Friday 27 January 2012

महंमद अली

"ज्याने माझी सायकल चोरली आहे त्याला शोधून काढा! साल्याला मरेपर्यंत मारीन! रक्ताच्या थारोळ्यात आडवा पाडीन," बारा वर्षाच्या कॅशियसच्या डोळ्यात अंगार उसळत होता. ज्या पोलीसाकडे तो सायकल चोरल्याची तक्रार नोंदवायला गेला होता त्या मार्टीनने या डोळ्यावरूनच हेरलं, की हा केवळ बालसुलभ संताप नाही; काहीतरी वेगळं रसायन आहे. "एवढी मस्ती आहे तर बॉक्सींगमध्ये का जीरवत नाहीस?! उद्यापासून माझ्या जीम मध्ये ये," मार्टीनने त्याला आमंत्रण दिलं तेव्हा त्याच्या ध्यानिमनीही नसेल की हे चिमुरडं एक दिवस द ग्रेटेस्ट, द चॅम्प, स्पॉर्टसमॅन ऑफ द सेंच्युरी, अशी बिरूदावली मिरवणारा, एक दोन नव्हे तर तीन वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पीअन होणारा, जगातला सदासर्वकाळचा सर्वश्रेष्ठ मुष्टियोद्धा बनेल. महंमद अली बनेल!
आपल्या तीन दशकांच्या देदिप्यमान कारकिर्दीत अनेक महारथींना आधी आपल्या शब्दांनी आणि मग आपल्या ठोश्यांनी नामोहरम करणा-या; खेळाआधीच्या माईंड गेम्सचा आणि खेळानंतरच्या खिलाडूवृत्तीचा बादशहा असणा-या महंमद अलीचा सत्तरावा वाढदिवस (१७ जानेवारी) जगभरातील क्रिडारसिक यंदा साजरा करीत आहेत. आपल्या सबंध कारकिर्दीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मारणारा ठेचणारा, भलेबुरे बोलून आणि आपल्या विध्वंसक खेळानी त्यांना खच्ची करणारा महंमद अली मात्र या वेळी आपल्या सामाजीक संस्थेसाठी देणगी गोळा करण्याच्या कामात मग्न आहे. स्वतः पार्किन्सन्सने ग्रस्त असलेल्या अलीने दुर्लक्षित, दुर्बल आणि दुर्दैवी समाजघटकांना मदत करण्याचा वीडा उचलला आहे. तसेही त्याला  असलेलं सामाजीक आणि राजकिय परिस्थीतीचं भान, दुर्बल लोकांप्रती असलेली करूणा आणि त्यांच्यासाठी घेतलेली परखड भुमीका ही महंमद अलीच्या कारकिर्दीची वैषिष्ट्ये राहिली आहेत.
१९४२ साली अमेरीकेतील केंटाकी मधल्या लुईजविल शहरात ओडेसा क्ले आणि कॅशियस मार्सेलस ह्यांच्या पोटी कॅशियस क्ले चा जन्म झाला. वडील पेंटर होते आणि आई गो-यांकडची मोलकरीण. दोन भावंडांपैकी हा लहान. वडिलांच्या नावावरूनच याचं नावं कॅशियस ठेवलं गेलं. खरं म्हणजे कॅशीअस हे नाव आहे केंटाकीमधीलच गुलामगीरीविरोधी चळवळ करणा-या एका महान नेत्याचं. यावरून क्ले कुटुंबिय वर्णभेद आणि गुलामगीरीविरोधी आंदोलनांशी जोडल्या गेलेले होते हे स्पष्ट होते. लहान असतांना कॅशियसने वर्णभेदाचे चटके सहन केले असणारच. यातुनच त्याच्यामधील आक्रामक बंडखोर घडत गेला.
सायकलचोरीच्या घटनेने त्याच्या या बंडखोरीला सकारात्मक रूप दिलं. मार्टीनच्या जीममध्ये जाऊन कॅशिअसने आधीच धष्टपुष्ट असलेलं आपलं शरीर अधीक बळकट बनवलं. बॉक्सींगमध्ये आवश्यक असलेली रग, राग, आणि माज त्याच्याकडे आधीपासुनच होता. आपण कसे ताकदवान आहोत आणि प्रतिस्पर्ध्याला आपण कसे मारू, फोडू  शकतो याची वर्णने करण्यात त्याचे तासनतास जात असत. सामान्य बॉक्सर्सप्रमाणे हात चेहर्‍यासमोर ठेवून लढणे त्याच्या स्वभावात नव्हते. कमरेपाशी हात ठेऊन तोंडाने समोरच्याला चिथवत, अपमानास्पद बोलत तो लढणार. हौशी बॉक्सिंगमध्ये प्रवेश केल्यावर या 'ऍटिट्युड' च्या भरवश्यावर त्याने १०५ मधील १०० मॅचॅस जिंकल्या. ईतक्या भारी कामगिरीनंतर त्याची निवड ऑलिम्पीकसाठी होणं सहाजीकच होतं.
१९६० च्या रोम ऑलिम्पीक्समध्ये लाईट हेवीवेट गटात अंतीम फेरीत पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्कीला धूळ चारली आणि ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर मायदेशी परतला तेव्हा तो सेलिब्रिटी झालेला होता. त्याच्या व्यावसायिक बॉक्सिंगची सुरूवात या काळात झाली. मग प्रायोजक आणि प्रशिक्षक आलेच! कॅशिअसला लुईजविल स्पॉन्सरशिप ग्रुपने करारबद्ध केलं आणि आर्ची मोर या बॉक्सरला त्याचा प्रशिक्षक म्हणुन नेमलं. पण थोड्याच दिवसात मोरशी खटके उडून त्याने त्याची ऍकॅडमी सोडली. अँजेलो डन्डी यांच्याबरोबर प्रशिक्षण सुरू केले. यानंतर काही दिवसांतच आर्ची मोर यालाच आव्हान देऊन त्याला हरवूनही दाखवलं. क्ले असा विचित्र स्वभावाचा धनी होता.
अश्यातच त्याने तेव्हाचा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पीअन सॉनी लिस्टनला आव्हान दिलं. विशेषज्ञांच्या मते क्लेला लढत जिंकण्याची जराशी ही संधी नव्हती. कारण लिस्टन म्हणजे राक्षसी ताकदीचा नमुना होता. पण क्लेची शैलीच मुळात वेगळी होती. 'फ्लोट लाइक अ बटरफ्लाय  ऍण्ड स्टींग लाईक अ बी' असं तो स्वतःबद्दल म्हणायचा. एकिकडे फुलपाखरासारखं अलगद आणि चपळ हालचाली करणं आणि समोरच्याचे ठोसे चुकवणं; आणि दुसरीकडे मधमाशीसारखं संधी मिळताच डंख मारणं ही त्याची खासियत! याच्या भरवश्यावर क्लेने आपली पहिलं वर्ल्ड हेवीवेट टायटल जिंकलं. ह्याच लढतीनंतर क्लेनं इस्लाम स्वीकारल्याचं जाहीर केलं. त्यानी आता नाव धारण केलं ते "महंमद अली"! याबद्दल त्याच्यावर खुप टिकाही झाली. पण टिकेला जुमानेल का तो अली कसला? पुढे त्याने व्हिएतनाम युद्धासाठी अमेरिकन सैन्यात भरती व्हायला साफ नकार दिला आणि आणखी एक वाद स्वतःवर ओढावून घेतला. केवळ नकार देऊन तो थांबला नाही, तर त्याचं कारणही त्याने स्पष्ट केलं.
"आधीच दुर्बल असलेल्या काळ्या लोकांवर बॉम्बगोळे बरसवण्यासाठी मी सैनिक होवून जाणार नाही. त्यांच्यासारखेच दिसणारे कोट्यावधी लोक माझ्या लुईजविल शहरात कुत्र्याचं जीणं जगत आहेत. गो-या लोकांची सत्ता जपण्यासाठी मी माझ्याच लोकांवर का म्हणुन हल्ले करावे?" - अलीच्या या वक्तव्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याचा जगज्जेत्याचा खिताब काढून घेण्यात आला. साडेतीन वर्षं अली व्यावसायिक बॉक्सिंगपासून दूर होता.
१९७१ मध्ये पुनरामन करतांना त्याला "स्मोकिन जो" - जो फ्रेझियर कडून तब्बल ३१ व्यावसायिक लढतींनंतर आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. पण १९७४ मध्ये पुन्हा तयारी करून अलीने या पराभवाचं उट्टं काढलंच.
त्याची दुसरी वर्ल्ड हेवीवेट चॅम्पीअनशिपची मॅच झाली ती जगज्जेता जॉर्ज फोरमन याच्या विरूद्ध. 'रंबल ईन द जंगल' या नावाने बॉक्सिंग विश्वात अजरामर झालेली ही झुंझ. ही लढत म्हणजे महंमद अलीच्या झळाळत्या कारकीर्दीवरचा सुवर्णकळस होता. लढतीच्या आधी अलीने फोरमनला घाबरवण्यासाठी एक कवीताही केली होती. दोघांचे माईंडगेम्सही खुप चर्चेत राहिले होते. शेवटी रिंगमध्ये आपल्या परिचीत चपळ हालचालींना बगल देऊन अलीने रोपच्या आसपास राहून प्रतिस्पर्ध्याला थकवण्याची शैली वापरली आणि तब्बल आठ राऊंड चाललेल्या या लढतीत त्याचा विजय झाला. या लढतीवर 'रंबल ईन द जंगल' नावाचा एक लघुपट हॉलीवूडमध्ये बनला आणि त्याला ऑस्करही मिळालं. १९९६ ऑस्कर घेतांना हे दोघे मित्र सोबत रंगमंचावर गेले, तेव्हा पार्किन्सन्स ग्रस्त अलीला फोरमन आधार देत होता. खिलाडू वृत्ती म्हणतात ती हीच ना!
यानंतर १९७८ पर्यंत अली चॅम्पीअन राहिला. १९७८ मध्ये लिऑन स्पिंक्सला टायटल हरल्यानंतर त्याने 'रिमॅच' ची मागणी केली आणि ही मॅच जींकत तीस-यांदा वर्ल्ड हेवीवेट चॅँम्पीअनशिवर आपलं नाव कोरलं. मात्र आता तो थकला होता. अलीने १९७९ मध्ये निवृत्तीची घोषणा केली. १९८० मध्ये त्याने लॅरी होम्स ला  आव्हान देण्यासाठी पुनरागमन केले पण पुर्वीचा अली पुन्हा बघायला नाही मिळाला. शेवटी १९८१ मध्ये त्याने कायम निवृत्ती घेतली.
निवृत्तीनंतर मात्र अलीचं रूप पुर्णतः वेगळं होतं. जगभरातल्या अक्षरशः कोट्यवधी गोरगरीबांसाठी देश, पंथ, वर्ण कसलाही मुलाहिजा न ठेवता त्याने मदत केली आणि प्रचंड निधी जमवला. पार्किनसन्सग्रस्तांसाठी "अली पार्किनसन सेंटरची" स्थापना केली. "ज्याप्रमाणे नदि, तलाव, झरे, आणि समुद्र ही नावं वेगवेगळी असली तरीही ते सगळे पाण्याच्या रूपाने जीवनच देत असतात, त्याचप्रमाणे जगातील धर्मांची नावं वेगळी असली तरी सर्व एक सत्याच्या रूपाने शांतीचाच संदेश देत असतात!" -- एरवी प्रतिस्पर्ध्यांना हीणवणारा, लढतीच्या आधी त्यांची चेष्टा काय करणारा, नको नको ते बोलून हैराण करणारा, एक आक्रामक खेळाडू हे विधान करतो यावरून 'खेळ' म्हणजे काही खेळायचा विषय नाही, तो जगायचा विषय आहे हेच उमगते; नाही का?

1 comment: