Wednesday 8 February 2012

सुमन कल्याणपूर

सध्या फास्टफुड, फास्ट फॉरवर्ड आणि फास्ट फॉरगेट चा जमाना आहे. एखादी गोष्ट जनमानसावर ठसवायची असेल तर त्याचं सतत हॅमरींग करत रहावं लागतं. पुर्वी एखादी गोष्ट जुनी व्हायला वर्ष, महिने किंवा काही दिवस लागायचे; आता ही वेळ काही मिनिटांवर आली आहे. अश्या परिस्थीतीत एखाद्या कलावंताला स्वतःची ओळख निर्माण करून ती टिकवायची असेल तर सतत रसिकांसमोर काहीतरी नवं घेऊन जात रहावं लगतं.
'मेरी आवाज ही पहचान है'  अशी स्वतःची ओळख निर्माण करणं हे स्वप्न पुर्ण करण्यात अनेकांची हयात निघून जाते पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत नाही. याउलट काही गायकांची ओळख ही मनावर कायम कोरल्या गेलेली असते. अगदी कालपरवाच (२८ जानेवारी) आपला ७५ वा वाढदिवस साजरा केलेल्या सुमन कल्याणपूर यांनी पार्श्वगायन सोडल्याला अनेक वर्षं उलटली तरी त्यांचे नाव व गाणं रसिकांच्या मनात तसंच ताजं आहे.
प्रत्यक्ष सरस्वतीच्या - लता मंगेशकरांच्या आवाजाशी अगदीच मिळताजुळता आवाज असल्याचा त्यांना किती फायदा आणि किती तोटा झाला या विषयाची चर्चा सुमनताईंपेक्षा ईतरांनीच अधीक केली. त्यांनी मात्र या सगळ्या वादांपासुन दूर, आपली कारकिर्द आपल्या निकशांवर सुरू ठेवली. संगीत त्यांच्यासाठी जीवनाचा भाग आहे, आणि पार्श्वगायन हा त्या संगीत साधनेतील एक छोटासा भाग. या संगीत साधनेची सुरवात थेट भवानीपूर या ढाक्याजवळील (तत्कालीन बंगाल प्रांत) छोट्याश्या गावात सापडते. वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले.
१९४३ मध्ये हेमाडी कुटुंबीय मुंबईला स्थायिक झाले आणि सहा वर्षाच्या सुमनच्या रितसर संगीत शिक्षणाला प्रारंभ झाला. या वेळी त्यांचे शेजारी होते केशवराव आणि ज्योत्स्नाताई भोळे तर शाळेतले संगीत शिक्षक होते यशवंत देव! शाळेत या दोघांनी बसवलेलं गाणं ऐकून भोळे दांम्पत्यांनी त्या गाण्याला शुक्राची चांदणी नावाच्या मराठी सिनेमामध्ये रेकॉर्ड करण्याची शिफारस केली. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने, पण हे गाणं आणि हा सिनेमाही कधी आलाच नाही. यामुळेच सुमनताईंची कारकिर्द मराठीतून सुरू होता होताच हिन्दी चित्रपटसृष्टीतून सुरू झाली.
दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही त्यांना मिळत गेली. अश्याच एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असतांना तलत मेहमुद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. 'ईस लडकी के आवाज मे जादू है' अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एच एम व्ही कडे स्वतःहून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली. एव्हाना १९५४ साल उजाडलं होतं. सुमन हेमाडी यांनी आपलं पहिलं गाणं रेकोर्ड केलं ते 'मंगु' चित्रपटासाठी. संगीतकार मोहम्मद शफी आणि ओ पी नय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी या चित्रपटात पाच गाणी गायली. 'कोई पुकारे धीरे से तुझे' हे त्यांचं पहिलंच गाणं तुफान लोकप्रिय झालं.
मात्र लतादिदिंच्या आवाजाशी असलेलं प्रचंड साधर्म्य या वेळी त्यांच्या मार्गातील अडथळा बनलं. गानसरस्वतीच्या आवाजासारखा आवाज मिळणं हे खरं पाहिलं तर किती मोठं सौभाग्य! पण सुखाचा अतीरेकही कधीकधी महागात पडतो. सुमन हेमाडी ही लता मंगेशकरांची नक्कल करते, असं वाटून अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्यापासून  अंतर ठेवलं. खरं तर सुमनताईंचा यांचा आवाज लतादीदीच्या जातकुळीचा, पण तरीही पूर्ण वेगळा. या दोन्ही आवाजांमधला फरक तसेच गायनाच्या पद्धतीतला फरक ज्यांचे कान तयार आहेत; अशा फार थोड्या लोकांच्या लक्षात येतो. त्यातल्या त्यात तेव्हा लता मंगेशकर यांचा आवाज वापरणं ही हिंदी चित्रपटसृष्टीची न टाळता येणारी अपरिहार्यता होती. त्यामुळे लतादिदिंशी ज्यांचं पटत नव्हतं अश्या काही संगीत दिग्दर्शकांनीच सुमनताईंकडून गाणी गावून घेतली. यामुळे विनाकारणच वाद वाढतोय हे पाहून त्यांनी राजमार्गाचा नाद तेव्हाच सोडून दिला. मोजकं आणि मनाला भावेल ईतकंच काम करायचं हे त्यांनी तेव्हाच ठरवलं .
१९५८ मध्ये उद्योजक श्री रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची कारकिर्द ख-या अर्थाने बहरली. आधीच ठरवल्याप्रमाणे त्यांनी मोजकी परंतू आवडणारी गाणी निवडली. कॅबेरे, मुजरा आणि कुटुंबात ऐकता येणार नाहीत अशी गाणी गायची नाहीत हा नियम त्यांनी मुद्दामहून लावून घेतला आणि पाळलाच. ठरावीकच गायचं परंतू ते 'खास आपलं' असलं पाहिजे हा नियम त्यांनी जपला. त्यामुळे लतादिदिंचा ऑप्शन हा टॅग मिटवून एक वेगळी ओळख त्या निर्माण करू शकल्या. त्यांनी रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरीही त्यांपैकी सुपरहिट झालेल्या गाण्यांचं प्रमाण पाहू जाता कमी गाणी गायला मिळाली म्हणून अन्याय झाला असं म्हणण्यापेक्षा जास्ती जास्त चांगली गाणी गायला मिळाल्यामुळे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात खरा न्याय सुमन कल्याणपूर यांनाच मिळाला, असं वाटतं. म्हणुनच मागच्या वर्षी त्यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित झाला, तेव्हाचा त्यांनी तो मोठ्या आदरपुर्वक स्विकार केला.
नंतरच्या काळात मग अमुक एका गाण्याला सुमन कल्याणपूर यांचाच आवाज न्याय देऊ शकेल असं संगीतकारांना वाटलं की, ते सुमनताईंकडूनच ते गाणे गाऊन घेत. 'आजकल तेरे-मेरे प्यार के चर्चे हर जुबानपर' हे 'ब्रह्माचारी' चित्रपटातलं गाणं अनेकांना लतादिदिंनीच गायलंय असं वाटतं. पण सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं मुमताजचा नखरा अगदी अचूक पकडला आहे. त्यामुळे ते आजही रसिकांच्या चांगलंच लक्षात आहे. मध्यंतरीच्या काळात लता मंगेशकर आणि महंमद रफी याच्यात काहीतरी अनबन झाली, तेव्हा युगुलगीतं गाण्यासाठी संगीतकारांनी सुमनताईंचा आवाज वापरला. ही युगलगीतं ईतकी लोकप्रिय झाली, की नंतर रफी  आणि सुमन कल्याणपूर ही जोडीच जमली.
मराठीत तर अनेक संगीतकारांनी सुमन कल्याणपूर हा आपला ब्रँडच बनवला होता. दशरथ पुजारी, अशोक पत्की, कमलाकर भागवत अशा गुणी संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांनाच डोळ्यासमोर ठेवून गाणी बांधली आणि त्यांनी ती गाणी अक्षरश: अजरामर केली. त्याखेरीज, सुधीर फडके, स्नेहल भटकर या जाणत्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली असंख्य गाणीही लोकप्रिय झाली. त्यांनी मराठी, हिंदीखेरीज १३ भाषांमध्ये पार्श्वगायन केलंय.
१९८० च्या दशकांत कुटुंबाच्या जबाबदा-या सांभाळत त्यांनी आपली करिअरची वाटचालही सुरू ठेवली. या काळात चित्रसृष्टीत झपाट्याने होत जाणारे बदल, त्यांच्या पतींची प्रकृती, ईत्यादींमुळे त्यांनी खुप मोजकी गाणी गायली.  मराठीमध्ये संगीतकारांनी केलेल्या नॉन फिल्मी अल्बम्ससाठीही त्यांनी गायन केलं. मात्र नव्वदच्या दशकात त्यांनी व्यावसायिक संगीतक्षेत्रातून काम करणं बंद केलं. सुमनताईंच्या मते १९९० मध्ये संगीताचा दर्जा खुप ढासळला होता, मात्र आता तो पुन्हा खुप उंचावला आहे. मराठी संगीतात होणाऱ्या नव्या बदलांमुळे या संगीताला खूप चांगले दिवस निश्चितच येतील, असंही त्या मानतात. आता बदलत्या काळात त्यांनी पुन्हा माईक हाती घ्यावा असा आग्रह अनेक संगीतकारांनी केला आहे. सुमनताई मात्र बागकाम, पुष्परचना, आणि एम्ब्रोय़डरी ईत्यादी आपले छंद जोपासत छान गाणी ऐकण्यात व्यस्त आहेत. मधल्या काळात त्यां सार्वजनिक कार्यक्रमातूनही खुप कमी दिसायच्या. २०१० आणि २०११ मध्ये मात्र महंमद रफी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार आणि झी गौरव पुरस्काराच्या माध्यमातून त्यां रसिकांपुढे आल्या. यापैकी एक दोन कार्यक्रमांत त्यांनी काही गाणीदेखील गायली. आजही त्यांच्या आवाजात तीच जादू आहे, याची खात्री परत एकदा सगळ्यांना पटली.
पंचाहात्तराव्या वाढदिवसाच्या शुभमुहुर्तावर त्यांनी संगीतकारांच्या आग्रहाचा स्विकार करून परत एकदा गाणं रेकॉर्ड करावं, हीच प्रार्थना त्यांचे असंख्य चाहते नटेश्वराच्या चरणी करत असतील.

No comments:

Post a Comment