Tuesday 2 August 2011

प्रकाश राज

मराठी कलाकारांची आणि तंत्रज्ञांची फौज, मराठी संगितकारांसह, एकंदर मराठमोळ्या वातारवरणात बनलेला 'सिंघम' चित्रपट सध्या चर्चेचा विषय  आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही हा सिनेमा पहाण्याचा मोह आवरला नाही. सिंघम साठी अजय देवगणने खास कमावलेली तब्येत, आणि त्याने बोललेले मराठी संवाद हे चित्रपटाचे आकर्षण असले तरीदेखील प्रकाश राजने रंगवलेला खलनायक जयकांत शिकरेही प्रचंड भाव खाऊन जातो, याबद्दल वादच नाही. दुष्ट, निर्दयी, कपटी, शिवाय मुर्ख, घाबरट, आणि कधीकधी बावळट असा खलनायक प्रकाश राजने मोठ्या खुबीने उभा केला आहे.
खरं म्हणजे प्रकाश राज सारख्या अष्टपैलु कलावंतासाठी ही भुमिका करणं फार सहज गोष्ट होती. कारण आपल्या दोन दशकांच्या अभिनय कारकिर्दीत प्रकाश राजने एकापेक्षा एक सरस अश्या शेकडो भुमिका केल्या आहेत. दक्षीण भारतीय चित्रपटसृष्टीतील तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांमधून काम करणार्या अत्यंत मोजक्या कलावंतांपैकी प्रकाश राज अग्रणी आहे. याशिवाय हिंदी आणि मराठी भाषाही त्याला अवगत आहेत. मणीरत्नम, प्रियदर्शन यांसारख्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणार्र्या निर्माता-दिग्दर्शकांबरोबरच रंजनप्रधान चित्रपटांच्या निर्मात्यांचाही तो आवडता कलाकार आहे. त्यामुळेच वर्षभर प्रदर्शित होणार्र्या अनेक दक्षीण भारतीय चित्रपटांमध्ये प्रकाश राज हे नाव चमकत असतं. म्हणुनच पाच फिल्मफेअर आणि चार राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच अनेक विषेश पुरस्कारही त्याच्या नावे आहेत.
दक्षीण कर्नाटकातील पुत्तूर या गावात जन्माला आलेला, सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील 'तुळु' भाषा बोलत मोठा झालेला एक मुलगा -- प्रकाश राय ('राय' हे त्याचं मुळ आडणाव आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर जेष्ट दिग्दर्शक के बालचंदर यांनी त्याला प्रकाश राज असं नाव दिलं.) -- कन्नडच नव्हे, तर दक्षिण भारतातल्या चारही भाषांतील चित्रपटसृष्टी गाजवतो, शिवाय हिंदी चित्रपटांमध्येही  आपलं मानाचं स्थान निर्माण करतो, ही सगळी वाटचाल स्वप्नवत वाटत असली, तरी यामागे प्रकाश राज या व्यक्तीची आयुष्यभराची तपश्चर्या आहे, हे विसरणे शक्य नाही.
अभिनय किंवा चित्रपटसृष्टी ही प्रकाश राज ला वारसा हक्काने मिळाली नाही. मात्र कर्नाटकातील त्याच्या 'बंत' समाजामधील लोकांना या क्षेत्राबद्दल कायमच आकर्षण राहिलेले आहे. ऐश्वर्या राय, सुनिल शेट्टी, शिल्पा शेट्टी किंवा 'सिंघम' चा दिग्दर्शक रोहीत शेट्टी ही नावं वानगीदाखल पुरेसी होतील! त्यामुळे उपजतच असलेली अभिनयाची आवड १९७० च्या दशकात त्याला पुत्तूरहून थेट बंगलोरला घेऊन गेली. सेन्ट जोसेफ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत पदवीचा अभ्यास करतांनाच महाविद्यालयिन नाटकांमधून त्यानं अनेक भुमिका केल्या. रंगभुमीवरचं प्रेम वाढत गेलं आणि एका वेगळ्या प्रकाश राय चा जन्म झाला.
बंगलोरला रविन्द्र कलाक्षेत्र नावाचे कलादालन आहे. महाविद्यालयातून बाहेर पडताच प्रकाश ने नोकरीच्या मागे न लागता या कलादालनाचा पर्याय निवडला. नाटकांमध्ये छोटीमोठी कामं मिळत गेली. एकाच दिवशी वेगवेगळ्या नाटकांचे, एका मागोमाग एक असे चार प्रयोग अनेकदा केले. दिवसभर नाटकाचे प्रयोग आणि रात्री बॅकस्टेजला झोपणे असा दिनक्रम असायचा, आणि महिन्याकाठी मिळायचे ३०० रूपये. असे एक दोन नव्हे, तर २००० नाटकाचे प्रयोग केले. प्रकाश राज मधला अष्टपैलू कलाकार या दरम्यान घडला. अनेक भाषांमधील त्याचे प्रभुत्व, वैषिष्ट्यपुर्ण संवादफेक, डोळ्यांच्या हालचालीवर असलेले अविश्वसनिय नियंत्रण, आणि अभिनयकौशल्य हे सगळे गुण याच दरम्यान आत्मसात झाले. १९९० च्या दरम्यान त्याने आपलं कार्यक्षेत्रं वाढवायचं ठरवलं, आणि टेलिव्हीजनकडे मोर्चा वळवला.
कन्नड दुरदर्शनवरील एक दोन मालिकांमध्ये त्याला काम मिळालं. काही चित्रपटांमध्ये छोट्या भुमिकाही मिळाल्या. मात्र त्याने समाधान होत नव्हतं. पोटापाण्यासाठी संकलन आणि सहदिग्दर्शन या क्षेत्रात हात आजमावून पाहिला. मात्र त्यातही अपयश आलं. शेवटी हे क्षेत्र सोडायचं असा निर्णय झाला. मात्र याच दरम्यान 'देव परिक्षा पाहत असतो' असं म्हणतात तसंच काहीसं झालं.
