Tuesday 21 February 2012

शि द फडणीस

गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं. मग भेटायला येणा-यांनी प्रश्न विचारला की तीच चित्रमालीका त्यांच्यापुढे करायची! आपण काढलेलं एक चित्र हजारो शब्दांचा  आशय सहजपणे सांगतं, याची प्रचिती  शिवराम दत्तात्रेय फडणीसला तेव्हाच आली. आणि कोल्हापूरच्या त्या चित्रनगरीतच 'शि द फडणीस' या अर्कचित्रकलाक्षेत्रातील महान कलावंताची जडणघडण सुरू झाली.
फडणीस म्हणताच आपल्यापैकी थोरामोठ्यांच्या डोक्यात 'हंस', 'मोहिनी' या नियतकालिकांची, पुलंच्या पुस्तकांची रेखीव मुखपृष्टं येतील. मध्यमवयिन लोकांना हसरी गॅलरी, मिष्कील गॅलरी, ही प्रदर्शने बघण्यासाठी केलेली गर्दी आठवेल, आणि तरूणांना आठवेल ते पहिल्या वर्गातलं पहिलंवहिलं गणीताचं पुस्तक! गणित असो किंवा सामान्य विज्ञान, त्या पुस्तकातील सगळी गोंडस चित्रं - गोब-या गालांची, मोठ्या मोठ्या डोळ्यांची छोटीशी मुलगी, चष्मा घातलेले आजोबा, गळ्यात किणकिणती घंटा लटकवलेली म्हैस आणिही बरंच काही -- शि द फडणिसांच्या चित्रांनी तीन पिढ्यांपासुन महाराष्ट्राच्या मनःपटलावर राज्यच केलं नाही, तर महाराष्ट्राची चित्रे म्हणुन ती एक ओळखच जगभर निर्माण केली आहे. व्यंगचित्रं म्हणावी तर प्रत्येक वेळी त्यात व्यंग किंवा विनोदच असतो असं नाही, व्यक्तीचित्रं म्हणावी तर प्रत्येक वेळी त्यात वेगळं व्यक्त्तीमत्त्व असतं असंदेखील नाही, हास्यचित्र म्हणावी तर प्रत्येकच चित्रात हसुही नाही, संदेशचित्र म्हणावी तर प्रत्येक चित्रात 'मॅसॅज' ही नाही. फडणिसांनी जीवनाचे ईतके विविध पैलू आपल्या अद्वीतीय शैलीत हाताळले आहेत की त्यांच्या चित्रांना 'जीवनचित्रे' हीच संज्ञा योग्य म्हणता येइल. या जीवनचित्रांच्या जिवनाची सुरूवात झाली ती बेळगावमधल्या भोज या त्यांच्या मुळगावी.
भोजमधील फडणिसांचं घर म्हणजे प्रखर राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव असलेलं कुटुंब. देशभक्ती, वाचन आणि लेखनाची आवड घरातील संस्कारातूनच लागलेली. चित्रकलेची प्रेरणाही यातुनच मिळाली. घरातील सर्व भावंडांमध्ये शिवराम म्हणजे शेंडेफळ. त्यामुळे जवळच्या मोठ्या शहरात, म्हणजे कोल्हापुरला शिक्षणासाठी गेल्यानंतर त्याची चित्रकलेची आवडही त्याला जपता आली. त्या काळचं कोल्हापुर म्हणजे चित्रकारांचा स्वर्गच. बाबुराव पेंटर, बाबा गजबर, यांच्यासारख्यांची चित्र पहात, शिंदेमास्तरांसारख्या गुरूजींकडून आणि वसंत सरवटेंसारख्या वर्गमित्रांबरोबर चित्रकेलेचे धडे गिरवत त्यांची कलासाधना सुरू झाली. मॅट्रीकची परिक्षा होईतोवर शासनाच्या एलिमेन्ट्री आणि ईंटरमिजेट परिक्षा त्यांनी राज्यस्तरावरची बक्षीसे मिळवत पास केल्या होत्या. मग सर जे जे स्कुल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश मिळणं अशक्य नव्हतंच! घरून येणारी पन्नास रूपयांची मनि ऑर्डर आणि हौस म्हणुन काही नियतकालिकांना पाठवलेली व्यगचित्रे प्रकाशित झाल्यास त्याचं येणारं मानधन यांच्या भरवश्यावर वाटचाल सुरू झाली.
'हंस' मासिकाच्या एका चित्रस्पर्धेमध्ये त्यांना बक्षीस मिळालं आणि या निमित्ताने ओळख झाली ती या मासिकाचे संपादक अनंत अंतरकर यांच्याशी. अंतरकरांनी शिदंमधील कलावंत हेरला आणि त्यांच्या मागे लागुन त्यांच्याकडून अनेक चित्र काढून घेतली. 'हंस' तसेच 'मोहिनी' या मासिकाचीही अनेक मुखपृष्ट त्यांनी बनवली. 'एक बस स्टॉप. एक युवती. तिच्या साडिवर मांजरांचे प्रिंटस. बाजुला एक युवक उभा. त्याच्या शर्टवर उंदरांचे प्रिंटस' हे चित्र आज अनेकांना माहिती आहे. १९५२ मध्ये प्रकाशित झालेल्या या चित्राने शिदंबरोबरच मराठी मासिकांच्या विश्वाला एका चाकोरीच्या बाहेर आणलं. याच हंस मासिकामध्ये १९५३ साली वाचकांचे अभिप्राय या सदरात एक लेख प्रकाशित झाला होता. लेखीका होती कुमारी शकुंतला बापट. मुखपृष्टाबद्दल या लेखात लेखिकेने काय अभिप्राय व्यक्त केला होता ते माहिती नाही, मात्र मुखपृष्ठ तयार करणा-या चित्रकाराशीच पुढे तीचं लग्न झालं. लग्नानंतर फडणिसांच्या गाडिने जो वेग घेतला तो त्यांनी केलेल्या कामातून आपल्याला दिसतोच.
कितीतरी पुस्तकांची मुखपृष्ठं, ईल्युस्ट्रेशन्स, यांबरोबरच एक अक्षरही न लिहता व्यक्त होणारी व्यंगचित्रे -- शिंदंच्या चित्रांनी एक काळ गाजवला. अप्लाईड आर्टस हा त्यांचा विषय असल्याने त्यांनी कलात्मकतेबरोबरच व्यावसायिकता जपली आणि एक वेगळा आदर्श नव्या पिढीपुढे घालून दिला.  अनेक नव्या उपक्रमांची, नव्या प्रकारांची, परंपरांची मुहुर्तमेढ या काळात रोवली गेली. मारिओ मिरांडापासुन ते बाळासाहेब ठाकरे पर्यंत सगळ्या अर्कचित्रजगताने फडणिसांच्या नावाचा 'लोहा' मानला. हसरी गॅलरी हे त्यांनी काढलेल्या चित्रांचं भव्य प्रदर्शन अनेक ठीकाणी हाउसफुल्ल गेलं, ते आजतागायत हाउसफुल्लच जातय. यानंतर मिष्कील ग़ॅलरी, आणि काही काळानंतर 'चित्रहास' नावाचं एक अभिनव प्रदर्शनही त्यांनी सुरू केलं. चित्रहासमध्ये फडणीस स्वतः रसिकांशी संवाद साधतात. मराठी आणि ईंग्रजीबरोबरच क्वचित हिंदीतही ते बोलतात. हा उपक्रम एक जगावेगळा अनुभव देऊन जातो आणि म्हणुनच जगभर त्याचे प्रयोग झालेत.
आकडेवारीच्याच निकषातुन पाहिल्यास सुमारे २०० पुस्तकांची मुखपृष्टे, ३० पुस्तकांना मुखपृष्टासह आतील पानांचीही सजावट, आणि २५० च्या वर चित्रहासचे कार्यक्रम याशिवाय गणित, शास्त्र, बॅकिंग, आरोग्य, व्यवस्थापन, नाटक, चित्रपट, उद्योग, यांच्यासाठी केलेले प्रचारसाहित्य, हास्यचित्रे आणि चित्रमाला यांच्यासाठी केलेल्या रेखाचित्रांची संख्या कित्येक हजार होईल. पाच पुस्तके, लहान मुलांसाठी निवडक चित्रांची एक सिडी, आणि नुकतंच आलेलं त्यांचं रेषाटन नावाचं आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा. केवळ चित्रांची पुस्तकंही खपाचा विक्रम मोडू शकतात ही गोष्ट फडणिसांच्याच पुस्तकांनी मराठी ग्रंथविश्वास पटवून दिली. कमर्शिअल आर्टीस्ट गिल्डच्या पुरस्काराबरोबरच ईंडियन ईन्स्टीट्युट ऑफ कार्टुनिस्टसने केलेला सन्मान शिवाय मार्मीकचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांमध्ये महत्त्वाचा.
परंतू या सगळ्या सन्मानांच्या वरचढ म्हणजे फडणिसांच्या चित्रांना मिळालेलं रसिकप्रेम. जगभरातल्या रसिकांनी त्यांच्या हास्यचित्रांना मनमोकळी दाद दिली. अप्लाईड आर्टस या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शि द फडणीस म्हणजे एक विद्यापिठच झाले. त्यांची चित्र बदलत्या काळाचं द्योतक बनली. एका पिढीने त्यांच्याच प्रतिमांच्या माध्यमातून जग पाहिलं आणि आधीच्या पिढीसाठी नाविन्यपुर्ण असलेली त्यांची चित्रं नव्या पिढीसाठी क्लासिक बनली. शि द फडणीस हे चित्रकलेतलं एक युग बनलं.
आजही वयाच्या सत्यांशीव्या वर्षी दोन मुलीं, जावई आणि नातवंडांच्या सहवासात फडणीस चित्रकलेबद्दल उत्साही आहेत. मुलींनी सुरू केलेली त्यांची वेबसाईट, ईमेल्स या माध्यमातून ते रसिकांशी संपर्कात असतात. शिवाय कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि नवीन तंत्रज्ञानानाचंही ते स्वागत करतात. कॉम्प्युटरने कलात्मकता नष्ट केली हा अनेक चित्रकारांचा आरोप त्यांना अजीबात मान्य नाही. कंप्युटर जीथे थांबतो, तेथे सृजनाचं काम सुरू होतं, असं त्यांचं स्पष्ट मत आहे.
आयुष्याचा या टप्प्यावर आपण अगदी शांत, मुक्त व तृप्त आहोत. परमेश्वराकडे काहिही मागणं नाही. कश्याच्याही मागे धावायचं नाही. पूर्वीप्रमाणेच आता आणि पुढेही चिरतरूण आस्वादक दृष्टीने सर्व गोष्टींचं स्वागत करायचं आहे --  असं केवळ एक अभिजात कलावंतच लीहू शकतो ना?

No comments:

Post a Comment