Tuesday 18 October 2011

तवक्कुल करमान

जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त सन्मानाचा मानला गेलेला नोबेल शांतता पुरस्कार या वर्षी तीन महिलांना संयुक्तपणे जाहिर झाला. जागतीक महिला दिन साजरा करण्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणुन महिला शक्तीला समर्पीत असलेल्या २०११ या वर्षाची यशस्वी सांगता आता या तीन तेजस्वीनिंना नोबेल शांतता पुरस्कार देऊन होइल. लायबेरियाच्या महिला अध्यक्ष एलेन जॉन्सन सरलीफ, महिला सबलीकरणासाठी लढणाऱ्या लायबेरियाच्याच लेमाह बोवी आणि येमेनच्या पत्रकार आणि महिला हक्क कार्यकर्त्या तवक्कुल करमान यांना हा पुरस्कार जाहीर झालाय.
पुरस्कारांच्या ईतर दोन मानकर्र्यांपेक्षा तवक्कुल करमान हे नाव विषेश आहे. ३२ वर्षांची तवक्कुल शांततेचं नोबेल मिळवणार्र्यांपैकी सर्वात कमी वयाची महिला आहे. येमेनसारख्या कट्टरतावादी देशात महिलांना बुरख्यातून बाहेर आणण्यासाठी सरकारवर हल्ला चढवणं, निवडणुका लढवणं, पत्रकारिता करणं ही गोष्ट साधी नाही. पण, तवक्कुल करमान झुंजते आहे. लढते आहे. सरकार कधी तिला समज देते तर कधी धमकावते, पण मानवी हक्कांसाठी तिचा आवाज बुलंद आहे. कारण लढाऊ वृत्ती तिच्या रक्तातच आहे.
तवक्कुलने जन्मापासून तीच्या देशावर एकच सत्ता पाहिली आहे  - अली अब्दुल्ला सालेह! हा हुकुमशहा १९७८ पासून तिथं राज्य करतो आहे. आलिशान महाल, महागड्या गाड्या, हजारो कोटी रुपयांचा बँक बॅलन्स, स्वत:ची खासगी विमाने उडविणारे सत्ताधीश आणि खपाटीला गेलेले पोट घेऊन चार दाण्यांसाठी रस्तोरस्ती हिंडणारी सामान्य जनता हे अरब जगतातील नेहमीचंच चित्र. लहानपणापासून ती हेच बघत आली आहे. तवक्कुलचे वडिल अब्देल सलाम करमान अल मेखलाफी येमेनमधील वरिष्ट कायदातज्ञ होते. सालेहच्या राजवटीत काही काळ कायदामंत्री म्हणुन काम करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली होती. मात्र कायद्याची वरचेवर होणारी गळचेपी पाहून त्यांनी हे पद सोडलं. दक्षीण येमेन मधील तैझ प्रांतातील आपल्या कसब्यापुरतं राजकारण करण्यातच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं. मात्र आपल्या मुलांना मात्र मानवाधिकार आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी आवर्जुन शिकवलं. मोठा मुलगा तारिक हा संवेदनशिल कवी झाला. मुलगी तवक्कुलने मात्र हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्याचं धाडस दाखवलं.
अरबी भाषेत तवक्कुल म्हणजे ईश्वराप्रती असलेली निष्टा, विश्वास! अगदी हाच विश्वास येमेनमधील महिलांनी आणि युवकांनी तीच्यावर टाकला. या वर्षाच्या सुरवातीला झालेल्या प्रचंड जन  आंदोलनानंतर सालेह यांनी पायऊतार होण्याची तयारी दाखवली, यातच तवक्कुलचं यश आहे.
खरं पाहिलं तर अरबी जगतात सध्या बदलाचे वारे वाह्त आहेत. बहारीन, येमेन आणि लीबिया या तीन देशांतील जनतेची प्रस्थापित सरकारच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र ईतर अरब देशातील रक्ताळलेल्या आंदोलनापेक्षा येमेनमधील आंदोलनाला मानवी मुल्य आणि शांततेची बैठक प्राप्त झाली आहे. येमेनमधील आंदोलनाला ट्युनिशिया आणि इजिप्तप्रमाणे हिंसेचे गालबोट अद्याप लागलेले नाही. याचं श्रेय तवक्कुलच्या कल्पकतेला जातं. सरकारविरोधात घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या हातात असलेले बॅनर, डोक्यावर बांधलेले हेडबँड्स जाणीवपूर्वक गुलाबी रंगाची निवडण्यात आली आहेत. सालेह यांनी सत्ता सोडावी, अशी मागणी आंदोलकांकडून होत आहे. 'सालेह यांनी प्रमाणिकपणे राजकीय सुधारणा राबवाव्यात अन्यथा आम्ही त्यांचे सरकार उलथवून लावू,' अशी घोषणा विरोधी पक्षाने केली आहे. मुळात पत्रकार असलेली तवक्कुल अल ईस्लाहविरोधी पक्षाची सदस्यही आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बाळकडू तवक्कुलला वडिलांकडून मिळाले आहे. त्या स्वातंत्र्याचा संकोच येमेनमध्ये होवू नये ही तिची मागणी आहे. गेली अनेक वर्षे ती लढते आहे. तीची मागणी साधी आहे. एक वर्तमानपत्र आणि रेडिओ स्टेशन सुरू करायचे आहे. पण सरकार काही परवानगी देत नाही. लडाई जारी है!
