Saturday 15 October 2011

फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग

मुलभुत गरजांच्या अन्न-वस्त्र-निवारा या त्रयीप्रमाणे वीज -ईंटरनेट-फेसबुक हे त्रिकुटही आजच्या युवा पिढीच्या जीवनाचा अविभ्याज्य भाग झालेले आहे. इतकं की फेसबुकवर एखादा नसेल तर त्याचं भौतिक अस्तित्व नाकारलं जाईल की काय, अशी परिस्थिती आहे. या दशकातील सर्वात मोठ्या सोशल नेटवर्कच्या या जाळ्यात अवघं विश्व आज गुंतलेलं आहे. आबालवृद्धांना अक्षरशः वेड लावणा-या या फेसबुकचे आजमितीला ८५ कोटीहून अधिक ऍक्टीव युजर्स आहेत यातच काय ते सगळं आलं.
फेसबुकचा सस्थापक मार्क झुकरबर्गला वयाची तिशी गाठायला अजुन तीन वर्षाहून अधीक काळ शिल्लक असतांना १७५० अब्ज डॉलर्सच्या कुबेरखजीन्याचा मालक बनवण्याचा चमत्कार या सोशल नेटवर्कींग टुल ने करून दाखवला आहे. मात्र झुकरबर्गला पैश्याचं काही अप्रूप नाही. तो सॉफ्टवेअर्सचा दिवाना आहे. कंप्युटर दिसला की काहीतरी  उचापत्या करत राहण्याचं त्याला वेड आहे. आणि वेडी माणसंच ईतीहास घडवतात.
आज मार्क झुकरबर्ग अशा १७ लोकांमध्ये गणला जातो जे वॉरेन बफेट आणि बिल गेटसकडून सुरू करण्यात आलेल्या क्लबचे सदस्य आहेत. हा क्लब अमेरिकेतील सर्वात श्रीमंत लोकांना आपली संपत्ती दान करण्याची प्रेरणा देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. झुगरबर्ग हा या क्लबमधील वयाने सर्वात लहान सदस्य आहे. शिवाय टाईम नियतकालिकाने त्यांचा सन्मानाचा 'पर्सन ऑफ द ईयर' पुरस्कार २०१० मध्येच जाहिर केलाय.  वयाच्या अवघ्या पंचविशीत ईतकंसगळं प्राप्त करणारा झुकरबर्ग नक्की आहे तरी कोण?
लंडनजवळच्या व्हाईट प्लेन्स या शहराळलेल्या भागात राहणारे मानसोपचार तज्ञ कॅरिन आणि डेन्टीस्ट डॉ एडवर्ड झुकरबर्ग म्हणजे मार्कचे आईवडिल. या दाम्पत्याच्या पोटी आलेल्या चार अपत्यांपैकी मार्क हा जेष्ट मुलगा. लहानपणापासुनच तो कमालीचा बुद्धिमान. जगाकडे पाहण्याचा त्याचा स्वत:चा एक दृष्टिकोन होता. गणित शास्त्र या विषयांत उत्तम गुण मिळवणार्र्या मार्कने ईंग्रजीबरोबरच फ्रेंच, हिब्रु, लॅटिन आणि एन्शंट ग्रिक भाषांवरही शालेय जीवनातच प्रभुत्त्व मिळवलं. महाकाव्य 'ईलियड' मधील ऑळीच्या ओळी घडघड म्हणुन दाखवणारा त्याच्या बॅचमध्ये फक्त तोच असावा! 
शाळेत अभ्यासासाठी कंप्युटर वापरतांना 'अमुक सॉफ्टवेअर कसं काम करतं?' हा प्रश्न मार्कला नेहमी सतावायचा. साधा कंप्युटर गेम खेळतांना देखील त्या गेमच्या मागचं 'मॅकॅनिजम' काय हे विचारून तो वडिलांना त्रस्त करून सोडत असे. वडिलांनी त्याला घरच्या घरी अटारी बेसिक प्रोग्रामिंग चा कोर्स शिकवला. पण तेवढं पुरेसं नव्हतं. शेवटी वडिलांनी एका सॉफ्टवेअर डेवलपरची पार्ट टाईम शिक्षक म्हणुन नियुक्ती केली. डेव्हिड न्युमॅन त्यांचं नाव. शिक्षक महोदय तर विद्यार्थ्याची हुशारी पाहून चकितच झाले. न्युमॅन आणि मार्क यांनी मिळून झ्युकनेट नावाचं एक ईंजिन तयार केलं. आजच्या विण्डोज मॅसॅंजरचा तो पुर्वज म्हणता येइल आणि ही घटना म्हणजे फेसबुकची  मुहुर्तमेढ!
हायस्कुलमध्ये असतांना त्याने 'सिनेप्से मिडिया प्लेयर' हा मिडिया प्लेयर बनवला आणि अमेरिका ऑनलाईन या कंपनिला तो ईतका आवडला की प्रॉडक्ट विकत घेतानाच मार्कला आपल्या कंपनित नोकरी देण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. मात्र मार्कला संगणकशास्त्रात डिग्री घ्यायची होती, त्यामुळे नोकरी नाकारून त्याने हॉवर्ड विद्यापिठात प्रवेश घेतला.
हॉवर्ड विद्यापिठात संगणकशास्त्र शिकत असतांना मार्कच्या डोक्यात रोज नवनव्या कल्पना येत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ना काही उचापत्या कराव्या आणि मग त्यात अपयश यावे, हा रोजचाच कित्ता झाला होता. अश्यातच फेसमॅशची कल्पना मार्कला सुचली. हे फेसमॅश म्हणजे फेसबुकची आजोबा म्हणता येतील. हॉवर्ड विद्यापिठातील विद्यार्थांचा फोटो आणि माहिती या साईटवर मिळू लागली. फेसमॅशला पहिल्या तासाभरातच ४५० च्या वर लोकांनी भेट दिली. मात्र स्वतः शिक्षण घेत असलेल्या हॉवर्ड विद्यापिठाचीच वेबसाईट हॅक करून मार्कने त्यातील बरीच माहिती फेसमॅशवर टाकली होती. विद्यापिठाच्या दृष्टीने हा गुन्हा गंभीर होता. पदवीच्या वर्गात शिकत असतांनाच त्याच्यावर कारवाई म्हणुन विद्यापिठाने त्याला निष्कासित केलं.
मात्र मार्कचा हॅकिगमागचा उद्देश वाईट नव्हता हे कळल्यानंतर त्यांनी त्याला परत विद्यापिठात घेतलं. दरम्यान  त्याचे वर्गमित्र त्याचे सिनिअर्स झाले होते. क्रिस ह्युजेस, डस्टीन मॉर्कॉविझ आणि ईडियेरो सॅव्हॅरिन या तीन मित्रांशी संपर्कात रहाता यावे म्हणुन त्याने एक सॉफ्टवेअर बनवायचं ठरवलं. द फेसबुक सुरू झालं! तारीख होती चार फेब्रुवारी २००४!
फेसबुकची वेबसाईट जेव्हा सुरू झाली तेव्हापासूनच तिला उदंड प्रतिसाद मिळू लागला. दर दिवशी लाखालाखांनी नवनवे सदस्य नोंदले जात होते. मार्कच्या कल्पकतेच्या कौतुकारत्या जगभर ओवाळल्या जात होत्या. पण त्यामुळे त्याच्या उत्पन्नात काही भर पडत नव्हती. म्हणजे फेसबुकमधून पैसे कसे मिळवायचे हे काही त्याला कळत नव्हतं. हे उत्पन्न वाढावं यासाठी वेगवेगळय़ा मार्गानं त्याचे प्रयत्न सुरू होते. पण लक्ष्मी काही प्रसन्न होताना दिसत नव्हती.
याच काळात एका मित्राच्या घरी डिसेंबरात नाताळच्या पार्टीला गेलेला असताना मार्कचा परिचय शेरील सँडबर्ग हिच्याशी झाला. ही २००७ सालातली गोष्ट. शेरील त्या वेळी बलाढय़ अशा गुगलच्या ऑनलाईन जाहिरात विभागाची उपाध्यक्ष होती. वयानंही मार्कपेक्षा साधारण दुप्पट. गलेलठ्ठ पगार. पदानं नाही तरी कर्तृत्वानंही मोठी होती मार्कपेक्षा. पण तिथे गप्पा मारताना मार्कनं तिला विचारलं, माझ्या कंपनीत येशील का? वर तो म्हणालादेखील, काय देऊ शकीन हे माहीत नाही, माझी कंपनी कुठे जाईल ते माहीत नाही, किती यशस्वी होऊ ते सांगता येत नाही.पण आव्हान मात्र आहे.
त्याच्यानंतर जवळपास महिनाभर या दोघांत चर्चा झाली. त्याची फलनिष्पत्ती इतकीच की शेरील फेसबुकमध्ये येते म्हणाली. तिला नवं आव्हान आवडलं. शेरील फेसबुकमध्ये दाखल झाली. मार्कने तिला पद दिलं, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. तोपर्यंत २००८ सालचा मार्च महिना उजाडला होता. आज शेरील सँडबर्ग ही फेसबुकमागच्या भव्य यशामागचा सोज्वळ चेहरा आहे.
शेरीलच्या येण्यानंतर फेसबुक कंपनीचे भागभांडवल अचानक वधारुन ते ७० अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहचले. मार्कला तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील तिसऱया क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा बहुमान मिळाला. सध्या मायक्रोसॉप्टचे बिल गेटस व ओरॉकलचे लॉरी इलिसन हेच फक्त मार्कच्या वर आहेत.
फेसबुक आता सामान्यांच्या जीवनाचा भाग झाला आणि त्याची प्रत्येक छोटी छोटी गोष्टही महत्त्वाची ठरू लागली. ईतक्या मोठ्या वेबसाईटचे साईन-अप पेजपासून ते लोगोपर्यंत सर्व काही निळं. मोबाईल अप्लिकेशन आणि पॉपअप होणारे डायलॉग विंडोही निळेच ! असं का? लोकांना प्रश्न पडला. उत्तर सोप्पं आहे. मार्क हा रंगांधळा आहे, पण त्याला निळा रंग स्पष्ट दिसतो. अन्य रंगच दिसत नसल्यानं, त्यानं फेसबुकचं डिझाईन निळ्या रंगातच असावं, असा आग्रह धरला होता.
रंगांचा मार्कवर काहीच परिणाम होत नाही. निसर्गातील रंगांची उधळण त्याला समजत नाही. परंतु, आकाशाचा निळा रंग त्याला सहज दिसतो. काही वर्षांपूर्वी त्यानं स्वतःचीच रंगांची ऑनलाईन टेस्ट घेतली आणि त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला लाल आणि हिरवा रंगच दिसत नाही. निळा रंग हा त्याच्यापुरता उत्कृष्ट आणि एकमेव रंग असल्यानं, निळा रंगच निवडला.
रंग कुठलाही का असे ना! हजारो लोकांशी मैत्री करण्यासाठी फक्त एक कम्प्युटर पुरेसा आहे, अशी संकल्पना प्रत्यक्षात आणणारा मार्क फेसबुकचा हिरो ठरलाय.

No comments:

Post a Comment