Sunday 1 January 2012

शिवमणी

आयुष्याला जर 'जीवनगाणं' म्हटलं, तर त्यात आपले शब्द, ईतरांचे सुर आणि नशिबाचा ताल यांची गुंफण अगदी चपखल व्हायला पाहिजे. यापैकी शब्द आपले आपण ठरवतो, सुर कुणाशी जुळवायचे ते देखील आपण ठरवू शकतो, मात्र 'ताल' हा विषय सर्वस्वी नियतीच्या हाती असतो. म्हणुनच नशिब लिहण्याची आणि ते बदलवण्याची सर्वोच्च शक्ती जवळ असणा-या महादेवाने स्वतःजवळ डमरू हे तालवाद्य ठेवलं असावं. आनंदम शिवमणीच्या नशिबाची गाठ याच महादेवाने याच तालवाद्याशी कायमची बांधून ठेवली आहे.
मुळात तालवाद्यापेक्षा शिवमणीची गाठ 'ताल' या संकल्पनेशीच बांधली  आहे असं म्हणावं लागेल. कारण शिवमणीला वाजवण्यासाठी अमुक एक वाद्यच लागते असं काही नाही. ड्रम,डमरू, तबला, ढोल आणि ढोलकीच नव्हे, तर पावभाजीचा तवा, कढई, पाण्याची बादली, काचेची बाटली, ताट, वाटी, चमचा, आणि जे वाटेल ते -- शिवमणी दगडातही ताल शोधू शकतो आणि विटेतूनही बिटस काढू शकतो. गेल्या ३५ वर्षांच्या त्याच्या तालयात्रेने या अवलीया कलावंताला भारतातील प्रथम क्रमांकाचा आणि जगातील पहिल्या पाच ड्रमर्सपैकी एक ड्रमर बनवले आहे. १९५९ साली जन्मलेल्या आणि  वयाच्या १४ व्या वर्षापासुन तालवाद्यांची संगत करत आलेल्या शिवमणीचे वादक म्हणुन करिअर जरी ३५ वर्षांच्या आसपास असले तरीही त्याला लाभलेली तालपरंपरा मात्र शंभर वर्षांहून जुनी आहे.
शिवमणीचे वडिल एस एम आनंदन हे दक्षीण भारतातील गाजलेले ड्रमर. तामीळ चित्रसृष्टीत त्यांचा चांगलाच दबदबा होता. घराण्यातच मुळात संगीताची परंपरा. संगीताबरोबरच वैदीक शास्त्री घर असल्यामुळे वेदमंत्र आणि संस्कृत श्लोकांचे संस्कारही शिवमणीवर लहानपणापासूनच झाले. अगदी लहान असतांनाच तो शंख वाजवायला शिकला. वडिलांना ड्रम वाजवतांना पाहून त्याने अनेकदा ड्रम वाजवण्याचा हट्ट धरला. मात्र तेव्हा त्याला तुटकी स्टीक आणि फुटका कोंगो याव्यतीरिक्त काहीही मिळालं नाही. अनेक महिने लाक़डाच्या एका स्टुलवर ठकठक करत घालवल्यावर त्याला पारंपारिक कर्नाटक संगीताचे धडे देण्यास सुरूवात झाली. वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा ड्रमवर ताल धरला आणि अकराव्या वर्षी पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली.
यानंतर ड्रमच्या स्टीक्स सोडल्या पेन, पेन्सील पुस्तक किंवा ईतर नादरहित गोष्टी काही त्याने फारश्या हाताळल्या नाहीत. शालेय शिक्षणात त्याला अगदीच पासिंगपुरता रस होता. शिवमणीचे दहावी बोर्डाचे पेपर सुरू असतांना त्याचे वडिल सिंगापुरच्या एका कार्यक्रमात ड्रम वाजवणार होते. या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर सोबत करण्यासाठी म्हणुन त्यांनी वेळेवर शिवमणीला बोलावणं धाडलं. तो तडक सिंगापुरकडे निघाला. परिक्षा राहिली ती कायमचीच.
