Monday 24 October 2011

मृत्युंजय डॉक्टर शरदकुमार दिक्षीत

"अनादि मी! अनंत मी! अवध्य मी भला! मारिल रिपु जगती असा कवण जन्मला!" अश्या शब्दांत प्रत्यक्ष काळालाच आव्हान देण्याचं सामर्थ्य सावरकरांसारख्या तेजस्वी राष्ट्रपुरूषाच्या ठायी येतं; कारण तेथे मातृभुमीप्रती असलेल्या निस्सिम भक्तीचं अधिष्टान आहे. आपल्या जन्मभुमीबद्दलची भक्ती आणि आपल्या देशबांधवांसाठी झटण्याची ईच्छा या सगळ्यांच्या बळावर मृत्युला एकदा नव्हे तर अनेकदा आव्हान देऊन पराभुत केलेलं एक चिरंजीव व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉक्टर शरदकुमार दिक्षीत.
काही क्षणातच यशस्वी शस्त्रक्रीया करण्याची जादुई क्षमता असणा-या जगातील बोटावर मोजण्याईतक्या प्लास्टीक सर्जन्समधील अग्रणी -- डॉक्टर दिक्षीत १९५८ मध्ये शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत गेले आणि नंतर तीकडे स्थायिक झाले. आज ऐशींच्या घरात आहेत. अमेरिकेतील फेअरबॅन्क्स, अलास्का येथे प्लास्टीक सर्जन म्हणुन यशस्वी कारकिर्द गाजवलेले दिक्षीत १९६८ पासून सलग भारतात येत आहेत. आजतायागत १ लाख रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. यामध्ये दुभंगलेले ओठ,तिरळेपणा,वाकडे नाक,काळे डाग यांचा समावेश आहे. सहा महिने अमेरिकेत रहायचे, आणि पाच महिने भारतात येऊन प्लास्टीक सर्जरी शिबिरांमध्ये मोफत शस्त्रक्रिया करायच्या, असा त्यांचा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. कर्तृत्त्वाच्या या कसोटी वर गेल्या अनेक वर्षापासुन डॉक्टर खरे उतरत आहेत. यासाठी त्यांनी अनेक अग्नीपरिक्षांमधून स्वतःला सिद्ध केलेलं आहे.
प्लास्टीक सर्जन म्हणुन नावलौकीक प्राप्त होत असतांनाच १९७८ मध्ये त्यांचा अपघात झाला  आणि त्यात पक्षाघाताचा झटका येऊन शरिराची उजवी बाजु निकामी झाली. तरिही हिम्मत न हरता डाव्या हातान शस्त्रक्रिया करण्याचं कसब प्राप्त केलं. १९८१ मध्ये उजवा हात काम करायला लागला आणि आशेचा किरण दिसला. पण १९८२ मध्येच स्वरयंत्राचा कर्करोग जडल्याचं निदान झालं. लहानपणापासुन सुरेल गायक असलेल्या डॉक्टरांना अवघे स्वरयंत्रच गमावावे लागले. दैव एवढ्यावरच थांबणार नव्हते. १९८८ मध्ये हृदयविकाराचा झटका आला. यातुन सावरत नाही तोच १९९४ मध्ये अहमदाबाद येथे शस्त्रक्रिया करतानाच हृदयविकाराचा दुसरा झटका आला. अमेरिकेत परतून ट्रिपल बायपास सर्जरी करावी लागली. आज केवळ १८ टक्के क्षमतेने त्यांचं हृदय कार्यरत आहे. व्हीलचेअरवर रहावे लागते. ऑक्सिजन सिलेंडर जवळ बाळगावा लागतो. स्वरयंत्रच नसल्यामुळे बोलण्यासाठी वेगळी यंत्रणा ठेवावी लागते. अशा स्थितीतही दिवसातून सलग ९ तास शस्त्रक्रिया करतात. भारतात येऊन मोफत शस्त्रक्रिया करण्याचा वसा अजुनही टाकलेला नाही.
चमत्कार, ईच्छाशक्ती, मनोबल, संघर्ष हे सगळे शद्ब थिटे पडतील असं हे जीवन. डॉक़्टर दिक्षीत मराठी माणुस आहेत. ते विदर्भातले आहेत. नागपुरला शिकलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटावा तेवढा  थोडाच आहे.
वडिल सिताराम दिक्षीत वर्धेला पोस्टमास्तर होते. आपल्या तीन मुलांना आणि तीन मुलींनाही बरोबरीनं शिक्षण दिलं. वर्धेच्या रॅडॉक हायस्कुलमधुन मॅट्रीक्युलेट झाल्यावर मधल्या डॉक्टरलोकांचा पांढराशुभ्र पोषाख, त्यांना मिळणारा पैसा आणि मानसन्मान पाहू जाता डॉक्टर बनण्यात त्यांना रस होता. मात्र मोठी बहिण स्नेहलसुद्धा डॉक्टर होणार होती. घरच्या परिस्थीतीनुसार कुण्यातरी एकाचाच डॉक्टरकीचा खर्च संभव होता. वडिलांनी मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. कारण त्यावेळी शरदकुमार यांना हैद्राबादच्या निजाम कॉलेजतर्फे बि एस्सीसाठी स्कॉलरशिप मिळाली होती. शरदकुमार हैद्राबादला रवाना झाले. मात्र वर्षभरातच स्नेहलचा डॉक्टर होण्याचा मानस बदलला आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये शरदचं डॉक्टरकिचं शिक्षण सुरु झालं. तेव्हाच्या पद्धतीनुसार ग्रॅज्युएट झाल्याबरोबर लगेच रेल्वे विभागात वैद्यकिय अधीकारी म्हणुन नोकरी लागली. दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या परिक्षा देणं सुरूच होतं.
सन १९५८ मध्ये आर्मी मेडिकल कॉर्प्सची परिक्षा शरदकुमार उत्तीर्ण झाले,  आणि नेमके याच दरम्यान अमेरिकन मेडिकल असोशिएशनतर्फे दिली जाणारी चार वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठीही त्यांची निवड झाली. सेनेमध्ये भरती व्हावं, की अमेरिकेत जावं अशी द्वीधा मनस्थीती निर्माण झाली. नोकरी ही कुटुंबाची आर्थीक गरज होती. मात्र अमेरिकेत गेल्यास अनुभवाचं भांडार खुलं होणार होतं. शिवाय थोडेसे का असेना, मानधन मिळणारच होते. त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी सहा हजार रूपयांची गरज होती. शरदकुमारांनी नवी नोकरी पत्करली. सहा महिन्यात पाच हजार रूपये जमवले. एक हजार रूपये उसने घेतले आणि विस्कॉन्सीन गाठले. ल्युथरॉन हॉस्पीटल या संस्थेत रहिवासी डॉक्टर म्हणुन काम करू लागले. याबद्दल त्यांना २५० डॉलर्स मानधन मिळत असे. त्यातील २०० डॉलर्स ते घरी पाठवत असत.
प्लास्टीक सर्जरी! कमी कालावधीत रुग्णावर दर्शनी आणि आयुष्यभरासाठी परिणाम करणारं आणि शास्त्र्! शिवाय यात सर्जनशिलतेला वाव मिळणार होता. डॉक्टरांनी डेट्रॉईटच्या ग्रेस हॉस्पीटलमध्ये प्लास्टीक सर्जरीचा कोर्स केला. मात्र भारतात परतण्याची ईच्छा त्यांना स्वस्थ बसु देइनाशी झाली. देशासाठी काहीतरी करायचं होतं. चाळीस हजार डॉलस मिळकत देणारी डेट्रॉईट क्लीनिकची नोकरीही मग निरर्थक वाटू लागली.
भारतातील डॉक्टर मित्रांनी मात्र शरदकुमारांना अमेरिकेतच राहण्याचा सल्ला दिला. मुंबईच्या त्यांच्या मित्रांनी भारतात मोफत प्लास्टीक सर्जरीची शिबिरं आयोजीत करण्याचं ठरवलं. १९६८ साली पहिलं शिबिर संपन्न झालं आणि डॉक्टर दिक्षितांची वार्षीक वारी तेव्हापासुन चुकली नाही. एका दिवसात ३० शस्त्रक्रिया या हिशोबाने ते वर्षातून पाच महिन्यांपर्यंत भारतात कार्य करत. शस्त्रक्रियेसाठी लागणारं साहित्य, औषधं, ईंजेक्शन्स, हे  सगळं डॉक़्टर स्वतः आणतात. डॉ.दीक्षित म्हणतात 'काही लोक भजन करून मनःशांती मिळवतात आपण ईश्वरी सेवा समजून हे कार्य करतो '
वैयक्तीक आयुष्यातही त्यांना अनेक आघात सहन करावे लागलेत. १९६१ मध्ये विस्कॉसिनला शिक्षण घेत असतांना त्यांनी विल्डा पिटरसन यांच्याशी केलेला विवाह चार वर्षापर्यंतच टिकला. मुलगा शरद ज्युनिअर आणि मुलगी शारी यांचे पालकत्त्व त्यांच्या आईला मिळाले. मुलं मोठी झालीत. संगिताचा वारसा मुलाने जपलाय. त्याचा स्वतःचा बॅण्ड आहे. शिवाय मुलगीही मॅनॅजमेन्ट गुरू आहे. १९७९ मध्ये त्यांनी तपती बोस या आपल्या पेशंटशी दुसरा विवाह केला. मात्र त्यानंतर डॉक्टरांना स्वरयंत्राचा कॅन्सर जडला आणि त्यांच्यापेक्षा मुळातच वयाने २५ वर्ष लहान असलेल्या पत्नीचे आयुष्य़ सावरल्या जावे म्हणुन त्यांनी तीला घटस्फोट दिला. आज डॉक्टर एकटे राहतात. दररोजची पुजा, स्वतःचे जेवण, कपडे धुण्यापासुन कामे ते स्वतः करतात. चालण्यासाठी भिंतींचा आधार घेतात. मोकळ्या वेळात मराठी गाणी ऐकतात. भगवद्द्गीता वाचतात.
अपघातानंतर पक्षाघातामुळे त्यांची नोकरी गेली. अमेरिकेत त्यांना अपंग गणले जाते. मात्र हिंम्मत न हरता त्यांनी कॉस्मेटीक सर्जरीच्या तीन फेलोशिप मिळवल्या. विश्वविख्यात कॉस्मेटिक सर्जन्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ब्रुकलीनच्या किंग्स काउंटी हॉस्पीटलमध्ये अध्यापकाची नोकरी पत्करली, तर स्वरयंत्राचा कॅन्सर झाला आणि वाचाच गमावावी लागली. काही दिवस ईलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे बोलणा-य़ा डॉक्टरांनी नंतर श्वासनलीकांच्या हालचालींना विषिष्टरित्या नियंत्रीत करून बोलण्याची कला अवगत केली. पाठोपाठ हृदयविकाराचे दोन झटके आले. ट्रीपल बायपास सर्जरी झाली. तज्ञांनी हृदयारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र आता पुन्हा शस्त्रक्रिया करायची नाही, हे डॉक्टरांनी ठरवलं आहे. मृत्यु, वेळ आणि रोगांशी त्यांची लढाई आजही सुरूच आहे.
मोफत सर्जरीचा आपला नियम अखंड सुरू रहावा म्हणुन त्यांनी आपल्या जीवन विम्यावर दिड कोटी डॉलर्सचा ट्रस्ट बनवला आहे. प्रोजेक्ट ईंडिया नावाच्या या प्रकल्पासाठी त्यांनी 'डॉक्टर शरदकुमार दिक्षीत फंड' सुद्धा उभा केला आहे. अमेरिकेतील अनेक डॉक्टरांनी सढळ हाताने मदत केली आहे. पैशाची योग्य गुंतवणुक करून त्यांनी आयुष्यभर आपला सेवायज्ञ सुरू ठेवण्याची सोय करून ठेवली आहे. वैद्यकिय क्षेत्रातील नोबेलसाठी आजवर सहा वेळा त्यांचे नामांकन झाले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिलाय.
मात्र पुरस्कारांची कोणतीच अपेक्षा न ठेवता, ऐवढ्या मोठ्या व्याधींशी झुंजून मिळवलेले आयुष्य यापुढेही गरिबांच्या सेवेसाठीच व्यतीत करण्याच्या वेडाने झपाटलेले हे झाड अजूनही उंचच उंच वाढत आहे.

No comments:

Post a Comment