रवाना झाले असतील. ही परिषद येत्या आठवड्यामध्ये चिनमध्ये होउ घातलेली आहे. या देशात शारिरिक, मानसिक आणि आत्मीक समाधान प्राप्त करण्यासाठी मार्शल आर्ट हा प्रकार सर्वमान्य आणि लोकप्रिय आहे. मार्शल आर्ट चे हयात असलेले सर्वोच्च शिक्षक मास्टर लु जिझिअन हे सध्या ११७ वर्षांचे आहेत. योगाचार्य अय्यंगार आणि मास्टर लु यांची या परिषदेच्या निमित्ताने भेट होईल आणि योग आणि मार्शल आर्ट या दोन शास्त्रांवरती सांगोपांग चर्चा होईल. वयाच्या या पाडावावर असतांना देखील दोघांचीही प्रकृती ठणठणीत आहे, यावरून या दोन्ही शास्त्रांचे महत्त्वच लक्षात येते. या निमित्ताने भारतातील योगशास्त्राचे पहिलेवहीले ग्लोबल ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर असलेले पद्मभुषण योगाचार्य अय्यंगार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. 

बेल्लूर कृष्णमचार सुंदरराज अय्यंगार यांचा जन्म जरी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर गावचा असला, तरी त्यांची कर्मभुमी पुणे हीच आहे. गेल्या पाउणशे वर्षांपासून योगशास्त्राचा अभ्यास, प्रसार, प्रचार आणि अध्यापन करणारे योगाचार्य या विषयावरील अनेक पुस्तकांचे लेखक आहेत. अनेक वृत्तपत्रांसाठी (यात मराठी वृत्तपत्रांचाही समावेश आहे) त्यांनी स्तंभलेखन केलं आहे. महर्षी पतंजलीच्या योगाचे गुरूजींनी सांगितलेले स्वरूप हे त्यांच्या अनुयायांमध्ये 'अय्यंगार योगा' म्हणुन प्रसिद्ध असले, तरीही गुरूजी मात्र हा ठेवा महर्षी पतंजलीचाच असल्याचं नम्रतेने वारंवार सांगतांना दिसतात.  अय्यंगार हे मुळात तामिळनाडूमधील उच्चकुलीन ब्राम्हण कुलनाम आहे. रामानुजाचार्यांनी सांगितलेल्या विषिष्टाद्वैतवादाच्या सिद्धांतावर विश्वास असणार्र्या भाविक वैष्णवांचा हा समाज आता तामिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातही आढळतो. गुरूंजींचे वडिल एक साधारण शिक्षक होते. १३ भावडांपैकी त्यांचा क्रमांक ११ वा. घरची परिस्थीती अतीशय हलाखीची होती. यामुळेच मलेरिया, टिबी, टायफॉईड आणि उपासमार या सर्वांचा सामना करत आयुष्याची नउ रोगट वर्षे कशीतरी काढली. नवव्या वर्षी वडिलांचा अकाली मृत्यू झाला. त्यामुळे सर्व भावंडांची जबाबदारी आई आणि मोठ्या भावांबहिणींवर येऊन पडली. गुरूजींचे बहिणजावई मैसुरचे तिरूमलाई कृष्णम्माचार्य हे योगशास्त्रातील त्या काळात गाजलेलं नाव. (कृष्णम्माचार्य देखील योगसामर्थ्याच्या भरवशावर शंभर वर्षांचं निरोगी आयुष्य जगले.) त्यांनी लहानग्या सुंदरची जबाबदारी स्विकारली. मैसुरला गुरूगृही त्यांचं योगशिक्षण सुरू झालं. 
 
यथाशक्ती निरंतर योगाभ्यासाने किमया केली, आणि गुरूजींनी अवघ्या काही दिवसांतच अशक्तपणा आणि रोगटपणावर मात केली. योगाभ्यासामध्ये त्यांची ऋची आणि गती लक्षात आल्यावर कृष्णम्माचार्यांचेदेखील ते आवडते शिष्य झाले. त्यांनी पुण्याच्या योगशाळेत शिक्षक म्हणुन तरूण सुंदरची नियुक्ती केली. साल होतं  १९३७. सुंदरचा बि के एस अय्यंगार गुरूजी होण्याची हीच सुरूवात. पुण्य़ात डॉ गोखल्यांनी ज्या वेळी प्रथम त्यांना ' योगा ' शिकवायला जिमखान्यावर आणलं. त्या काळी पूना गेस्ट हाऊसच्या निमित्तानं सिनेमावाले खूप ओळखीचे झाले. ललिता पवार आणि भालजी पेंढारकरांनीही गुरुजींकडून योगाचे धडे घेतले. त्या काळात माणूस आणि शेजारी हे दोन चित्रपट खूप वेळा बघितल्याचं ते सांगतात. पुण्यात गुरूजींनी लावलेल्या ईवल्याश्या रोपट्याचा वेलु हळूहळू जगभर पसरू लागला.
 
