Wednesday 28 December 2011

सचिन पिळगावकर

सचिन म्हटलं की मराठी माणसाच्या डोळ्यांपुढे दोन व्यक्तीरेखा उभ्या राहतात. एक म्हणजे खचाखच भरलेल्या मैदानात एका हातात आपली वजनदार बॅट आणि दुस-या हातात हेल्मेट उंचावून आभाळाकडे पहात देवाचे आणि वडिलांचे आशिर्वाद मागणारा सचिन तेंडूलकर; आणि दुसरा म्हणजे पडद्यावर आणि पडद्यामागेही आपल्या स्मीतहास्याने आणि सुरेल आवाजाने लोकांची मने जिंकणारा सचिन पिळगावकर. मराठी माणसाने या दोन्ही सचिनवर भरभरून प्रेम केलंय आणि हे दोन्ही सचिनही मराठी माणसावर मनापासून प्रेम करतात.
म्हणुनच कारकिर्दीला वीस वर्षे पुर्ण झाली तरीदेखील सचिन तेंडूलकर आबालवृद्धांसाठी 'सचिन' किंवा 'तेंडल्या'च आहे आणि पन्नास वर्षांपासून मनोरंजनविश्व गाजवल्यानंतरही सचिन पिळगावकरदेखील सर्वसामान्यांसाठी 'सचिन'च आहे. खरं म्हणजे पुढच्या वर्षीच्या १७ ऑगस्टला जेव्हा सचिन आपला ५५वा वाढदिवस साजरा करेल, त्या आधीच येत्या फेब्रुवारी महिन्यात त्याने चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीची पन्नाशी पुर्ण केलेली असेल. ईतक्या लहान वयात आजवर कुणीच करू शकले नाही असा हा विक्रम सचिन पिळगावकर नावाच्या अष्टपैलु व्यक्तीमत्त्वाच्या नावावर जमा व्हावा ही आश्चर्याची गोष्ट मुळीच नाही. चित्रपटसृष्टीचे सर्व पैलू - अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संगीत, गायन, नृत्य, संपादन, वितरण, जाहिरात आणिही बरंच काही - सचिनने केवळ जवळून अभ्यासलेच नाहीत, तर या सर्व विभागांत देदिप्यमान यशही मिळवून दाखवलंय.  उतरती कळा लागलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला सावरणा-या, जगवणा-या आणि फुलवणा-या काही मोजक्या निर्माता-दिग्दर्शकांमध्ये सचिनचं नाव अग्रणी आहे. उणेपुरे साडेचार वर्षाचे वय असतांना पडद्यावरच्या पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या या मुलाचा जन्मच मुळात चित्रपटसृष्टीसाठीच झाला आहे, असंच  आता म्हणावं लागेल.
सचिनचं 'पिळगाव' हे जरी गोव्यातलं असलं तरी त्याचा जन्म मात्र मुंबईचा. वडिल शरद पिळगावकर हे तेव्हा एक छोटामोठा ऑर्केस्ट्रा चालवायचे. यात ते स्वतःही गायचे आणि सचिनची आईदेखील. सचिनच्या जन्मानंतर पिळगावकरांचं संगीत क्षेत्रातील बस्तान चांगलंच बसत आलं होतं. चित्रपटसृष्टीमध्ये शरद पिळगावकरांची ब-यापैकी ओळख होवू लागली. कलागुणांना उत्तेजन देणारे आणि कलेचे व्यासंगी असलेल्या शरदरावांनी आपल्या मुलातील असलेली चुणुक ओळखली नसती तरच नवल. राजा परांजपे या आपल्या मित्राला त्यांनी सचिनबद्दल सहज म्हणुन सांगुन पाहिलं. 'हा माझा मार्ग एकला' ची तयारी तेव्हा सुरू होती. साडेचार वर्षाच्या सचिनला यात महत्त्वाची बालकलाकाराची भुमिका मिळाली, आणि या भुमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही.
त्याचा लोभस चेहरा आणि अभिनयाची असलेली उपजत जाण यांच्या बळावर बालकलाकार म्हणुन त्याला अनेक भुमिका मिळत गेल्या. ज्वेल थिफ, ब्रम्हचारी, मेला -- एकामागोमाग एक ६५ चित्रपट झाले. ज्युनिअर मेहमुद बरोबर सचिनची जी जोडगोळी जमली, ती जवळपास पंधरा चित्रपटांत सोबत होती. बालकलाकारांच्या वाट्याला मोठे झाल्यानंतर येणारी भयंकर उपेक्षा सचिनच्या वाट्याला कधीच आली नाही याचं कारण म्हणजे त्याच्या वडिलांनी मोठ्या कल्पकतेने उचललेली पावले होत.
सचिनच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीचा मिळालेला मुक्त वावर शरदरावांनी सचिनचं व्यक्तीमत्त्व फुलवण्यासाठी वापरला. मोठमोठ्या दिग्दर्शकांशी, निर्मात्यांशी ओळख करून त्यांनी सचिनला त्यांच्या सहवासात ठेवला. केवळ अभिनयच नव्हे, तर कॅमेरा हॅण्डलींगपासून ते लाईट लावण्यापर्यंत सगळी कामं त्याने खुप जवळून पाहिली. शरद पिळगावकरांनी मराठी चित्रपटांची निर्मीतीही यादरम्यान सुरू केली होती. ते चित्रपटांची कथाही लिहायचे आणि संवादही. दरम्यानच्या काळात त्यांनी 'गीत गाता चल' नावाची एक गोष्ट लिहली होती. रविन्द्रनाथ टागोरांच्या एका कथेवर आधारित हा चित्रपट मराठीत बनवणे म्हणजे मोठे जिकरीचे काम होते. मधुसूदन कालेलकर यांच्या मदतीने ही कथा राजश्री प्रॉडक्शन्सच्या दरबारात मांडण्यात आली. राजश्रीने ही कथा विकत घेतली आणि सचिन या चित्रपटाचा हिरो बनला. आणि मग सुरू झाला त्याचा सुवर्णकाळ!
राजश्री प्रॉडक्शनमध्ये संगीतकार रविन्द्र जैन, निर्माते दिग्दर्शक ताराचंद बरजात्या यांच्यासारख्या दिग्गजांच्या हाताखाली सचिन घडत गेला. त्याच्यातील उपजत जिज्ञासु वृत्तीमुळे त्याने स्वतःला अभिनयापुरतंच मर्यादित ठेवलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतून मराठीत येणं ही जशी सचिनच्या बाबतीत घडलेली वैषिष्ट्यपुर्ण घटना आहे, तशीच हिंदी चित्रपटसृष्टीत त्याला मिळालेलं मानाचं स्थान ही देखील आहे. बालकलाकार म्हणुन प्रवेश केल्यामुळे कमी वेळातच सचिनचा चेहरा चित्रपटसृष्टीसाठी परवलीचा झाला. अगदी लहानपणापासून दिग्गजांबरोबर काम करतांना शिकता येईल तेवढं सगळं त्यानं आत्मसात केलं. शिवाय मुळात चित्रपटसृष्टीला समांतर अशी एक अभ्यासकाची  भुमिका सचिन सतत करत आलेला आहे. त्यामुळे सहाजीकच त्याचं अनुभवविश्व समृद्ध झालं. सिप्पींपासुन ते हृषिकेश मुखर्जींपर्यंत सगळ्यांनी या मराठी मुलाचं स्वागतच केल आणि मग हा मुलगा मराठी व हिंदी दोन्ही भाषांच्या माध्यमांत मस्त, स्वच्छंदपणे वावरला!
हिंदीत व्यस्त असतांनादेखील शरद पिळगावकरांनी जेव्हा 'अष्टविनायक' बनवायला घेतला, तेव्हा सचिनने मराठीसाठी वेळ काढला. १९८२ मध्ये आलेल्या 'नदिया के पार' ने तर सगळे विक्रमच तोडले. शिवाय मसाला हिंदी सिनेमांमध्ये सत्ते पे सत्ता आणि शोलेमधल्या भुमिकांनी सचिनसाठी हिंदीत अढळ स्थान निर्माण केलं.
मराठी चित्रपटांत हिरोला चेहरा नसतो. आपल्या मातृभाषेतला रसातळाला चाललेला चित्रपट जगवला पाहिजे, या हेतूने सचिनने मराठीत सिनेमा बनवायचं ठरवलं. १९८२ मध्ये 'आईबाप' या चित्रपटासहं त्यानं रूपेरी पडद्यावर आगमन केलं. त्यानंतर सव्वाशेर, नवरी मिळे नव-याला, आणि गम्मत जम्मत आले. नवरी मिळे नव-याला च्या दरम्यान त्याला खरोखरच सुप्रियाच्या रूपाने एक अनुरूप नवरीदेखील मिळाली.
त्यानंतर आलेल्या शांताराम सन्सची निर्मिती असलेल्या 'अशी ही बनवाबनवी' ने मराठी चित्रपटांचे सगळे रेकॉर्डसच तोडले. लक्षा अशोक आणि सचिनची धम्माल असलेला हा सिनेमा आजही तेवढाच एन्जॉय केला जातो. त्यानंतरच्या कादकिर्दीत सचिनने 'आत्मविश्वास' सारखा गंभिर विषयही तीतक्याच ताकदिने हाताळला आणि आमच्यासारखे आम्हीच मध्ये परत व्यावसायिक यशही मिळवून दाखवलं.
अनेक दर्जेदार, उत्तम व निर्भेळ करमणूक करणारे चित्रपट काढतांनाच नव्याने उदयास येत असलेल्या टिव्ही मालिकांचे माध्यम सचिनच्या जाणकार नजरेतून कसे बरे सुटणार? तू तू मै मै सारखी हास्यस्फोटक मालिका बनवून सचिनने यशाचं आणखी एक शिखर पार केलं! क्षितीज सारख्या गंभीर पण उत्तम हिंदी मालिकाही धाडसाने यशस्वी केल्या आणि हिंदी टेलीविजनच्या यशाने इंडस्ट्रीमध्ये पक्क, आदराचं स्थान निर्माण केलं. जीकडे जावे तीकडे यश मिळवायचं हा फॉर्मुला सचिनने अगदी 'नच बलीये' या रिऍलिटी शो मध्ये विजयी होण्यापर्यंत कायम ठेवला.
या दरम्यान त्याने काढलेल्या नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, आणि आय़डियाची कल्पना या चित्रपटांच्या दर्जावर चर्चाही झाली. आपला अनुभव काय ? गुणवत्ता काय ? कर्तुत्व काय ? हे सगळं विसरून रिऍलीटी शोमध्ये नाचल्याने स्वतःच्या कर्तुत्वाचा, स्थानाचा, स्वतःच्या उत्तमोत्तम कलाकृतींचा आणि रसिकांच्या प्रेमाचा सचिनने अपमानच केलाय, असाही सुर ऐकायला आला. गुरू आणि महागुरू म्हणुन जातांना तो स्वतःचीच बडेजावी करतो, असाही आरोप त्याच्यावर झाला.
मात्र जुने ते न विसरता नवे ते स्विकारावे हा सचिनचा यशाचा फॉर्मुला आहे. आणि तो आजवर सुपरहिट ठरतोय. पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत काय चालतं आणि काय चालत नाही याचा सचिनईतका अंदाज कुणालाच नसावा. येत्या पंचवीस वर्षांत लोक घरीच सिनेमागृह बनवून सिनेमा पाहणार आहेत, त्यामुळे सिनेमा जितका लोकांच्या जवळ गेला तीतकं चांगलं, या हेतूने सचिनने काम सुरू केलं आहे.
सचिनचं वय आणि त्याच्यातलं 'नवतारूण्य' पाहू जाता आणखी पन्नास वर्षतरी तो चित्रपटसृष्टीचा असा पॅरॅलल स्टडी सुरू ठेवेल असं वाटतं. आजपासुन दोन दशकांनंतर कदाचित ईतका दिर्घ काळ चित्रपटसृष्टीची वाटचाल अनुभवणारा, सहा पिढ्यांचा साक्षिदार असा सचिन हा एकमेव कलावंत चित्रसृष्टीत राहिल. अगदी सहा विश्वचषक खेळून गोलंदाजांच्या चार पिढ्या पाहिलेल्या चिरतरूण सचिन तेंडूलकरसारखा.

No comments:

Post a Comment