Wednesday 4 April 2012

स्वप्नातली कार बनवणारा सुधाकर!

आजच्या कॉर्पोरेट जगतामध्ये करिअरच्या सुरवातीलाच 'नयी कार' आणि काही वर्षात 'नया घर' मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक 'सुनिलबाबु' बघत असतो. आपलं घर ईतरांपेक्षा वेगळं असावं, आणि त्याच्या अंगणात उभी असलेली कारही ईतरांपेक्षा जरा वेगळी असावी, असंही प्रत्येकाला वाटतं. अगदी लहानपणी 'झुकझुक झुकझुक अगीनगाडी' पासुन सुरू झालेलं गाड्यांचं आकर्षण 'पोलीसच्या जीप' पासुन ते 'चांदण्यांची गाडी, अन त्याला हरणाची जोडी' पर्यंत आपल्याबरोबर असतं. असंच जुन्या हैद्राबाद शहरातील बहादूरपू-यात रहाणा-या के सुधाकर यादव नावाच्या पोराला शाळेत असतांनाच 'वेगळ्या' गाड्यांच्या भुतानं झपाटलं. नेहमीच्या चाकोरीबद्ध आकारापेक्षा वेगळं काहीतरी आपल्या वाहनामध्ये करता आलं पाहिजे, या वेडानं कामाला लागलेल्या सुधाकरने आज तीनशेच्या आसपास चित्रविचित्र आकाराच्या कार्स बनवल्या आहेत,
अगदी चौदा ईंचाच्या मोटारसायकलपासुन ते बेचाळीस फुटाच्या महाकाय तीनचाकी सायकलपर्यंत कित्येक वाहनं त्याच्या 'सुधा-कार्स' संग्रहालयाची शान वाढवत आहेत. भारताचा सगळ्यात मोठा ऑटॉमोबाईल मॉडिफायरम्हणुन त्याचं नाव घेतलं जातंय, आणि लिम्काबुक पासुन ते गिनिजबुक पर्यंत सगळीकडेच त्याने बनवलेल्या वाहनांचा डंका पिटल्या जातोय. शहराच्या ईतर आकर्षणांबरोबरच सुधाकरचं कार संग्रहालयही 'हैद्राबाद दर्शन' फेरीचा भाग बनलंय. आज विविध कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या प्रसिद्धीसाठी व्हॅन डिझाईन करून देणा-या, अनेक सामाजीक उपक्रमांसाठी, क्रिडा स्पर्धांसाठी नाविन्यपुर्ण वाहने तयार करणा-या सुधाकरची सुरूवात झाली ती याच वेडापासुन.
खरं पाहिलं तर जुन्या हैदराबादेत असलेल्या काही पिढीजात मुद्रणालयांपैकी एक म्हणजे के रामस्वामी कुटुंबियांचे मुद्रणालय. घर म्हणावं तर ब-यापैकी सुखवस्तू. एकत्र कुटुंबात राहतांना मुलांनीही हाच व्यवसाय पुढे न्यावा ही सहज अपेक्षा. पण शाळेत जायला लागल्यापासुनच सुधाकरच्या डोक्यात घर केलं ते वेगळ्याच उद्योगाने! घराच्या मागच्या अंगणात अनेक वर्षांपासुन धूळ खात पडलेली एक जुनी हेराल्ड कार त्याला खुणावत होती. या कारचा जीर्णोद्धार करता येइल का? या विचाराने त्याच्या मनात काहूर माजवलं. ईटरच्या वर्गात असतांना कॉलेजला बुट्टी मारून मित्रांबरोबर सिनेमा पहायला जाण्याऐवजी सुधाकरचा तो वेळ घराजवळच्याच बाबु खान गॅरॅजमध्ये जायला लागला. कच-यातुन कला हा मंत्र त्याने याच ठीकाणी आत्मसात केला. त्याला दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नसानसाशी परिचित करून देणारे बाबु खानच मग त्याचे गुरू बनले. मागच्या अंगणातल्या हेराल्डवरची धूळही मग झटकली गेली आणि तीचं बाह्यस्वरूप बदलून तीला एका बग्गीसारखं बनवण्यात आलं. पहिलाच प्रयोग होता. आणि खर्च आला दहा हजार रूपये. हौस म्हणुन वडिलांनी देऊ केलेले हे पैसे सुधाकरचं आयुष्यच बदलवून टाकतील असं तेव्हा कुणालाच वाटलं नसेल. कॉलेजमध्ये बि कॉम चं शिक्षण घेत असतांनाच त्याच्या मनात 'कार संग्रहालयाची' कल्पना आली. भंगारमध्ये काढलेल्या गाड्यांमध्ये जीव फुंकायचा आणि त्यांचं बाह्यस्वरूप बदलवून त्यांना नव्याने लोकांसमोर आणायचं, हा त्याचा छंद बनला. जुन्या हैद्राबादेतल्या भंगारच्या मोठमोठ्या दुकानांमध्ये फेरफटका मारणे आणि निकामी झालेले गाड्य़ांचे स्पेअरपार्टस, ईंजीनचे पुर्जे, आणि जे वाटेल ते खरेदी करून घरी आणुन ठेवणे हा दिनक्रमच झाला. मागच्या अंगणातलं गॅरॅज ही त्याची प्रयोगशाळा बनली आणि याच प्रयोगशाळेतून हळूहळू निर्माण व्ह्यायला लागला चित्रविचित्र वाहनांचा ताफा. चौदा ईंचाची एक मोटरसायल बनली. सहा ईंचाची सायकल बनली. सहासात जण एकत्र चालवू शकतील अशी सायकल ट्रेन बनली. आणि हे सगळं केवळ शो साठी नाही! अगदी कुणीही चालवू शकेल ईतपत कार्यक्षम अश्या या सगळ्या गाड्या बनल्या.
१९९०-९१ दरम्यानच्या काळात सुधाकरला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. त्याच्या शोधक डोळ्यांनी हेरली ती 'वॅकी कार्स' ची संकल्पना. जुन्या कारच्या चेसिसवर नवं आवरण चढवायचं  आणि वेगळी दिसणारी गाडी बनवायची अशी ही एकंदर भन्नाट कल्पना. सुधाकरच्या सुपिक डोक्यात मग अश्या अनेक कार्स तयार झाल्या आणि भारतात परतल्यावर त्याने त्या प्रत्यक्षातही उतरवल्या. सहा सात हजार रूपयांचा भंगारातला ऑटो घरी आणायचा. आधी त्याला सुरू करायचं, आणि नंतर त्याच्यावर आपल्या मनात येइल त्याप्रमाणे साज चढवायचे असा हा उपक्रम. यातूनच मग 'बुटाची कार', सोफा कार, बास्केटबॉल कार, लिपस्टीक कार आणि अश्या शंभरेक मॉडेल्सचा जन्म झाला. फुटबॉलच्या विश्वचषकाच्या वेळी 'फुटबॉल कार' जन्मली, तर क्रिकेटच्या २००३ च्या विश्वचषकाच्या वेळी 'क्रिकेट बॉल कार' हैद्राबादच्या रस्त्यांवरून धावली. २००७ च्या विश्वचषकामध्ये क्रिकेटची बॅट रस्त्यावरून ४० च्या स्पिडने धावतांना पाहून लोकांनी तोंडात बोटं घातली, तर नुकत्याच झालेल्या विश्वचषकादरम्यान प्रत्यक्ष विश्वचषकाची टॉफीच रस्त्यावरून धावत होती. अधूनमधून हैदराबादच्या रस्त्यावर एखादा महाकाय कॅमॅरा, कंप्युटर, किंवा एखादं हेल्मेट धावतांना दिसलं तर ट्राफिक पोलीसांना आश्चर्य वाटत नाही. गाडीला एखाद्या भल्यामोठ्या बर्गरने, किंवा सुटकेसने ओव्हरटेक केलं तर 'तौबा ये क्या बला है?' असे हैदराबादी उद्गारही हल्ली निघत नाहीत. सुधाकर आणि त्याच्या विचित्र गाड्या या शहराच्या संस्कृतीचा एक भाग होउन गेल्या आहेत.
                सुधाकरने हैद्राबादची लाडकी टेनिसस्टार सानिया मिर्झाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणुन एक टेनिसबॉल कारही बनवली होती. सानियानेच त्या कारचं उद्घाटन करावं अशी त्याने तीला विनंती केली. मात्र सानियाच्या एजंटने या साठी पैशाची मागणी केली. कपिलदेव पासुन ते चिरंजीवीपर्यंत सगळ्यांनी सुधाकरने बनवलेल्या कार्सचं अनावरण मोठ्या कौतुकाने केलं आहे. तेव्हा त्याच्याच शहरातल्या सानियाकडून अशी वागणुक मिळाल्यामुळे तो बराच व्यथीतही झाला होता. सुधाकरने ती कार आजही कायमची पडद्यांमागे ठेवली आहे.
                मात्र  आपल्या हैदराबादवर त्याचं मनापासुन प्रेम आहे. मित्रांच्या आग्रहास्तव हैद्राबादचं नाव गिनिजबुक मध्ये न्यायचं ठरवल्यावर त्याने एक भलीमोठी तीनचाकी सायकल बनवायला घेतली. एक्केचाळीस फुट सात ईंचं उंचीची, सतरा फुट व्यासाची चाकं असणारी, तीन टनाची ही महाकाय तीचाकी सायकल एक व्यक्ती आरामात चालवू शकतो ईतकी सहज आहे.
                सामाजीक बांधीलकी म्हणुन सुधाकरने कित्येक अपंग व्यक्तींना त्यांच्या सोयीच्या होतील अश्या सायकली, गाड्या आणि कार डिझाईन करून दिल्या आहेत. एडसबद्दल जनजागृती करण्यासाठी त्याने 'कॉण्डॉम बाईक' बनवली होती, ती बरिच लोकप्रिय झाली होती. आजही 'कच-यातून कला' हे सुत्र त्याने जपलं आहे. गाड्या बनवणं हा त्याचा व्यवसाय नाही, छंद आहे, हे तो आवर्जुन सांगतो. बनवलेल्या कार तो विकत नाही. मात्र त्याचं एक कायमस्वरूपी प्रदर्शन त्याने आपल्या घरीच तयार केलं आहे. या प्रदर्शनाला दररोज शेकडो लोक भेट देतात. वयाच्या पन्नाशीला आलेल्या सुधाकरने आता 'ऍनिमल पार्क' च्या एका भन्नाट कल्पनेवर काम सुरू केलं आहे.
                खरं म्हणजे घरापासुन जवळच असलेल्या हैद्राबादच्या प्राणिसंग्रहालयामध्ये वारंवार जाणा-या सुधाकरच्या नऊ वर्षाच्या मुलीच्या, स्पष्टाक्षराच्या डोक्यात आलेली ही आयडीया! 'झु मध्ये जसे प्राणी फिरतात, तसेच आपल्या पार्कमध्येही ईलेक्ट्रॉनिक प्राणी फिरू शकत नाहीत का?' या एका वाक्यासरशी सुधाकरच्या डोक्यात वादळ  आकार घेऊ लागलं. मोटरवर चालणा-या हत्तीवर बसुन मुलांना पार्कचा फेरफटका मारता येइल. पार्कमध्ये फिरणारे ईतर प्राणीही अगदी खरेखुरे वाटतील, तसेच चालतील, आणि तसेच आवाजही काढतील असे हे प्राणी संग्रहालय तयार करण्याच्या कामात सुधाकर हल्ली मग्न आहे.
                आजवर मनात येइल आणि स्वप्नात दिसेल ते ते करून दाखवलेल्या सृजनशिल सुधाकरच्या 'रिअलटाईम झु' ची सफरही आपण लवकरच करू शकू!

No comments:

Post a Comment