चौकातल्या सार्वजनिक नळाचं पाणी पिऊन, ' रीगल ' च्या सिंगल चहाची चव जिभेवर रेंगाळती ठेवत 'योग' शिकणे, शिकवणे सुरू झाले. 'योगा' इतकाच नृत्य आणि गाणं ऐकण्यात
रस असल्याने आणि शास्त्रीय संगीतात विशेष रुची असल्याने सूर आणि सुरेल माणसं हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच पंडित भिमसेन जोशी आणि जागतीक किर्तीचे व्हायोलीन वादक येहूदी मेन्युहीन यांच्याशी संपर्क आला. १९५२ साली मेन्युहीन यांच्या सहकार्याने लंडन, स्वित्ज्झर्लॅड आदी ठीकाणी योग शिबिरे घेतली. भारताबाहेर योगशिबीर होण्याची ही बहूधा पहिली वेळ असावी. त्यानंतर मात्र योगाला ग्लोबल करण्याचं सत्रच सुरू झालं. आज युरोप-अमेरिकेत अय्यंगार योगवर्गाच्या तीनशे शाखा आहेत.
 
१९६१ साली त्यांचे गुरुजी कृष्णमाचार्य पुण्यात आले होते. अय्यंग़ार सरांची कन्या गीता आणि मुलगा प्रशांत यांना योगाभ्यासाचे धडे देणे सुरू होते. कृष्णमाचार्यांनी एक आसन जवळपास अर्ध्या तासापर्यंत शिकवूनही या लहानग्यांना ते समजे ना. योगायोगाने तीथे अय्यंगार गुरूजी आले, आणि सजहपणे एका वाक्यात 'अमुक बिंदूपासून तमुक या बिंदूपर्यंत शरीर स्ट्रेच करा' असं सांगीतलं. मुलांच्या हे लगेच लक्षात आलं. एवढा एक प्रसंग कृष्णमाचार्यांसाठी पुरेसा होता. त्यांनी गुरूजींना योग शिक्षक चक्रवर्ती हे स्वर्णपत्र प्रदाब केलं. त्यांच्यामधील शिक्षकाला मिळालेली ही सर्वोच्च पावती. गुरूजींचं पहिलं पुस्तक 'लाईट ऑन योगा' हे १९६६ साली प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे योगाभ्यासावरील बायबल म्हणुन गणलं जातं. जगातील १७ हून  अधीक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली. ईंग्रजी, कन्नड, मराठी आणि ईतर अनेक भारतीय भाषांमध्ये संवाद साधू शकणार्र्या गुरूजींनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केलंय, आणि करत आहेत. त्यांची योगशास्त्रावरची सोळा पुस्तकं प्रकाशीत झाली आहेत. ' अष्टदल योगमाला ' चे बारा खंड लिहून पूर्ण करण्याचं काम सुरू आहे.
 
येत्या चौदा डिसेंबरला वयाची ९४ वर्षे पूर्ण होणार , तरी धाप नाही. दम नाही. चपळतेनं बंगलोरी हिरव्या काठाची लुंगी सावरत, आपल्या दिवंगत पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्य़ात उभारलेल्या 'राममणी अय्यंगार मेमोरिअल योगा ईन्स्टीट्युट' मध्ये फेरफटका मारणारे गुरूजी  अनेकांना लक्षात असतील. या वयातदेखील कामाच्या झपाट्यात फरक नाही. पूर्वी पहाटे साडेतीनला उठायचे. आता साडेपाच होतात. दोन तास प्राणायाम. नंतरच चार तास योगवर्ग. दुपारी ग्रंथालयात वाचन किंवा नोट्स काढणं. सध्या ईंडो-चायना योग समिट संदर्भातली गुरुजींची तयारी सुरू असेल.
नव्वदीच्या घरात चपळतेने वावरणारे पद्मभूषण आणि पुण्यभूषण अय्यंगारगुरुजी हे पौराणिक चित्रपटातल्या नायकासारखेच दिसतात. कपाळावरून उलटे फिरवलेले आणि खांदे-मानेवर रेंगाळणारे दाट केस. भव्य कपाळावर रेखलेली लाल कुंकवाची उभी रेघ. पौराणिक पुरुषासारख्या दाट वळलेल्या भुवया , दणकट बाहू. आणि सचिन तेंडुलकरला सहज उचलतील अशी उंची!
 
