Monday 27 June 2011

नितिश भारद्वाज

२४ जुन १९९० या दिवसाचं वैशिष्ट्य काय? असं विचारल्यास आपण सगळेच विचारात पडू. मात्र 'महाभारत' मालिकेचा शेवटचा भाग याच दिवशी दुरदर्शनवरून प्रसारित झाला होता, हे आठवून दिल्यावर  आपल्यापैकी अनेकांचं मन 'रम्य ते दिवस' म्हणत भुतकाळात जाईल. वस्तीत एखाद्याच घरी असलेला क्राउन कंपनिचा शटरवाला टिव्ही, दोन मजली घरावर सत्तर-सत्तर फुट उंचावर लावलेला एन्टीना, मोठ्या भक्तीभावाने घरात जमलेली भाविकांची गर्दी, ओस पडलेले रस्ते, बंद दुकाने, आणि टिव्हीच्या पडद्यावर श्रीकृष्णाच्या रूपातल्या नितिश भारद्वाजला पाहताच टिव्हीसमोरच नतमस्तक होणारी मंडळी -- हा सगळा 'माहोल' ज्या दिवशीपासुन केवळ आठवणीपुरता उरला तो दिवस म्हणजे २४ जुन.
डॉक्टर नितिश भारद्वाज यांनी 'सेलिब्रिटी स्टेटस' पेक्षा कितीतरी पटीने अधीक प्रभावी असं हे 'डेईटी स्टेटस' पुष्कळ दिवसांपर्यंत अनुभवलंय. आजही दिसताक्षणी त्यांचे पाय धरणारे लोक कमी नाहीत. आणि भारद्वाज यांचा अभिनय, श्रीमद्भगद्गीतेवरील त्यांचा व्यासंग, आणि त्यांच्या ठायी असलेला उत्कृष्ठ वक्तृत्त्वाचा गुण पाहू जाता त्यांचे पाय धरण्यातही काहीच गैर नाही. एक जनावरांचा डॉक्टर अभिनयाच्या आवडीपोटी रंगभुमी, आणि टेलिव्हीजनच्या मागे लागतो, 'दूरदर्शन'मध्ये 'डय़ुटी ऑफिसर' म्हणून रूजू होतो, नंतर निवेदक होतो, आणि एक दिवस श्रीकृष्णाच्या भुमिकेत येऊन घराघरात आणि मनामनात आपलं स्थान कायमचं कोरून ठेवतो -- हे सगळं ईश्वरी योजनेशिवाय शक्य आहे का? शिवाय नितिश भारद्वाज माजी खासदार आहेत. मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे ते अध्यक्षदेखील होते. 'गीतारहस्य', 'अपराधी' ईत्यादी मालिकांबरोबरच गोळवलकर गुरूजींच्या जीवनावरील गाजलेल्या 'कर्मयोगी' या डॉक्युमेन्ट्रीचे चे ते निर्माते दिग्दर्शकदेखील आहेत. डॉ नितिश उत्तम छायाचित्रकार आहेत, पर्यटक आहेत, साहित्यीक आहेत, वक्ते आहेत, शिवाय महत्त्वाचं म्हणजे ते 'मराठी माणुस' आहेत! मुंबईकर आहेत!
होय. त्यांची जन्मभुमी आणि कलाक्षेत्रातली कर्मभुमीही मुंबईच. कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या 'चित्रपुर सारस्वत' समाजातील 'उपाध्ये' घराण्यामध्ये १९६२ साली नितिशजींचा जन्म झाला. नावाप्रमाणेच सरस्वतीचे पुत्र असलेल्या या लोकांमध्ये कलाक्षेत्राबद्दलची जाण आणि ओढ ही पिढिजात देणगीच असते. मध्यमवर्गिय मराठी घरात नितिशजींना अभिनयासाठी अभ्यासातून सुट नव्हती. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधून त्यांनी पशुचिकित्साशास्त्र आणि पशुपालनात शिक्षण पुरं केलं. गुरांचा डॉक़्टर म्हणुन करिअर सुरू करतांना एक दिवस 'वृंदावनी गोधने चारणार्या' श्रीकृष्णाची भुमिका आपल्याला करायची आहे हे नितिश भारद्वाजच्या ध्यानिमनीही नसेल.
