Friday 2 September 2011

अगाथा संगमा

एकविसाव्या शतकातला भारत म्हणजे तरूणांचा देश. स्वातंत्र्याची ६५ वर्षे पुर्ण करतांनाच आता देशाची धूरा 'यंग ब्रिगेडच्याच' खांद्यावर असणार हे नक्की आहे. म्हणुनच प्रत्येक क्षेत्रात आज तरूणांईचे आयकॉन्स बनणे आणि बनवणे सुरू झाले आहे. देशातल्या प्रत्येक शहरात भविष्याकडे डोळे लावून बसलेले महाविद्यालयीन तरूण; विविध क्षेत्रामध्ये नावारूपाला येणारं तरूण नेतृत्त्व आणि कर्तृत्त्व या सर्वांनी ६५ वर्षे वयाच्या या स्वातंत्र्याला एक नवी उभारी दिलेली आहे.
अन्य क्षेत्रांबरोबच राजकारणातही अनेक युथ आयकॉन्स निर्माण झाले आहेत. राजकारणाला फुल टाईम करीअर म्हणुन पहाणारे आणि कॉर्पोरेट स्टाईल पॉलिटिक्स करणारे उच्चशिक्षित युवक या क्षेत्राला थोड्याफार प्रमाणात का होईना बदल दाखवत आहेत. म्हणुनच ज्या देशात खासदार होण्याची वयोमर्यादाच २५ आहे, त्या देशात सत्तावीस वर्षाची अगाथा संगमा खासदार म्हणुन निवडूनही येते, आणि डॉक्टर मनमोहसिंग यांच्या मंत्रीमंडळात सर्वात कमी वयाची मंत्री बनुन 'ग्रामिण विकास' सारख्या महत्त्वाच्या खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कारभारही सांभाळते ही अतीशय उल्लेखनिय बाब होउन बसते. कुटुंबात असलेली राजकिय पार्श्वभुमी आणि वडिल पि ए संगमा यांचं राजकिय वजन या गोष्टी लक्षात घेतल्या तरीही मेघालयच्या दुर्गम गारो टेकड्यांमध्ये बालपण घालवलेल्या या मुलीने ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणुन ज्या आत्मविश्वासाने विश्वसमुदायासमोर भारताचं जे प्रतिनिधित्त्व केलं आहे त्याची दखल घेणं आवश्यक आहे.
नुकत्याच जुलै महिन्याच्या चोवीस तारखेला अगाथाने आपला एकतीसावा वाढदिवस साजरा केला. यातली सहा वर्ष तीने खासदार म्हणुन तर साडेतीन वर्षे मंत्री म्हणुन घालवली आहेत . आज राजकारणात असलेल्या अनेक तरूण नेत्यांप्रमाणेच अगाथाला देखील हे क्षेत्रं वारसा हक्काने मिळालेलं आहे. तीचा जन्मच मुळी दिल्लीचा! १९८० मध्ये अगाथाचा जन्म झाला तेव्हा वडिल पुर्णो ऍजिटॉक संगमा हे केन्द्रीय मंत्रीमंडळात मंत्री होते. ती शाळेत जाऊ लागली, तेव्हा १९८८ मध्ये ते मेघालयचे मुख्यमंत्री झाले. ती पुण्यात कायद्याचा अभ्यास करत असतांना पि ए संगमा यांनी शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. आणि २००८ मध्ये ती दिल्लीला हायकोर्टात वकीली करत असतांना वडिलांनी राष्ट्रीय राजकारणातून मेघालयच्या राजकारणात उडी घेतली, आणि खासदारकीची धूरा आपल्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान अगाथा च्या खांद्यावर सोपवली.
मात्र अगाथाला वारसाहक्काने 'राजकीय वजन' ही एकच गोष्ट मिळालेली नाही. उच्चशिक्षण, वक्तृत्त्व, समस्यांची जाण, हजरजबाबीपणा आणि अभ्यासु वृत्ती या गोष्टी देखील तीला पिढीजात प्राप्त झाल्या आहेत. वडिल पि ए संगमा परराष्ट्र संबंध आणि कायद्याचे अभ्यासक आहेत. मोठा भाऊ कर्नाड हा अमेरिकेतील पेनिसॅल्व्हीया विद्यापिठ्याच्या व्हॉर्टन बिझनेस स्कुलमधून एम बि ए आहे. मेघालयच्या अर्थमंत्रीपदाची धूरा सांभाळल्याच्या दहाव्या दिवशीच मेघालयचा वर्षभराचा अर्थसंकल्प सादर करून कर्नाडने आपल्या बुद्धीची चुणुक दाखवून दिली होती. अगाथाचा दूसरा भाऊ जेम्स आणि मोठी बहीण ख्रिस्ती देखील उच्चविद्याविभुषित आहेत. जेम्सनेही नुकतंच राजकारणात पदार्पण केलेलं आहे तर ख्रिस्तीचं नाव आर्किटेक्ट म्हणुन गाजतंय.
मेघालयच्या टेकड्यांमध्ये शालेय शिक्षण पुर्ण केल्यानंतर बारावीनंतर पाच वर्षांचा विधी अभ्यासक्रम करण्यासाठी अगाथाने २००० साली थेट पुणे विद्यापिठ गाठलं आणि आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. लोकसभेच्या सभापतींची कन्या, अशी ओळख माहिती होऊ नये, याकडेच तिचा कल होता. अन्य सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणेच ती कायम कॅम्पसमध्ये वावरायची. अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या वेळी अगाथा आजारी पडली होती. त्यानंतर एक वर्ष थांबून तिने २००५ साली अभ्यासक्रम पूर्ण केला.
सायबर लॉ, कॉर्पोरेट लॉ, मानवाधीकार आणि संरक्षण कायद्यांमध्ये तीने पदवीकाही मिळवल्या. ईंग्लंडला नॉटींगहम विद्यापिठातून ईनव्हायर्नमेन्टल मॅनॅजमेन्टमध्ये एम ए केल्यानंतर तीने दिल्ली हायकोर्टात वकील म्हणुन करीअरला सुरूवात केली. कायद्याचा अभ्यास करतांना तीने निवडलेले विषय असोत, किंवा एम ए करण्यासाठी निवडलेला पर्यावरणशास्त्र हा विषय असो, नव्या जगातील नव्या विषयांना जाणुन आणि समजुन घेण्याचा तिचा प्रयत्न यातून दिसतो. आयुष्यात कधी तरी संगमा यांचे राजकीय वारसदार म्हणून भूमिका पार पाडावी लागेल, याची तिला जाणीव होती. इतक्या लवकर खासदार होण्याची वेळ येईल आणि मंत्रिपदाचा मान मिळेल, अशी तिलाही अपेक्षा नसावी. मात्र पुढेमागे आपल्याला राजकारणात यायचेच आहे, त्याची तयारी म्हणुनच तीने हे विषय निवडले. म्हणजेच अगाथाचा राजकारणातील प्रवेश हा अपघाताने झालेला नाही. या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने,  आणि तयारीने तीने पदार्पण केलं आहे.
दिल्लीला फॉक्स मंडल लिटल ऍण्ड कंपनी या लॉ फर्म मध्ये काम करत असतांनाच वडिल पि ए संगमा यांनी खासदारकिचा राजीनामा दिला आणि अगाथाला आपला वारस म्हणुन निवडणुकीस उभे केले. वर्ष होतं २००८. त्या वेळला उण्यापुर्र्या सत्तावीस वर्षाच्या अगाथाने प्रचारसभांना संबोधीत करणे, रोड शो, आणि जनतेशी संवाद ह्या सगळ्या गोष्टी लिलया केल्या. मेघालयच्या गारो, खासी आणि जैतीया बोलींबरोबरच ईंग्रजी, हिंदी आणि पुण्यात राहिल्यामुळे मराठीचीही तीला चांगली जाण आहे. विलासराव देशमुख ग्रामिण विकास खात्याचे मंत्री असतांना या खात्याची राज्यमंत्री म्हणुन अनेकदा त्यांच्याबरोबर दौ-यावर जाण्याची संधी अगाथाला प्राप्त झाली. तेव्हा बरेचदा त्यांच्याशी मराठीत बोलून तीने धमाल उडवून दिली होती.
ईंग्रज सत्तेच्या आणि धर्मांतरणाच्या प्रभावामुळे मेघालय, मणिपुर, मिझोराम ईत्यादी राज्यांची राजभाषा आज ईंग्रजी आहे. हिंदी किंवा त्यां त्या राज्यातील स्थानिक भाषेला राजभाषेचा दर्जा नाही. हिंदिबद्दल असलेली अनास्था ह्याला कारणीभुत आहे. मंत्रीपदाची शपथ अस्खलीत हिंदीमधून घेतांना अगाथाने पुर्वोत्तर राज्यांमध्ये असलेली ही अनास्था आता दूर होते आहे, हा संदेश देण्याचाच प्रयत्न केला.
या सगळ्यांबरोबरच कित्येक किलोमिटर्स पायी प्रवास करण्याची तीची क्षमता आहे. आणि पायी चालतांना हाती कॅमॅरा असेल, तर मग तर काही बघायलाच नको! फोटोग्राफिचा आपला छंद तीने प्रयत्नपुर्वक जपला आहे. पर्यावरण या विषयावर तर तीचा अभ्यासही आहे. शिवाय मेघालयचा निसर्गश्रीमंत वातावरणात बालपण घालवले असल्याने ती पर्यावरण रक्षण या विषयाबद्दल भरभरून बोलते. या क्षेत्रातील अनेक एनजिओसाठी ती कामही करते.
मेघालयच्या लोकांबद्दल आणि निसर्गसौंदर्याबद्दल तीच्या मनात नितांत प्रेम आहे. ईथला निसर्ग कॉर्पोरेट आक्रमणाचा बळी ठरू नये, आणि त्याबरोबरच लोकांनी मागासलेलेही राहू नये या दुहेरी जबाबदारीला पार पाडतांना तीने अनेक धाडसि निर्णयही घेतले आहेत. युवा नेतृत्त्व म्हणुन तिच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणिवही अगाथाला आहे. "दोन बादल्या पाण्यासाठी सहा किलोमिटर टेकड्या तुडवत जावे लागणे हे किती जिकरिचं काम आहे, ते मेघालयच्या दुर्गम भागात मी पाहिलंय. हे दोन बादल्या पाणी त्यांच्या घरापर्यंत पोचवलं तर ते घर सोडून जाणार नाहीत. मग परकिय येऊन तो भुभाग हस्तगत करू शकणार नाहीत. शेवटी माणसं राहिली, तरच राज्य राहिल. देश राहिल. त्यासाठी आधी माणसं घरी रहायला हवी!"
अतीशय सोप्या शब्दात अगाथा मोठा संदेश देऊन जाते. 'अगाथा' या नावाचा अर्थ आहे सन्माननिय. पुर्वोत्तर राज्यांना त्यांचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी झटणा-या  अगाथा ला 'फेस ऑफ नॉर्थ ईस्ट' अशी योग्यच ओळख प्राप्त होते आहे. पुर्वोत्तर राज्यांप्रमाणेच जरा दुर्लक्षीत राहिलेली अगाथा ही खर्र्या अर्थाने 'युथ आयकॉन' आहे. असायला हवी.

No comments:

Post a Comment