होय! सचिन हा गुरूजींचा आवडता शिष्य! मध्यंतरी तो रोज गुरुजींकडे योगाचे धडे घ्यायला येत होता. क्रिकेट तर त्यांचा जीव की प्राण. मॅच मन:पूर्वक पाहतात. मध्यंतरी बंगलोरला सर्व खेळाडूंना कोचिंग द्यायला गुरुजी गेले होते. नुसतं पाहून ' सेहवाग ला त्यांनी सांगितलं की , पायाचा प्रॉब्लेम असेल. खूप पाय दुखतो ना! त्यामुळे मन स्थिर न राहल्याने कन्सिस्टन्सी नाही. सौरभला विचारलं , ' कंबर दुखते का ?.' नुसतं उभं राहण्याच्या पोश्चरवरून ओळखलं आणि आसनं टिकवून सगळ्यांना फिट्ट केलं. योगा फॉर क्रिकेटर्स हे त्यांचं पुस्तकही त्यानंतर आलं.
 
योगप्रचाराच्या निमित्ताने सध्या जगभर प्रवास करावा लागत असुनही गुरूजींच्या चेहर्र्यावरील सहज आणि सात्त्वीक स्मीत कायम असतं. आता चिनमध्ये मास्टर लु जिझिअन यांच्यासमवेत योग आणि मार्शल आर्ट यांचा काय सुवर्णमध्य ते शोधून काढतात ते पहायचे.
 
 

Sunday 5 June 2011

कादर खान

सध्या निकालांचा मोसम आहे. मात्र बारावीच्या बोर्डाच्या परिक्षांच्या निकालांपेक्षाही विद्यार्थ्यांना उत्सुकता होती ती आय आय टी जे ई ई च्या प्रवेश परिक्षेच्या निकालाची. कारण आय  आय टी मध्ये प्रवेश म्हणजे उज्ज्वल भविष्याची हमी असते. एकदा का येथून ईंजिनिअर झालं, म्हणजे ईंजिनिअरिंगबरोबरच ईतर अनेक क्षेत्रांचे दरवाजेदेखील खुले होतात. दक्षीणेतला सुपरस्टार नागार्जुन असो, किंवा पर्यावरणमंत्री जयरामरमेश असो, लेखक चेतन भगत असो, किंवा कवी कुमार विश्वास असो, हे सगळे ईंजिनिअरच आहेत. आणि "रिश्तेमें तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह" हे तुफान गाजलेलं वाक्य ज्यांच्या लेखणीतून उतरलं आहे ते  पटकथा लेखक कादर खानही मुळात ईंजिनिअरच आहेत.

कादर खान म्हटलं की एक विनोदी किंवा चरित्र अभिनेता अशी छवी युवकांसमोर उभी राहिल. गोविंदा किंवा शक्ती कपूरबरोबर विनोदी चित्रपटात टिवल्याबावल्या करणारा कादरखान अनेकांना आठवेल. जरा जुन्या पिढीतल्या लोकांना 'परवरिश', 'अमर अकबर अंथोनी', 'खून पसीना' , 'मुकद्दर का सिन्दर' , 'सुहाग' , 'लावारिस' ,देशप्रेमी' , 'शराबी'  ईत्यादी चित्रपटांतून दिसणारा किंवा या चित्रपटांच्या संवादातून लक्षात राहणारा कादर खान आठवेल.
यापेक्षाही जुन्या लोकांना आठवेल तो मुंबईच्या एम एच साबु सिद्दीक पॉलीटेक्नीक कॉलेजच्या स्नेहसंमेलनात अभिनय करताना दिलिपकुमारच्या नजेरेने हेरलेला आणि त्याला 'बैराग' मध्ये छोटीशी भूमिका दिलेला एक युवा कलाकार.
मात्र उर्दू, पर्शियन आणि पश्तुनी भाषेतील शंभराहून अधीक पुस्तके लिहणारा साहित्यीक कादर खान; रंगभुमी, स्तानिलावस्की, गोर्की, चेखव, दोस्तोवयस्की, ग़ालिब , कबीर यांच्या साहित्यावर टिका लिहणारा समिक्षक कादरखान; शंभराहून अधीक गरिब मुलांना शिक्षण देणारी एक संस्था चालवणारा समाजसेवक कादर खान; आणि सध्या दुबईमध्ये अनिवासि दुबईकरांना अरबी आणि उर्दु शिकवणारा; ह्युस्टनमध्ये एंटरनॅशनल ड्रामा स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणारा; सुभाष घईं आणि अनुपम खेर यांच्या ऍक्टींग स्कुल्समध्ये विषेश निमंत्रीत अध्यापक असलेला;  'उस्ताद,' गुरुजी, मास्साब, सर, किंवा प्रोफ़ेसर कादर खान अनेकांना माहिती नाहीय.
बलुचिस्तानमधील पिशिन प्रांतातल्या एका खेड्यात १९३५ साली जन्मलेला एक माणूस स्वतःभोवती ईतकं सगळं वलय निर्माण करतो काय, आणि या मोहमयी रूपेरी दूनियेतून स्वतःला अलगदपणे वेगळं करून परत आपल्या साहित्य आणि शिक्षणाच्या दूनियेत स्वतःला गुंतवून घेऊ शकतो काय -- कादर खान यांची साडेसात दशकांची वाटचाल अचंबित करणारी आहे.
बलुचिस्तानमधून आपल्या भाषाशास्त्रज्ञ वडिलांबरोबर मुंबईला येणं कादर खान यांच्यासाठी स्वप्नवतच होतं. मुंबईच्या कमाठीपुरा भागातल्या गल्लीबोळात वसलेल्या एका छोट्याश्या घरात राहून, अनेकदा कागद न मिळाल्यामुळे घराच्या फरशीवर खडूने गणिते सोडवण्याचा सराव करून, ईस्माईल युसुफ कॉलेजमधून कादर खान ने सिव्हील ईंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली. सुदैवाने भायखळ्यातला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक छोटीशी नोकरीही लागली. स्वतः मोठे अभ्यासक असलेल्या वडिलांचं आपला मुलगाही प्राध्यापक व्हावा हे स्वप्न होतं, ते कादर खान ने पुर्ण केलं. थ्योरी ऒफ स्ट्रक्चर, हायड्रोलिक्स, स्ट्रेन्थ ऑफ मेटेरियल , आरसीसी स्टील -- प्राध्यापक महोदयांचे सगळे विषय त्यांच्या वडिलांच्या भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकजीवन या विषयांपेक्षा पुर्णतः वेगळे होते. तरिदेखील अनेकदा वडिल कुणाच्याही नकळत त्यांच्या वर्गात जाऊन बसत.

'आप मेरी क्लास में क्यों आते हैं?' -- मुलगा विचारायचा.
- 'सीखने के लिए.' वडिलांचं उत्तर! "सीखने की कोई उम्र नहीं होती , कहीं भी , कभी भी, कुछ भी सीखा जा सकता है. मैं यहाँ एक अच्छे अध्यापक से अध्यापन कला के गुर सीखने आता हूँ ।"


शिकवता शिकवताच महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांबरोबर अभिनयही करायला लागायचा. अश्याच एका स्नेहसंमेलनात सुपरस्टार दिलिपकुमारने हा हिरा हेरला आणि आपल्या एका चित्रपटात छोटीशी भुमिका दिली. नव्या प्रवासाची हीच सुरवात. दिलिपकुमारच्या निवडीमुळे कादरखान अचानक चमचमत्या दुनियेत आले. ओळखी वाढत गेल्या. चौऱ्ह्यात्तर साली मनमोहन देसाई 'रोटी' बनवत होते. त्याच्या शेवटच्या प्रसंगातील संवाद लिहिण्याचे काम त्यांना मिळालं. सहज म्हणुन लिहलेले काही संवाद देसाईंना इतके आवडले की त्यांनी खिशात असतील नसतील तेवढ्या नोटा काढून कादरखानच्या खिशात कोंबल्या. सगळीकडे हेच उद्गार काढले जाऊ लागले -- "क्या डायलॉग लिखा है कादरखानने!"

