Sunday 5 June 2011

कादर खान

सध्या निकालांचा मोसम आहे. मात्र बारावीच्या बोर्डाच्या परिक्षांच्या निकालांपेक्षाही विद्यार्थ्यांना उत्सुकता होती ती आय आय टी जे ई ई च्या प्रवेश परिक्षेच्या निकालाची. कारण आय  आय टी मध्ये प्रवेश म्हणजे उज्ज्वल भविष्याची हमी असते. एकदा का येथून ईंजिनिअर झालं, म्हणजे ईंजिनिअरिंगबरोबरच ईतर अनेक क्षेत्रांचे दरवाजेदेखील खुले होतात. दक्षीणेतला सुपरस्टार नागार्जुन असो, किंवा पर्यावरणमंत्री जयरामरमेश असो, लेखक चेतन भगत असो, किंवा कवी कुमार विश्वास असो, हे सगळे ईंजिनिअरच आहेत. आणि "रिश्तेमें तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह" हे तुफान गाजलेलं वाक्य ज्यांच्या लेखणीतून उतरलं आहे ते  पटकथा लेखक कादर खानही मुळात ईंजिनिअरच आहेत.

कादर खान म्हटलं की एक विनोदी किंवा चरित्र अभिनेता अशी छवी युवकांसमोर उभी राहिल. गोविंदा किंवा शक्ती कपूरबरोबर विनोदी चित्रपटात टिवल्याबावल्या करणारा कादरखान अनेकांना आठवेल. जरा जुन्या पिढीतल्या लोकांना 'परवरिश', 'अमर अकबर अंथोनी', 'खून पसीना' , 'मुकद्दर का सिन्दर' , 'सुहाग' , 'लावारिस' ,देशप्रेमी' , 'शराबी'  ईत्यादी चित्रपटांतून दिसणारा किंवा या चित्रपटांच्या संवादातून लक्षात राहणारा कादर खान आठवेल.
यापेक्षाही जुन्या लोकांना आठवेल तो मुंबईच्या एम एच साबु सिद्दीक पॉलीटेक्नीक कॉलेजच्या स्नेहसंमेलनात अभिनय करताना दिलिपकुमारच्या नजेरेने हेरलेला आणि त्याला 'बैराग' मध्ये छोटीशी भूमिका दिलेला एक युवा कलाकार.
मात्र उर्दू, पर्शियन आणि पश्तुनी भाषेतील शंभराहून अधीक पुस्तके लिहणारा साहित्यीक कादर खान; रंगभुमी, स्तानिलावस्की, गोर्की, चेखव, दोस्तोवयस्की, ग़ालिब , कबीर यांच्या साहित्यावर टिका लिहणारा समिक्षक कादरखान; शंभराहून अधीक गरिब मुलांना शिक्षण देणारी एक संस्था चालवणारा समाजसेवक कादर खान; आणि सध्या दुबईमध्ये अनिवासि दुबईकरांना अरबी आणि उर्दु शिकवणारा; ह्युस्टनमध्ये एंटरनॅशनल ड्रामा स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणारा; सुभाष घईं आणि अनुपम खेर यांच्या ऍक्टींग स्कुल्समध्ये विषेश निमंत्रीत अध्यापक असलेला;  'उस्ताद,' गुरुजी, मास्साब, सर, किंवा प्रोफ़ेसर कादर खान अनेकांना माहिती नाहीय.
बलुचिस्तानमधील पिशिन प्रांतातल्या एका खेड्यात १९३५ साली जन्मलेला एक माणूस स्वतःभोवती ईतकं सगळं वलय निर्माण करतो काय, आणि या मोहमयी रूपेरी दूनियेतून स्वतःला अलगदपणे वेगळं करून परत आपल्या साहित्य आणि शिक्षणाच्या दूनियेत स्वतःला गुंतवून घेऊ शकतो काय -- कादर खान यांची साडेसात दशकांची वाटचाल अचंबित करणारी आहे.
बलुचिस्तानमधून आपल्या भाषाशास्त्रज्ञ वडिलांबरोबर मुंबईला येणं कादर खान यांच्यासाठी स्वप्नवतच होतं. मुंबईच्या कमाठीपुरा भागातल्या गल्लीबोळात वसलेल्या एका छोट्याश्या घरात राहून, अनेकदा कागद न मिळाल्यामुळे घराच्या फरशीवर खडूने गणिते सोडवण्याचा सराव करून, ईस्माईल युसुफ कॉलेजमधून कादर खान ने सिव्हील ईंजिनिअरींगची पदवी प्राप्त केली. सुदैवाने भायखळ्यातला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एक छोटीशी नोकरीही लागली. स्वतः मोठे अभ्यासक असलेल्या वडिलांचं आपला मुलगाही प्राध्यापक व्हावा हे स्वप्न होतं, ते कादर खान ने पुर्ण केलं. थ्योरी ऒफ स्ट्रक्चर, हायड्रोलिक्स, स्ट्रेन्थ ऑफ मेटेरियल , आरसीसी स्टील -- प्राध्यापक महोदयांचे सगळे विषय त्यांच्या वडिलांच्या भाषा, साहित्य, संस्कृती आणि लोकजीवन या विषयांपेक्षा पुर्णतः वेगळे होते. तरिदेखील अनेकदा वडिल कुणाच्याही नकळत त्यांच्या वर्गात जाऊन बसत.

'आप मेरी क्लास में क्यों आते हैं?' -- मुलगा विचारायचा.
- 'सीखने के लिए.' वडिलांचं उत्तर! "सीखने की कोई उम्र नहीं होती , कहीं भी , कभी भी, कुछ भी सीखा जा सकता है. मैं यहाँ एक अच्छे अध्यापक से अध्यापन कला के गुर सीखने आता हूँ ।"


शिकवता शिकवताच महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांबरोबर अभिनयही करायला लागायचा. अश्याच एका स्नेहसंमेलनात सुपरस्टार दिलिपकुमारने हा हिरा हेरला आणि आपल्या एका चित्रपटात छोटीशी भुमिका दिली. नव्या प्रवासाची हीच सुरवात. दिलिपकुमारच्या निवडीमुळे कादरखान अचानक चमचमत्या दुनियेत आले. ओळखी वाढत गेल्या. चौऱ्ह्यात्तर साली मनमोहन देसाई 'रोटी' बनवत होते. त्याच्या शेवटच्या प्रसंगातील संवाद लिहिण्याचे काम त्यांना मिळालं. सहज म्हणुन लिहलेले काही संवाद देसाईंना इतके आवडले की त्यांनी खिशात असतील नसतील तेवढ्या नोटा काढून कादरखानच्या खिशात कोंबल्या. सगळीकडे हेच उद्गार काढले जाऊ लागले -- "क्या डायलॉग लिखा है कादरखानने!"

देसाईंनी पुढचे सगळेच कादरखानकडे सोपवले. अमर-अकबर-अँथनी, परवरिश, कूली, नसीब, सुहाग -- चमकदार संवाद लिहिणारा माणूस सापडला म्हटल्यावर प्रकाश मेहराही, टिनू आनंदही मागे राहिले नाहीत. मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल, शराबी, कालिया, शहंशाह या सगळ्या व्यक्तिरेखा कादरखान यांच्याकडेच गेल्या. अमिताभच्या यशाचे श्रेय स्वतःच्या अभिनयाबरोबरच लेखक-दिग्दर्शकाकडेही जाते. सलीम-जावेद यांच्या जोडीने कादरखान यांनीही अमिताभला कसदार संवाद दिले. मुंबईया हिंदी लोकप्रिय करण्यात कादरखान यांचा वाटा आहे.
तर्क आणि कल्पनाशक्तीची उत्तुंग झेप, हा त्यांच्या संवादाचा महत्वाचा भाग.  दिग्दर्शकाच्या मनात व्यक्तिरेखा कशी आहे, हे ते समजावून घेत. कित्येकदा व्यक्तिरेखांचा आकृतीबंध ठरवण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शक त्यांना देत. म्हणूनच एकाच चित्रपटातील खूप व्यक्तिरेखा स्वतंत्र वाटतात, ते त्यांनी लिहिलेल्या संवादांमुळे. मूळची आवड अभिनयाची असल्यामुळे कादरखान संवादांबरोबरच भूमिकाही साकारत गेले. सदुसष्ट ते पंचाहत्तर किरकोळ व्यक्तिरेखा, पंच्याऐंशीपर्यंत खलप्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा असा त्यांचा प्रवास सुरु होता. मग शक्तिकपूरसह जोडी जमवली. या जोडगोळीने पडद्यावर धुमाकूळ घातला. विनोदी खलनायक हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला. नव्वदनंतर गोविंदासह विनोदी आघाडी उभारली आणि तीही यशस्वी करुन दाखविली.


कादरखान यांनी एकोणीसशे पंचाहत्तर नंतरच्या सर्वच अभिनेत्यांसाठी संवाद लिहिले आहेत आणि त्यांच्याबरोबर कामही केले आहे. मायावी नगरीतील हे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व. अतिशय बहुश्रुत असणाऱ्या या माणसाने संवादात भूत-वर्तमान-भविष्याचे उत्तम संदर्भ, म्हणी, वाक्प्रचार, शायरी यांचा प्रभावी वापर केला आहे. हे न जाणणाऱ्या लोकांनी च्यावर 'शब्दबंबाळ' हा शिक्का मारला आहे. दुहेरी अर्थाचे संवाद लिहिण्यात ते हिंदीतील दादा कोंडके आहेत, हीही टीका त्यांच्यावर झाली आहे.

'म्हातारपण आलं होतं पण मला काम करताना पाहून तसंच हात हलवत परत गेलं' असं म्हणणार्र्या कादरखानकडे जिथे म्हातारपणासाठीदेखील वेळ नाही, तीथे असल्या टिकाकारांची काय कथा?
फिल्मी दुनियेतील आपल्या कारकिर्दिबरोबरच आपल्या ज्ञातिबांधवांसाठीही त्यांनी भरपूर कार्य करून ठेवलं आहे. आपल्या केके फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून ईस्लाम धर्म आणि मुस्लीम कायदा याबाबर जागृती निर्माण करण्याचं कार्य ते करत आहेत. मुळात अतिशय धार्मिक असलेल्या कादर खान यांनी मुस्लीमांनी कोत्या विचारसरणीचा त्याग करून नव्याचा स्विकार केला पाहिजे, असा विचार मांडला आहे. ह्युस्टनच्या मुस्लीम समुदायाने शहराचं मानद नागरिकत्त्व देऊन त्यांचा सन्मानही केला आहे.


वयाच्या पंच्याहत्तरीच्या जवळ आल्यावर कादर खान यांनी फिल्मी दुनियेला रामराम ठोकला. हे धाडस तर हाच माणूस करू जाणे. त्यांनी मुंबईदेखील सोडली आणि थेट दुबई गाठली.  आता काही मोजक्या चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भुमीका (आग्रहास्तव) आणि दुबईत उर्दु आणि  अरबी भाषेचे अध्यापन हे त्याचा जिवनक्रम झाला आहे. परत एकदा  आपल्या  आवडत्या प्राध्यापकी पेशामध्ये मन रमवतांना कादर खान अनेकांपुढे आदर्श ठेवून जातात, नाही का?
(दैनिक तरूण भारत मध्ये प्रकाशित झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण)

No comments:

Post a Comment