Wednesday 30 November 2011

नृत्यदिग्दर्शनातील 'सुबल' सरकार

कलकत्त्यावरून एक मुलगा सुमारे साठ वर्षापुर्वी मुंबईत आला. नृत्याची त्याला आवड होती, कलाकार बनण्याची ईच्छाही! मुंबई नगरीने त्याची परिक्षा घेणं सुरू केलं.  फेरीवाला, फळविक्रेता बनुन त्याने रेल्वे स्टेशनवर दिवस काढले. मात्र हार मानली नाही. कारण त्याच्या नावातच 'बल' होतं.
हाल-अपेष्टा सोसुन आलेलं मनोबल, कलेची तपस्या करून आलेलं तपोबल, आणि ईश्वरावरील अतुट श्रद्धेमुळे आलेलं आत्मबल या सगळ्यांनी त्याचं 'सुबल' हे नाव सार्थक केलं. एक दिवस सुबल हा मुलगा सरकार बनला! मराठी चित्रपटातील आजवरचा सगळ्यांत मोठा नृत्यदिग्दर्शक! सुबल सरकार!  त्यांच्या जाण्याने पदन्यासाचे पर्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
सुबलदांचं आयुष्य म्हणजे एक चित्रपटच. अनेक अतर्क्‍य गोष्टी त्यात आहेत. त्याला असंख्य वळणं आहेत. बांग्लादेशातल्या कोणत्या खेड्यात नेमका कुठल्या दिवशी त्यांचा जन्म झाला हे त्यांच्याही लक्षात नव्हतंच कधी. बहुधा १९३५ साली जन्म झाला असावा. देशाची फाळणी झाली आणि पुर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मधून त्यांना निर्वासित म्हणुन भारतात यावं लागलं. घरची परिस्थीती फारच बेताची होती, त्यातही आता बेघर व्हायची वेळ आली. कलकत्यातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये दिवस कंठतांना आपल्या खेड्यातील घरात केलेला नृत्याचा सराव नऊ दहा वर्षाच्या सुबलला खुप आठवत असे. नृत्याची आवड कशी लागली हे माहिती नाही, मात्र नृत्याशिवाय आणखी कश्याचीही आवड लागलीच नाही, हे देखील तेवढंच खरं.
जवळपास दहा वर्षं वेगवेगळ्या "कॅंप'मध्ये राहून काढली. हे जिणं शेवटी असह्य झालं आणि एके दिवशी आई-वडिलांच्या पाया पडून "थोडंसं फिरून येतो" असं सांगुन थेट रेल्वे स्टेशन गाठलं. मुंबईची गाडी पकडली.
त्या काळात मुंबईत पळून येणाऱ्या बंगाली मुलांना हेरून त्यांना कामाला लावण्यासाठी एक "टीम'च कार्यरत होती. दुसऱ्याच दिवसापासून त्यांना फेरीवाल्याचं काम मिळालं. एखाद्या स्टुडिओसमोर उभे राहून फळं विकायची! जातायेता कुणी दिसतंय का?, ते पहायला. कलाकारांना आपल्याच तो-यात जाता-येतांना पाहून सोळा सतरा वर्षाचं ते शिडशिडित पोर हरखुन जायचं. त्याला वाटायचं की आपणच या सगळ्यांना पाहतोय. मात्र त्याच्याकडेही कुणीतरी पहात होतं.
एक दिवस व्हीटी स्टेशनबाहेर एके दिवशी चिकू विकत बसला असतांना एक गाडी समोर येऊन थांबली. त्यातून एक उंच, हॅट घातलेला माणूस बाहेर पडला. "चिकू कैसे दिया?' हा त्याचा प्रश्‍न. "छह आना डझन।" "घर से भागके आया क्‍या ?' त्या व्यक्तीचा दुसरा प्रश्‍न. मुलाने होकारार्थी मान डोलावली. तेव्हा या व्यक्तीनं त्याला चिकूच्या टोपली सकट गाडीत बसायला लावलं आणि आपल्या घरी आणलं. हे सर्व घडेपर्यंत आपण ज्या व्यक्तीशी बोलतो आहोत, ती व्यक्ती म्हणजे सचिन शंकर आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती. या काळातील कलासृष्टी गाजवणारा नृत्यदिग्दर्शक! सचिन शंकर म्हणजे कलाक्षेत्रात येण्याचा महामार्गच! नशिब फळफळलं आणि हा महामार्ग सुबलला मिळाला.
सचिनदांच्या किचनमध्ये सुबलची राहण्याची व्यवस्था झाली. त्यांच्या सहवासात कलाक्षेत्राचा परिचय जवळून होत गेला. खरं तर ते काही सिनेमातले हीरो नव्हते; पण ते रस्त्यावर उतरले की सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे वळून पाहायचे. तेव्हा नृत्यदिग्दर्शक बनण्यामागचं ग्लॅमर सुबलच्या लक्षात आलं. त्यांच्या अनेक गोष्टींची नक्कल करायला मग त्यानं सुरवात केली. पांढरे कपडे हा देखील त्यातलाच एक भाग. पुढे ही सुबलदांची ओळख बनली. पांढरा पायजमा, पांढरा कुर्ता !
सचिनदांच्या हाताखाली नृत्याचे धडे गिरवतांना त्यांच्यासारखाच दिसणारा, तसेच कपडे घालणारा मुलगा कधी  'एस.एस.नं. २' बनला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. 'बॅले' ही तेव्हा सचिन शंकर यांची खासियत होती. त्यांच्या बॅले ट्रुपमध्ये डान्सरचं, आणि नंतर सहायक नृत्यदिग्दर्शकाचं काम सुबलदांना मिळालं. देशभर दौरे झाले. विदेशात जाण्याचीही संधी मिळाली. देशात फिरत असतांना सामान्य माणसाचे लोकनृत्यावर जास्त प्रेम असते ही जाणीव त्यांना झाली. मनात आपोआपच लोकनृत्यप्रकारांप्रती आकर्षण निर्माण झालं.
