Sunday 30 October 2011

जॉनी लिव्हर

दिवाळीची धामधुम संपवून सर्वजणच आता नव्या जोमाने कामाला लागले असतील. मागचा आठवडाभर दिवाळीच्या निमित्ताने हास्यकल्लोळाचे कार्यक्रम सर्व वाहिन्यांवर चोवीस तास सुरू होते. तसेही हल्ली हिंदी असो वा मराठी, स्टॅण्ड-अप कॉमेडीला चांगलेच दिवस आले आहेत. अनेक नवे लाफ्टर चॅम्पीयन्स  आणि हास्यसम्राट दरवर्षी बनत आहेत. या सगळ्यांचं आराध्य दैवत आणि मुळातच स्टॅण्ड-अप कॉमेडीचा कायापालट करणारा विनोदाचा अनभिशिक्त चक्रवर्ती सम्राट म्हणजे जॉनी लिव्हर! केवळ हे नाव वाचून किंवा छायाचित्र पाहूनच आपल्यापैकी अनेकांच्या ओठांवर एक सुचक स्मीतहास्य नकळतपणे तराळलं असेल - यापेक्षा जास्त या अफलातून व्यक्तीमत्त्वाची जादू काय सांगावी?
गेल्या तीस वर्षाहून अधीक काळ जॉनी लिव्हर आपल्याला हसवतो आहे. येत्या जानेवारी महिन्यात तो ६३ वा वाढदिवस साजरा करेल, पण या गोष्टीवर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही ईतका तो तरूण दिसतो. जॉनी सतत हसत असतो, आणि त्याला पाहून आपणही. मात्र हसण्या-हसवण्याची ही जादू प्राप्त करण्यासाठी जॉन प्रकाशराव जनुमाला या माणसाला खुप संघर्ष करावा लागलाय.
आंध्रप्रदेशच्या ऑस्लापॅलॅट खेड्यातून गिरणी कामगार म्हणुन मुंबईत धारावीला स्थायिक झालेल्या वडिलांजवळ रहायला आला तेव्हा जॉनने शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं. आई करूणाम्मा अशिक्षित होती. हिंदी-मराठी पैकी कुठलीच भाषा येत नव्हती. मात्र मुंबई सगळ्यांना जगणं शिकवते. जॉन सतत आईबरोबर रहात असे. भाषा येत नसुनसुद्धा समोरच्या व्यक्तीबरोबर संवाद साधण्याचं आईचं कौशल्य तो कुतुहलपुर्वक न्याहाळत असे. एरवी तेलगुमिश्रीत हिंदीमध्ये शेजा-यांशी संवाद साधणारी आई, जेव्हा पंजाबी शेजारणीशी बोलते, तेव्हा तीचा स्वर कसा पटकन पंजाबी होतो; जेव्हा ती मराठी बोलते, तेव्हा तीचा आवाज कसा बदलतो, याचं जॉनला नेहमी कुतुहल वाटे. समोरच्याची लकब अचुक हेरून ती क्षणार्धात आत्मसात करण्याचं कौशल्य त्यानं आईकडूनच प्राप्त केलं. सातव्या वर्गात शाळा सोडून बसस्टॅंडवर फेरीवाल्याचं काम करावं लागलं, तेव्हा हे कसब त्याच्या कामी आलं.
समोरच्या व्यक्तीच्याच भाषेत, आणि त्याच्याच लेहज्यात त्याला वस्तु विकत घेण्याचा आग्रह करणं ही लहानग्या जॉनची खासियत बनली. बसस्टॅंडवर येणारे लोक सिनेमाचे दिवाणे असल्याचं लक्षात आल्यावर त्याने सिनेस्टार्सची हुबेहुब नक्कल करत पेन, पेन्सील आणि ईतर वस्तू विकायला सुरूवात केली. मिमिक्री आर्टिस्टची जडघडण अशी बस स्टॅंडवर होत गेली. मनोमन त्याने ठरवून टाकलं की - कलाकार व्हायचं!
