Wednesday 16 November 2011

रविन्द्र जैन

त्यांचं संगीत लोकसंगीताप्रमाणे स्वयंभु वाटावं, शब्द मंत्रोच्चाराप्रमाणे सुत्रबद्ध वाटावे, आणि स्वर आकाशवाणीप्रमाणे अढळ वाटावा,  अशी सामर्थ्याची त्रीसुत्री परमेश्वराने रविन्द्र जैन नावाच्या व्यक्तीला अर्पण करून आता सात दशकं होत आलीत. रामायण आणि भगवतगीता टिव्हीच्या माध्यमातून त्यांच्याच शब्दांतून ऐकलेल्या-समजलेल्या युवा पिढीसाठी रविन्द्र जैन कथा-व्यास आहेत, अभिजात संगीताच्या चाहत्यावर्गासाठी रविन्द्र जैन आदर्श संगीतकार आहेत, गीतलेखनाला साहित्यलेखन मानणा-यांसाठी रविन्द्र जैन जेष्ठश्रेष्ट कवी आहेत तर संगीतक्षेत्रात नव्याने येऊ ईच्छीणा-यांसाठी रविन्द्र जैन हे सरस्वतीचं देऊळ आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांना त्यांच्यावर प्रेम करणा-यांचे लाडके 'दादू' होवून राहणंच अधीक आवडतं.
चाहत्यांशी संवाद साधता साधताच दादू क्षणार्धात स्वरबद्ध कवीता रचतात आणि आपल्या सुरेल आवाजात सादर करतात. हिंदी बरोबरच ईंग्रजी, संस्कृत आणि मराठी बंगाली भाषेचंही त्यांना ज्ञान आहे. हिंदू बरोबरच जैन, बुद्ध, ख्रिस्त्री आणि ईस्लाम धर्माचा अभ्यास आहे. ही विलक्षण अध्ययन क्षमता मात्र त्यांच्यासाठी नवीन नाही. कारण दादूंचे वडिल आयुर्वैदाचार्य पंडित ईंद्रमणी जैन हे संस्कृतचेदेखील पंडित होते. त्यांचे जेष्ट बंधू महेन्द्रकुमार जैन हे देखील भारतातील आघाडिचे आयुर्वेदाचार्य आहेत. 'मंजले भैया' जेष्ट कायदेतज्ञ आणि सर्वैच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉक्टर डि के जैन हे टाईम्स समुहाचे संचालक आहेत. संगीताचा वारसा दादूंना त्यांच्या आई किरणदेवींकडून मिळाला.
मुळचे अलीगढचे असलेले जैन राजस्थानमधील लोहारिया या खेड्यात वास्तव्याला असतांना १९४४ मध्ये रविन्द्रचा जन्म झाला. सात भावंडांमध्ये रविन्द्र तीसरा. देवाने त्याला अलौकीक दृष्टी द्यायची असं आधीच ठरवलं असावं, त्यामुळे भौतीक दृष्टी देण्याच्या भानगडीत तो पडला नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मात्र जन्मांध मुलाचे भविष्य घडवणे ही मोठीच जबाबदारी होती. छोट्या रविन्द्रचे शिक्षण सुरू झाले ते गुरूमुखी विद्या ग्रहण करतच. आजुबाजुच्या जैन मंदिरांमध्ये होणा-या भजन समारंभात रविन्द्र अगदी लहान असतांनापासुनच भजन गायला लागला. तेव्हा वडिलांनी ठरवलं, की मुलाला संगीताचंच शिक्षण द्यायचं. पंडित जनार्दन शर्मा, जि एल जैन आणि पंडित नथुराम यांसारखे गुरू लाभले. लोहारिया, जयपूर,  अलीगढ, दिल्लीसह कलकत्त्यापर्यंत संगीतशिक्षणासाठी भ्रमंती झाली. संगीताबरोबरच संस्कृत आणि धार्मिक ग्रंथाचा अभ्यास झाला.
दरम्यानच्या काळात १९५७ मध्ये दादूंचं वास्तव्य काही काळ मोठ्या भावाकडे नागपूरलाही होतं. १९७० च्या दरम्यान मात्र वडिलांच्या ईच्छेनुसार चित्रपटाला संगीत द्यायचं हे मनाशी ठरवून त्यांनी मुंबई गाठली. पुढील मार्ग सोपा नक्कीच नव्हता. मात्र दादूंच्या मनमिळावू व्यक्तीमत्त्वामुळे आणि बोलक्या स्वभावामुळे, त्यांच्या चौकस वृत्तीमुळे आणि ज्ञानामुळे चित्रपटक्षेत्रातील दर्दी लोकांमध्ये ते काही काळातच लोकप्रिय झाले. गुणवत्ता तर त्यांच्या ठायी होतीच. तरीदेखील संधी मिळण्यासाठी दोन वर्षाहून अधीक काळपर्यंत वाट पहावी लागली. १९७२ च्या दरम्यान 'सौदागर चित्रपटाचं काम मिळालं. पहिलं रेकॉर्डिंग होतं फ़िल्म सेण्टर स्टूडियो मध्ये आणि गायक होते महंमद रफी. दिवस होता मकसंक्रांतीचा. १४ जानेवारी १९७२.
रविन्द्रजींच्या कार्यशैलीने प्रभावीत झालेल्या रफीसाहेबांनी दादूंना गज़ल म्हणुन दाखवण्याची विनंती केली. 'गम भी हैं न मुक्कमल, खुशियाँ भी हैं अधूरी, आंसू भी आ रहे हैं, हंसना भी है जरूरी' -- दादूंच्या घनगंभीर आवाजातील ह्या ओळींनी रफीसाहेबांना ईतकं प्रभावीत केलं की यानंतर प्रत्येक रेकॉर्डिंगनंतर ही गज़ल त्यांची खास फर्माईश बनली.
यानंतर आलेल्या 'चोर मचाये शोर' च्या दरम्यान त्यांनी किशोरदांबरोबर आपलं पहिलं गाणं 'घुंगरू की त-हा बजता ही रहा हू मै' रेकॉर्ड केलं. भल्याभल्या संगीत दिग्दर्शकांच्या नाकी नऊ आणणारे किशोरदा रविन्द्रजींना मात्र संगीत संयोजनासाठी हवा तेवढा वेळ घेऊ द्यायचे. यानंतर मुळातच श्रद्धाळू आणि धार्मिक असलेल्या बडजात्यांच्या राजश्री प्रॉडक्शनबरोबर त्यांची जोडी जी जमली ती आजतागायत 'विवाह' च्या सुपरहिट गाण्यांपर्यंत कायम आहे.
गाण्याची धुन बनवतांनाच त्याचे शब्द लिहण्याचं कसबही दादूंना देवाने बहाल केलेलं आहे. त्यांच्या अप्रतीम गीतरचना आणि भजनांनी प्रभावीत झालेल्या कवयित्री दिव्या जैन यांनी सौदागर च्या प्रसिद्दी दौ-यादरम्यान त्यांना दिल्ली येथे पाहिलं आणि 'लग्न करायचं तर यांच्याशीच' अस मनोमन निश्चयच केला. यथावकाश दोघांचा विवाह झाला. विवाहानंतर जणु दादूंच्या करिअरचे सुवर्णयुगच सुरू झाले. 'ब्रिजभुमी', 'नदिया के पार' 'अखीयो के झरोको से' -- आणि यादी वाढतच जाईल.
हिंदीच नव्हे तर अनेक मल्याळम, हरियाणवी, भोजपुरी, पंजाबी आणि तेलगु चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं. धार्मिक चित्रपटांचे संगीत देण्यात त्यांचा हातखंडा! गोपालकृष्ण, राजा हरिश्चंद्र यां हिंदी चित्रपटांबरोबरच ब्रम्हर्षि विश्वामित्र या तेलगु चित्रपटालाही संगीत दिलं. याचदरम्यान दक्षिण भारतीय संगीतक्षेत्रातील तेव्हा गाजत असलेलं नाव होतं - डॉक्टर के जे येसुदास ! दादूंनी येसुदासचा तलम रेशमी आवाज हिंदीमध्ये आणला. या जोडगोळीने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. खरं म्हणजे येसुदासच नव्हे, तर यांबरोबरच दादूंना श्रेय जातं ते अनेक नवे आणि दर्जेदार पार्श्वगायक हिंदी चित्रपटसृष्टीला देण्याचं. सुरेश वाडकर, आरती मुख़र्जी, जसपाल सिंग, हेमलता यांसह अनेक नव्या आवाजांना त्यांनी संधी दिली. नाव दिलं.
१९८२ च्या लगीनसराईमध्ये एक स्वप्नवत घटना घडली. चित्रपटक्षेत्रातीलच कुणाचातरी (कदाचित बरजात्या परिवारातीलच) विवाहसोहळा सुरू होता. मेहफिल जमलेली होती. दादूंना गाणं म्हणण्याचा आग्रह करण्यात आला. आणि त्यांनी सहज तान धरली - 'एक राधा, एक मीरा, दोनों ने श्याम को चाहा, अन्तर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी...' मेहफिलीमध्ये बसलेल्यांपैकी एक होते राज कपुर! गाण्याच्या ओळी ऐकून ते मंत्रमुग्ध झाले! "ये गीत किसी को दिया तो नही?" त्यांनी विचारलं. दादू म्हणाले - "दे दिया!" "किसे?" राजजींनी  आश्चर्याने विचारलं. आणि दादूंनी हसुन सांगीतलं - "राजकपूर जी को!". पुढच्याच क्षणी राजजींनी खिशातले होते नव्हते तेवढे सगळे पैसे त्यांनी दादूंच्या हातात दिले. 'राम तेरी गंगा मैली' च्या अप्रतीम संगीताची मुहुर्तमेढ रोवली गेली. यानंतर आर के प्रॉडक्शन्सबरोबर त्यांनी 'हिना' चित्रपटही केला. मात्र याच दरम्यान राजजींच निधन झालं, आणि पुढचे अनेक मैलाचे दगड त्यांच्या आणि आपल्याही संगीत प्रवासात यायचे राहून गेले.
बरजात्या परिवार आणि राज कपूर यांच्यासह सागर परिवारांशी असलेला दादूंचा ऋणानुबंधही आजतागायत टिकून आहे. रामानंद सागर अर्थात पापाजींच्या 'आखे' चित्रपटाला संगीत देणा-या रविंन्द्रजींनी जेव्हा 'रामायण' मालीकेसाठी गीत आणि संगीताची जबाबदारी घेतली, तेव्हा दादूंची गीतं तुलसिरामायणाप्रमाणेच पुजनिय झाली. यानंतर श्रीकृष्ण मालीकेतून त्यांनी भगवद्गीता सांगीतली. नुकतीच सागर परिवाराच्या तीस-या पिढीबरोबर काम करत त्यांनी रामायणाची २०११ मधली आवृत्ती आपल्यापुढे आणली.
सध्याच्या बदलेल्या संगीत क्षेत्रामध्ये देखील स्वतःची शैली आणि अभिजात संगीताची साथ त्यांनी सोडली नाहीय. सध्या हिंदी साहित्य संमेलनात, कवी संमेलनात, तसेच गीत-गज़ल च्या मैफलींमध्ये ते व्यस्त असतात. फेसबुकवरही दादूंचं अकाउंट आहे, आणि दररोज चार अप्रतीम ओळी ते त्यावर लिहतात. चित्रपटाला संगीत देण्याचं कामही सुरू आहे. आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे २०१२ मध्ये येऊ घातलेल्या सदानंद देशमुख यांच्या 'बारोमास' कादंबरीवर आधारीत चित्रपटाचं संगीत दादूंनीच दिलेलं आहे.
'खुला खुला गगन ये हरे भरी धरती, जीतना भी देखो तबीयत नही भरती' सारखे शब्द लौकीकार्थाने कधी सृष्टीसौंदर्य पाहिलेलंच नसलेल्या माणसाने लिहावे ही गोष्ट मातापित्यांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट, संगीत तपस्येसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, यांबरोबरच ईश्वरी अस्तीत्त्वाचा पुरावा देण्यासही पुरेशी नाही का?

No comments:

Post a Comment