Sunday 19 June 2011

डंकन फ्लेचर

सुरेश रैनाच्या नेतृत्त्वात कॅरॅबियन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला सुरवातीला 'कच्चा लिंबु' म्हटलं गेलं असलं, तरीदेखील लागोपाठ तीन सामन्यांमध्ये वेस्टईंडिजला धूळ चारून या खेळाडूंनी आपण 'नवा गडी नवं राज्यं' करणार असल्याचं सिद्ध केलंय. या नव्या गड्यांबरोबरच आणखी एक नवा गडी एक नवं राज्य सुरू करू बघतोय. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रूजू झालेले डंकन फ्लेचर यांनी आपली पहिली चाचणी परिक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण केली आहे. आणि प्रशिक्षक या स्वरूपात फ्लेचरचा एंकंदर अनुभव पाहता, येत्या परिक्षांमध्येही ते हाच निकाल कायम ठेवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद हा एक काटेरी मुकुट आहे. क्रिकेट प्रशिक्षण दुनियेमध्ये आजच्या तारखेला हे पद सर्वात जास्त दबावाचे मानले जाते. गुरू गॅरी कर्स्टनच्या मार्गदर्शनात नुकताच विश्वविजेता ठरलेल्या भारतीय संघाच्या पुढच्या वाटचालीची धूरा एखाद्या अनुभवी खांद्यांवर टाकणंच आवश्यक होतं, आणि त्यामुळेच बिसिसिआयने डंकन फ्लेचरची नियुक्ती केली असावी. ४२ वर्षाच्या गॅरी कर्स्टनच्या तुलनेत ६२ वर्षांच्या फ्लेचरचा अनुभव सर्वच दृष्टीने दांडगा आहे.

डंकन ऍंड्र्यु ग्वेन फ्लेचर हे झिम्बाब्वेचे माजी कर्णधार आणि इंग्लंडचे माजी प्रशिक्षक आहेत. झिम्बाब्वेमधील हरारे जवळच्या (त्या वेळी र्र्होडेशिया) सॅलीसबरी मध्ये आपल्या पाच भावंडांबरोबर वेगवेगळे खेळ खेळतच डंकनचं लहानपण गेलं. मुळात र्र्होडेशिअन शेतकरी परिवारांमध्ये मैदानावर जाऊन खेळ खेळणे हा रोजच्या सवयीचाच भाग असतो. ईंग्रजांच्या राजवटीदरम्यान ईंग्रजी खेळांचा प्रभाव फ्लेचर भावंडांवर झाला. डंकनची बहिण ऍन ग्रॅण्ट ही झिम्बाब्वेच्या फिल्ड हॉकी संघाची कर्णधार होती. तीच्या नेतृत्वात १९८० च्या मॉस्कॉ समर ऑलीम्पीक्समध्ये झिम्बाब्वेने फिल्डहॉकीचे सुवर्णपदकही जिंकले होते. शिवाय डंकनचा भाउ ऍलन हा देखील सत्तरच्या दशकात र्र्होडेशिया कडून फर्स्टक्लास क्रिकेट खेळत होता. याच दरम्यान डंकनने झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचे नेतृत्त्वच केले. १९८२ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली झिम्बाब्वेने आयसिसि ट्रॉफी जिंकली. १९८३ च्या (भारताने जिंकलेल्या) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत डंकन फ्लेचरच्या झकास कामगिरीमुळे झिम्बाब्वेला बलाढय़ ऑस्ट्रेलिया संघावर विजय मिळविता आला होता. फ्लेचर यांनी ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. बहिण राष्ट्रीय हॉकी संघाची कर्णधार, भाउ क्रिकेट संघाचा कर्णधार, आणि दूसरा भाऊ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असा योग जुळून येण्याची कदाचीत ती पहिलीच वेळ असावी.

मात्र खेळाडू म्हणून फ्लेचरची कादकिर्द हवी तशी बहरली नाही. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाज असलेल्या फ्लेचरने सहा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ४७.७५ च्या सरासरीने १९१ धावा काढल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट आहे ६६.०८. त्यांच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. त्यांची सर्वोत्तम खेळी नाबाद ७१ धावांची आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. सहा सामन्यांत २२१ धावांत ७ बळी ही त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधली कामगिरी. प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात त्यांच्या नावावर एकही शतक नाही. १११ प्रथम दर्जाच्या सामन्यात २३.६७ सरासरीने ४०९५ धावा त्यांच्या नावावर आहे. त्यात २० अर्धशतकांचा समावेश आहे. खेळाडू म्हणून जास्त न गाजलेली त्यांची कारकिर्द प्रशिक्षक म्हणुनच खुप गाजली. १९९९ मध्ये फ्लेचर यांनी इंग्लंड क्रिकेट संघाची सूत्रे हाती घेतली तेव्हा क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंड संघाचे ते पहिले विदेशी प्रशिक्षक होते. ईंग्लंडच्या माजी खेळाडुंसह ईतर दिग्गज क्रिकेटविरांनी त्यांच्या निवडिवर टिकास्त्रे सोडली होती. मात्र टिकेला शांततेने सामोरे जाणे आणि प्रसारमाध्यमांशी अतीशय मोजके बोलणे हे फ्लेचर यांचे सुत्र आहे. शिवाय डंकन फ्लेचर या नावाला खेळाडू म्हणुन फारसं वलय नाही. कारण महान क्रिकेटपटू ही प्रशिक्षक म्हणुन मोठी डोकेदुखी ठरते (उदा. ग्रेग चॅपल)कारण तो आपलं महानपण विसरून वावरू शकत नाही. मात्र फ्लेचर मीडियापेक्षा खेळाडूबरोबर जास्त वावरणारे आणि प्रशिक्षणाचं आधुनिक ज्ञान असलेले असे कोच आहेत. स्वतः एकही कसोटी सामना खेळलेला नसला, तरी देखील कसोटी मानांकनामध्ये तळाला गेलेल्या इंग्लंड क्रिकेट संघाला एक ताकतवान संघ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा फ्लेचर यांचा सिंहाचा वाटा आहे. आज कसोटी मानांकनांमध्ये इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. २००५ मध्ये ऍशेस मालीकेत ऑस्ट्रॅलीयाला त्यांनी चारलेली धूळ आजही क्रिकेटजगतात आठवली जाते. ऑस्ट्रेलियाचा पतनाचा प्रारंभ नेमका या क्षणापासून झाला, असं म्हणाल्यास अतिशयोक्ती ठरू नये. अठरा वर्षानंतर ऍशेसवरती ईंग्लंडचे वर्चस्व निर्माण करण्यात मोलाची भुमिका बजावल्याबद्दल ब्रिटिश शासनातर्फे फ्लेचर यांना ईंग्लंडचं नागरिकत्त्व तर बहाल करण्यात आलंच, शिवाय 'ऑफीसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर' हा सन्मानाचा खिताबही देण्यात आला.

कसोटीमध्ये इंग्लंडचे मानांकन चांगले असले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र डंकन फ्लेचर यांच्या कार्यकाळात इंग्लंडला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडला त्यांच्या कारकीर्दीत ७५ विजय तर ८२ पराजय पत्करावे लागले.

कसोटीमध्ये इंग्लंडचे मानांकन चांगले असले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र डंकन फ्लेचर यांच्या कार्यकाळात इंग्लंडला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्या काळात खेळल्या गेलेल्या विश्वचषकांदरम्यान ईंग्लंडला सन्माननिय आव्हानही उभे करता आले नाही. त्यामुळे फ्लेचरच्या कार्यक्षमतेवर ताशेरेही ओढले गेले.

भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणुन निवड झाल्यावरही फ्लेचरवरती विविध क्षेत्रातून टिका झाली. कपिल देवने 'कोण हा डंकन फ्लेचर' असा सरळ सवाल करून खळबळ माजवून दिली. (खरेतर कपिल देवच्या १९८३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील १७५ धावांच्या खेळीचा डंकन फ्लेचर हे साक्षीदार आहेत.) शिवाय सुनिल गावसकरनेही भारतीय प्रशिक्षकाला संधी द्यायला हवी होती, असे म्हणुन फ्लेचर यांच्या निवडिलाच सुरंग लावला होता. "आम्हाला प्रशिक्षक मिळेल, पण कर्स्टन मिळणार नाही" असं म्हणुन हरभजन सिंगने नव्या प्रशिक्षकाचं स्वागत केलं होतं. मात्र या सगळ्यांवर प्रतिक्रीया व्यक्त करण्याचं टाळत फ्लेचरने पहिल्या लढ्यात स्वतःची सरशी केली. यजमान विंडीज संघाला पराभवाची धूळ चारून ३-० च्या आघाडीने भारतीय संघाने मालिकेवर तिरंगा फडकावल्यानंतर मग "येत्या दशकापर्यंत तरी क्रिकेटविश्वावर भारतीय संघाचेच निर्विवाद वर्चस्व कायम राहणार" असे वक्तव्य त्यांनी केले. यावरून 'आधी केले, मग सांगितले' ही त्यांची वृत्ती दिसुन येते.

क्रिकेट जगताकडून टिकास्त्रे झेलत असतांनाच २००७ मध्ये फ्लेचरने 'रग्बी' खेळाचे सल्लागार म्हणुन काम करणार असल्याचं जाहिर केलं. रग्बीचा थरार हा क्रिकेटपेक्षाही काकणभर जास्तच असल्याचं ते मानतात. त्या खेळातही सल्लागार प्रशिक्षक होण्याईतपत कौशल्य त्यांच्या ठायी आहे. याव्यतीरीक्त आणखी एक कौशल्य फ्लेचरकडे आहे. ते म्हणजे त्यांचा साहित्य आणि संस्कृती या विषयांवरचा व्यासंग. वाचन हा त्यांचा आवडता पासटाईम असला, तरी, ते एक उत्तम लेखकही आहेत. याचा परिचय त्यांचे 'बिहाईंड द शेडस' हे त्यांचं हे आत्मचरित्र वाचतांना आपल्याला येईल. वाडवडिल ईंग्रजांच्या राजवटिचे सेवक असुनदेखील ब्रिटिश नागरिकत्त्व मिळवण्यासाठी त्यांना किती कष्ट झेलावे लागले, हे फ्लेचरच्या शैलीत वाचतांना वेगळीच मजा येते. भारतातील त्यांच्या दोन वर्षाच्या वास्तव्यादरम्यान विविधतेने नटलेल्या या भुमिबद्दल त्यांच्या लेखणीतून काहीतरी वेगळं वाचायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पूरवणी मध्ये प्रकाशित झालेले याच लेखाचे हे कात्रण. दि. १९ जुन २०११)

No comments:

Post a Comment