मात्र घरची परिस्थीती वेगळी होती. वडिलांना आर्थीक आधाराची गरज होती. त्यांनीच पुढाकार घेऊन जॉनला हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामगाराची नोकरी मिळवून दिली. फॅक्ट्रीत काम करतांना मिमिक्रीचं भुत डोक्यातून निघुन जाईल हा वडिलांची उद्देश! मात्र झालं उलटंच! आपल्या बरोबरच्या कामगारांना विविध सिनेस्टार्सच्या नकला करून दाखवणे हा जॉनीचा आवडता छंद बनला. फॅक्ट्रीच्या एका गेट टुगेदर मध्ये अधीकारी आणि कर्मचा-यांसमोर त्याने पहिलावहीला "स्टेज परफॉर्मन्स" दिला आणि खळखळून हसणा-या हिंदुस्थान लिव्हरच्या कर्मचा-यांनीच त्याचं 'जॉनी लिव्हर' हे नामकरण केलं.
हिंदुस्थान लिव्हरच्या साथीने जॉनीची अभिनयक्षेत्रात वाटचाल सुरू झाली. त्यावेळचे गाजणारे मिमिक्री आर्टीस्ट प्रताप जानी आणि राम कुमार यांच्या पायाशी जाऊन मिमिक्रीचे धडे त्याने गिरवले. ऑर्केस्ट्राजमध्ये दोन गाण्यांमधील असलेल्या मोकळ्या वेळेत सिनेस्टार्सची नक्कल करणे हे तेव्हा मिमिक्री आर्टीस्टचं काम होतं. काही स्थानिक ऑर्केस्ट्राजमध्ये जॉनीने हे काम देखील केलं. तब्बल सात वर्षे हाच दिनक्रम ठरला. घर-फॅक्ट्री-ऑर्केस्ट्रा! फॅक्ट्री सांभाळून संध्याकाळी घाईघाईने ऑस्केस्ट्राकडे पळणा-या जॉनीला कुण्या एका अधीका-याच्या ओळखीने कल्याणजी-आनंदजी जोडीच्या ऑर्केस्ट्रामध्ये मिमिक्री आर्टीस्ट म्हणुन काम करण्याची संधी मिळाली आणि आयुष्यात एक महत्त्वाचं वळण आलं. कल्याणजी-आनंदजींच्या बरोबर जगभर शो करत फिरण्याची संधी त्याला मिळाली. अमिताभ बच्चनसह ईतर अनेक कलाकार, आणि गायक यांची ओळख झाली. त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या लकबी, सवयी, स्वभाव, आवाजाचे चढ-उतार हे सगळं त्याने जवळून पाहिलं आणि आत्मसात केलं. केवळ नक्कल करणारा किंवा  आवाज काढणारा एक कलाकार म्हणुन रहायचं नाही, हे त्यानं ठरवलं.
यासाठी स्वतःला तयार करण्याचं काम मग सुरू झालं. "चित्रपटातलेच संवाद का म्हणुन सादर करायचे? आपण स्वतः स्क्रीप्ट लिहून कार्यक्रम सादर करायला पाहिजे!" निर्णय झाला. छोटेछोटे किस्से एकमेकांत गुंफुन  आपल्या कार्यक्रमाची स्क्रीप्ट स्वतः लिहणे त्याने सुरू केले. हे किस्से तुफान लोकप्रिय झाले. प्रत्येक ऑर्केस्ट्रामधून मग जॉनी लिव्हर साठी मागणी येऊ लागली! दिवस बदलू लागले.
दरम्यान त्याने स्वतःच्या किस्स्यांची एक ध्वनिफित तयार करून प्रकाशित केली. ८० च्या दशकात या कॅसॅटने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्डस तोडले. प्रत्येक घराघरात आणि समारंभात, अनेक म्युझिक स्टोर्समध्ये, वेटींग रूम्समध्ये आणि लग्नाएवात सुद्धा हीच ध्वनिफित वाजु लागली. स्कायलॅब, मद्रासि अन्ना क्रिक़ेट, हिजरा कबड्डी, बिल्डींग मे आग सारखे किस्से आजही अनेकांना पाठ असतील. जॉनिला याच किस्स्यांसाठी स्टेज शो करण्याची मागणी येऊ लागली. त्याचे हे किस्से वापरून अनेक स्थानिक नकलाकारांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं.
