Wednesday 7 September 2011

बायचुंग भुतिया

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाच्या निवृत्तीने कोलकाता-गोव्याबरोबरच मराठी फुटबॉलरसिकही हळहळला. गेली दोन दशके भारतीय फुटबॉलचा चेहरा म्हणून ओळखला जाणार्र्या बायचुंगचे स्थान भारतीय फुटबॉलच्या 'जनरेशन नेक्स्ट'मध्ये सचिन तेंडुलकरप्रमाणे आहे!
 भारताकडून सर्वाधिक १०९ सामने खेळण्याचा पराक्रम बायचुंगने त्याच्या सोळा वर्षांच्या कारकीर्दीत केला. त्याचे ४३ आंतरराष्ट्रीय गोल म्हणजे व्यक्तिगत कौशल्य आणि सांघिक कामगिरीचा आदर्श ठरले. मात्र आकडेवारी बाजुला ठेवून विचार केल्यास तो लाखो उदयोन्मुखांसाठी स्फूतीर्स्थान ठरणे ही भुतियाची मोठी कमाई मानावी लागेल. भारतात क्रिकेटचे वेड जगजाहीर आहे. असे असतानाही बायचुंगने आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले. तो भारतीय फुटब़ॉलचा पोस्टर बॉय ठरला. भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रिकेटनंतर लोकप्रियतेत बायचुंगचा क्रमांक लागतो, हे त्याचं केवढं मोठं यश!
बायचुंगची लोकप्रियता पाहून माजी प्रशिक्षक बॉब हॉटन यांनी सचिन तेंडुलकरशी त्याची तुलना केली होती. मात्र केवळ लोकप्रियतेच्या निकशावरच नव्हे, तर खेळातील विक्रमी कामगिरी, आणि मैदानाबाहेरील विनम्र वागणुक आणि त्याने जपलेलं सामाजिक भान यावरूनही त्याची तुलना सचीनशी नक्कीच होउ शकेल.
बायचुंने भारतीय फुटबॉल लिगमध्ये इतिहास घडविला आहे. इस्ट बंगाल, जेसीटी फगवाडा आणि मोहन बागान या तीन क्लबकडून तो फुटबॉल लिगमध्ये खेळलेला आहे. त्याच्या नावावर २०० पेक्षा जास्त गोल्स आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने नेहरू चषकावर लागोपाठ दोन वेळा आपले नाव कोरले. फुटबॉलमध्ये, तेही भारतातर्फे खेळून आंतरराष्ट्रीय सामन्यांचे शतक पूर्ण करणे ही काही सोपी बाब नव्हे. शिवाय आपला स्वतःचा क्लब असणारा तो जगातला एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू  आहे.
ईतके असुन सिक्कीम या त्याच्या जन्मभुमीप्रती आणि लोकांप्रती असलेली त्याची आत्मीयता, खेड्यातल्या एखाद्या गल्लीत फुटबॉल खेळणार्र्या मुलापासुन ते आंतरराष्ट्रीय पटलावर तयार होत असलेल्या खेळाडुंबद्दल त्याला वाटणारी तळमळ या सगळ्यांमुळे देखील त्याचे नाव कायम लक्षात राहिल. युवा पिढीतील फुटबॉलपटू घडविण्यासाठी त्याने मिशन हाती घेतले असून, दिल्लीत फुटबॉल स्कूल सुरू केले आहे. सिक्कीमसह ईशान्य भारतातील फुटबॉलच्या विकासाकरिता जागतिक फुटबॉल महासंघाकडून (फिफा) भरीव अनुदान मिळविण्यातही त्याचा पुढाकार आहे.
खरं पाहिलं तर भुतिया हे मुळचे तिबेटचे. पंधराव्या दशकात ते सिक्कीमसह भारताच्या पूर्व भागात आणि भुतानमध्ये स्थलांतरित झाले आणि आता कायमचे भारतवासी झाले. टिंकी टम या सिक्कीममधील खेड्यात दोरजी दोर्मा आणि सोनम या शेतकरी दाम्पत्याला १५ डिसेंबर १९७६ साली प्राप्त झालेले तीसरे अपत्य म्हणजे बायचुंग. तिबेटीयन भाषेत बायचुंगचा अर्थ होतो -- छोटा भाऊ म्हणजेच शेंडेफळ! भारतीय फुटबॉलमध्ये त्याची भूमिका मात्र वडीलधाऱ्या भावाची आहे. त्याचा मोठा भाऊ स्थानिक फुटबॉल स्पर्धेत खेळला होता. शालेय पातळीवर बायचुंग भुतिया हा फुटबॉल व्यतिरिक्त बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये प्रतिनिधित्व करत असे. मोठ्या भावाने फुटबॉलमधील त्याचं कौशल्य हेरलं, आणि बायचुंगची जडणघडण सुरू झाली. आई आणि वडिल हे गरीब शेतकरी असल्यामुळे त्याच्या खेळाच्या वेडाकडे त्यांचं फारसं लक्ष नव्हतं. मोठ्या भावाने मात्र नेहमी त्याला प्रोत्साहन दिलं. कर्मा भुतिया या आपल्या काकांकडे तगादा लावून त्याने बायचुंगचा प्रवेश पॅक्योंग या पुर्व सिक्कीममधील गावातील सेंन्ट झेवियर्स कॉन्व्हेन्टमध्ये करवला. आपल्या मोठ्या भावाच्या प्रयत्नांचं चीज करत केवळ नऊ वर्षाच्या बायचुंगने स्पोर्टस ऑथॉरीटी ऑफ ईण्डीया ची शिष्यवृत्ती मिळवली, आणि सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे ताशी ऍकॅडमी मध्ये फुटबॉल खेळाडू म्हणुन प्रवेश प्राप्त केला. सचिनला आणि बायचुंगमध्ये असलेलं हे आणखी एक साम्य.
पुर्वोत्तर राज्यांमध्ये असलेले फुटबॉलचे वेड जगजाहिर आहे. वर्षभर तेथे क्लब आणि लिग मॅचॅस होत राहतात. बायचुंगचेही सिक्कीमच्या छोट्या छोट्या क्लब्सकडून खेळणे सुरू झाले. १९९२ मध्ये सुब्रतो कप या प्रतिष्टेच्या मानल्या जाणार्या स्पर्धेमध्ये तेव्हाचा भारताचा गोल कीपर भास्कर गांगुली याने बायचुंगचा खेळ पाहिला, आणि त्याला फुटबॉलच्या माहेरघरी - कलकत्त्याला - येण्याचं आमंत्रण दिलं. १९९३ मध्ये ईस्ट बंगाल क्लब ची जर्सि त्याने घातली, आणि हाच बायचुंगच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. १९९५ मध्ये जेसीटी फगवाडा या क्लबकडून खेळताना त्याने ईडियन फुटबॉल लिगमध्ये सर्वाधीक गोल मारले, आणि आपला आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा मार्ग प्रशस्त केला. वयाच्या १९व्या वर्षी नेहरू कपमधील उझबेकिस्तानविरूद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 'राखीव खेळाडू' म्हणुन गोल करून बायचुंगने आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. 'सिक्कीम्स स्नॅपर' हे त्याचे टोपण नाव गोल मारण्याच्या शैलीवरून त्याला पडलं ते ह्याच दरम्यान.
त्यानंतरची भुतिया म्हणजे भारतीय फुटबॉल हे समिकरण तब्बल दशकभरापर्यंत चाललं. १९९९ला बायचुंगने कर्तृत्वाची आणखी एक किक लगावली. इंग्लंडच्या सेकंड डिव्हिजन लीगमध्ये खेळणाऱ्या बरी एफ. सी. क्लबने त्याला तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. युरोपने संधी दिलेला तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. चपळता, चेंडूवर कमालीचे नियंत्रण, अथक परिश्रम करण्याची वृत्ती आणि जिगर या गुणांच्या जोरावर बायचुंग केवळ भारतच नव्हे, तर एशियन फुटबॉलमधील स्टार ठरला. फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी अर्जुन पुरस्कार तसेच पद्म श्रीसन्मानाने गौरविण्यात आले. भारताचा माजी फुटबॉलपटू विजयनने बायचुंगला भारतीय फुटबॉलसाठी ईश्वराने दिलेली भेट असल्याचे म्हटले होते.
चढत्या कारकिर्दीदरम्यान बायचुंग अनेकदा वादाच्या भोवर्र्यातही अडकला. तो कोणत्या क्लबकडून खेळतो, या पासुन ते तो खेळात राजकारण आणतो, यापर्यंत सगळे आरोप त्याच्यावर झाले. २००६ मध्ये प्रशिक्षक सय्यद नयीमुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी खराब होत होती. त्यावेळीच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिदीर्ला गुडबाय करण्याची मानसिक तयारी केली होती. मात्र, एआयएफएफचे अध्यक्ष प्रियरंजन दासमुंशी आणि नवीन प्रशिक्षक बॉब हॉटन यांच्या विनंतीवरून त्याने आपला विचार बदलला. याशिवाय 'राजकारणी, उद्योजकांच्या टेरेसवरील गवताची मशागत करण्यासाठी आपली व्यवस्था राबवली जाते, तोपर्यंत फुटबॉलच्या मैदानावरील भवितव्य चिखलातच रुतलेले राहील,' असे परखड बोल सुनवून त्याने अनेकदा राजकारण्यांचा रोश स्वतःवर ओढावून घेतला.
भुतीया हे तिबेटमधील बुद्ध धर्मीयांचे उपनाम असले तरीही बायचुंग स्वतःल धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगतो. मात्र याचा अर्थ तो निधर्मी आहे असा नव्हे. केवळ तार्कीक किंवा अध्यात्मिक आधारावर बुध्दाच्या विचारांचे पालन करीत नाही, तर तो आपल्या वैचारीक स्वातंत्र्याची जोपासना करण्याचा दृष्टीने विचारांना मानतो. मुळात तिबेटियन असल्यामुळे २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकची मशाल घेण्यास त्याने नकार दिला होता. बायचुंगने घेतलेल्या या निर्णयामुळे उलट सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.
काही दिवसांपुर्वी झलक दिखला जा या डान्स रिऍलीटी शो मध्ये त्याने भाग घेतला होता. खरं म्हणजे गोल मारल्यानंतरही न नाचणारा हा खेळाडू नृत्याचा गंधही नसतांना या कार्यक्रमात सहभागी झाला तो हाच विचार करून की, पहिल्या दोन-तीन भागांमध्येच आपली गच्छंती होईल. मात्र झालं वेगळंच. सिक्कीममध्ये त्याला देव मानणार्र्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर एस एम एस पाठवून बायचुंगला विजेता बनवले. त्यानिमित्तानं त्याला शेवटच्या भागापर्यंत का कार्यक्रमाबरोबर रहावं लागलं आणि लिग मॅचॅसमधील प्रॅक्टीस सेशन्स आणि एका सामन्यालाही मुकावं लागलं. यामुळे त्याच्यावर पुन्हा टिकेची झोड उठली. मात्र या सगळ्या टिकास्त्रांची मोठ्या खेळाडुंना सवय करून घ्यावी लागते. सचिनबरोबर असलेलं बायचुंगचं हे आणखी एक साम्य!
या सगळ्यांबरोबरच उल्लेखनिय म्हणजे बायचुंगचे मराठी कनेक्शन! त्याची अनेक वर्षांपासुन प्रेयसी आणि आता पत्नी असलेली माधुरी टिपणीस ही मुळची पुण्याची आहे. नुकतेच तीने एक मुलगा आणि एक मुलगी अश्या जुळ्यांना जन्म देऊन एक वेगळा गोल मारला आहे.
पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे बायचुंगने आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवण्याचा निर्णय़ नुकताच घेतला. निवृत्ती घेतली असली तरी सिक्कीम एफसी क्लबकडून तो खेळणार आहे. शिवाय युवा पिढीतील बायचुंग घडविण्यासाठी त्याने मिशन हाती घेतले असून, दिल्लीत फुटबॉल स्कूल सुरू केले आहे. भारतीय फुटबॉलसाठी योगदान देण्यास बायचुंग भुतिया सदैव तयार असणार आहे.

No comments:

Post a Comment