हेलसिंकीच्या दौऱ्यावर असतांना एक दिवस कोळी नृत्य करायचं होतं. त्यासाठी एक जण त्यांच्याकडे लुंगी मागायला आला. लुंगी दिल्यावर त्यानं टोपी मागितली. मग बनियन मागितलं. त्याच्या मागण्या काही संपत नव्हत्या. आता आणखी मी काय देणं बाकी आहे, असे भाव चेहऱ्यावर आणुन सुबलदांनी एक रागीट लुक त्या व्यक्तीला दिला आणि तो माणुस पसार झाला. कार्यक्रम सुरू झाला. सुबलदांनी दिलेल्या कपड्यातल्या त्या माणसाने "होशियार' असा नारा दिला आणि नंतर अख्खं स्टेडियम जागच्या जागी उभं राहिलं. सात-आठ मिनिटं हा माणूस गायला आणि अवघा आसमंत त्यानं भारून टाकला. हा माणूस दुसरातिसरा कोणी नसून होते ते शाहीर अमर शेख!
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सुबलदांना महान व्यक्तिमत्त्वं भेटत गेली, त्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे अमर शेख. त्यांच्या माध्यमातून सुबलदांना सामान्य जनतेचं जीणं जाणण्याची संधी मिळणार होती. त्यांच्याकरीता पुर्णतः  अपरिचीत अश्या महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी त्यांचा परिचय होणार होता. बंगाली-हिंदीत बोलणारे सुबल सरकार  आता अस्खलीत मराठीत बोलणारे 'दद्दू' होणार होते. यासाठी सचिन शंकर यांची साथ मात्र सोडावी लागणार होती.
"आप का पैर मेरे हक का पैर है । जब मैं चाहूँ तब नतमस्तक हो जाऊँगा ।" या शब्दात त्यांनी आपल्या पित्यासमान असलेल्या गुरूचा निरोप घेतला आणि शाहीरांकडे काम सुरू केलं. सचिनदांकडे त्यांना मिळायचे चाळीस रूपये! तर शाहिरांच्या फडात मिळायचे चार रूपये! मात्र हा 'घाट्याचा सौदा' त्यांनी सहर्ष स्विकारला.
शाहिरांमुळे सुबलदा अख्खा महाराष्ट्र पालथा घालू शकले. कॉ. डांगे, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे अशा मोठमोठ्या माणसांचा सहवास त्यांना मिळाला. गावोगावी दौरा केल्यामुळेच त्यांना मराठी माणसाची नस ओळखता आली. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा होता. सुबलदां केवळ याच लढ्यात नव्हे, तर गिरणी कामगारांच्या लढ्यात धरणे, मोर्चा, उपोषण अशा विविध अंगाने ते सहभागी झाले होते. महाराष्ट्रावर त्यांनी भरभरून प्रेम केलं. आणि महाराष्ट्रानेही त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं.
एके ठिकाणी स्थिर राहणं हा सुबलदांचा स्वभाव नव्हता. म्हणूनच अमर शेख यांच्याबरोबर काम करून झाल्यानंतर स्वतःची "सुबल सरकार डान्स युनिट' ही संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे "माझं गाव' हा बॅले सादर केला जायचा; पण मनानं कलावंत असणाऱ्या सुबलदांना आर्थिक गणितं सोडवता आली नाहीत आणि ही कंपनी त्यांना बंद करावी लागली. मग अर्थार्जनासाठी पुढे त्यांनी "ग्रुप डान्सर' म्हणून नवीन भूमिका स्वीकारली.
अश्यातच एक दिवस निर्माते अशोक ताटे यांनी त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटातील चार गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी दिली. नृत्यदिग्दर्शक म्हणुन त्यांच्या प्रवासाला प्रारंभ झाला. मग काय झालं तो ईतीहासच आहे!
अगदी भालजी पेंढारकर, राजा ठाकूर, हृषीकेश मुखर्जी यांच्यापासून दादा कोंडकेंपर्यंतच्या सर्व दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. 'राजश्री प्रॉडक्‍शन' चे तब्बल १७ चित्रपट केले. दाक्षिणात्य भाषा सोडल्या तर इतर सर्व प्रादेशिक भाषांमधल्या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं. शेकडो कलाकारांना नाचविलं. एक काळ असा होता की सुबल सरकार यांच्याशिवाय एकही मराठी सिनेमा होत नसे. १९६०-७० च्या दशकापासून अगदी २०१० पर्यंत प्रत्येक मराठी दिग्दर्शक, निर्मात्याबरोबर सुबलदांनी काम केलं. त्याचं फळही मिळालं. तब्बल सहा राज्य चित्रपट पुरस्कार त्यांच्या वाट्याला आले. दादासाहेब फाळके अकादमीने त्यांचा 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मान केला तर, राज्य सरकारने त्यांना सांस्कृतिक पुरस्काराने गौरवले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार त्यांना २००७ साली देण्यात आला. यावर्षी (२०११) महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवले. रसिकांचं प्रेम मिळालं. आज त्यांचा मुलगा आणि मुलगी या क्षेत्रात खूप चांगलं काम करताहेत.
सुबलदांचा पुनर्जन्मावर विश्वास असल्यामुळे ते म्हणायचे की, मला पुढचा जन्म याच महाराष्ट्रात मिळो. त्यांची ही ईच्छा पुर्ण व्हावी हीच त्यांना श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment