Wednesday 17 August 2011

चाचा चौधरींचे "प्राण"

ज्यांचा १५ ऑगस्ट या दिवशी वाढदिवस येतो , त्यांच्यासाठी तर या दिवसाचं महत्त्व अधीकच! प्राणकुमार शर्माचा वाढदिवसही स्वातंत्र्यदिनीच येतो. त्यांनी आपल्या नवव्या वाढदिवसापासुन पुढचे सगळे वाढदिवस देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणुनच साजरे केले आहेत. उद्या त्यांचा ७३ वा वाढदिवस आहे. केवळ नावावरून प्राणकुमार शर्मा कोण हे अनेकांना लक्षात येणार नाही. असो.
लहानपणी एखाद्या कॉमिक्सच्या शेवटी 'चित्रकथा: प्राण' असं वाचल्याचं आपल्याला आठवत असेल. 'प्रा' या अक्षरापुढे शुन्य आणि उद्गारवाचक चिन्ह या स्वरूपात '' हे  अक्षर काढण्याची त्यांची लकब अनेकांच्या लक्षात राहून गेलेली असेल. आता थोडंफार आठवू लागलं असेल, मात्र अजुनही नक्की प्राणकुमार शर्मा कोण हे काहिंच्याच लक्षात येइल. असो.
चाचा चौधरी! -- बस! या दोन शब्दानंतर आता काही सांगायची गरजच उरलेली नाही! गेल्या साडेचार दशकांपासुन भारतातील बालविश्वाला समृद्ध करणार्र्या 'कंप्युटर से भी तेज चलनेवाला दिमाग' लाभलेल्या चाचा चौधरींचे रचनाकार  'कार्टुनिस्ट प्राण' म्हणजेच प्राणकुमार शर्मा! चाचा चौधरीच काय, पण कॉमिक्सच्या वाचकवर्गाच्या गळ्यातले ताईत असलेल्या पिंकी, बिल्लू, श्रीमतीजी, रमन, साबु, राका, चिन्नी चाची आणि ईतर अनेक पात्रांमध्ये 'प्राण' ने प्राण फुंकले आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या-माझ्या भावविश्वातही !!
भारतीय कॉमिक्सचे जनक मानल्या गेलेल्या प्राण यांनी सामान्य लोकांपुढे त्यांच्यासारखीच सामान्य पात्रे सुपर हिरो म्हणुन ठेवण्याचा आगळा-वेगळा विचार केला, तेव्हा कॉमिक्स जगतावरती फॅण्टम आणि सुपरमॅनसारख्या तगड्या आणि आकर्षक हिरोंचं राज्य होतं. मात्र धोपटमार्गाने जायचे नाही हे जणु काही त्यांनी लहानपणापासुनच ठरवून ठेवलं होते. म्हणुनच पंजाबमधील कसुर (आता पाकिस्तान) या छोट्याश्या गावातुन दिल्लीला येऊन त्यांनी राज्यशास्त्रात एम ए केलं. वडिल शास्त्री-पंडित असल्यामुळे घरी धार्मिक आणि शैक्षणिक वातावरण होतं. कलेची कदर होती. म्हणुन मग राज्यशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच चित्रकलेचाही छंद जोपासला. या छंदानेच अनेकदा पोटापाण्याची सोयही केली.
 'मिलाप' नावाच्या छोट्याश्या हिंदी दैनिकासाठी 'डब्बु' नावाचं एक पात्र बनवून दररोज एक व्यंगचित्र देणं सुरू केलं. हे पात्रं बरंच लोकप्रियही होतं. मात्र अजुनही हात हवा तसा शिताफिने फिरत नव्हता. त्यासाठी औपचारिक प्रशिक्षणाची गरज होती. मग 'एम ए राज्यशास्त्र' असलेल्या शर्माजींनी थेट मुंबई गाठली, आणि सर जे जे स्कुल ऑफ फाईन आर्टसला प्रवेश घेतला. पुढची चार वर्षे ही लाखमोलाची ठरली. बरंच शिकायला मिळालं. आयुष्यभरासाठीची शिदोरीच जणु! पण हाताला काम नव्हतं. साल होतं १९६६!