देसाईंनी पुढचे सगळेच कादरखानकडे सोपवले. अमर-अकबर-अँथनी, परवरिश, कूली, नसीब, सुहाग -- चमकदार संवाद लिहिणारा माणूस सापडला म्हटल्यावर प्रकाश मेहराही, टिनू आनंदही मागे राहिले नाहीत. मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल, शराबी, कालिया, शहंशाह या सगळ्या व्यक्तिरेखा कादरखान यांच्याकडेच गेल्या. अमिताभच्या यशाचे श्रेय स्वतःच्या अभिनयाबरोबरच लेखक-दिग्दर्शकाकडेही जाते. सलीम-जावेद यांच्या जोडीने कादरखान यांनीही अमिताभला कसदार संवाद दिले. मुंबईया हिंदी लोकप्रिय करण्यात कादरखान यांचा वाटा आहे.
तर्क आणि कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप, हा त्यांच्या संवादाचा महत्वाचा भाग.  दिग्दर्शकाच्या मनात व्यक्तिरेखा कशी आहे, हे ते समजावून घेत. कित्येकदा व्यक्तिरेखांचा आकृतीबंध ठरवण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शक त्यांना देत. म्हणूनच एकाच चित्रपटातील खूप व्यक्तिरेखा स्वतंत्र वाटतात, ते त्यांनी लिहिलेल्या संवादांमुळे. मूळची आवड अभिनयाची असल्यामुळे कादरखान संवादांबरोबरच भूमिकाही साकारत गेले. सदुसष्ट ते पंचाहत्तर किरकोळ व्यक्तिरेखा, पंच्याऐंशीपर्यंत खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा असा त्यांचा प्रवास सुरु होता. मग शक्तिकपूरसह जोडी जमवली. या जोडगोळीने पडद्यावर धुमाकूळ घातला. विनोदी खलनायक हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला. नव्वदनंतर गोविंदासह विनोदी आघाडी उभारली आणि तीही यशस्वी करुन दाखविली.


कादरखान यांनी एकोणीसशे पंचाहत्तर नंतरच्या सर्वच अभिनेत्यांसाठी संवाद लिहिले आहेत आणि त्यांच्याबरोबर कामही केले आहे. मायावी नगरीतील हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व. अतिशय बहुश्रुत असणाऱ्या या माणसाने संवादात भूत-वर्तमान-भविष्याचे उत्तम संदर्भ, म्हणी, वाक्प्रचार, शायरी यांचा प्रभावी वापर केला आहे. हे न जाणणाऱ्या लोकांनी च्यावर 'शब्दबंबाळ' हा शिक्का मारला आहे. दुहेरी अर्थाचे संवाद लिहिण्यात ते हिंदीतील दादा कोंडके आहेत, हीही टीका त्यांच्यावर झाली आहे.

'म्हातारपण आलं होतं पण मला काम करताना पाहून तसंच हात हलवत परत गेलं' असं म्हणणार्र्या कादरखानकडे जिथे म्हातारपणासाठीदेखील वेळ नाही, तीथे असल्या टिकाकारांची काय कथा?
फिल्मी दुनियेतील आपल्या कारकिर्दिबरोबरच आपल्या ज्ञातिबांधवांसाठीही त्यांनी भरपूर कार्य करून ठेवलं आहे. आपल्या केके फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ईस्लाम धर्म आणि मुस्लीम कायदा याबाबर जागृती निर्माण करण्याचं कार्य ते करत आहेत. मुळात अतिशय धार्मिक असलेल्या कादर खान यांनी मुस्लीमांनी कोत्या विचारसरणीचा त्याग करून नव्याचा स्विकार केला पाहिजे, असा विचार मांडला आहे. ह्युस्टनच्या मुस्लीम समुदायाने शहराचं मानद नागरिकत्त्व देऊन त्यांचा सन्मानही केला आहे.


वयाच्या पंच्याहत्तरीच्या जवळ आल्यावर कादर खान यांनी फिल्मी दुनियेला रामराम ठोकला. हे धाडस तर हाच माणूस करू जाणे. त्यांनी मुंबईदेखील सोडली आणि थेट दुबई गाठली.  आता काही मोजक्या चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भुमीका (आग्रहास्तव) आणि दुबईत उर्दु आणि  अरबी भाषेचे अध्यापन हे त्याचा जिवनक्रम झाला आहे. परत एकदा  आपल्या  आवडत्या प्राध्यापकी पेशामध्ये मन रमवतांना कादर खान अनेकांपुढे आदर्श ठेवून जातात, नाही का?
(दैनिक तरूण भारत मध्ये प्रकाशित झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण)

Wednesday 1 June 2011

रेमो फर्नांडिस



गोवा म्हणजे फक्त बीचेस, तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक आणि बेधुंद वातावरणाचा आनंद घेणारी तरूणाई एवढीच गोव्याची ओळख आजही बर्र्याच लोकांच्या मनात आहे. पण या सगळ्याच्या व्यतिरिक्त असलेला, सदैव हिरव्या रंगात न्हालेला, शांत, देवळातून रमलेला गोवाही आहे. गोवा म्हणजे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी अनेकांची समजूत आहे. प्रत्यक्षात गोवा मात्र बराचसा वेगळा आहे. भारतावर दिडशे वर्ष ईंग्रजांची सत्ता होती, मात्र गोवा तब्बल चारशे वर्ष पोर्तुगिज सत्ताधिशांच्या जुलमी राजवटीखाली पिचत होता. असं जरी असलं, तरी गोव्याच्या लोकांनी आपली संस्क़ृती जपली. येत्या तीस मे या दिवशी गोवेकर एक्कावनावा गोवा राज्य दिन साजरा करतील. हिंदु-मुस्लीम आणि ख्रिश्चन संस्कृतींचा अनोखा मेळ गोव्यात पहायला मिळतो. गोव्यात कलाकारांची घरं आहेत, आणि घराघरात कलाकार आहेत. रेमो फर्नांडिस हे यापैकीच एक नाव.