व्यावसायिक क्षेत्रात ड्रमर म्हणुन शिवमणीला पहिली संधी मिळाली ती के व्ही महादेवन यांच्याकडे. महादेवन म्हणजेच मामा हे त्या काळातील तामिळ आणि तेलगु संगीत क्षेत्रातील खुप मोठं नाव होतं. त्यांच्याकडे रेकॉर्डींग करत असतांनाच शिवमणीवर एस पी बालसुब्रमन्य़म यांची कृपादृष्टी झाली. बालसुब्रमण्यम तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवत होते. त्यांनी वेळोवेळी शिवमणीला  मार्गदर्शन केलं. आजही करत आहेतच. या वेळी भारतात ड्रमर्सचे एवढे चलन नव्हते. म्हणुन मग वडिलांकडून कलेचे धडे घेणा-या शिवमणीला आपले आदर्श देशाबाहेर शोधावे लागले.
विल्यम कॉबहॅम हे या क्षेत्रातलं त्या काळातलं जॅझ आणि रॉक क्षेत्रातील गाजत असलेलं नाव! शिवमणी त्याचा भक्त झाला. डोक्याला पटका बांधण्याची, भडक रंगीत कपडे घालून चेह-यावर मोकळेपणाने हसत ड्रम वाजवण्याची त्याची स्टाईल बिली कॉबहॅमच्या प्रभावातूनच आलेली आहे. त्याला ऐकता यावं आणि नव्या संधी मिळाव्या म्हणुन शिवमणीने जीवाची मुंबई करायचं ठरवलं. मुंबईत आल्यावर त्याच्यामधील उपजत कलावंताला नवं आकाशच मिळालं. उस्ताद झाकिर हुसैन पासुन ते लुई बॅन्क्सपर्यंत सगळ्यांबरोबरच काम करण्याची आणि नवं काही शिकण्याची संधी त्याला मिळाली. त्याचे आदर्श विल्यम कॉबहॅम यांच्याबरोबरही त्याने १९९० मध्ये पहिल्यांदा रंगमंचावर कला सादर केली. शिवमणी हे नाव आता चांगलंच गाजायला लागलं.
शिवमणीला ड्रम वाजवण्याचं बाळकडू घरातूनच मिळालं असलं, आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एस पी बालसुब्रण्यमसारख्यांच्या पाठींब्याने त्याचं मुंबईतील स्थानही बरंच प्रबळ झालं असलं, तरीही केवळ या कारणांमुळे त्याची वाटचाल सहज झाली असं म्हणणं म्हणजे पर्क्युश्यन या क्षेत्रात शिवमणी होण्यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केल्यासारखंच होईल. कर्नाटक संगीताचे घरातून मिळालेले प्राथमीक शिक्षण एवढेच काय ते संचित घेऊन शिवमणीने आपली तालतपस्या सुरू केली होती. घटम वादक विक्कु विनायकराम, मृदंगवादक टि के मुर्ती, कंजीरावादक नागराजन, टि व्ही गोपालकृष्णन, कुन्नाकुडी वैज्यनाथन यांसारख्या शास्त्रीय संगीताला आयुष्य वाहून घेतलेल्या गुरूंचे शिष्यत्त्व मिळवण्यासाठीच त्याला खुप धडपड करावी लागली.
मुंबईत दक्षिण भारतीय संगीतक्षेत्रातील लोकांचा एक वेगळा दबदबा आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, सराव आणि कर्नाटक आणि हिंदुस्थानी या शैलींचा संगम ही या कलावंतांची वैषिष्ट्ये म्हणावी लागतील. शिवमणीलाही आपले सुरवातीच्या दिवसांतील सोबती याच कलावंतांमध्ये मिळाले. 'श्रद्धा' या बॅण्डचा तो भाग बनला. एकवार या बॅण्डच्या ईतर सहका-यांच्या नावांकडे वळून पाहूया म्हणजे 'श्रद्धा' ची शक्ती आपल्या लक्षात येइल. ग़िटारवर लॉय मेंडोसा (शंकर-एहशान-लॉय मधील), मॅंडोलीनवर यु श्रीनिवास (पद्मश्रीसह अनेक पुरस्कार शिवाय मायकल जॅक्सनसह अल्बम्स) आणि गायक म्हणुन हरिहरन आणि शंकर महादेवन (बस नाम ही काफी है).
                जवळपास तीन दशके तालवाद्यांची तपस्या करून झाल्यानंतर शिवमणीचे आराध्य भगवान शिव त्याला प्रसन्न झाले जेव्हा मणिरत्नम यांनी तामिळमध्ये रोजा चित्रपट बनवायला घेतला. ए आर रहमानने या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसंगीतात पदार्पण केलं. आपली खास 'चमु' जमवतांना रहमानच्या लिस्टमध्ये ड्रमर म्हणुन शिवमणीशिवाय ईतर क़ुणाचं नाव असतं तरच नवल. रहमानबरोबर शिवमणीची जोडी ही रोजा पासून जी जमली ती बॉम्बे, लगान, दिल से, गुरू, ताल ये थेट स्लमडॉग पर्यंत कायम आहे. रहमानच्या वर्ल्ड टुरचा शिवमणी हा अविभाज्य घटक असतो. केवळ त्याचा 'सोलो परफॉर्मन्स' ऐकायला येणारे रसिकही काही कमी नाहीत. जगभर रॉक़, जॅझ, पॉप, आणि संगीताच्या सगळ्याच प्रकारांचे चाहते शिवमणीचेही फॅन्स आहेत. शिवमणीला मात्र आपली भारतीय, तामिळ ओळख जपण्यातच खरा अभिमान वाटतो.
आपल्या सादरिकरणादरम्यान तो मंत्रपठण करतो, नोटेशन्स म्हणुन दाखवतो, शंख वाजवतो, ॐकार गाऊन दाखवतो. 'मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव' हा त्याचा मंत्र येतील तेवढ्या भाषांमध्ये समजावून सांगतो, आणि भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेगळेवपण पटवून देतो. शिवमणीला दक्षिण भारतीय भाषांबरोबरच चांगलं मराठी आणि तुटक हिंदी बोलता येतं. संगीत तो लहानपणी शिकलाय, त्यामुळे गाणारा गळा त्याच्याकडे आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच हिंदी सिनेमाची गाणीही तो गुणगुणत असतो.
२००९ मध्ये त्याने स्वतःचा पहिला नादवाद्यांचा अल्बम काढला. 'महालिला' असं त्याचं नाव. याशिवाय एशिया ईथनिक आणि सिल्क अन श्रद्धा या त्याच्या दोन बॅण्डसह कार्यक्रम देण्यात तो व्यस्त आहे. या दोन्ही बॅण्डचे वैषिष्ट्य म्हणजे शिवाचे अधिष्टान! एशिया ईथनिकच्या तर लोगोमध्येच शिवाचा त्रिशुळ आहे. शिवमणीला भक्ती, संगीत आणि जीवन या गोष्टी एकमेकांच्या सोबती वाटतात. त्याला परंपरांबद्दल नितांत आदर आहे. पारंपारिक वेषभुषा, तामिळ भाषा यांबरोबरच भारतीय संस्कृतीमधिल गुरूकुल शिक्षणपद्धतीचा तो समर्थक आहे. लवकरच तो स्वतःचे गुरूकुलही काढणार आहे.
शिवाच्या आशिर्वादाने सुरू झालेली शिवमणीची ही वाटचाल त्याला जगभर गाजत असलेल्या एका वाद्याचा गुरू तर बनवतेच शिवाय भारतीय संस्कृतीचा वैश्वीक राजदूतही बनवते.

No comments:

Post a Comment