तेव्हा नुकतीच नेतेगिरीची ईनिंग सुरू केलेले जेष्ट अभिनेते सुनिल दत्त यांनी जॉनीला ऑर्केस्ट्रात पाहिलं. किरकोळ शरिरयष्टीच्या, पक्क्या दाक्षिणात्य काळ्या रंगाच्या, या ठेंगण्या माणसामध्ये त्यांनी भविष्यातला बॉलीवुडचा कॉमेडियन हेरला. दर्द का रिश्ता या चित्रपटात त्याला एक छोटासा सिन मिळाला आणि जॉनीने त्याचं सोनं केलं.
बाजीगरमधल्या बाबुलाल च्या भुमिकेने लोकांच्या कानापर्यंत पोचलेल्या जॉनीला लोकांच्या मनापर्यंतही पोचतं केलं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर येणा-या जवळपास प्रत्येक चित्रपटात जॉनि लिव्हर असायचाच. त्याला भुमिकेसाठी साईन करून शुटींगला बोलवायचे, आणि 'जॉनीभाई आप देख लो क्या करना है!" असं म्हणुन अवघ्या सिनची लिखाणापासुनची जबाबदारी त्याच्यावर सोपवून लोक मोकळे व्हायला लागले. मात्र व्यवस्थीत स्क्रीप्ट आणि दिग्दर्शन नसल्यामुळे जॉनीच्या अभिनयात तोच तो पणा येऊ लागला. तशी टिकाही त्याच्यावर होउ लागली. हळूहळू जॉनीने या सगळ्यापासून स्वतःला दूर करत मोजके चित्रपट घेणं सुरू केलं. मात्र याच कालखंडाने त्याला कॉमेडी किंग बनवलं यात शंकाच नाही.
जॉनी लिव्हरने प्रसिद्धी आणि पैसा मिळवला असला तरीही गरीबीचा विसर त्याने पडू दिलेला नाहिय. अगदी छोट्याश्या खेड्यातल्या नकलाकारालाही हवी ती मदत करायला तो तयार असतो. सिने ऍण्ड टिव्ही आर्टीस्टस असोशिएशन, तसेच मिमिक्री आर्टीस्ट  असोशिएशनचा तो अध्यक्ष आहे, आणि या दोन्ही जबाबदा-या तो पुर्णवेळ पार पाडतो. विनोदाची संकल्पनाच बदलवून टाकणा-या 'द ग्रेट ईंडियन लाफ्टर चॅलॅंज' ची संकल्पना जॉनिच्याच सुपिक डोक्यातून बाहेर पडलेली होती. तसेच सुनिल पाल आणि राजु श्रीवास्तव सह 'लाफ्टर चॅलॅंज' ची पहिली बॅचच जॉनी लिव्हरच्या शिष्यपरिवारातील होती, असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. टिव्हीवर आणि सिनेमात बिझी असतांनाही जॉनीने रंगमंचाशी नातं अतुट ठेवलं. आजही जगभर त्याचे स्टेज शो होतात आणि हाउस फुल्ल गर्दी खेचतात!
चित्रपटसृष्टीत एक दिलदार, मोकळ्या मनाचा आणि कलाकाराची कदर करणारा कलाकार म्हणुन जॉनिला ओळखलं जातं. त्याचा भाऊ जिमि मोसेस हा सुद्धा कॉमेडिअन म्हणुन गाजतोय. शिवाय मुलगा जेस सुद्धा लवकरच या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
मायानगरीमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळवत असतांनाच माणसं कमावण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभतं. जॉनी लिव्हरच्या चेह-यावरील निखळ, निरागस, आणि सहज असं स्मीतहास्य त्याला हे भाग्य मोठ्या प्रमाणात लाभल्याचं द्योतकच नव्हे का?!

No comments:

Post a Comment