Tuesday 13 December 2011

डॉ वर्गीस कुरियन

ताज्या घडामोडींवर आधारीत आपल्या वैषिष्ट्यपुर्ण जाहिरातीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'अमुल' डेअरी प्रोडक्टसतर्फे २६ नोव्हेंबर या दिवशी एक खुप वेगळी जाहिरात वृत्तपत्रांमध्ये झळकली. 'अमुल' ची शुभंकर असलेली मुलगी एका ज्येष्ट व्यक्तीला गुलाबाचे फुल देत आहे. फिकट गुलाबी रंगाचा साधा शर्ट आणि पॅण्ट घातलेल्या या व्यक्तीने गायीच्या एका बछड्याला उचलून छातीशी कवटाळले आहे, आणि मागे आहे 'अमुल' ची भलीमोठी फॅक्ट्री. पंचलाईन आहे - 'वी प्रेझेंट नांईन्टी कॅण्डल्स टू द मिल्कमॅन ऑफ ईंडिया'! आणि ही व्यक्ती म्हणजे 'अमुल' सह एकुणच भारत देशातील दुध उत्पादकांचे भिष्म पितामह - पद्मविभुषण डॉ वर्गीस कुरियन!
'अमूल', 'धारा', 'आणंद', 'ऑपरेशन फ्लड' ही नावं ही नावं न ऐकलेली व्यक्ती विरळाच. या नावांना प्रत्येक भारतीयाच्या घरात आणि जगभरात मानाचं आणि आपुलकीचं स्थान मिळवून दिलं ते वर्गीस कुरियन यांनी. भारतीय धवलक्रांतीचे ते जनक! भारताला दुग्धोत्पादन आणि खाद्यतेलाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याचं संपूर्ण श्रेय डॉ. कुरियन यांचे आहे. जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश म्हणून भारताला घडवण्यात त्यांनी उभारलेल्या संस्थांचा फार मोठा वाटा आहे.
चौकस, ज्ञानी, कल्पक, मेहनती आणि देशाभिमानी पुत्रांनी केलेल्या मोलाच्या कर्तृत्त्वानेच देशाची मान जगात गर्वाने उंच होत असते. डॉ कुरिअन शिक्षणाने मॅकॅनिकल ईंजिनिअर, आणि व्यवसायाने डेअरीचे व्यवस्थापक. मनाने मात्र जनमानसाची व्यथा ओळखणारे आणि मोठी स्वप्न पाहतानाच त्याच्या परिपुर्तीसाठी झटणारे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व. अष्टपैलू यासाठी की ते यशस्वी उद्योजकही आहेत, सहकारक्षेत्रातील अध्वर्युही आहेत, समाजशास्त्राचे जाणकार आहेत, पर्यावरणवादी असण्याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचेही पुरस्कर्ते आहेत, परिवर्तनवादीही आहेत, राजकारणाचे अभ्यासक आहेत, उत्तम लेखक आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम शिक्षक आहेत.
केरळमधील कोझिकोडे येथील एका सामान्य मध्यमवर्गीय केरलाईट ख्रिश्चन कुटुंबामध्ये जन्मलेल्या-वाढलेल्या मुलाने गुजरातमधल्या कुठल्यातरी छोट्याश्या 'आणंद' गावी जाऊन आपल्या कामाची चुणुक दाखवावी. नव्हे  आपल्या कर्तृत्त्वाने देशाच्या दुग्धोत्पादन क्षेत्राचा चेहरामोहराच बदलवून टाकावा ही गोष्ट चमत्कारसदृष्य़च वाटते ना? पण तो काळच तसा होता असं म्हणावं लागेल. देश आणि देशवासियांप्रती त्या काळात असलेली तळमळ तेव्हा असे चमत्कार घडवतच असे. नवेनवेच स्वातंत्र्य मिळाले होते ना तेव्हा!
म्हणुनच चेन्नईला ईंजिनियर बनुन आणि मिशिगन विद्यापिठात उच्च शिक्षण घेऊन ऐन उमेदिच्या काळात वर्गीस कुरिअन भारतात परत आले. जमशेदपुरला टाटांच्या विद्यापिठात ईंजिनिअरिंगची सामाजीक बाजु अभ्यासतांनाच देशात नव्यानेच स्थापन होउ बघत असलेल्या डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी ते बंगलोरला गेले. पुढचा मार्ग खुपच अनवट होता. वाट बघावी लागणार होती. सरकारी नोकरी मिळाली ती डेअरी डिपार्टमेन्टमध्ये आणि पहिली पोस्टींग मिळाली ती गुजरातमधील आणंद येथे.
एका छोटेखानी सरकारी फॅक्ट्री मध्ये दुधापासून भुकटी बनवण्याचं काम चालायचं. 'म्हशीच्या दुधाची भुकटी होऊच शकत नाही' असं जगभरातील शास्त्रज्ञांनी ठासून सांगितलं असूनसुद्धा डॉ. कुरियन यांनी हा प्रकल्प आणंदला यशस्वीरित्या राबवला. सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यांच्यातील ही चुणुक हेरली. आणंदला सरदार पटेल यांनी स्थापना केलेल्या कैरा डिस्ट्रीक्ट को ऑपरेटीव्ह मिल्क प्रोड्युसर्स संघाची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. जबरदस्त इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी आणंदला जगाच्या नकाशावर पोहोचवलं. विदेशी आक्रमणाला थोपवत जगातला सर्वांत मोठा खाद्यान्न व्यवसाय उभा करून 'अमूल'सारख्या देशातल्या सगळ्यात मोठ्या ब्रँडची निर्मिती केली. पुढे काय झालं तो ईतीहास आहे!
१९६५ मध्ये लालबहादुर शास्त्रींनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्डाची स्थापना केली, तेव्हा या महामंडळाचे अध्यक्ष म्हणुन केवळ एकच नाव त्यांच्या डोळ्यांपुढे होतं ते म्हणजे डॉ वर्गिस कुरियन यांचं. सहकारी स्तरावर दुध उत्पादनचा अमुल पॅटर्न मग देशभर राबवला गेला. सावकारी पाश, अनिष्ट रुढी आणि वर्ण-जातिभेदाच्या ओझ्यांतून ग्रामीण जनतेची मुक्तता या माध्यमातून करता आली. शेतकर्‍यांचे आर्थिक हितसंबंध जपणार्‍या आणि ग्रामीण जनतेच्या गरजा भागवणार्‍या ग्रामपातळीवरच्या संशोधन तसंच प्रशिक्षण संस्थांची उभारणी झाली आणि आणि देशात धवलक्रांती आली!
१९७७ साली एच. एम. पटेल यांनी भारताच्या अर्थमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. गुजरातचे असल्यामुळे डॉक्टर कुरियन यांचे ते जवळचे स्नेही होते. पटेल यांनी खाद्यतेलांच्या वाढत्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होत असल्याबद्दलची आपली चिंता डॉक्टर कुरियन यांच्याजवळ व्यक्त केली. सहकार तत्त्वाचा पाया असणारा 'आणंद पॅटर्न' खाद्यतेलाच्या क्षेत्रातही वापरता येईल का, जेणेकरून या बाबतीतही देश स्वयंपूर्ण ठरेल, अशी विचारणा केली. आणि 'धारा' च्या ईतीहासाची पायाभरणी झाली. तेलबिया उत्पादक आणि तेलाचे ग्राहक यांच्यात मध्यस्थ म्हणून हे 'तेलिया राजे' काम करीत होते. यांची मध्यस्ती मिटवून तेल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही योग्य न्याय मिळावा या उद्देशाने 'धारा' ची निर्मिती झाली. त्यात 'अमुल' ईतकं जरी नाही, तरी ब-यापैकी यश त्यांना मिळालं.
देशात तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे बदल घडवून  आणणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर कुरियन यांची असलेली मैत्री अनेकदा राजकिय चर्चेचा विषय झाली. कॉन्ग्रेसकडे असलेला त्यांचा कल आणि उजव्या पक्षांप्रती असलेली अनास्था यावर देखील राजकिय चर्चा ब-याच झाल्या. मात्र अनेकांना हे माहिती नाही की संघाचे दुसरे सरसंघचालक प.पू गोळवलकर गुरूंजींबरोबर कुरियन यांचा स्नेह खुप जवळचा होता.
संघाने गोहत्येविरोधात उभारलेल्या चळवळीच्या फलस्वरूप १९६७ साली केंद्र सरकारनं गायींच्या संरक्षणाकरता एक उच्चाधिकार समिती नेमली होती. 'एनडीडीबी'चा अध्यक्ष या नात्यानं डॉक्टर कुरियन त्याचे सभासद होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सरकार यांची समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. सभासदांमध्ये होते पुरीचे शंकराचार्य, म्हैसूरच्या 'सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट'चे संचालक एच ए बी पारपिया आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर गुरूजी! या समितीच्या बैठका तब्बल १२ वर्षापर्यंत नियमीत होत राहिल्या. यात  हरिणाजिन वापरणा-या शंकराचार्यांचा गोहत्येबाबतचा धार्मिक दृष्टीकोन कुरियन यांच्यामधील व्यावसायिक डेअरी डेव्हलपरला पटला नाही. प पु गुरूजींचा राष्ट्रवादी दृष्टीकोन मात्र त्यांच्यातील देशभक्त भारतीयाला पटला.
आपल्या आत्मचरित्रात ते लिहतात -- गुरूजी म्हणाले, "गोहत्याबंदीचा अर्ज संघाने दाखल केला, तो सरकारला अडचणीत आणण्यासाठी मात्र जनतेने याला पाठींबा दिला तो उपजीविकेचं साधन असलेली आपली गाय वाचवण्यासाठी! गायीमध्ये देशाला एकत्र आणायची ताकद आहे. भारतीय संस्कृतीचं ते प्रतीक आहे. तुम्ही गोहत्याबंदीसाठी या समितीत माझ्याशी सहमती दर्शवा आणि मी तुम्हांला वचन देतो, त्या तारखेपासून ५ वर्षांत मी देशाला एकत्र आणलेलं असेल. आपल्यातलं भारतीयत्व जागृत करण्यासाठी मला गायीचा उपयोग करून घ्यायचा आहे," -- गुरूजींच्या व्यक्तीमत्त्वाचा चा प्रभाव त्यांच्यावर एवढा होता की समितीमध्ये त्यांनी गोहत्याबंदीचे समर्थन केले. भ्रष्टाचार, दहशतवाद बळावलेला असुनही आपला हा देश कोलमडून पडत नाही, कारण जातिधर्माच्या पलीकडे समष्टीच्या कल्याणाच्या ध्येयानं प्रेरित अशी डॉ कुरियन यांच्यासारखी माणसं जी कामं उभी करतात, त्यांतून मोठी प्रेरणा मिळत राहते.
याच सचोटी, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि देशावरील आत्यंतिक प्रेम या गुणांच्या जोरावर डॉ कुरियन यांनी गुजरातेतल्या आणि नंतर देशभरातल्या दुग्धोत्पादक शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण बनवले.'विलक्षण द्रष्टेपण, बांधिलकी, निष्ठा आणि राष्ट्रीयत्वाची ज्वलंत भावना असणारे एक हजार कुरियन मिळाले असते, तर आपला देश आज कुठल्या कुठे असता,' -- कुरियन यांच्याबद्द्ल रतन टाटा यांचं हे विधान बरंच काही सांगून जातं.

1 comment:

  1. Today Google India celebrates National Milk Day.
    Verghese Kurien Google Doodle. 94th birth anniversary of the "Milkman of India". See the video in this link
    https://www.youtube.com/watch?v=-7YcVjFcPDM&list=PLK2ccNIJVPpAlYHL7UaTP5uUs6eux28ZG

    ReplyDelete