Tuesday 20 September 2011

उस्ताद अहमद हुसेन - महंमद हुसेन!


"अज़ दिल रीज़त, बर दिल खीज़त" म्हणजे- या काळजातून उसळणारी आणि त्या काळजावर बरसणारी गज़ल म्हणजे एक मनभावन काव्यप्रकार आहे.ती काळजाची भाषा आहे.हृदयाचा उद्‌गार आहे. मात्र या तरल काव्यमाध्यमावर अधिराज्य गाजवणा-या काही मोजक्याच नावांशी साधारणपणे आपला परिचय  असतो. ऊस्ताद मेहदिहसन पासुन ते गुलाम अली, जगजीतसिंग, पंकज उदास आणि त्यांच्या सुप्रसिद्ध अश्या काही गज़लांच्या पलिकडे आपल्यापैकी अनेकजण सहसा जात नाहीत. मात्र 'सितारों के आगे जहॉं  और भी है' हेदेखील तेवढंच खरं.
राजस्थानच्या राजेशाही वैभवाचे प्रतीक असलेले हे दोन गज़लनवाज़ भाऊ गेल्या चार दशकांपासुन चोखंदळ गज़लरसिकांच्या गळ्यातले ताईत आहेत. शास्त्रीय संगीत यांच्या रक्तात आहे आणि गज़लची जाण हृदयात. उर्दु आणि हिंदी त्यांच्या जिभेवर तीतक्याच सहज नांदतात जीतक्या फारसि आणि पंजाबी. सुफी गाण्यातील उंची आणि जयपुर परंपरेतील खर्जातील स्वरांवर त्यांचे सारखेचे प्रभुत्त्व आहे. आजवर अनेकांच्या 'धडकन-ए-हिज्र' झालेल्या शेकडो गज़लांना त्यांनी आपल्या आवाजाच्या जादूने अविस्मरणीय बनवलंय. आतापर्यंत अनेकांना कल्पना आली असेलच ही 'जिक्र' उस्ताद अहमद हुसैन आणि महंमद हुसैन यांचा होतोय!
गज़लची आवड असणार्र्यांना उस्ताद अहमद-महंमद हुसेन यांनी गायलेल्या अनेक गजला आता आठवू लागल्या असतील, मात्र ज्यांना गज़लबद्दल फारशी माहिती त्यांनी काही वर्षापुर्वी  आलेल्या 'वीर झारा' चित्रपटातील "आया तेरे दर पे दिवाना!" हे गाणं आठवावं. सहसा चित्रपटसृष्टीपासुन, मुळात मुंबईपासुनच दूर राहणे पसंत करणार्र्या उस्तादद्वयांनी या गाण्यात केलेले  हार्मोनायझेशनचे एकापेक्षा एक प्रयोग आपल्याला नकळत 'वाह्! क्या बात है!" असं म्हणायला लावतात. गेल्या चौरेचाळीस वर्षापासुन रसिकांच्या हृदयाच्या ठाव घेणारे हे हार्मोनायझेशनचे प्रयोग म्हणजे हुसेन बंधुंचं वैषिष्ट्य राहिलेलं आहे. आजही त्यांनी ते जपलंय.
जयपुर घराण्याचे जेष्ट गजल आणि ठुमरी गायक अफज़ल हुसेन हे शास्त्रीय संगित क्षेत्रातलं नावाजलेलं नाव. अहमद (१९५१) आणि महंमद (१९५३) ही त्यांचीच मुलं. शास्त्रीय संगिताचं रितसर शिक्षण वडिलांकडेच झालं. वयाच्या आठव्या आणि दहाव्या वर्षी त्यांनी आपला पहिला कार्यक्रम दिला आणि कारकिर्दीला सुरवात झाली. थोड्या कठीण शास्त्रीय संगीतावर बेतलेली चाल, उत्तम शद्ब, आणि सुस्पष्ट उच्चारण ही त्यांची वैषिष्ट्य सांगता येतील.
मात्र सगळ्यात मोठं वैषिष्ट्य म्हणजे भावांची जोडी एकत्रितरित्या कार्यरत आहे! दोघानी एकाच घरात जन्म घेतलाय. नेहमी सोबतच काम करण्याची शिकवण वडिलांकडून मिळाली आहे. एक विचार, एक सुर व एक ओळख अशी त्यांची जोडी आहे.एकही शख्स तो पहचान हम दोनो की, चाहे दो जिस्म हो, ईक जान है हम दोनों की! ही गज़ल खयालने खास हुसेन बंधुसांठी लीहली असावी!
१९५९ मध्ये 'चाईल्ड आर्टिस्ट'च्या रूपात दोघांनी जयपूर आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर यूथ, 'बी' ग्रेड, '' ग्रेडमध्ये देखील निवड होत गेली. भारत सरकारकडून 'टॉप' ग्रेडने सन्मानित करण्यात आले.आतापर्यंत दोघा भावांचे गझलचे ६४ अल्बम बाजारात आले आहेत. त्यातील गुलदस्ता, हमख्याल, मेरी मोहब्बत, द ग्रेट गझल्स, कृष्ण जनम भयो आज, कशिश, रिफाकत, याद करते रहे, नूर-ए-इस्लाम आदी गाजलेले अल्बम्स आहेत. पुरस्कारही बरेच मिळालेत. राजस्थान सरकारकडून राज्य पुरस्कार, राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 'बेगम अख्तर पुरस्कार', नवी दिल्ली, उ.प्र. सरकारद्वारा 'मिर्झा ग़ालिब पुरस्कार', महाराष्ट्र शासनाकडून 'आपला उत्सव पुरस्कार' आणि अनेक!
शास्त्रीय संगित आणि गज़ल जाणणार्यांना अतीशय भावणारा हा स्वर सामान्य रसिकांपर्यंत मात्र हवा तसा पोचला नही. याचं कारण म्हणजे कठीण शद्ब आणि त्याहूनही कठीण असं संगित करण्यातच या जोडगोळीला रस आहे. सुरवातीला त्यांनी सादर केलेला कला प्रकार प्रेक्षकाच्या लक्षात आला नाही. परंतु, जेव्हा त्यांच्या लक्षा‍त आला तेव्हा तीच उस्तादद्वयीची ओळख बनली.
खयाल, बशिर बद्र, तसेच त्यांच्याच गावचे असलेले हसरत जयपुरी यांच्या वरवर पाहता क्लीष्ट वाटणा-या रचनांना शास्त्रीय संगीताच्या विविध रागदारींमध्ये चपखल बसवून भाव आणि भावार्थ दोन्हींचा संगम साधत गाणं सादर करण्यामध्ये हुसैन बंधुंनी 'महारत' प्राप्त केली आहे. गज़ल बरोबरच भावगीत आणि भक्तीरसातील गाणी त्यांनी बरीच गायली आहेत. स्वतः मुस्लीम असुनही ॐकार मंत्र, मीराभजन आणि सुरदास भजन ते भक्तीभावाने म्हणतात. 'मेहफिलीं'मध्ये आलेली भजनांची फर्माइश ते आवर्जुन पुरी करतात. त्यांच्यामते संगीत परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपात त्याची आळवणी करणे हे ईश्वराचे कार्य आहे. याशिवाय अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींवर त्यांची अपार श्रद्धा आहे. ख्वाजाचा दरबार म्हणजे सुफी गायकांचे माहेरघर असते. त्यामुळे सुफी शैलीवरही दोघांनी प्रभुत्त्व मिळवले आहे. उत्तर भारतात आणि पाकिस्तानात सुप्रसिद्ध अशी पंजाबी गज़लही त्यांनी आत्मसात केलेली आहे. गज़लगायकीच्या क्षेत्रातील वेगळी शैली त्यांनी निर्माण केली आणि जपली. जपत आहेत.
शास्त्रीय संगीत जाणणारा, भावार्थाला मानणारा असा त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. झगमग प्रसिद्धीच्या आजच्या जगात उस्तादद्वयिंनी आपली संगीतसाधना स्वतःसाठी आणि या चाहत्यावर्गासाठी सुरू ठेवलेली आहे. मात्र त्यांचा आवाज, शैली ही दर्दी रसिकांना आणि गायकांना बरोबर खुणावते. याचं ताजं  उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचा उभरता गज़लनवाज विजय गटलेवार होय. गज़लचा 'दिवाना' असलेल्या विजयने कधीतरी कुठेतरी ऐकलेली हुसैन बंधुंची 'मै हवा कहॉं वतन मेरा' ही गज़ल त्याच्या मनात ईतकी पक्की ठसली की त्याने सरळ जयपुर गाठलं. उस्तादजींकडूनच गज़ल शिकायची असा त्याने हट्टच धरला. बरेच दिवस त्याची परिक्षा घेतल्यानंतर उस्तान अहमद हुसेन यांनी त्याला शिष्य़ बवनला. गुरुगृही राहून बराच काळ शिक्षण घेतल्यानंर विजय गटलेवारने मुंबई गाठली आणि त्यानंतर मागे वळून पाहिलंच नाही. हुसेन बंधुंनी असे अनेक शिष्य तयार केलेले आहेत. दिल्लीला नुकतीच त्यांच्या नावाने संगित  अकादमी सुरू झाली आहे. गुरूगृही जाउन शिक्षण घेण्याचा पद्धतीचे समर्थक असलेले उस्ताद या अकादमीमध्ये चाहत्यांच्या आग्रहास्तव काही ठरावीक विषयांवर व्याख्याने देतात.
भारतीय शास्त्रीय संगीतावर हुसेन बंधुंची देवाईतकीच श्रद्धा आहे. गज़ल ही जन्माने भारतीय नसली तरीही भारतातच ती रूजली आणि वाढली. अश्या या भारतातील गज़ल रसिकही आज गज़ल म्हटलं की पाकिस्तानी गायकांची नावं घेतात ही गोष्ट हुसेनबंधुंना दुदैवाची वाटते. पाकिस्तानात कला आहे, पण त्याची कदर नाही. पाकिस्तानी गायक भारतात येऊन येथील रसिकांच्या भरवश्यावर पैसा, प्रसिद्धी आणि नाव मिळवतात आणि भारतीय गायक मात्र या स्पर्धेत मागे पडतात, या गोष्टीची त्यांच्या मनात सल आहे. मागे पाकिस्तानी गायकांच्या विरोधात भारतीय गायकांनी जी आघाडी उभी केली होती त्यातील हुसेन बंधु एक महत्त्वाचे सदस्य होते.
गझल हा शब्द गजाल या शब्दावरुन आला आहे. गजाल म्हणजे हरिणाचे अश्रु! शिकारी एका हरणाचा पाठलाग करतो आहे. हरिण पुढे सुसाट वेगाने पळून दमते आणि थांबून त्या शिक-याकडे वळून पाहते, तेव्हाच् त्या शिका-य़ाच्या कमानीतील बाण सूटतो, आणि तो बाण आपली छाती भेदणार या कल्पनेने त्याच्या डोळ्य़ात् तरळलेले अश्रू म्हणजेच् गजाल होय! शास्त्रीय संगीताची साधना करतांना नेमकी ही भावना आपल्या गज़ल मधुन व्यक्त करण्याचं सामर्थ्य असलेले उस्ताद अहमद हुसेन आणि महंमद हुसेन भारतीय गज़ल गायकीचे वैश्वीक राजदूत आहेत.

No comments:

Post a Comment