Tuesday 8 November 2011

लेडी गागा

नुकत्याच पार पडलेल्या पहिला ईंडियन ग्रॅंण्ड प्रिंक्स फॉम्युला वन च्या महासोहळ्याने भारतीय क्रिडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. गाड्यांची दिलखेचक रचना, स्पॉन्सर्सचे लोगो, देहभान हरपून शर्यतीचा आनंद लुटणारे प्रेक्षक या सर्वांनीच खेळांच्या या प्रकाराला ग्लॅमर मिळालंय. त्या ग्लॅमरमध्ये आणखी रंग भरण्याचं काम करतात ते या निमित्ताने आमंत्रीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार! दिल्लीला येऊन 'नमस्ते ईंडिया' म्हणत आणि 'एफ वन' पार्टीमध्ये सितार वाजवत पॉप सिंगर लेडी गागाने सर्वांची मने जिंकली आणि एरवी पॉप म्युजीकच्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत असणारी पंचवीस वर्षाची स्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा सगळीकडेच चर्चेचा विषय झाली.
व्यावसायिक स्तरावर गाणे सुरू केले वयाच्या सतराव्या वर्षी. पहिला अल्बम आला तो २००८ साली. आणि आज २०११ मध्ये लेडि गागा पॉप संगिताची राणी मानली जाते. मायकेल जॅक्सन, मॅडोना या संगीतदेवांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच तीने कमावून दाखविली. एक दोन नव्हे तर तब्बल पाच ग्रॅमीसोबत ईतरही सर्व संगीत सन्मानांच्या राशी पटकावणाऱ्या, टाईम, फोर्ब्स, या सर्व नियतकालिकांच्या प्रभावशाली व्यक्तींक्तींच्या यादिममधील अग्रस्थान गाठणाऱ्या गागाकडे या शतकातील सर्वात बुद्धिमान गायिका म्हणून पाहता येईल.
आजवर बारा वेगवेगळ्या विभागांमध्ये सन्मानाच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी गागाचे नामांकन झाले आहे. मॅडम तुसाच्या संग्रहालयात तीचे एक दोन नव्हे तर आठ पुतळे आहेत. तीने आजवर प्रकाशीत केलेल्या तीन अल्बम्सपैकी दोन ऐतीहासिक बेस्टसेलर्स आहेत, आणि तीसरा हे सर्व रेकॉर्डस तोडण्याच्या मार्गावर आहे. ईतर पॉप गायिकांप्रमाणे आपल्या तोकड्या कपड्यांमुळेच आणि जगावेगळ्या फॅशन स्टेटमेन्टमुळेच जास्त चर्चेत राहत असली; तरीदेखील  आत्मविश्वास, खणखणीत आवाज रंगमंचावरील बिनधास्त वावराबरोबरच उत्तम नृत्य आणि त्याहूनही उत्तम गीतलेखनाची क्षमता ही गागाच्या यशाची कमी चर्चीली जाणारी कारणं आहेत.
आई सिन्थीआ आणि वडिल जोसेफ दोघेही टेलिकम्युनिकेशनच्या व्यवसायात, आणि बारा बारा तासांच्या शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या दोन अपत्यांपैकी मोठ्या असलेल्या स्टीफनीला शहाणपण त्यामानाने जरा लवकरच आलं. वयाच्या चौथ्या वर्षी ती पियानो वाजवायला लागली. बाराव्या वर्षी तीने पियानोवरील आपलं पहिलं 'बॅलड' लिहलं. आणि चौदाव्या वर्षी माईकवरती पहिला परफॉर्मन्स दिला. रंगमंचाचं, मायक्रोफोनचं आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचं आकर्षण तीला स्वस्थ बसु देइनासं झालं. म्हणुन मग नाटकात काम करणं सुरू झालं. अनेक नाटकांत आणि नंतर एका टिव्ही सिरिअलमध्येही छोटीशी भुमिका केली. पण संगीतावरचं प्रेम गाण्याशिवाय दुसरं काही करू देइल तर शपथ! सोळाव्या वर्षी शाळेला बुट्ट्या मारत न्यु यॉर्कच्या आजुबाजुला असलेल्या रॉक-पॉप बॅण्डसची मुशाफिरी करणं सुरू झालं. लोकांना स्टीफनीचं गाणं आवडायचं, त्याचे शब्दही आवडायचे, मात्र तीचं व्यक्तीमत्त्व काही क्लीक होत नव्हतं. सगळीकडून नकार पदरी पडला.  मग आठवली आई!