गोव्याबद्दल गोव्याच्या बाहेर जसे अनेक समज-गैरसमज आहेत, तसेच गोव्याच्या या पॉप-रॉक आणि फ्युजन गायकाबद्दलही आहेत. रेमोला नवी पिढी ओळखते ती त्याच्या 'ओ मेरी मुन्नी' या एकमेव हिंदी गाण्यांच्या अल्बमवरून. याहून थोडं मागे गेल्यास 'प्यार तो होना ही था' या अजय देवगण-काजोल च्या चित्रपटाच्या शिर्षकगिताचा गायक म्हणून आणि त्यापेक्षाही थोडं मागे गेल्यास 'बॉम्बे' चित्रपटात रेमोने गायलेल्या 'हम्मा, हम्मा' या गाण्यावरून त्याची ओळख अनेकांना पटेल. त्यापेक्षाही जुन्या लोकांना रेमोने गायलेल्या 'ये है जलवा' या गाण्यावर थिरकणारी अर्चना पुरणसिंग आठवेल. मात्र हिंदी चित्रपटात रेमोने गायलेली गाणी ही त्याच्या संगितक्षेत्रातील कारकिर्दीचा एक टक्का देखील  परिचय करून देण्यास समर्थ नाहीत, ईतकी त्याची या क्षेत्रातील कारकिर्द मोठी आहे. आपल्याकडे प्रसिद्धीचा हव्यास  न धरता दोन-दोन तीन-तीन तपे शास्त्रीय संगिताची साधना करणारे गायक आहेत. लुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस गेल्या चार तपांपासून पाश्चात्य संगिताची साधना करतोय, भक्तीभावाने या कलेची पुजा त्याने बांधली आहे.

१९५३ साली पणजी येथे बर्नॅर्डो आणि लुईझा फर्नांडिस या गोवन कॅथोलीक दाम्पत्याच्या पोटी रेमो चा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडिल गोव्यातील समाजवादि चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते. घरात रॉक-पॉप संगिताचं वातावरण अजिबातच नव्हतं. एक दिवस रेक्स नावाच्या रेमोच्या चुलत भावाने पुण्याहून 'रॉक अराउंड द क्लॉक' नावाची एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली. 'बिल हॅलॅ ऍण्ड हीस कॉमेटस' या अमेरिकेतल्या गाजलेल्या रॉक ऍण्ड रोल बॅण्डने तयार केलेल्या या रेकॉर्डने रेमोचं आयुष्यच बदलवून टाकलं. या वेळी रेमोचं वय होतं अवघं आठ वर्ष. त्यानंतरची दहा वर्ष रेमोने रॉक-पॉप क्षेत्रातील गुरूंची एकलव्य-स्टाईल मुशाफिरी करण्यात घालवली. ईल्व्हीस प्रिसले, क्लीफ रिचर्डस्, द शॅडोस, द रोलींग स्टोन्स, आणि द बिटल्स -- एक ना अनेक रॉक बॅण्डला ऐकत तो मोठा होउ लागला. सत्तरच्या दशकात रॉक संगिताने अमेरिकेच्या सिमा उल्लंघून जगाला वेड लावायला सुरवात केली. लॅटीन, आफ्रिकन, वेस्टर्न क्लासिकल, आणि जॅझ संगिताबरोबर रॉक म्युजिक चे फ्युजन बनु लागले, आणि हळूहळू 'लेट्स रॉक' हे सगळ्या जगाचंच आवडतं वाक्य बनलं. रेमो त्या वेळी शाळकरी होता. मात्र शाळेतील चार मित्रांबरोबर त्याने 'बिट फोर' नावाचा रॉकबॅण्ड तयार केला होता. या बॅण्डबरोबर काम करतांना त्याच्या हाती गिटार आली, आणि तेव्हापासून बास गिटार आणि रेमो यांचं अतुट नातं जुळलं ते आजतागायत कायम आहे. गिटारवर रेमोची बोटं किती जादूईरित्या फिरतात याचा अनुभव नुकताच ए आर रहमान च्या कार्यक्रमात नागपूरकरांनी घेतला.