अभिनयाची ओढ होतीच. राजबिंडं रूप, व्यक्तीमत्त्व, आणि भारदस्त आवाजही जवळ होता. मग प्रयत्न सुरू झाले. मुंबई दुरदर्शनमध्ये निवेदक म्हणुन डॉक्टर नितिश उपाध्ये रूजू झाला. निवेदन करणारा तरूण चेहरा हळुहळु सुपरिचीत होत गेला. दरम्यान बि आर चोप्रा 'महाभारत' बनवणार होते. श्रीकृष्णाच्या प्रमुख भुमिकेसाठी स्क्रीनटेस्ट्स सुरू होत्या. नितिशचं थोडंसं मिष्कील, थोडंसं गुढ, बरंचसं सांगुन जाणारं, आणि खुप काही राखुन ठेवणारं सुचक स्मीतहास्य दिग्दर्शक रवी चोप्राच्या मनाला भावलं. बस! निर्णय झाला! नितिश उपाध्येने छोट्या पडद्यावर नितिश भारद्वाज म्हणुन आगमन केलं, आणि मग ईतीहास बनला! १९८८ ते ९० या दोन वर्षात महाभारत घराघरात पोचलं, आणि श्रीकृष्ण मनामनात पोचले. नितिश भारद्वाजनंतर अनेकांनी श्रीकृष्ण केले. अगदी स्वप्नील जोशीसारख्या गोंडस तरूणापासून ते डॉक्टर सर्वदमन बॅनर्जींसारख्या विद्वानापर्यंत सगळ्यांनीच या भुमिकेत रंग भरून पाहिले. पण आजही श्रीकृष्ण म्हटलं की नितिश भारद्वाज हा एकच चेहरा डोळ्यापुढे येतो.
महाभारतातील कृष्णाच्या भुमिकेने नितिशचं जिवन बदलवून टाकलं. एके काळी केवळ अभिनेता होण्याचं स्वप्न बाळगणारा हा तरूण आता भगवद्गीतेच्या अभ्यासाकडे आकर्षित झाला. एका वेगळ्या दृष्टीकोणातून गीतेचा अभ्यास करणे सुरू झाले. श्रीकृष्ण हा दैवी दृष्टीकोनातून न पाहता तात्त्वीक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला. एक वैचारिक क्रांती घडवणारा क्रांतीकारी, जगावेगळी वाट धरायला न बिचकणारा एक विचारवंत, वीर पुरूष, आणि जगद्गुरू या दृष्टीने कृष्ण अभ्यासणे सुरू झाले.  'गीतारहस्य' या मालिकेची बैठक तयार होउ लागली.
या दरम्यान श्रीकृष्णाच्या ईपिक ईमेज मधून बाहेर येऊन अभिनय करण्याची धडपड सुरूच होती. १९९१ मध्ये पी पद्मराजन यांचा 'न्यान गंधर्वन' या मल्याळी चित्रपट मिळाला. यात एका लाकडाच्या पुतळ्यातून प्रकट होणार्र्या आणि केवळ नायिकेलाच दिसु शकणार्र्या नायकाची भुमीका केली. हा चित्रपट आजही मल्याळम चित्रसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. हिंदी आणि मराठी चित्रपटांत मात्र नितिशजींना हवं तसं यश मिळालं नाही. त्यांची 'श्रीकृष्ण' ही पॉप्युलर ईमेज या वेळी त्यांचं नुकसान करून गेली. मात्र या ईमेजचा अगदी चपखल वापर त्यांनी एका नव्या क्षेत्रात पाउल ठेवल्यावर त्यांना झाला. ते म्हणजे राजकारण!
श्रीकृष्णाच्या भुमिकेच्या निमित्ताने अनेक विद्वज्जनांशी आणि राजकिय नेतृत्त्वांशी त्यांचा संपर्क आला. यातूनच अभ्यासु वृत्तीबरोबरच राजकारणातही काहीतरी करून दाखवण्याची ईच्छा जागृत झाली. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधील जमशेटपुरमधून निवडणुक लढवली. ईंदरसिंग नामधारी आणि शैलेन्द्र महतो यांसारख्या खंद्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत त्यांनी मोठा विजय प्राप्त केला.
अकराव्या लोकसभेच्या अठरा महिन्याच्या कारकिर्दीत नितिश भारद्वाज यांनी आपण केवळ लेखकाने लिहलेले स्क्रीप्ट वाचणारे कलाकार नसल्याचे सिद्ध केले. टेलीव्हीजन चॅनलवरील वाढती अश्लीलता, असंसदिय भाषा, याचा नवीन पिढीवर होणारा परिणाम, ईत्यादी गंभीर विषय त्यांनी संसदेत प्रभावीपणे मांडले. दुर्दैवाने ही लोकसभा अल्पजीवी ठरली, आणि नितिशजींची खासदार म्हणुन कारकिर्दही थोडक्यातच संपली.
याच दरम्यान रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालीकेला दिलेली ७५ भागांची मुदत संपत आली होती, आणि दूरदर्शनने त्यांना मालिका गुंडाळायचे आदेश दिले होते. खासदार नितिश भारद्वाज यांची 'गितारहस्य' ही मालीका त्या स्लॉटमध्ये लागावी म्हणुन शासनाचा हा डाव आहे, असा सुर टिव्ही क्षेत्रामध्ये निघाला आणि नितिश भारद्वाज वेगळ्याच वादात फसले. राजकारणात मिळालेलं पद हे कलाक्षेत्रात आड येतंय हे लक्षात आल्यावर त्यांनी १९९८ ची निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला.
१९९९ मध्ये 'गितारहस्य' मालीका सुरू झाली, आणि त्यानंतर लगेच मध्यावधी निवडणुका आल्या. या वेळी उमा भारती यांच्या प्रोत्साहनामुळे नितिशजींनी मध्यप्रदेशातील राजगड येथुन दिग्वीजयसिंग यांचे बंधु लक्ष्मणसिंग यांच्या विरोधात निवडणुक लढवली. मालिका टिव्हीवर सुरू असल्यामुळे उमेदवाराचा आयता प्रचार होतो आहे, असा आरोप विरोधकांनी लावल्यामुळे निवडणुक आयोगाने 'गितारहस्य' चे प्रसारण थांबवले. या निवडणुकीत नितिशजीं पराभुत झाले, आणि त्यानंतर ही अप्रतीम मालिकाही आपल्याला बघायला मिळाली नाही. 
दरम्यान, उमा भारती यांच्या भाजपा मधून गच्छंती नंतर नितिशजींचा पक्षातील प्रभावही कमी झाला. राजकिय स्थीत्यंतरे झाली, तशी वैयक्तीक आयुष्यातही वादळे आली. पहिली पत्नी मोनिशापासून घटस्फोट झाला. त्यांची दोन्ही मुलं २००३ पासून आईबरोबर लंडनला असतात. नुकताच आय.ए.एस. अधिकारी असलेल्या स्मिता गाटे या पुण्याच्या मराठी तरुणीशी नितिशजींचा विवाह झालाय. सध्या एका चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शनात ते व्यस्त आहेत. शिवाय विविध ठीकाणी (साहित्य संमेलनांपासुन ते सामाजीक कार्यक्रमांपर्यंत) त्यांना वक्ता म्हणुन आमंत्रीत केले जाते. भारतीय जनता पक्षाचं कार्य ते करतच आहेत.
त्यांच्या राजकिय मेंटर उमा भारती नुकत्याच भाजपात परत आल्या आहेत, त्यामुळे आता येत्या काही दिवसांत नितिश भारद्वाज यांना एका नव्या आणि मोठ्या भुमिकेत पहाण्याची संधी आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा करू या!
(दैनिक तरूण भारत च्या आसमंत पूरवणी मध्ये प्रकाशित झालेले याच लेखाचे हे कात्रण.)
(दि. २६ जुन २०११)

No comments:

Post a Comment