आईच्या सल्ल्यानुसार स्टीफनीनं न्यु यॉर्क विद्यापिठाच्या टिश स्कुल ऑफ आर्टसमध्ये 'कॉलॅबरेटीव आर्ट प्रोजेक्ट' या सन्मानाचा मानल्या जाणा-या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. संगीत रंगभुमीसह, धर्म, समाज आणि राज्यशास्त्राची सांग़ड घालत कलाक्षेत्राचा अभ्यास केल्यामुळे तीची लेखनक्षमता विलक्षण वाढली. 'एकदा का तुम्ही त्या कलेबद्दल विचार कसा करायचा हे शिकलात, की मग ती कला तुम्हाला आपोआपच आत्मसात होते!' असं स्वानुभवावरून सांगणा-या गागा ने गिटार, ऑर्गन आणि ड्रमही स्वतःहूनच शिकला. दिल्लीच्या कार्यक्रमात तीने सतारही वाजवली. जाहीर कार्यक्रमात सतार हाती घेण्याची ती पहिलीच वेळ होती हे विषेश!
दरम्यानच्या काळात विविध कार्यक्रमांसाठी ऑडिशन्स देणं सुरूच होतं. आणि दुस-या सेमिस्टरच्या नेमके आधी एका ऑडिशनमध्ये स्टीफनीची निवड झाली. कॉलेज सोडून आता संगीतक्षेत्रात करीअर करायचं असा निर्णय तीने घरी बोलून दाखवला. वडिलांनी तीला एक वर्ष आणि एक ठरावीक रक्कम देऊन न्यु यॉर्कला जाण्याची परवानगी दिली. वर्षभरात किंवा पैसे संपल्यावर - दोन्हीपैकी जे आधी होईल तोपर्यंत यश मिळालं तर ठीक, नाही तर परत येऊन उरलेलं कॉलेजचं शिक्षण पुर्ण करायचं असा करार ठरला. तोपर्यंत २००५ साल उजाडलं होतं. स्टीफनीने  अतीशय स्वस्त अशी खोली भाड्याने घेऊन आणि मोजकं तेवढंच खाऊन न्युयॉर्कचं संगीत जगत पालथं घालणं सुरू केलं.
छोटंमोठं काम मिळत गेलं. कॉलेजमधील आपल्या मित्रांना बरोबर घेऊन स्टीफनी जर्मानोटा बॅण्ड (एसजीबॅण्ड) ची स्थापना केली. वर्षभरात एसजी बॅण्डने स्थानिक स्तरावर लोकप्रियता प्राप्त केली. छोट्या बॅण्डमधूनच मोठे गायक मिळत असतात असा आजवरचा अमेरिकेचा अनुभव आहे. मल्टीप्लॅटिनम ग्रॅमी अवार्ड विनर म्युझिक प्रॉड्युसर रॉब फुसारीला एका जवळच्या व्यक्तीने एसजीबॅण्डची गीतकार स्टीफनी जर्मानोटा हे नाव सुचवलं. त्या दरम्यान पॉपस्टार क्वीन बरोबर 'रेडिओ गा गा' या गाण्यावर फुसारी आणि त्याची टीम काम करत होते. हे गाणं तेव्हा ज्याच्यात्याच्या  ओठांवर होतं. या गाण्यातील 'गा गा' या शब्दांनी फुसारीला मोहीनी घातली आणि त्याने एक दिवस सहज म्हणुन 'लेडी गागा' असा मॅसॅज स्टीफनी ला केला! ठरलं! याच नावावर तीने शिक्कामोर्तब केलं!
फुसारीबरोबर बनवलेल्या अल्बममध्ये अनेक महिने गीतकार म्हणुन मेहनत करूनही वेळेवर तीचं नाव आणि काम त्यातून काढून टाकण्यात आलं. वीस वर्षाच्या मुलीसाठी हा मोठा धक्का होता. ती घरी परतली आणि आलेलं नैराश्य लपवण्यासाठी मग वाटेल ते करायला लागली. यात बिअर बार मध्ये तोकड्या कपड्यात पोल डान्स करणे, ड्रग्स घेणे आणि शेवटी प्रेमप्रकरणही घडले. सुरवातीला या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करणा-या वडिलांनी मात्र प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं पाहून योग्य ती पावलं उचलली. लेडी स्टारलाईट या पॉप गायिकेची गाठ घालून दिली. स्टारलाईट तेव्हा १९७०च्या दशकातील गाणी आणि संगीत त्याच थाटात सादर करीत असे. गागा च्या व्यक्तीमत्त्वामध्ये तीने अमुलाग्र बदल घडवून आणले. एक करारी, विचारी, करीअर ओरिएंटेड अशी गायीका तीने गागामधून घडवली. लेडी स्टारलाईट आणि गागा यांनी मिळून अनेक ठीकाणी कार्यक्रम केले. वाईट दिवसांच्या आठवणी मागे सारून नवं आयुष्य़ सुरू करणा-या गागाच्या पुढ्यात आता सोनेरी दिवस येऊन उभे राहिले.
आधी अल्बममधुन काढून टाकण्यात आलेल्या तीच्या रचना फुसारीने अनेक म्युझिक कंपन्यांकडे पाठवल्या होत्या. त्यातूनच सोनी एटीव्ही या कंपनीने तीच्याशी गीतलेखनाचा करार केला. ब्रिटनी स्पीअर्स पासुन ते अक़ॉन पर्यंत पॉप आणि रॅप संगीताच्या दिग्गजांसाठी तीने गाणी लिहली. दरम्यान लिहलेलं गाणं उदाहरणादाखल म्हणुन दाखवत असतांनाचा गागाचा आवाज ऐकुन प्रभावीत झालेल्या 'अकॉन' ने तीला गायिका म्हणुन संधी देण्याची शिफारस केली. आणखी काय हवं?
२००७ ते २००८ दरम्यान तीने लिहलेल्या 'जस्ट डान्स' आणि 'पोकर फेस' या गाण्यांच्या लोकप्रियतेने सगळे रेकॉर्डस तोडले. या दोन्ही आणि ईतर काही रचनांसह लेडी गागाचा पहिला स्वतंत्र अल्बम 'द फेम बॉल' प्रदर्शित झाला. २००९ मध्ये 'द फेम मॉन्स्टर' आला आणि नुकताच 'बॉर्न धिस वे' रिलिज झालाय. लोकप्रियतेच्या लाटेवर विराजमान असलेल्या लेडी गागाने ईंटरनेट, फेसबुक, युट्युब या साधनांचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या कलात्मकतेने वापर करून घेतला.
आज जगभर तीची फॅन फॉलोईंग आहे. आयुष्यात आलेले चढ्-उतार आणि संघर्ष यांनी गागाला थोडे आक्रामक बनवले आहे; एकदा लेडि गागा म्हणुन रंगमंचावर पाऊल ठेवल्यावर आपण काय करू, हे स्वतः गागाही सांगु शकत नाही,ईतकं बेभान होउन ती गाणं म्हणते. शिवाय नियम तोडायला तीला आवडते. वेगवेगळे धाडसी प्रयोग तीने केले, आणि सुदैवाने तीला यशही आलंय.
काहीही असो! लेडी गागाला भारतातल्या तीच्या लक्षावधी चाहत्यांनी पहिल्यावहिल्या शो नंतरच  ' आणखी गा गा' असा कौल दिलेला आहे.

No comments:

Post a Comment