Tuesday 9 August 2011

अजय अतुल

'अजय अतुल' ही संगितकारजोडी आज मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत झालेली आहे. 'जोगवा' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यांच्यामधील संगीतकाराच्या श्रेष्टत्त्वावर शिक्कामोर्तब झालं. १९९३ साली तामीळनाडू मध्ये ऍड फिल्म्सची जिंगल्स बवनवणार्र्या एका संगीतकाराने केलेल्या पहिल्याच चित्रपटाला असाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आज त्या संगीतकाराला आपण 'ए आर रहमान' नावाने ओळखतो आणि 'रोजा' ची गाणी वारंवार ऐकतो. रहमान आणि अजय अतुल यांच्यातील हे साम्य लक्षात घेता येत्या दहा वर्षात त्यांना ऑस्कर मिळाल्यास आश्चर्य नाही!
मात्र रहमान आणि अजय अतुल मध्ये केवळ हेच एक साम्य नाही. दर्जेदार, प्रयोगशील आणि तितक्याच यशस्वीपणे गाणी संगीतबद्ध करण्यातील त्यांचा हातखंडा, संगीत देण्याकरता त्यांनी घातलेला अनेक पठडीबाहेरील वाद्यांचा मेळ, गाण्यांमध्ये लय-ताल-सुरांचे जादूई मिश्रण,लोकांना वेगळं, पण चांगलं काय देता येईल याची उत्कृष्ट जाण, याबरोबरच संगीत ही दैवी देणगी आहे असा विश्वास आणि ईश्वरावर असलेली अतुट श्रद्धा हे सगळे गुण अजय अतुल यांना संगीत क्षेत्रात स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करवून देतात.
पुण्याजवळ शिरूरला रेव्हेन्यू विभागात कामाला असलेल्या अशोक गोगावले यांची ही दोन मुलं - अतुल मोठा तर अजय त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. घरी थोडीफार शेती होती, आणि वारकरी परंपरा होती. एक भजनी ठेका आणि लोकसंगीताचा वसा सोडला तर घरी संगीत म्हणुन नावालाही काहीच नव्हतं. मात्र या दोन भावंडांनी लहानपणीच ठरवलं, की आपण संगीतकारच व्हायचं. शाळेत असल्यापासून संगीत हेच त्यांचं विश्व बनलं. वडिलांचं म्हणणं होतं की “'जे काही कराल ते मनापासून करा. पैसा कमावण्यासाठी करू नका. नाहीच जमलं तर दोन सुखाचे घास खाण्याइतकी आपली परिस्थिती नक्कीच आहे.आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचं वेड जोर धरू लागलं.
पण संगीतकार व्हायचं, म्हणजे नेमकं काय करायचं हे ठाऊक नव्हतं. अतुल लहानपणी पोवाडे म्हणायचा. अजय पाठीमागे झील धरायचा. शिरुर, जुन्नर, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांच्या ठिकाणी रहावं लागलं. त्यामुळे ग्रामीण भाषेचा ढंग, ग्रामीण संस्कृती तेव्हापासून पहायला मिळाली. पहाटेची काकड आरती, त्यात वाजणारा पखवाज, लग्नात घातलेला गोंधळ-जागरण यातुनच संगीताचे धडे मिळत गेले. शाळेत असताना सांस्कृतीक कार्यक्रमात भाग घेणे, मुलांची गाणी, नृत्य बसवणे, एनसीसीच्या बॅन्ड पथकात भाग घेणे यातून संगीतकार घडत गेले. अजय अतुल यांनी शास्त्र-शुद्ध पणे संगीताचे शिक्षण कधीच घेतले नाही पण त्यांनी आजुबाजुच्या वातावरणातूनच संगीत आत्मसात केलं
वडिलांची सतत बदली होत असल्याने त्यांना फार मित्र जोडता आले नाहीत. त्यामुळे दोघेच एकमेकांचे मित्र, साथीदार बनले. तासनतास संगीतावरच बोलत राहणे हा त्यांचा आवडता छंद कदाचित त्यामुळेच त्यांच्यात जे टय़ुनिंगजमले, ते आज त्यांना 'अजय-अतुल' बनवण्यात कामी आले.
शाळा-कॉलेज संपल्यावर इतर लोकांसारखं नोकरी शोधा, कंप्युटर शिका असे उद्योग करत करत पुण्याच्या काही लोकल ग्रूप्ससोबत गाण्याच्या व लोककलेच्या कार्यक्रमांत वादक, गायक, नर्तक म्हणून भाग घेणे सुरू झाले. त्या वेळी गोगावले रहायचे त्या नारायण पेठेत अनेक बॅन्ड पथकांची दुकाने होती. तासन्तास अतुल आणि अजय या दुकानापाशी चकचकीत वाद्ये निरखत घुटमळायचे. बॅन्ड पथकांच्या सतत पाठीमागे लागायचे. कधी तरी त्यांना दया यायची आणि मग एखाद्या वेळला की-बोर्ड, ट्रम्पेट हाताळायला मिळायचे. मैत्रीदेखील त्यांनी ज्याच्यापाशी वाद्ये आहेत अशाच विद्यार्थ्यांशी केली. नवनवीन वाद्ये हाताळायची आणि स्वतः वाजवून बघत शिकायची -- अनुभव हाच त्यांचा गुरू बनला. कुठेही तालीम घेतली नसतानाही हात हार्मोनियमवर चांगलाच फिरू लागला.
"डॉक्टर-इंजिनीअरिंगला पाठवले असते तर किमान पाच लाख रुपयांचा खर्च आलाच असता. मग आमच्यावर एकदाच फक्त एक लाख रुपये खर्च करा आणि आम्हाला की-बोर्ड आणून द्या," असा तगादा वडिलांकडे सतत लावला. अखेर वडिलांनी मागणी मान्य केली. मग कुठला की-बोर्ड घ्यायचा या वर चर्चा सुरू झाली. वस्तू घ्यायची तर तर भारीचीच असे ठरवून त्यांनी दिड लाख रूपयाचा कि-बोर्ड घरात आणला. अगदी सुरूवातीपासूनच 'खाईन तर तुपाशी' हा 'ऍटिट्युड' या दोघांनीही जपला आहे. त्यांच्या पहिल्या पहिल्या लाईव्ह ईन कॉन्सर्टच्या वेळला ही १०८ वाद्यवृंद, ५० गायक, शंभरेक परफॉर्मर्स ईत्यादी लवाजम्यासह त्यांनी कार्यक्रम दिला. मराठी संगीतकारांसाठी ही गोष्ट नवीन होती, आणि आजही आहे.
आजही अजय अतुल त्याच की-बोर्डवर काम करतात. की-बोर्ड हातात आल्यानंतर त्यांनी सुरवात केली ती छोटी छोटी जिंगल्स बनवून. संगीत नसानसात होतंच. पुण्यात काही छोटेमोठे कार्यक्रम, जाहिरातींची जिंगल्स, मग धार्मिक अल्बम्स असं करत करत कामाला सुरुवात झाली.  हळूहळू यश मिळत गेलं. मोठं काहीतरी मात्र मिळत नव्हतं.
प्रत्येक मराठी माणसांप्रमाणे गणपती हे त्यांचं आराध्य दैवत आहे. संगीतक्षेत्रातही गणपतीबाप्पाच त्यांच्या मदतीला धावून आले. गणेशोत्सवानिमित्त स्त्रोत्र आणि भजनांच्या सिडिज दरवर्षी शेकडो येतात. टाईम्स म्युझिक च्या अश्याच एका सिडिचं काम त्यांना मिळालं. 'विश्वविनायक' या अल्बमची निर्मिती सुरू झाली. या अल्बमची संकल्पनाही अजय आणि अतुल यांचीच. पठडीतली फिल्मी गाण्यांच्या चालीवरची गाणी बसवण्याचं त्यांनी टाळलं. जवळ जवळ दोन वर्षे गणपतीच्या पुराणकथा, स्तोत्रं, आरत्या यांचा त्यांनी अभ्यास केला, संस्कृत स्त्रोत्रांना संगितबद्ध केलं, आणि मग 'विश्वविनायक'ची निर्मिती झाली. या अल्बमवर संगीतकार म्हणुन नाव लिहतांना अतुल-अजयहे वयानुरूप येणारं नाव ऱ्हिदमिक वाटत नसल्याने 'अजय-अतुल' हे नाव त्यांनी निवडलं.
मात्र विश्वविनायक लगेच हिट झाला नाही. अल्बम रिलीज झाला तो अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जन झाले, सहा महिने-वर्ष लोटलं, तरी काही नाही. स्ट्रगल चालूच होतं. अनेकदा तर काही कामदेखील नसायचं. पण बाप्पाचा आशीर्वाद होता. दोन वर्षांत विश्वविनायक ची माउथ-टू-माउथ पब्लिसिटी झाली. कुणी गणपतीत १०० सीडीज वाटल्या, कुणी कुणाला गिफ्ट दिल्या, एकाला आवडलं दुसर्‍याला सांगितलं. आणि यश कणाकणानं, दबक्या पावलांनी आलं. 'विश्वविनायक'ने अजय अतुल ची ओळख निर्माण केली.
आज मराठी माणसाला अजय-अतुलची ओळख करून देण्याची खरं गरजच नाही. गेल्या काही वर्षांत या जोडीने संगीतक्षेत्रात जणू काही क्रांतीच घडवून आणली आहे. मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात. मराठी संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली. अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं. मराठीत 'अगं बाई अरेच्या' 'जत्रा,' पासून ते 'नटरंग' 'जोगवा' पर्यंत आणि हिंदीत 'गायब' पासून ते 'सिंगम' आणि आता येऊ घातलेला 'अग्नीपथ' पर्यंत त्यांच्या यशस्वी चित्रपटांची, गाण्यांची यादी थोडक्यात न संपणारी आहे.
मराठी बरोबरच हिंदी चित्रपट, मालिका, नाटक, लाईव्ह कॉन्सर्टस, जिंगल्स ईत्यादीमध्ये अजय अतुल आज व्यस्त आहेत. गणपतीबाप्पांवरची श्रद्धा कायम आहे. "त्याच्या'कडे आमच्यासाठी प्लॅन आहे. गॉड हॅज अ प्लॅन फॉर अस ! वी आर जस्ट फॉलॉइंग दॅट प्लॅन." ईतक्या समर्पण भावनेनं हे दोघं भाऊ काम करत आहेत. रहमान प्रमाणे अजय अतुल संगीतातच देवाला पाहतात. हा देवच त्यांच्या माध्यमातून भारताला परत ऑस्कर मिळवून देइल ही सदिच्छा!
दि. ७ ऑगस्ट २०११ रोजी तरूण भारत च्या आसमंत पुरवणीत प्रकाशीत झालेल्या प्रस्तूत लेखाचे हे कात्रण

No comments:

Post a Comment