Wednesday 15 June 2011

कर्मापा लामा

बुद्ध पौर्णीमेचा चंद्र एव्हाना कलेकलेने लहान होताना दिसत असला तरीही बौद्ध धर्माचा व्याप मात्र प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढताच राहिला आहे. आज बौद्ध धर्माचे पस्तीस कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील चौथ्या क्रमांकाचा धर्म आहे. आशिया खंडात बौद्ध धर्माचे अनुयायी अधीक असले तरीही,  आता जगभर बौद्ध तत्त्वज्ञान आणि धर्माचा प्रचारप्रसार झालेला आहे.
बुद्ध पौर्णीमेचे निमित्त साधून सतरावे कर्मापा लामा नुकतेच नागपूरात येऊन गेले. ओग्येन ट्रिनले दोर्जे कर्मापा अवघ्या २६ वर्षाचे आहेत. दलाई लामा आणि पांचेन लामा यांच्यानंतर ते तिसरे सर्वोच्च गुरू मानले जातात. "शांती, नैतिकता आणि सामर्थ्य' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. तिबेटी भाषेत झालेल्या या व्याख्यानातुन त्यांनी बुद्ध तत्त्वज्ञानाची संकल्पना विशद केली. मात्र हल्ली कर्मापांचे नाव गाजतेय ते मात्र वेगळ्याच कारणाने. हिमाचल प्रदेशातील कर्मापा वास्तव्यास असलेल्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी जवळपास सात कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहे. या संपत्तीबाबत अद्याप समाधानकारक स्पष्टीकरण देऊ न शकल्याने व तपास समितीला कर्मापा सतत चीनच्या प्रशासकांच्या संपर्कात असल्याचे आढळल्याने ते चीनचे गुप्तहेर असण्याचा संशय बळावला आहे.
धर्माची धर्मसंस्था झाली, की त्यात अनेक पंथ, उपपंथ, शाखा, जाती, समुह, त्यांचे त्यांचे वेगळे धर्मगुरू, आणि त्यांच्यातील मानापमानांनाही सुरूवात होते. एक सहज दृष्टीक्षेप टाकल्यास सतराव्या कर्मापा लामांच्या भोवती या वादाच्या भोवर्र्याने फेर धरल्याचे कारण आपल्या लक्षात येइल.
बौद्ध धर्माच्या महायान शाखेचे अनुयायी पुर्व आशियाई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. यांपैकी तिबेटीयन उपशाखेमधील धर्मगुरूंना 'लामा' (ज्ञानाचा सागर) असे संबोधन आहे. लामा हे तिबेटचे धर्मगुरू तर आहेतच, शिवाय परंपरेने तिबेटची राजकिय सत्ताही त्यांच्याच हाती आहे. मात्र सध्या तिबेटवर चिनचे राज्य असल्यामुळे तीबेटचे हे शासक आणि धर्मगुरू हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे आश्रय घेऊन राहतात.
दलाई लामा आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. तिबेटियन बुद्धांचे ते सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. असे जरी असले, तरी तिबेटियन बुद्ध धर्मामध्ये चार पिठे आहेत ज्यांना 'मॉनेस्टीज' म्हटले जाते.  'न्यिगमा', 'काग्यु', 'साक्य' आणि 'जिलग' या चार मॉनेस्टीजपैकी 'जिलग' मॉनेस्टीचे गुरू म्हणजे दलाई लामा होत, तर 'काग्यु' मॉनेस्टीचे गुरू कर्मापा लामा नावाने ओळखले जातात. महत्त्वाचे म्हणजे काग्यु मॉनेस्टी ही दलाई लामांच्या 'जिलग' मॉनेस्टीपेक्षा जवळपास दोनशे वर्षे आधीपासून अस्तित्त्वात असल्याने तीचे महत्त्व आणि अनुयायी जास्त आहेत. मात्र सध्या दलाई लामा हे या चारही मॉनेस्टीज मधील लामांपेक्षा वयाने जेष्ट असल्यामुळे त्यांना सर्वोच्च मानले जाते. त्यामुळे जेष्टता प्राप्त झाल्यास कर्मापांकडे दलाई लामांचा वारस म्हणून पाहिले जाईल. मात्र थेट निवडिपासूनच कर्मापा वादाच्या भोवर्र्यात अडकले आहेत.
आजवर काग्यु मॉनेस्टीमध्ये झालेल्या सोळा कर्मापांपैकी सात जणांनी स्वतःच अतिशय कमी वयात आपण कर्मापा असल्याचे घोषित केले होते व आपल्या आधिच्या कर्मापांच्या वस्तू ओळखून, आणि ईतर संदर्भ सांगुन ते सिद्धही केले होते. ईतर कर्मापांच्या वेळला कुणीच स्वतःहून घोषणा न केल्यामुळे मॉनेस्टीच्या सदस्यांना दिवंगत कर्मापांचे लिखीत स्वरूपातील संकेत ओळखून योग्य कर्मापांची ओळख पटवावी लागली होती. तसाच काहीसा गुंता सतराव्या कर्मापांच्या निवडिच्या वेळी झाला. मॉनेस्टीच्या काही सदस्यांनी तिबेटमधील तशुरफू मठाचे प्रमुख ओग्येन ट्रीनले दोर्जे यांची कर्मापा म्हणुन निवड केली. दलाई लामांसह ईतर मॉनेस्टीजच्या गुरूंनीदेखील त्याला मान्यता दिली, तसेच चिनच्या शासनानेही ट्रीनले दोर्जे यांची निवड पक्की केली.
मात्र दरम्यान काही सदस्यांनी त्रिन्ले थाये दोर्जे यांची कर्मापा म्हणुन निवड केली. थाये दोर्जे हे तिबेटमधील ल्हासा या ठीकाणी १९८३ मध्ये जन्मलेले असुन परंपरेप्रमाणे ते लहानपणापासूनच आपण कर्मापा असल्याचा दावा करत असल्याचे निवडकर्त्यांचे म्हणणे आहे. खरा कर्मापा कोण हा विवाद आजही सुरूच आहे.
मार्च १९९४ साली त्रिन्ले थाये दोर्जे यांनी तिबेटमधून भारतात निर्वासितांसह आगमन केलं. नवी दिल्ली येथे निर्वासितांचे स्वागत करत असतांना त्त्यांची ओळख देण्यात आली, आणि हिमाचल प्रदेशातील तवांग येथील आश्रमात त्यांच्या वास्तव्यास सुरवात झाली. आजही अनेक भारतिय तिबेटी निर्वासितांचे श्रद्धास्थान हेच कर्मापा आहेत.
याउलट उग्येल ट्रिनले यांनी तिबेटमधून पलायन केलं आणि भारतात येण्याच्या त्यांच्या पद्धतिपासूनच त्यांच्याभोवती संशय दाटायला सुरुवात झाली. सन २००० मध्ये चौदा वर्षे वयाचे कर्मापा चिनी सुरक्षा रक्षकांना चकवून तिबेटमधून भारतात पळून आले. तिबेटी सीमेवर आजवरचा इतिहास, भारतीय हद्दीत शिरकाव करणाऱ्यांना थेट गोळ्या घालण्याचाच होता. पण कर्मापा सीमा ओलांडून सुखरूप भारतात आले. भारत सरकारने त्यांना आश्रय दिला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे त्यांना मठ स्थापन करण्याची परवानगी दिली.
मात्र भारतात आश्रयाला आल्यानंतरही कर्मापांची पाठ वादविवादांनी सोडली नाही. वैद्यकीय तपासणीत त्यांचे वय खुप जास्त असल्याचे आढळले. याचा अर्थ त्यांचा जन्म १९८१ पुर्वी (१६ व्या कर्मापांच्या निर्वाणाचा आधी) झालेला आहे असे म्हणता येइल, त्त्यामुळे त्यांच्या खरे कर्मापा नसल्याच्या ईतरांच्या दाव्याला बळच मिळाले.
फेब्रुवारी २०११ मध्ये हिमाचल पोलीसांनी त्यांच्या सिद्धबानी मठात छापा मारला. यांच्याकडून एक कोटी रुपयांची कार, भारतीय चलनातील चार लाख रुपये रोख रक्कम, सहा लाख अमेरिकन डॉलर, अकरा लाख युआन तसेच जपानी आणि ऑस्ट्रेलियन चलन अशी सात कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. त्यात चीन, नेपाळ, अमेरिका आणि अन्य देशांतील चलनी नोटांचाही समावेश होता.
कर्मापा यांच्या मठाचे कोषाध्यक्ष शक्ती लामा यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले तर कर्मापांवर आश्रमाच्या पंधरा किलोमिटरच्या बाहेर प्रवास न करण्याचे निर्बंध लादण्यात आले. मात्र मार्च २०११ मध्ये केन्द्र सरकारने कर्मापांची संपत्ती ही त्यांना देश विदेशातून भक्तजनांनी दिलेले दान आहे, असे शिक्कामोर्तब करून त्यांच्यावरील प्रवासाचे निर्बंध हटवले.

दलाई लामांनी नुकतेच आपण निवृत्ती पत्करणार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आगामी तिबेटी धर्मगुरूचे पद प्राप्त करण्याच्या चढाओढीमध्ये दोनपैकी कोणते कर्मापा आघाडिवर राहतात ते आता पहायचे. मात्र तथाकथीत चिनी प्रभावाखाली असलेले ओग्येन ट्रीनले दोर्जे हे दलाईंचे वारस झाल्यास चिनला आनंदच होईल हे नक्की.


No comments:

Post a Comment