अरब राष्ट्रांतील उठावांत महिला आणि इस्लाम यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय तवक्कुलच्या नेतृत्त्वाखाली जनतेने केलेल्या आंदोलनातून आला. येमेनसारख्या रूढीवादी विचारांच्या देशांत महिलांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून उठावात सहभाग घेतला. ईस्लामने महिलांसाठी ठरवलेला पोषाख म्हणजे 'नकाब' हा त्यांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य मारण्यासाठी बनवलेलं अवजार नाही, हे तीनं जनमानसांवर ठसवलं. नकाब काळाच असला पाहिजे, हा अलीखीत नियमही तीने आधी स्वतःपुरता आणि नंतर अनेकांसाठी कायमचा बंद केला. त्यापेक्षा रंगिबेरंगी रूमाल वापरावे, चेहरा लपवण्यापेक्षा कोरड्या हवेपासून त्याचं संरक्षण म्हणुन हे रूमाल बांधावे असा विचार येमेनमध्ये मांडणं म्हणजे मोठंच हिमतीचं काम होतं. याच्या परिणामस्वरूप २०१० मध्ये एका रूढीवादी महिलेनेच तिच्यावर जांभियाने जीवघेणा हल्लाही केला होता. त्यातून तवक्कूल थोडक्यात बचावली. लडाई फिर भी जारी है.
२००४ मध्ये तवक्कूलने पहिल्यांदा नकाब न घालता एक पत्रकारपरिषद संबोधीत केली, आणि तीचं नाव चर्चेत आलं. २००५ मध्ये 'वुमज जर्नस्लिस्टस विदाउट चेन्स' ही संघटना स्थापन करून तीने स्वतंत्र पत्रकारिता करू ईच्छीणार्र्या महिलांचं संघठन सुरू केलं. येमेनमध्ये एस एम एस द्वारे बातम्या देणार्र्या न्युज सर्व्व्हीसेस वर तेव्हा बंदी होती. या बंदिच्या विरोधात तीने आवाज उठवला. सरकारने ईतर सर्व न्युज सर्वीसेसला येमेनमध्ये कार्य करण्याची परवानगी दिली, मात्र तवक्कुलच्या 'वुमज जर्नस्लिस्टस विदाउट चेन्स' द्वारे संचालीत सर्व्हीसवर बंदी कायम ठेवली. संघर्ष मग अधीकच तिव्र झाला. २००७ मध्ये तर येमेन सरकारने पत्रकारीतेची केलेली गळचेपी यावर एक भलामोठा अभ्यासच तीने प्रकाशित केला. २००७ पासून ते आजतागायत येमेनची राजधानी सना येथीच 'चेंज स्क्वेअर' मध्ये कित्येकदा तरी तीने धरणे  आंदोलनं, शांततापुर्ण निदर्शनं आणि सरकारविरोधी घोषणांचे फलक दाखवले आहेत. लडाई अभी भी जारी है.
महिला हक्क आणि पत्रकारीते बरोबरच येमेनच्या युवकांना संघटीत करून  आंदोलनासाठी सज्ज करण्यामागे तवक्कुलचं कर्तृत्त्व मोठं आहे. येमेनमध्ये ४६ टक्के लोकसंख्या युवकांची आहे. देशात अल्-कायदाचे अस्तित्व वाढत आहे. रायफल मिरविणे ही येथील एक फॅशन होऊन बसली आहे. मानवी हक्क आणि स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. या सगळया घटनांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. नेहमीप्रमाणेच भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरीबी हे अरब जगतातील शाप येमेनच्याही माथ्यावर आहेतच. या सगळ्या दुष्टचक्रातून युवा पिढीला बाहेर काढण्यासाठी तवक्कुल झटते आहे. स्वतः तीन मुलांची आई असल्यामुळे युवा पिढीचे हित कशात आहे हे ती जाणते.
२००७ पासून सुरू झालेल्या या जन आंदोलनाने जानेवारी २०११ मध्ये ईजिप्त आणि टयुनिशियातील 'जास्मीन जनसंघर्षापासून' (जन आंदोलनाला दिलेलं ट्युनिशिअन नाव) प्रेरणा घेऊन  आक्रामक रूप धारण केलं. २४ जानेवारीला तीला अटक करण्यात आली. कुठल्याही फौजदारी आरोपपत्राशिवाय तीन दिवस साखळदंडामध्ये बांधून ठेवण्यात आलं. मात्र २९ जानेवारीला सुटका झाल्याबरोबर लगेच ३ फेब्रुवारीला 'डे ऑफ रेज' (संताप दिवस) पाळायचं आवाहन करून तवक्कुलने पुन्हा सरकार विरोधात रणशिंग फुंकलेच. यात तवक्कुलचे पती महंमद अल निहमीचाही सहभाग होता, हे उल्लेखनीय. या दरम्यान गार्डिअन, न्यु यॉर्क टाईम्स सारख्या वर्तमानपत्रांना ती संपादकीय लिहत राहिली. त्या माध्यमातून जगभर तीचा आवाज पोचत राहिला. त्यामुळे सरकारवर प्रचंड आंतरराष्ट्रीय दबाव येत गेला. यानंतर अनेकदा  अटक आणि सुटकेचं सत्र झालं. जीवाने मारण्याच्या धमक्याही आल्या. मात्र लडाई जारी रही. नुकतंच सालेह यांनी पायऊतार होण्याची तयारी दर्शवली आहे.
आजुबाजुच्या अरबस्थानात रक्तपात होत असतांना येमेन मध्ये शांततेच्या मार्गाने क्रांती घडवून आणण्याचं जगावेगळं कार्य केल्याबद्दल मिळालेला नोबेल पुरस्कार हा येमेनमधील तरुणांच्या क्रांतीला आणि तेथील जनतेला अर्पण करीत असल्याची प्रतिक्रिया करमान यांनी दिली, तेव्हा प्रत्येक येमेनियन युवकाच्या डोळ्यात नोबेल मिळाल्याचं समाधान झळकलं असेल.

No comments:

Post a Comment