शालेय शिक्षण संपवून रेमो आर्किटेक़्ट बनण्यासाठी मुंबईला आला. मायानगरी म्हणजे कलाकारांचं नंदनवनच. कॉलेजला बुट्टी मारून गिटार वाजवण्याच्या कार्यक्रमांना जाणे हा रेमोचा आवडता उद्योग बनला. या कालावधीत त्याने हिंदी आणि मराठी भाषा शिकली. सितार आणि बासरी कशी वाजवायची हे तो स्वतःहूनच शिकला. आज हिंदी, मराठी, कोकणी, ईंग्रजी, पोर्तुगिज आणि फ्रेंच या भाषांमध्ये तो गाणी लिहतो. गोवन, पोर्तुगिज, सेगा, मॉरिशस आणि सिसेलस,  आफ्रिकन, लॅटिन, क्युबा, निकाराग्वा या सगळ्या संगितप्रकारांमध्ये ही गाणी कंपोज करतो. आणि जगभर  ही गाणी सादर करतो. गोव्यात लहानाचा मोठा होत असतांना रेमोने अनेक युरोपिअन हिप्पी पाहिले होते. तेव्हाच त्याने युरोपमध्ये 'ईंडियन हिप्पी' बनुन जायचं असं ठरवलं होतं. आज आपलं स्वप्न तो जगतोय.
मुंबईतील चार वर्षांचं वास्तव्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॅण्डबरोबर केलेले युरोप आफिकेचे दौरे रेमोला गोव्यापासून तोडू शकले नाहीत. युरोपमध्ये स्थायिक होण्याची सुवर्णसंधी जवळ असतांना हा  अवलीया भारतात परत आला. गोव्यात मात्र त्याचं हवं तसं स्वागत झालं नाही. 'घर की मुर्गी दाल बराबर' या भारतीय लोकांच्या स्वभावाचा त्याला परिचय आला. ईंग्रजीत लिहलेली आणि कंपोझ केलेली रेमोची गाणी रेकॉर्ड करायला एकही कंपनी तयार होई ना. आणि आपल्या संगित साधनेशी तडजोड करायला रेमो तयार नव्हता. १९८० च्या दशकामध्ये भारतीय रेडिओ स्टेशन्सवरदेखील रॉक पॉप संगिताला अनुकुल वातावरण नव्हते. त्यामुळे गाणं लोकांपुढे आणावं कसं, हा यक्षप्रश्न रेमोपुढे होता. मात्र हार मानेल तो रेमो कसला?
गोवन क्रेझी नावाची एक रेकॉर्ड कॅसॅट त्याने पोर्टास्टुडिओ या घरघुती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली. यातली सगळी गाणी रेमोनं स्वतः लिहली, संगितबद्ध केली आणि रेकॉर्ड केली. गाण्यातील विविध आवाज त्याने एकट्याने काढले. सगळी वाद्ये स्वतःच वाजवली. स्वतःच साउंड ईंजिनिअर बनुन या अल्बमचं मिक्सिंग केलं. अल्बमचं कव्हरही स्वतःच डिझाईन केलं. आणि मुंबईला जाऊन कॅसॅटसच्या प्रती काढून आणल्या. या कॅसॅटस घेऊन तो आपल्या तुटक्या स्कुटरवर गोव्यातील मार्केटमध्ये स्वतः फिरायला लागला. दुकानदारांना आणि ग्राहकांना  आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या गाण्याच्या बोलांचं एक पुस्तकही स्वतःच्या हस्ताक्षात लिहून स्वतःच सायक्लोस्टाईल प्रिंटरवरती प्रकाशित केलं. शिवाय पोस्टकार्ड, टि शर्ट्स आणि टोप्यांवरती आपल्या अल्बमचं चित्र काढून या गोष्टी कॅसॅटसबरोबर वाटायला सुरवात केली. याला मेहनत म्हणावे की साधना की वेड म्हणावे? हे अविश्वसनिय काम रेमोने एक दोन नव्हे, तर तब्बल सहा वर्षांपर्यंत केलं. 'गोवन क्रेझी' नंतर त्याने ओल्ड गोवन गोल्ड आणि ईतर कॅसॅटसही प्रकाशित केल्या.
सन १९८६. पंतप्रधान राजिव गांधी यांची गोवा भेट. या भेटीदरम्यान रेमोने 'हॅलो राजीव गांधी' हे गाणं स्टेजवर सादर केलं. यात राजीव गांधी यांना 'ड्युड, बडी' अश्या एकेरी संबोधनांनी संबोधीत केल्यामुळे रेमो नव्याच वादामध्ये फसला. मात्र शेवटी राजीव गांधींनीच हे गाणं आपल्याला मनापासून आवडल्याचं जाहीर केलं आणि रेमोची या वादातून सुटका झाली. यामुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मात्र मिळाली. २००७ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही याची पावतीच म्हणावी लागेल.

