Monday 22 August 2011

अक्षयपात्राचे प्रणेते मधुपंडित दास!

कृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहात न्हाऊन निघण्यासाठी आपण सर्वच तयार झालेले असाल. अनेकांना ओढ लागली असेल ती गोपाळकाल्याची.  दहीहंडी उत्सवाची. आपल्या छोट्याछोट्या लिलांमधून मोठे मोठे आशय सरल करून सांगत असल्यामुळेच 'कृष्णम वंदे जगदगुरू' असं आपण भक्तीभावाने म्हणतो.  भगवान श्रीकृष्णाचा संदेश जगाच्या कानाकोप-यात पसरवण्याचं काम  आज अनेक संस्था करत आहेत. मात्र यांमध्ये निःसंदेह अग्रणी म्हणुन 'ईस्कॉन'चं नाव घेता येइल. 'ईंटरनॅशनल सोसायटी फॉर क्रिष्णा क़ॉन्शसनेस' या संस्थेची स्थापना अभयचरणारविंद भक्तीवेदांतस्वामी प्रभुपाद यांनी केली. श्रीमदभगवद्गीता ईंग्रजीमध्ये लिहून जागतीक समुदायाच्या समोर आणण्याचं महान कार्य स्वामींनी केलं. आज त्यांनी लावलेल्या या ईवल्याश्या रोपाचा वेलु गगवावरी गेलेला आहे.
ईस्कॉनच्या जगभर असलेल्या शेकडो केन्द्रांच्या माध्यमातून श्रीकृष्ण सगळ्यांना कळतो आहे. यमुनेच्या वाळवंटात सर्व गोपांनी बरोबर आणलेल्या अन्नाचा एक गोपाळकाला करून सगळे भेदभाव विसरून आपल्या सर्व मित्रांना प्रेमपुर्वक भरवणार्र्या श्रीकृष्णाचं केवळ वर्णन आणि किर्तन करून ईस्कॉन थांबले नाही. कुणीही उपाशी राहू नये हा कृष्णाचा संदेश त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा वसाच जणुकाही घेतला. 'अक्षयपात्र' या अभिनव योजने अंतर्गत आज शाळेत जाणार्र्या तब्बल १३ लाख मुलांना दुपारचं जेवण पुरवलं जातंय. या योजनेचे शिल्पकार म्हणजे ईस्कॉनच्या बंगलोर केन्द्राचे अध्यक्ष मधुपंडित दास!
इस्कॉनची अक्षय पात्र योजना ही सरकारच्या मिड-डे मील योजनेपेक्षा जुनी आहे. ह्या योजनेची सुरवात २००० साली बंगलोर मधे पाच शाळांतील १५०० मुलांना जेवण पुरविण्यापासून झाली. पण २००१ साली सरकारची योजना जाहिर झाल्यावर इस्कॉनने आपली अक्षय पात्र योजना ह्या योजनेला जोडली. आज अक्षय पात्र योजने अंतर्गत ९ राज्यांतील १९हून अधिक शहरं, नगर इ. शाळांमधल्या १३ लाखहून अधिक मुलांना रोज दुपारचे अन्न पुरविले जाते. अक्षय पात्र योजना चालवणा-या सेवाभावी संस्थेचे मधुपंडित दास हे अध्यक्ष आहेत.
दास यांचं पुर्वाश्रमीचं नाव एस मधुसुदन. नागरकॉल या केरळमधील गावातील वैष्णव परिवारात १९५६ मध्ये त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची लहानपणापासूनच आवड होती. महाविद्यालयात  असतांना राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञा शोध परिक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड आय आय टी मुंबई साठी करण्यात आली. आय आय टी तुन बिटेक आणि एम टेक करत असतांनाच श्री भक्तीवेदांतस्वामींच्या साहित्याशी परिचय झाला. ईस्कॉनच्या कार्याने प्रभावीत होउन या सिव्हील ईंजिनियरने आपलं जीवन कृष्णार्पण करायचा निश्चय केला. एस मधुसुदन चा मधुपंडित दास झाला. ते वर्ष होतं १९८१.