'हरकेय कुरी' या चित्रपटात प्रकाश राय छोटीशी भुमिका करत होते. के एस एल स्वामी यांच्या या चित्रपटात त्या काळातील दक्षीणेतील चित्रपटसृष्टीची 'राणी' असलेली अभिनेत्री गीता ही मुख्य भुमिका करत होती. प्रकाश मधली अभिनयाची चुणुक तीने हेरली आणि तामिळ दिग्दर्शक के बालचंदर यांच्याकडे त्याच्यासाठी शब्द टाकला. भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराचे मानकरी के बालचंदर म्हणजे तामिळ चित्रसृष्टीचे भिष्म पितामहच! १९९३ साली ते 'ड्युएट' नावाचा एक कमी बजेटचा चित्रपट बनवत होते. त्यातील मुख्य भुमिका प्रकाश राय ला मिळाली, आणि बरोबरच मिळालं 'प्रकाश राज' हे नवीन नाव! हा चित्रपट लोकांना क्लीक झाला आणि तामिळनाडूमध्ये प्रकाश राज चे फॅन्स तयार होउ लागले. मग मागे वळून पहावंच लागलं नाही.
रंगभुमीवरील कष्टाने जमलेला अनुभवाचा खजीना आता कामी येऊ लागला. नागमंडल या चित्रपटाद्वारे कन्नड चित्रपटसृष्टीतही पदार्पण झालं. १९९७ मध्ये मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्यावहिल्या नाटकात -- नेतृ ईंदू नालाई -- मध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली, आणि याच दरम्यान तामिळ चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन 'ईरूवर' चित्रपटाची बैठक तयार होउ लागली. एम जी रामचंद्रन आणि एम करूणानिधी या द्राविढ राजकारणातील धुरंधर नेतृत्त्वांच्या परस्परसंबंधावर आधारीत हा चित्रपट तामिळनाडूमधील प्रत्येक दर्शकाच्या मनावर छाप पाडणारा ठरला. यातील तामिळसेल्वन (करूणानिधी) या भुमिकेसाठी प्रकाश राज ला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विषेश म्हणजे या चित्रपटाद्वारेच ऐश्वर्य़ा राय हिचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला!
१९९९ साली अंतपुरम या तेलगु चित्रपटासाठी दुसरा राष्ट्रीय पुरस्कार तर २००३ मध्ये तामिळ चित्रपट दया आणि त्याचाच तेलगु रूपांतर 'खडगम' यातील भुमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. नुकताच प्रियदर्शनबरोबर केलेल्या कांचिवरम या तामिळ चित्रपटासाठी  सर्वोत्तम अभिनेत्याचा मानही प्रकाश राज यांना प्राप्त झाला. आजवर २५० हून अधीक तामीळ चित्रपटांबरोबरच त्यांचे तेलगु, कन्नड, मल्याळम किंवा हिंदी रिमेक या सगळ्यांना हिशोबात धरल्यास प्रकाश राजची 'फिल्मोग्राफी' हजारच्या वर जाते. बाकी सगळी स्टारकास्ट रिमेक मध्ये बदलेल्, मात्र प्रकाश राज बदलत नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे 'सिंघम'. २०१० साली प्रदर्शित झालेल्या 'सिंगम' या तामिळ चित्रपटाचाच हिंदी 'सिंघम' हा रिमेक आहे. आणि तामिळ चित्रपटातही खलनायकाची भुमिका प्रकाश राज नेच केलेली होती.
व्यावसायिक चित्रपटात खलनायकाच्या भुमिका करून अमाप लोकप्रियता आणि पैसा मिळवतांनाचा आपल्यातील अभिजात अभिनेत्याची कुंचबणा होणार नाही याची काळजी प्रकाश राज ने घेतली आहे. कांजीवरम हा चित्रपट त्याचं उदारहरण आहे. विशेष म्हणजे तो सणसणीत राजकीय भाष्य करणारा सिनेमा आहे.
अभिनयाबरोबरच निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आता प्रकाश राजने पाऊल टाकले आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाउसचे नाव त्याने 'ड्युएट मुव्हीज' असे ठेवले आहे. आपल्या पहिल्यावहिल्या मोठ्या तामिळ चित्रपटाची आठवण म्हणुन! तामिळ मध्ये काही पारिवारीक मनोरंजक चित्रपटांची निर्मीती केल्यानंतर त्याने दिग्दर्शनासाठी आपली मातृभाषा कन्नडची निवड केली. मागच्याच वर्षी 'नानु नन्ना कन्नासु' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यशस्वीदेखील झाला. आता या चित्रपटाची तामिळ आवृत्ती दिग्दर्शित करण्यात प्रकाश राज मग्न आहे. नुकताच त्याने पोनी शर्मा या पंजाबी कोरिओग्राफर मुलीबरोबर दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे चार दाक्षिणात्य भाषा, आणि हिंदी नंतर प्रकाश राज 'पंजाबी' चित्रपटातूनही आपल्यासमोर आल्यास आश्चर्य वाटून घ्यायला नको!
दिनांक ३१ जुलै २०११ रोजी च्या 'आसमंत पुरवणी' मध्ये प्रकाशित झालेले प्रस्तूत लेखाचे हे कात्रण

No comments:

Post a Comment