दिल्ली-मुंबई वार्र्या सुरु झाल्या. व्यंगचित्रकार, रेखाचित्रकार, ईल्युस्ट्रेटर म्हणुन काम शोधणं सुरू झालं. तो काळ आर के लक्ष्मण, क़ृपाशंकर भारद्वाज, ईत्यादिंचा होता. एका वर्तमानपत्रात केवळ एक व्यंगचित्र दररोज प्रकाशित होत असे. त्यामुळे या क्षेत्रात हवी तशी संधी नव्हती. दरम्यान दादा माखन लाल चतुर्वेदी या हिंदी साहित्यातील जुन्याजाणत्या कवीच्या काही कवीतांवर रेखाचित्रे काढण्याचं काम मिळालं.
'एक भारतीय आत्मा' या नावाने चतुर्वेदीजी कवीता लिहत. दिल्लीपासुन दूर खंडवा येथे त्यांचं वास्तव्य होतं. तीशीच्या आसपास असलेल्या प्राणकुमारला त्यांचा सहवास लाभला. "मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर तुम देना फेंक| मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ जाएँ वीर अनेक||" असे प्रेरक बोल लिहणारे चतुर्वेदी हिंदी साहित्य आणि पत्रकारितेतील भिष्म पितामहच!. त्यांच्याबरोबरच्या छोट्याश्या वास्तव्यातच साहित्याची, संगीताची गोडी प्राणला लागली. वाचनात लक्षणिय वाढ झाली. चतुर्वेदींच्या व्यक्तीमत्त्वातुनच 'चाचा चौधरी' हे पात्र त्यांच्या डोक्यात आले असावे.
या दरम्यान जागतीक पटलावर व्यंगचित्र किंवा कॉमिक्स क्षेत्रात काय सुरू आहे याचा अभ्यासही प्राणने केला. फ्रान्समध्ये निर्माण झालेली 'ऍस्ट्रेरिक्स आणि ऑबेलिक्स' कॉमिक सिरिज त्या काळात खुप लोकप्रिय होती. यातील ऍस्ट्रेरिक्स हा शिडशिडित बांध्याचा पण हुशार माणुस ऑबेलिक्स या आपल्या ताकदवान मित्राच्या मदतीने रोमन आर्मीचा मुकाबला करतांना दाखवला आहे. चाचा चौधरींची एक झलक प्राणला या पात्रांतुन मिळाली असं मानतात. मात्र प्राणने स्वतः कधी याची पुष्टी केली नाही.
१९६९ मध्ये मायापुरी गृप एका हास्य-व्यंग नियतकालीकाची योजना बनवत होते - 'लोटपोट' त्याचं नाव. या नियतकालिकासाठी एक व्यंगचित्राची स्ट्रीप काढण्याचं काम प्राणला मिळालं. लाल पगडी घातलेले चाचा चौधरीं कागदावर उतरले ते याच वर्षी. मात्र लोटपोट मध्ये तेव्हा कृपाशंकर भारद्वाज यांच्या 'मोटू-पतलू' मालिकेचा माहोल होता, त्यामुळे चाचा चौधरींना प्रकाशित होण्यासाठी तब्बल दोन वर्षे वाट पहावी लागली. सन १९७१ साली पहिल्यांदा चाचा चौधरी 'लोटपोट' च्या पानांमधून जनतेपुढे आले.
चाचा चौधरी एक सामान्य, म्हातारा, शिडशिडित बांध्याचा माणुस! मात्र प्राणने त्यात असे काही रंग भरले, की भारताचं सगळ्यात आवडतं कार्टुन कॅरॅक्टर म्हणुन चाचा नावारूपाला आले. साबुच्या रूपाने त्यांनी जादूई शक्तीही त्यात आणली. 'चाचा चौधरी का दिमाग कंप्युटर से भी तेज चलता है', किंवा 'साबु को गुस्सा आता है, तब ज्वालामुखी फटता है' सारखी वाक्यं परवलीची झाली. सामान्य जनतेशी सहज एकरूप होणारे पात्रं असल्यामुळे लोकांनी चाचा चौधरींना डोक्यावर घेतलं. पुढे डायमंड कॉमिक्सने चाचा चौधरींचे वेगळे कॉमिक्सच काढायचे हक्क विकत घेतले, आणि मग  ईतीहास बनला!
डायमंडबरोबरचा हा करार आजही सुरू आहे. हजारो, अगदी हजारोंच्या संख्येने कॉमिक्स आजवर आले आहेत. पुढे पिंकी, बिल्लू, श्रीमतीजी, रमन ही पात्रं आली. या सगळ्या सकारात्मक पात्रांबरोबरच राका, गोबरसिंग, धमाकासिंग, चक्रम आचार्य ही सगळी पात्रंही लोकप्रिय झाली. ईतकंच काय, तर चाचा चौधरींचा कुत्रा 'राकेट'देखील! सहारा टिव्हीने चाचा चौधरींवर मालिका काढली. त्यात रघुविर यादवने चाचा चौधरींची भुमिका केली होती. मालिकेनेही तब्बल ६०० भाग पुर्ण केले. लवकरच चाचा चौधरींची थ्री-डी ऍनिमेशन फिल्मही येते आहे.
केवळ ठरल्या मार्गाने नं जाता वेगळ्या वाटा शोधायच्या आणि नवं काहितरी करायचं या एका जिद्दीच्या भरवश्यावर भारतामध्ये अस्सल भारतीय कॉमिक्सचं साम्राज्य प्राणने उभं केलं. यासाठी त्यांचं नाव लिम्का बुकमध्येही नोंदवल्या गेलेलं आहे. या साम्राज्याच्याच प्रेरणेने मग 'राज कॉमिक्स' सारखी प्रकाशनसंस्था सुरू झाली आणि १९८३ मध्ये 'नागराज' बरोबर अस्सल भारतीय 'ऍक्शन सुपरहिरो' चा जन्म झाला. मात्र त्याला उत्तर म्हणुन ऍक्शन हिरोच देइल तर तो 'प्राण' चा विचार कसला? त्याने 'रमन' चं 'हम एक है' नावाचं राष्ट्रीय एकात्मतेवरील कॉमिक्स आणलं. पंतप्रधान ईंदिरा गांधींच्या हस्ते या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. कार्टुनकलेला भारत देशात जनमान्यतेबरोबरच राजमान्यता मिळवून देण्यात प्राण चा सिंहाचा वाटा आहे.
सध्या वयाच्या ७३ व्या वर्षीही प्राण पुर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांच्या मुलाने -- निखिलने -- त्यांच्याच नावाने दिल्लीला 'प्राण्स मिडिया ईन्स्टीट्युट' या जनसंवाद महाविद्यालयाची स्थापना केली आहे. वृत्तपत्रकारीतेपासुन ते ऍनिमेशन- वेबमिडियापर्यंत सर्व आधुनिक अभ्यासक्रम या विद्यालयामध्ये शिकवले जातात. विद्यालयाचे संचालक असलेले प्राण स्वतः विद्यार्थ्यांना व्यंगचित्रकलेचे धडेही देतात. ईंडियन ईन्स्टीट्युट ऑफ कार्टुनिस्ट या संस्थेमध्येही त्यांना पितामहाचं स्थान आहे. जगभरातल्या कार्टुन संग्रहालयात आज चाचा चौधरीच्या स्ट्रीप्स लागलेल्या आहेत.  असं एखादं कार्टुन संग्रहालय भारतातही असावं, असं त्यांना मनापासुन वाटतं.
उद्याच्या त्यांच्या वाढदिवशी त्यांची ही ईच्छा पुर्ण व्हावी, आणि अजुनही बरीच वर्षे त्यांनी आपल्याला हा वाचनानंद देत रहावे, याच शुभेच्छा या भारताच्या वॉल्ट डिस्नी ला देऊ या!

No comments:

Post a Comment