त्रीवेन्द्रम या त्यांच्या मुळगावीच ईस्कॉनचं कार्य करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. त्रीवेंद्रमचं मंदिर हे ईस्कॉनच्या बंगलोर केंन्द्राच्या कार्यक्षेत्रा अंतर्गत येत असे. केंद्राचा कारभार मात्र भाड्याने घेतलेल्या एका छोट्याश्या फ्लॅटमधून चालायचा. बंगलोर केन्द्राची एक प्रशस्त वास्तू असावी, असा सर्वांचा प्रयत्न होता. सरकार कडे जमिनीसाठी पाठपुरावा सुरू होता. १९८३ सालापासून मधुपंडित दास यांनी बंगलोर ईस्कॉनच्या जागेसाठी वाटाघाटी सुरू केल्या. अनेक बर्ष पाठपुराव्यानंतर सरकारने गावाबाहेरची एक टेकडी संस्थेला देऊ केली. ती जंगली, नापीक आणि खडकाळ जमीन मधुपंडित दास यांनी सहर्ष स्विकारली आणि आज त्याच हरे कृष्णा टेकडीवर बंगलोर ईस्कॉनची टुमदार ईमारत डौलाने उभी आहे. या कार्यासाठी शंभरहून अधीक ईस्कॉन सदस्यांनी तीन वर्षापर्यंत अखंड श्रमदान केलं.
भरदिवसाही दुर्गम भासणा-या, विषारी काट्यांनी भरलेल्या या टेकडीवर ईस्कॉनच्या सदस्यांनी केलेल्या या भिमपराक्रमाचे श्रेय मधुपंडित दास यांच्या नेतृत्त्वालाच जातं. १९९४ मध्ये मैसुर आणि मंड्या जिल्ह्यातील शेतक-यांसाठी  त्यांनी अभिनव अशी नैसर्गिक शेतीची संकल्पना राबवली. किटकनाशक आणि रसायनांनी नासवलेली आपली शेतजमीन पुर्वीप्रमाणे कसदार झाली पाहिजे यासाठी ईस्कॉनच्या माध्यमातून त्यांनी अनेक शास्त्रज्ञ, अभ्यासक, आणि जाणकार सोबत जोडले. ईस्कॉनच्या केन्द्राच्या आसपासची जवळपास सगळी शेती आज नैसर्गिक पद्धतीने केली जाते. अभिनव योजना राबवण्याचा आणि ती यशस्वी करून दाखवण्याचा अनुभव या दोन प्रयत्नांतून आल्यानंतर सन २००० मध्ये आपले गुरू श्री भक्तीवेदान्तस्वामी यांचं एक स्वप्न पुर्ण करायचा वसा मधुपंडित यांनी घेतला.
अन्नदानाचा संकल्प आपल्या संस्कृतीमध्ये सर्वश्रेष्ट मानला जातो. भक्तीवेदान्तस्वामी प्रभुपाद मायापूर या कलकत्त्याजवळील गावात असतांना त्यांनी एकदा भाकरीसाठी कुत्र्याबरोबर भांडणारी मुलांची टोळी पाहिली. घटना हृदयद्रावक होती. स्वामींनी मनोमन ठरवलं की निदान ईस्कॉन मंदिराच्या दहा मैलांच्या परिसरात तरी कुणीच उपाशी रहायला नको. स्वामीजींच्या प्रेरणेने अन्नदान योजनेचे बिजारोपण झाले. नाव ठेवण्यात आलं -- अक्षयपात्र योजना.
वनवासात असताना पांडवांना अन्न-धान्याची टंचाई भासू नये आणि आलेल्या ऋषी-मुनी आणि अथितींना उपाशी परत पाठवायला लागू नये, म्हणून युधिष्ठिराने सूर्यदेवाकडून अक्षय पात्र मिळवले होते. ह्या पात्राची ख्याती अशी होती की ह्यातील अन्न कधीच संपत नसे. अक्षय पात्रामुळे पांडवांनी अनेक भुकेलेल्या अथितींना जेवण वाढून तृप्त केलं होतं. आता पांडवही गेले आणि ते अक्षय पात्र सुद्धा. पण भारतातील कोट्यावधी लोकांची जठराग्नि अजूनही धगधगत आहे. ह्या जठराग्निला शमविण्याकरिता अनेक लहान मुलांना आपल्या आयुष्यातील कोवळी वर्षं शाळेत न जाता मजूरी मधे घालवावी लागतात.
ईस्कॉनचं 'अक्षयपात्र' मात्र आता मुलांना सकस आहाराबरोबरच शिक्षणाची संधीही देते आहे. अक्षयपात्र योजने अंतर्गत अन्न शिजवणारी ईमारत हा देखील स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. या तीन मजली ईमारतीमध्ये गुरुत्त्वाकर्षणाच्या सिद्दांताचा वापर करून अन्न शिजवले जाते, ते अग्नी नव्हे, तर वाफेच्या भरवश्यावर. दिवसभरात एक लाख डबे तयार करण्याची क्षमता एका युनिटची असते. विस मिनिटात ११० किलो तांदळाचा भात तर दोन तासात १२०० लिटर सांबर तयार होतं. दिवसभरात एक युनिट तब्बल सहा हजार किलो तांदळाचा भात बनवतं. शिवाय हजारो लिटर सांबर, आणि तब्बल दोन लाख चपात्या. आणि हे सगळंकाही अत्याधुनिक मशिन्सच्या मदतीने. मानवी स्पर्षही या अन्नाला होत नाही. त्यामुळे ते अत्यंत शुद्ध आणि सकस असतं. २०२० सालापर्यंत ५०लाख मुलांना ह्या योजनेचा लाभ व्हावा हे मधुपंडित दास आणि इस्कॉनचं ध्येय आहे.
अक्षयपात्राचं हे सगळं साम्राज्य लोकांनी दिलेल्या दानावर अवलंबलेलं आहे. सरकारच्या माध्यान्नभोजन योजनेमुळे हल्ली सरकारी मदतही मिळत आहे. त्यामुळे अनेक नवे युनिटस उभारले जात आहेत. मात्र योजनेची व्याप्ती बघता ती चालण्यासाठी आर्थिक पाठबळ गरजेचं आहे. त्यामुळे सामान्य जनतेकडून देणग्या स्विकारण्याचं काम अक्षयपात्र फाउंडेशन करते. केवळ ६७५ रूपये दान करून आपण एका मुलाच्या वर्षभराच्या जेवणाचा खर्च करू शकतो. आपण दान केलेल्या पैशां मधून मुलांना वर्षभरासाठी जेवायला पौष्टिक अन्न मिळत आहे, आणि त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती सुद्धा होत आहे, हे पहाण्यात किती तरी समाधान आहे. त्यामुळेच मधुपंडित दास यांचा आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि करोडो रूपये फाउंडेशनजवळ जमा झाले. पैसा आला की बदनामी ही बरोबर येतेच.
दान म्हणुन प्राप्त झालेल्या या पैशाचा दास यांनी भ्रष्टाचार करून तो स्थावर मालमत्ता घेण्याच्या कामात गुंतवला असल्याचा आरोप आश्रमातीलच काही असंतुष्टांनी त्यांच्यावर केला आहे. अनेकांनी तर ईस्कॉनचे बंगलोर केंन्द्राच्या अस्तीत्त्वावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. अनेकांनी मधुपंडित दास आणि बंगलोर ईस्कॉन या संस्थेला न्यायालयात आवाहन दिले आहे. बरेच खटले सध्या न्यायालयात सुरू आहेत. खरंखोटं काय ते न्यायदेवता स्पष्ट करेलच, मात्र, कुणीतरी वावड्या उठवल्या म्हणुन बारा लाख मुलांच्या तोंडी सकस अन्नाचा घास भरवणारं मधुपंडित दास यांचं कार्य लहान होत नाही.

No comments:

Post a Comment