रॉक म्युजीकचा उपयोग जन-आंदोलनादरम्यान लोकांच्या भावना बोलत्या करण्यासाठी केला जातो, याची रेमोला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी झालेल्या संगितमय कार्यक्रमामध्ये स्वतःसाठी दोन गाणी मागुन घेतली. हा कार्यक्रमा आणि त्यानिमित्ताने ही गाणी त्यावेळला दुरदर्शनवरून संपुर्ण देशभर दाखवली गेली  आणि रेमोचं नाव युवकांच्या ओठावर येऊ लागलं. याच दरम्यान जलवा चित्रपटाचं शिर्षकगित गाण्याची ऑफर त्याला आली आणि तेव्हा मुंबईतच असल्यामुळे त्याने सहज म्हणुन ते गाणं गायलं. पुढे या गाण्याने काय चमत्कार घडवला ते आपण जाणतोच.

बॉलीवूड मध्ये नावारूपाला आल्यावर मुंबई सोडण्याचं जीगर मोठमोठे कलाकार दाखवू शकत नाहीत. रेमो मात्र या सगळ्याला अपवाद आहे. कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) संगितकाराने बनवलेलं गाणं कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) गितकाराने लिहलेलं गित आपण त्यांच्या स्टाईलमध्ये गायचं, म्हणजे आपल्या संगिताचा अपमान आहे असं त्याचं मत होतं. त्यामुळे बॉलीवुडसाठी गाणी म्हणायचं त्याने टाळलं. १९९५ मध्ये ए आर रेहमान ने मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 'हम्मा हम्मा' हे गाणं गाण्यासाठी रेमो ला विनंती केली. या गाण्याचे हिंदी बोल मात्र मी लिहणार, आणि ते माझ्या पद्धतीने सादर करणार, असा बाणेदारपणा प्रत्यक्ष रहमानला दाखवण्याचं धाडस रेमोच करू जाणे. मात्र या गाण्याने रेमोबरोबरच रेहमानसाठीही रसिकांच्या मनाची कवाडे खुली केली, यात शंका नाही.

या दरम्यान रॉक सिंगर म्हणुन त्याचे  अनेक अल्बम्स येत गेले आणि ते भारतीय उपखंडाबरोबरच युरोपातही लोकप्रिय होत गेले. मात्र हे सगळं काम रेमोने गोव्यात राहूनच करायचं असं ठरवलं होतं. गोवा या  आपल्या जन्मभुमिबद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाचं ते प्रतिक आहे. ख्रिस्चन आणिहिंदू संस्कृतीचा मिलाप असलेल्या गोवा सिओलीम झागोर फेस्टीवल मध्ये रेमोच्या गाण्याशिवाय लोकांचे मन भरत नाही. शिवाय गोव्याचा गणेशोत्सव रेमोच्या बासरिशिवाय पुरा होत नाही. रेमोच्या घरीदेखील गणपतीबाप्पा येतात आणि दहा दिवसांचा उत्सव साजरा होतो. मुळची फ्रेंच असलेली त्याची पत्नी मिशेल आणि दोन मुले आजही गोव्यातील सिओलीम या खेड्यात असलेल्या त्यांच्या पैतृक घरातच राहतात. मुले राज्य शासनाच्या शाळेत जातात. गोव्याच्या राजकारणात आपल्या वडिलांचा समाजवादाचा संदेश रेमो आपल्या गाण्याच्या माध्यमातून पसरवत असतो. कोकणी भाषेतील त्याची गाणी निवडणुकीदरम्यान प्रचारात वापरली जातात. गोव्याच्या उत्कर्षासाठी तेथील राजकारण्यांवर आणि राजकारणावर तो नेहमीच कडक शब्दात टिका करत असतो. आणि हे सगळं गोव्यावर असलेल्या प्रेमापोटी. गोवा राज्य दिनाच्या निमित्ताने गोव्यावर मनापासून प्रेम करणार्र्या या अवलीया संगितकाराची आठवण होणं सहाजीकच नाही का?

(दैनिक तरूण भारत मध्ये दिनांक प्रकाशित झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण)