Friday 17 February 2012

डॉ. एस. एल. भैरप्पा

चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनादरम्यान सहा दर्जेदार परिसंवादातून, उद्घाटन आणि समारोपिय भाषणांतुन अनेक नव्या कल्पना पुढे आल्या. संमेलनाला ख-या अर्थाने 'अखिल भारतीय' बनवायचे असेल तर ईतर भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत आणले पाहिजे; ललित किंवा कादंब-यांच्या लेखकांनी अभ्यास करून लेखन केलं पाहिजे; भाषासौंदर्याच्या पलिकडे जाऊन साहित्य त्यातील 'कंटेन्ट' च्या भरवश्यावर ईतर भाषिकांना आकर्षित करेल असे असायला हवे, असे सुर संमेलनादरम्यान निघाले. म्हणुनच या सर्व गुणांनी परिपुर्ण असलेलं डॉक्टर एस एल भैरप्पा यांचं साहित्यही संमेलनाच विषेश आकर्षणाचा विषय बनलं होतं.
मुळ कन्नडमधून लिहलेल्या डॉक़्टर भैरप्पांच्या कादंब-यांचे मराठी अनुवाद गेल्या अनेक वर्षांपासून बेस्टसेलर होत आहेत. भारतीय साहित्याला, कादंबरीलेखनाला एक वेगळा आयाम देणारे डॉक्टर संतेश्वरा लिंगन्नैय्या भैरप्पा येत्या ऑगस्ट महिन्यात आपले सहस्त्रचंद्रदर्शन साजरे करतील. अभ्यासपुर्ण, वैज्ञानिक दृष्टीकोनातून,समाजशास्त्र, तत्त्वज्ञान ईत्यांदिंनी मजबुत केलेल्या पायावर उभं असलेलं त्यांचं लेखन एकुण भारतीय साहित्यातील मैलाचा दगड ठरलंय. २०१० मध्ये त्यांना  के. के. बिर्ला फाऊंडेशनचासरस्वती सन्मान प्राप्त झाला तेव्हा या पुरस्कारालाच पुरस्कार मिळाल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलं होतं, यातच सर्वकाय ते आलं.
बंगलोरपासून २०० किलोमिटर दुर हसन जिल्ह्यात असलेल्या  कोण्या एका चन्नरायपट्टण नावाच्या खेड्यात भैरप्पांचा जन्म झाला तो १९३१ मध्ये. घरात वेदाध्ययन, महाकाव्यग्रंथांचे अध्ययन, मंत्रपठणाची परंपरा होती. त्यामुळे लहान असतांनाच संस्कृतशी जवळचा परिचय झाला. घरातील वातावरणामुळे संस्कृतशी, आणि आईमुळे संस्कृतीशी! पण नेमकी तेव्हा जीवघेणी प्लेगची साथ आली, आणि त्यात आईसह भावंडंही दुरावली. काका आणि काकुंच्या सहवासात सावत्र जीणं नशिबी आलं. घर सोडून पळून जावं असं सतत मनात यायला लागलं. भटकंतीचं आणि'नक्की खरं काय आहे?' हे शोधण्याचं मुळ या छळवादातूनच उगवलं असावं.
शालेय शिक्षण सुरू झालं, तो काळ स्वातंत्र्यचळवळीचा होता. गोरूर रामस्वामी अय्यंगार हे त्यांच्याच भागातील साहित्यक्षेत्रातील मोठं नाव. त्यांच्या प्रभावाखाली येऊन स्वातंत्र्यचळवळीतही भाग घेतला. ईंग्रजांच्या राजकिय प्रभावातून तर आपण मुक्त होउ, पण त्यांच्या बौद्धीक, वैचारिक प्रभावाचे काय? हा प्रश्न त्याना सतत पडायचा. यातूनच शाळा सोडून भटकंती करण्याची उर्मी आली.
वर्षभर भटकत ते मुंबईला पोचले. हाताला मिळेल ते काम करत पुढं जात राहिले. एका साधुंच्या समुहाशीही यादरम्यान गाठ पडली, आणि त्यांच्याबरोबरही काही काळ भटकंती झाली. मात्र शहर असो किंवा गाव, लोक कुठलाच विचार न करता, शोध न घेता केवळ कुणीतरी सांगीतलेल्या मार्गावर आंधळेपणाने चालत  आहेत, हाच अनुभव त्यांना आला. पावलं परत फिरली आणि मैसुरला राहिलेलं शिक्षण पुर्ण करायचं ठरलं. मिळेल ते काम करत, आपल्या शिक्षणासाठी पैसा आणि आयुष्यासाठी अनुभव जमवत सुरू झालं उच्च शिक्षण.
स्वभावगुणानुसारच तत्त्वज्ञान हा विषय निवडला, आणि त्यात सुवर्णपदकही मिळवलं. भैरप्पांचा लेखन-प्रवास त्यांच्या वयाच्या सुमारे सतरा-अठरा वर्षांपासून सुरू झाला. सुरुवातही कादंबरी लेखनानं झाली. कारण त्यांना जे सुचतं तेच मुळी भव्य स्वरूपात. भीमकाय नावाची कादंबरी लिहली तेव्हा प्रकाशक मिळण्याची वानवा होती. दरम्यानच्या काळात हुबळीच्या कलासिद्देश्वर कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणुन नोकरी सुरू केली. शोध सुरूच होता.भीमकाय प्रकाशित होण्यासाठी १९६० साल उगवावं लागलं.
त्यानंतर मात्र मागे वळून पहावंच लागलं नाही. कन्नडमध्ये त्यांच्या बाविस कादंब-या प्रकाशित झाल्या. अनेकांच्या दहा दहा आवृत्त्या निघाल्यात. सहा कादंब-यांबर चित्रपट निघालेत,काहिंवर दुरदर्शन मालिका निघाल्यात. त्यांच्या ग्रंथसंपदेवर आधारीत पंचवीसहून अधिक ईतर लेखकांची पुस्तकं प्रकाशीत झालीत. त्यांच्या बहुतांश कादंबऱ्या भारतातील सर्व भाषांमध्ये अनुवादित झाल्या असून त्यापैकी बऱ्याच अनुवादकांना साहित्य अकादमीचे अनुवाद पुरस्कार मिळवून देण्यास कारणीभूत झाल्या आहेत. शेकडो अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यावर डॉक्टरेट मिळवली आहे. भैरप्पांना मात्र त्यांच्या'ट्रुथ ऍण्ड ब्युटी' या ईंग्रजीतील शोधनिबंधासाठी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीने डि लिट दिली आहे. यानंतर तब्बल सहा विद्यापिठांच्या मानद डॉक्टरेट मिळाल्या! वाचकांच्या दृष्टीने एक जिवंत ज्ञानपिठ असलेल्या भैरप्पांना मात्र अजुनही ज्ञानपिठ पुरस्कारानं हुलकावणीच दिली आहे.
दरम्यानच्या काळात भैरप्पांनी गुजरातच्या सरदार पटेल विद्यापिठात, दिल्लीच्या एनसिईआरटीमध्ये आणि मैसुरच्या रिजनल कॉलेजमध्येही अध्यापन केलं. गुजरात आणि उत्तर भारतात केलेल्या वास्तव्यामुळे त्यांचे विषय आणि हाताळणी संपूर्ण भारताला भिडणारी झाली. ईंग्रजीवरती कमालीचं प्रभुत्त्व असुनदेखील त्यांनी कन्नडमध्येच लेखनाला प्राधान्य दिलं याचं कारण म्हणजे कर्नाटकावर आणि कन्नड भाषेवर त्यांचं प्रेम!
'अभ्यास' हे त्यांच्या लेखनाचं वैषिष्ट्य. शास्त्रीय संगीतावरील मंद्र नावाच्या कादंबरीसाठी त्यांना सरस्वती सन्मान मिळाला. ह्या कादंबरीचा विषय कला आणि कलाकार किंवा कलाजीवन आणि सामान्य जीवन असा ठेवला आहे. यासाठी भैरप्पांनी स्वतः शास्त्रीय संगीताचा क्लास लावला!'पर्व' या महाभारतावरील त्यांच्या प्रचंड गाजलेल्या कादंबरीच्या वेळी त्यांनी तत्त्वज्ञान या आपल्या विषयाबरोबरच समाजशास्त्र, मानव्यवंशशास्त्र,भुगोल ईत्यादी विषयांचा ईतका अभ्यास केला, की या साठी त्यांना वेगळी डॉक्टरेट मिळावी! म्हणुनच लोकमान्यता आणि विद्वत्मान्यता लाभलेल्या काही मोजक्याच लेखकांपैकी डॉक्टर भैरप्पा एक आहेत. सखोल अभ्यासानंतर स्वत:ला वाटेल ते निर्भिडपणे मांडणारा हा शिपाई आहे.
प्राचिन भारताच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक महानतेबद्दल डॉक्टर भैरप्पा भरभरून बोलतात. साहित्य वाचवायचे असेल, तर आपल्या शिक्षणप्रणालित बदल घडवून आणायला  हवेत. पुराणातल्या भाकडकथा म्हणुन अभ्यासक्रमातून बाद केलेला आपला देदिप्यमान ईतीहासच आपल्या विद्यार्थ्यांना निर्मितीक्षम विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो असंही ते मानतात. नव्या विचारांचं ते समर्थन करतातआणि वैज्ञानिक दृष्टीकोणाचा आग्रह धरतात. हिंदू धर्म, त्यापेक्षाही पुढे जाऊन भारतीय दर्शन हे तर्कसंमत आणि पुरोगामी असल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे. यामुळे एकुणच त्यांनी स्वतःवर अनेक वादविवादही ओढवून घेतले.
एन आर नारायण मुर्ती यांचं कावेरी मुद्यावर समर्थन करणं असो, किंवा टिपु सुल्तानच्या धार्मिक धोरणांवर गिरिश कर्नाड यांच्याशी झालेला वादविवाद असो, त्यांनी आपली बाजु 'सबुतो के साथ' मांडली आहे. 'आवरण' ही त्यांची टिपु सुल्तानवरिल कादंबरी जेव्हा १४ भाषांमध्ये भाषांतरित झाली आणि हिंदीमध्ये तीच्या तीन आवृत्त्या लगोलग खपल्या, त्यावेळी हा विवादही आपोआपच शमला.
त्यांच्या वंशवृक्ष, पर्व,धर्मश्री’, ‘तंतु’, ‘काठ’, ‘सार्थ या कादंब-या भारतीय तत्त्वज्ञानातील विविध दर्शनावर, आपल्या महाकाव्यांवर,ऐतिहासिक संदर्भांवर आधारीत आहेत. या ग्रथांकडे, आपल्या कथांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणा-या या कादंब-या  आहेत. 'पर्व' ही आठशे पानांची महाकादंबरी लिहण्यापुर्वी पाच वर्षे भैरप्पांनी महाभारतकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यात घालवली यावरून त्यांची शोधक वृत्ती दिसून येते. म्हणुनच टिका करायच्या आधी एकदा मी उल्लेख केलेल्या संदर्भांवरून नजर फिरवा, आणि मग वादविवादाला उभे रहा, असं आव्हान त्यांनी दिल्यावर कुणाचीच विवाद करण्याची टाप राहिली नाही.
आज वयाच्या एंशिव्या वर्षिही डॉक़्टर भैरप्पांचा शोध सुरूच आहे. मैसुरमधल्या आपल्या घरी आपल्या दोन मुलांसह एकत्र कुटुंबात राहतांना शास्त्रीय संगीत ऐकणे, वाचन करणे आणि संस्कृत भाषेच्या उत्थानासाठी कार्य करणे यात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे. 'भित्ती'नावाचं त्यांचं आत्मचरित्रही खुप लोकप्रिय झालंय आणि सध्या 'कवलू' ह्या कादंबरीचा मराठी अनुवाद गाजतोय.
साहित्यामध्ये अभावानेच आढळणारा संशोधन आणि लालित्याचा संगम डॉक्टर भैरप्पांच्या आठ दशकाच्या साहित्यतपश्चर्येला भारतातील सर्वोत्कृष्ट कादंबरिकारांच्या रांगेत नेऊन ठेवतो.

No comments:

Post a Comment