Monday 12 September 2011

ईरॉम शर्मिला

भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीसाठी अण्णा हजारेंनी केलेल्या उपोषणाने अवघा देश अक्षरशः ढवळून निघाला. अण्णांच्या समर्थनार्थ दिल्लीपासुन ते गल्लीपर्यंत लोकांनी उपोषणं केली. अण्णांच्या बरोबरीने दहा दिवस उपोषण करणारे कार्यकर्ते देशभर, अगदी खेडोपाडीदेखील सापडले. बदलाचं वारं वाहू लागलं. मात्र प्रत्येक उपोषण यशस्वी होत नसतं. आणि प्रत्येक उपोषण करणारा अण्णांसारखा 'लकी' देखील नसतो. दुर दुर्गम पुर्वोत्तरातल्या ईम्फाल व्हॅलींमध्ये एक मणिपुरी युवती गेली दहा वर्षे उपोषण करत आहे. पण सरकार तिला जबरदस्तीने खाऊ घालत आहे. दुर्दैवाने मेनलँड भारतात तिला फारशी प्रसिद्धी मिळत नाही. अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला समर्थन देण्याचं आमंत्रण या युवतीला दिलं, आणि कधी नव्हे ते - ईरॉम शर्मिला चानु - हे नाव प्रकाशझोतात आलं!
२ नोव्हेंबर २०००! गुरूवार होता. २८ वर्षीय शर्मिला गुरूवारी उपास करायची. मात्र २ नोव्हेंबरच्या गुरूवारी तीने धरलेला उपास आजतागायत तीने सोडलेला नाही. मणिपूरात लष्कराला असलेले काही विशेषाधिकार काढून घ्यावेत व येथून लष्कराला हटवावे यासाठी शर्मिला तेव्हापासुन उपोषण करत आहे. स्वतःच्या तोंडून तीने आजवर अन्नाचा कणही घेतलेला नाही, की पाण्याचा थेंबही नाही.  गेली ११ वर्षे सरकार तिला जबरदस्तीने नाकातल्या नळीवाटे अन्न देऊन जिवंत ठेवत आहे. असं काय घडलं होतं २ नोंव्हेंबर २००० या दिवशी?
मणिपूर व नागालँड या दोन राज्यांमध्ये काही प्रदेशांवरून टोकाचे मतभेद आहेत. एकमेकांच्या प्रदेशावर हल्ला करणे व दुसर्‍या राज्यातील नागरिकांच्या हत्या करणार्‍या टोळ्या दोन्ही राज्यात आहेत. याचा फायदा चीन उठवत आहे व दोन्ही बाजूच्या टोळ्यांना चीन सर्व प्रकारची मदत करत आहे. त्यामुळे नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी व चीनचा या दोन्ही राज्यात संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी भारताने तिथे कायमस्वरूपी लष्कर ठेवलेले आहे व अतिरेकी प्रदेशात लष्कराला हे विशेषाधिकार असतात ते तिथल्या लष्कराला प्रदान केलेले आहेत. या विशेष अधिकारांना "Armed Forces Special Powers Act (AFSPA)" असे म्हणतात. या अधिकारांअंतर्गत लष्कर कोणालाही संशयावरून अटक करू शकते, कोणाच्याही घराची झडती घेऊ शकते व चकमकीत अतिरेक्यांवर थेट गोळीबारही करू शकते. जम्मू-काश्मिरमध्येही लष्कराला हे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत. निरपराध नागरिकांची हत्या करणार्‍या अतिरेक्यांशी लढण्यासाठी लष्करालाही मुक्त हस्त द्यावा लागतो. मात्र पुर्वोत्तर राज्यांतील अंतर्गत कलह मिटवण्यासाठीदेखील परकिय शक्तीप्रणित आतंकवादी भागात असतात तेच अधीकार लष्क़राला दिल्यामुळे येथील नागरिकांमध्ये असंतोष आहे. लष्क़राच्या विरोधात त्यांच्या कारवाया सुरूच असतात. नाईलाजाने कधीकधी लष्करही चुकीच्या पद्धतीने उत्तर देते. असंच काहीसं त्या दिवशी घडलं.
बसची वाट पहात उभ्या असलेल्या एका घोळक्यावर आसाम रायफल्सच्या जवानांनी आतंकवादी समजुन बेछुट गोळीबार केला आणि त्याच दहा लोकांचा जागीच मृत्यु झाला. लष्क़राच्या दुर्दैवाने हे सगळे सामान्य नागरिक होते. यात ६२ वर्षाच्या लेसग्बम ईबेटोमी नावाच्या महिलेचा, आणि १९८८ चा राष्ट्रीय साहस पुरस्काराचा विजेता १८ वर्षीय सिन्नम चंद्रमणी यांचाही समावेश होता. लष्क़राने चालवलेले हे निर्घृण हत्याकांड अवघ्या मणिपुरच्या मनावर खुप मोठा आघात करून गेले.
ईराम नंदा चानु या चतुर्थश्रेणी सफाई कर्मचार्र्याच्या नउ अपत्यांपैकी सगळ्यात लहान ईरॉम शर्मिला या संवेदनशिल कवयित्री असलेल्या मुलीला तर काहीच सुचेनासे झाले. आदिवासी राज्य असले तरी मणिपुरची राज्यभाषा ईंग्रजी आहे. शाळांमधुन ईंग्रजी माध्यमातुनच शिक्षण दिलं जातं. लोकशाही, मानवाधिकार ही मुल्यं शर्मिलाने शाळा-महाविद्यालयात राज्यशास्त्राची विद्यार्थी म्हणुन अभ्यासली होती. त्यांची पायामल्ली चाललेली पाहून तीनं मनोमन ठरवलं  - जोवर मनाला शांती लाभत नाही, तोवर गुरूवारचा हा उपास सोडायचा नाही!
शुक्रवारी आपल्या आईला - ईरॉम सखी चानु यांना नमस्कार करून तीने आपला उपोषणाचा सकल्प सांगीतला. व्यथीत सगळेच होते. आईने परवानगी दिली,  आणि शर्मिलाच्या ऐतीहासिक उपवासाची सुरूवात झाली! मागणी ठरली - लष्कराचे हे विशेषाधिकार काढून घ्यावेत. मणिपूर येथून लष्कराला हटवावे. उपोषणाचा कालावधी ठरला - आमरण!
मात्र अतिरेक्यांनी ग्रासलेल्या प्रदेशातून लष्कर काढून घेण्याची चूक कोणताही देश करणार नाही. त्यामुळे शर्मिलाच्या या मागण्या अमान्य करत उपोषणाच्या तीसर्र्या दिवशी तीला सरकारने अटक केली. स्वतःला मारून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा गुन्हा (कलम ३०९) तीच्यावर दाखल करण्यात आला आणि तीला न्यायालयिन कोठडित ठेवण्यात आलं. मात्र या कलमानुसार गुन्हेगाराला जास्तीत जास्त केवळ १ वर्षाची शिक्षा करता येऊ शकते. त्यामुळे पोलीस शर्मिलाला दरवर्षी अटक करतात आणि मग परत एक वर्षासाठी तीला अटकेत ठेवतात. गेल्या दशकभरापासून हेच सुरू आहे.
ऑक्टोबर २००४ मध्ये न्यायालयाने तिची सशर्त मुक्तता केली. स्वातंत्र्याचा फायदा घेत शर्मिलाने थेट दिल्ली गाठली. महात्मा गांधीं यांना राजघाटावर श्रद्धांजली अर्पण करून तीने जनसभांना संबोधीत करण्याचा सपाटाच लावला. जंतरमंतरवर तीचं उपोषण सुरू झालं. चार दिवसातच दिल्ली पोलीसांनी तीला अटक करून एम्स मध्ये भरती केलं. दवाखान्यातही स्वस्थ बसायचं नाही हेच तीने ठरवलं असावं. शर्मिलाने पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेकांना पत्रे लिहली. जगभर तीचं नाव झालं. दुदैवाने यात मोठी 'ब्रेकिंग न्युज' नसल्यामुळे आपल्या मिडियाने हा मुद्दा दुर्लक्षीत ठेवला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र शर्मिलाच्या आंदोलनाने मोठीच चर्चा भडकवली. अगदी नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीचं नामांकन होईपर्यंत!  यानंतर जणु पुरस्कारांची रांगच लागली.
देशात दुर्लक्ष होत असलं तरिही आंतरराष्ट्रीय समुदायाकडुन शर्मिलाला मिळत असलेलं समर्थन अविश्वसनिय आहे. टर्कीमध्ये २०१० मध्ये आयोजीत केलेलं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संमेलन शर्मिलाच्या कार्याला अर्पण केलं होतं. शर्मिलाने मणिपुरी आणि ईंग्रजी भाषेत लिहलेल्या कवीतांपैकी निवडक १२ कवीतांचं प्रकाशन नॉर्वेच्या जुबान बुक्सने नुकतंच प्रकाशित केलं. 'फ्रॅग्रंस ऑफ पिस' (शांतीचा सुगंध) या पुस्तकाच्या विक्रितून मिळालेला नफा शर्मिलाच्या आंदोलनाच्या समर्थनात दान करण्यात आला.
भारतातील अनेक लेखकांनी, कलाकारांनी शर्मिलाचा मुद्दा आपापल्या माध्यमातुन मांडलाय. तिच्यावरचं पहिलं पुस्तक, दिप्तीप्रिया मेहरोत्राने लिहलेलं 'बर्निग़ ब्राईट' हे खुप गाजलं. हे पुस्तक वाचुन मुळचा गोव्याचा आणि आता ईंग्लंडचा नागरिक असलेला डेस्मंड क़ॉटेन्हो याने शर्मिलाशी पत्रमैत्री केली. अगदी स्वप्नवत या पत्रमैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मात्र परंपरावादी मणिपुरी जनतेला हे आंतरधर्मिय प्रेम मान्य नाहीय. सध्या तरी प्रेमाची कबुली देऊन शर्मिला आणि डेस्मंड आंदोलनाला यश येण्याची वाट बघत आहेत. सरकारने लष्कर हटवले तर आपण डेस्मंडशी लग्न करू, असे शर्मिलाने घोषित केले आहे.
मुंबईच्या कवीता जोशीने 'माय बॉडी माय वेपन' या नावाखाली शर्मिलाच्या संघर्षावर आधारीत डॉक्युमेन्ट्री बनवली आहे, तर पुण्याची ऑजस एस वी शर्मिलाच्या जीवनावर आधारीत 'ले मशाले' नावाचा एकपात्री प्रयोग करत असते. या सर्व माध्यमांतुन शर्मिला सामान्य जनतेपर्यंत पोचते आहे. मात्र लष्कर हटवण्याची तिची मागणी कितपत रास्त आहे, हे अद्याप सांगता यायचं नाही. कारण तसे केल्यास मुळातच भारतापासुन वेगळा पडलेला हा भाग चिनने गिळंकृत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, गृहमंत्री पी चिदम्बरम यांनी या भागातील AFSPA कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शर्मिलाची माग़णी स्पष्ट आहे. आता दशकभराच्या उपोषणानंतर तर ती कसल्याच तडजोडीला तयार नाही. दहा वर्षापासुन तिने आपल्या आईची भेट घेतलेली नाही. जेव्हा लष्कर हटेल, तेव्हा आईच्या हाताने भात खाऊन उपोषण सोडायची तिची ईच्छा आहे.
शर्मिलाची मागणी रास्त आहे, किंवा नाही, हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र पुढच्या वर्षीपर्यंत हे असेच चालल्यास उपोषणाची तपपुर्ती साजरी करणारी ती जगातली बहुधा पहिलीच आंदोलक ठरेल, हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment