Saturday 8 October 2011

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

ज्येष्ट संगीतकार पंडित यशवंत देव यांना यंदाचा सन्मानाचा लता मंगेशकर पुरस्कार लतादिदिच्या वाढदिवशी २८ सप्टेबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला,  आणि या पुरस्काराच्या मानकर्र्यांच्या यादित आणखी एक मोलाची भर पडली. प्रत्यक्ष सरस्वतीच्या नावाने दिला जाणारा, महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला हा पुरस्कार नेहमीच सगळ्यांसाठी श्रद्धेचा आणि सन्मानाचा विषय राहिलेला आहे. मात्र महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्त्सवाच्या निमित्ताने मागल्या वर्षी (२०१० मध्ये) लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना हा पुरस्कार मिळाला, तेव्हाचा मणिकांचन योग संगीतरसिकांच्या कायम स्मरणात राहील.
आज वयाच्या अठ्ठाहात्तराव्या वर्षीदेखील आवाजातील त्याच वैषिष्ट्यपुर्ण ठसक्यासह लावणी गाण्याचं सामर्थ्य सरस्वतीने फक्त सुलोचनादिदिंनाच बहाल केलेलं आहे. केवळ त्यांच्या पार्श्वगायनाने अनेक मराठी चित्रपटांना मोठं केलं. त्यांच्या घरंदाज व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव आणि संगीततपश्चर्येंचं सामर्थ्यच म्हणावं लागेल की त्यांनी गायलेली उडत्या शब्दांची लावणीदेखील कधीच सुमार वाटली नाही. श्रृंगारीक, ठसकेबाज लावणी सादर करताना त्यांनी डोक्यावरचा पदर कधी ढळू दिला नाही. शालीनता जपली. लोकसंगीताची मूल्ये जोपासताना त्यांनी आपली संस्कृतीही जपली. लावणीला 'तमाशा' तून बाहेर काढून सर्वसमावेशक बनवण्याचं श्रेय सुलोचनाबाईंच्या गाण्याला जातं.
१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचनाजींचा जन्म झाला. माहेरचे त्यांचे नाव होते सुलोचना कदम. मुंबईतील चाळ संस्कृतीत त्यांचे बालपण गेले. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता "श्रीकृष्ण बाळमेळा". याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातुन सुलोचना चव्हाण यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. मुंबई तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतांची संयुक्त राजधानी होती. त्यामुळे बाळमेळ्यात श्रीकृष्णाची भुमिका करणा-या लहानग्या सुलोचनाला याच वेळी गरब्यामध्ये कृष्णाची भूमिका करायला लागायची. पूढे गुजराती रंगभूमीवर ती काम करु लागली. मग उर्दू शिकुन 'लैला मजनू' मध्ये छोटी मजनू बनली. त्यानंतर तामीळ, पंजाबी सिनेमांमध्येही कामें केली. या दरम्यान मराठी चौथीपर्यंत शिक्षणही झालं. मराठीचं वाचन खूप होतं. व्यक्तीमत्त्व घडत गेलं.
सुलोचनाजींची मोठी बहिण स्वतः कलाक्षेत्रात काम करत नसे पण त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायची. लहान बहिणीने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. याच प्रोत्साहनातुन त्यांची गायिका होण्याची बीजं रोवली गेली. मात्र कोणतंही शास्त्रीय प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं. त्याकाळात रियाझाचं एकच माध्यम होतं, आणि ते म्हणजे -- ग्रामोफोन रेकॉर्ड!
श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. तासनतास रेकॉर्डस ऐकणार्र्या, सतत गाणी गुणगुणणार्र्या सुलोचनाला त्यांनी संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे नेलं. "कृष्ण सुदामा" या हिंदी चित्रपटाचं काम तेव्हा सुरू होतं. एक छोटासा अंतरा गाण्याची संधी मिळाली. वय होतं अवघं नऊ वर्षे.
या नंतर त्यांनी मास्टर भगवानदादांच्या अनेक चित्रपटात पार्श्वगायन केलं. मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली. करीयरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत "भोजपुरी रामायण" त्या गायल्या. मराठी व्यतिरीक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषेमध्ये भजन, गझल असे विविध प्रकार देखील हाताळले.
त्यांचे गझल गायन ऐकुन बेगम अख्तर यांनी त्यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद सुलोचनाजींना दिली होती. सुलोचनाजींचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकुन तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र आपण सुलोचनाजींच्या लावण्या जेंव्हा ऐकत असतो त्यावेळेस संगीतातील त्यांची इतर मजल थोडी दुर्लक्षित होते.
त्यांनी पहिली लावणी गायली ती आचार्य अत्रे यांच्या "हिच माझी लक्ष्मी" या चित्रपटात. संगीतकार होते वसंत देसाई आणि लावणी चित्रीत झाले होती हंसा वाडकर यांच्यावर. या गाण्याने सुलोचनाजींच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लावले.
१९५३-५४ च्या सुमारास "कलगीतुरा" या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गाण्याचं काम त्यांना मिळालं. या चित्रपटाचे संगित दिग्दर्शक होते "एस चव्हाण" म्हणजेच श्यामराव चव्हाण. पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाजींचे लग्न झाले आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. लग्नानंतर मात्र त्यांना मागे वळून पहावेच लागले नाही. शामराव चव्हाण यांनी सुलोचनाबाईंना अमुक शब्द कसा उच्चारायचा किंवा कुठल्या शब्दावर जोर द्यायचा त्याचे रितसर शिक्षण दिलं. त्यामुळे त्यांच्या लावणीत सुधारणा झाली. यजमान हेच त्यांचे गुरु होते.
यादरम्यानच "रंगल्या रात्री अशा" या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलुन गेले. त्यातुनच खर्‍या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणुन सुलोचना चव्हाण पुढे आल्या.
मग एकामागोमाग एक लावण्या मिळत गेल्या. खेळताना रंग बाईचा होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘राग नका धरू सजना’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘लाडे लाडे बाई करू नकाअशा एकापेक्षा एक सरस, ठसकेबाज लावण्या सुलोचनाजींनी गायल्या. त्यांना पहिली लावणी गायला देणारे आचार्य अत्रे यांनीच मग लावणीसम्राज्ञीहा किताब बहाल केला. 
मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटातुन त्यांनी लावणी आपल्या ठसकेबाज स्वरात सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका, खटका देण्याचे काम सुलोचनाजींइतक कुणीच उत्तम करू शकलं नाही.
लोककलावंतांप्रती असलेली आस्था आणि जनसामान्यांशी जुळलेली नाळ ही सुलोचनाबाईंच्या यशाची वेगळी बाजु म्हणावी लागेल. त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पैसाही मिळाला. कलाकार म्हणून नावलौकीक मिळाला. मात्र देवावर असलेली त्यांची श्रद्धा आणि समाजऋण फेडण्यासाठी सतत तत्पर त्यांची जागरूक वृत्ती ही त्यांची खासियत. ज्या कलेची आयुष्यभर सेवा केली त्या कलेलाच नवी ओळख देण्याचं भाग्य नटेश्वर काही मोजक्या कलावंतांनाच देतो. सुलोचनाजींनी लावणीला सन्मान मिळवून दिला. मंदिर, धार्मिक वा सामाजिक संस्था आपल्या कार्यासाठी निधी उभारण्यासाठी लावणीचे कार्यक्रम करण्याकरता त्यांना निमंत्रण देउ लागल्या यातच सर्व काय ते आले. सुलोचनाजींनी सुद्धा केवळ कलाकारांच्या जाण्या-येण्याचे प्रवासभाडे फक्त घेउन उर्वरित रक्कम कार्यासाठी दान करावी, कार्यक्रम तसंच पुरस्कारांच्या मिळणाऱ्या पैशांपैकी बराच पैसा गरीबांपर्यंत पोहोचवावा, लोककलेच्या उत्थानासाठी झटावं या सर्वांमुळे त्यांची एक वेगळी प्रतीमा जनमानसात उभी झाली.
अरुण कचरे या लोककलावंताने जेव्हा कुणाल कॅसॅटस या कंपनिची निर्मीती करून महाराष्ट्रातील लोककलांना 'ग्लोबलाईज' करण्याचा विडा उचलला, तेव्हा त्याला देखील आठवण झाली ती सुलोचना चव्हाण यांचीच! अरूण कचरेने अडत-अडखळत, थरथर कापत कसंबशी मांढरदेवीची गाणी गाण्याची विनंती सुलोचनादिदिंना केली. कलेच्या प्रेमापोटी आणि देवीच्या भक्तीसाठी सुलोचनाजींनी ती गाणी कुठलंही मानधन न घेता गायली. यानंतर दहा वर्षापर्यंत कुणाल कॅसॅटस हा सामान्य जनांच्या गळ्यातला ताईत बनला. 'डोकं फिरलंया' पासुन ते 'खंडेरायाच्या लग्नाला' पर्यंत सगळी गाणी आबालवृद्धांची पहिली पसंती झाली.
'माझं गाणं माझं जगणं' हे त्यांचं आत्मचरित्र वाचणं म्हणजे तर एक रोमांचकारी अनुभव आहे. लावणी या प्रकाराला त्यांच्या गायनाने मिळवून दिलेली मान्यता आणि यामुळेच जनमानसांच्या ह्रदयात मिळालेले स्थान त्यांना मराठी कलेच्या क्षितीजावरचे तेजस्वी नक्षत्रं बनवतात.

No comments:

Post a Comment